बांध्यावरच्या घाटावरील पूल
मनाचा तळ अलगद सांधतो
डोळ्यांतील अश्रूंचा थेंब
हलकेच अनामिक होतो
भावनांच्या बेरजेत का
वजाचा हिशोब अधिक लागतो
ओल भरल्या अंतरात तेव्हाच
भाव आल्हाद व्याकुळ होतो
जन्मोजन्मीच्या रहाट संसारात
का जीव तिचाच कळवळतो
स्वप्नांच्या मखमली शालीवर
काटेरी सल अलगद बोचतो
रोज नव्याने मरते ती संसारी
तिच्या किंमतीचा हिशोब नसतो
रडणाऱ्या थेंबातही तिचा वाटा
हक्काचा असा कधी नसतो
युगे लोटली काळ पावली
तिचा देह संसारात गुरफटतो
मनाच्या काच तड्यावर एक
ओरखडा मग सहज उमटतो
संसार असतो तिचा नेहमी
कर्तव्य भाव ओलावतो
येते मरणं अकल्पित अवचित
शांत देह तेव्हाच तिचा होतो
न कळते वेल्हाळ स्त्री कधी
मंगळसूत्र मण्यांत धागा रुततो
स्त्री जन्मा ही कहाणी तुझी खरी
स्त्री नावं तिचे अध्याय कुठे न हा संपतो
नाजूक फुलांच्या बागेत भाव
मोहक मलमली अलवार गंधाळतो
अजूनही आहेस बाई तू धाकात
दुःख काळजात निःशब्द भाव स्तब्धतो
सप्तपदीत बांधली तू अलगद
भावनांचा डोह होतो मलीन
स्त्री असते तू कोमल मर्यादेत
सीता ही न सुटली या फेऱ्यातून
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply