![p-45386-northeast-map](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2018/02/p-45386-northeast-map-600x381.jpg)
ईशान्य भारतातील लहान राज्यात बांगलादेशी घुसखोरांचे आक्रमण हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज
मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणुका त्रिपुरात 18 फेब्रुवारीला, मेघालय व नागालँड या दोन राज्यांत 27 फेब्रुवारीला होतिल. मात्र याला मिडीयात,कुठल्या वाहिन्यांमध्ये खास स्थान मिळाले नाही. या तिन्ही विधानसभांच्या सदस्यांची संख्या प्रत्येकी 60 इतकी आहे. ईशान्येकडच्या राज्यांची एकूण सदस्य संख्या बंगालपेक्षाही कमी आहे; पण कितीही लहान असली, तरी ती भारतीय संघराज्यातील सीमावर्ती राज्ये आहेत. म्हणूनच राष्ट्रीय राजकारण व उलथापालथीत त्यांना त्यांचे न्याय्य स्थान असले पाहिजे. सहा दशके तिथे कुठला ना कुठला सशस्त्र उठाव व घातपाती कारवाया बळावत गेलेल्या आहेत.मात्र आज तिथे सर्वात भयंकर समस्या आहे ती बांगलादेशी घुसखोरीची.
घुसखोरीची ही समस्या आसामच्या मैदानी भागांत अधिक आहे. कारण डोंगराळ पूर्वांचलामध्ये राहणाऱ्या जमातींनी सशस्त्र संघर्ष करून, त्यांच्या प्रदेशात होणारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. पण तेथेही बांगलादेशींनी सीमेवर व्यापारासाठी येणाऱ्या या जमातींच्या महिलांशी संबंध जोडून, विवाह करून व पत्नीच्या नावाने जमिनी घेऊन शिरकाव करण्याचा एक यशस्वी प्रयोग चालू केलेला आहे.
नागालँडचे बांगलादेशीकरण
नागा जमातींपेक्षा ‘बांगलादेशी घुसखोर’ हीच या राज्यातील सर्वात मोठी जमात ठरत आहे. नागालँडमध्ये अनधिकृतपणे राहत असलेल्या बांगलादेशींवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालावा, असे आवाहन नागा परिषदेच्या पब्लिक अॅक्शन कमिटीने केले. पण त्यामुळे फ़ारसे काही निष्पन झाले नाही.
भारतीय सैन्याने ३० वर्षे केलेल्या बंडखोरीविरोधी कारवाईमुळे बंडखोरांना भारत सरकारशी वाटाघाटी करणे भाग पडले. बंडखोर आणि भारतीय सैन्यामध्ये गेली अनेक वर्षे शस्त्रसंधी (सीझफायर) लागू आहे. यामुळे शांतता प्रस्थापित झाली, मात्र नागालँडमधे बांगलादेशी घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. नागांमध्येही विविध प्रकारच्या तीस जातीजमाती असून त्या स्वतंत्र नावांनी ओळखल्या जातात.
भारतात सर्वात जास्त घुसखोरी
नागालँडची लोकसंख्यावाढीचे प्रमाण संपूर्ण भारतात सर्वात जास्त होते. अर्थातच ही वाढ बांगलादेशी घुसखोरांमुळे होती.घुसखोरांची संख्या नागालँड सरकारच्या मोजदादीप्रमाणे दोन लाख आणि नागा बंडखोरांच्या ‘एनएससीएन – आयझॅक – मुईवा गटा’च्या म्हणण्याप्रमाणे ती तीन लाख आहे. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असे की, हे लोक फक्त बांगलादेशातून आलेले नसून शेजारील आसामातून ओळखपत्र मिळवुन आलेले बांगलादेशी घुसखोर आहेत. नागालँड सरकारने पकडलेल्या प्रत्येक घुसखोराकडे प बंगाल,आसाम सरकारच्या राजकिय पक्षांनी,नोकरशाहीने बनवून दिलेली सर्व ओळखपत्रे होती, जी अजून सामान्य नागा जमातीकडे नाहीत.
नवी सुमिया जमात
नागालँडमध्ये प्रत्येक जमातीची वेगळी भाषा, पोशाख आणि रीतिरिवाज आहेत. या जमाती एकमेकांशी लग्न करायलाही तयार नसतात. मात्र अनेक घुसखोरांनी नागा मुलींशी लग्ने केली आहेत. जमातीच्या बाहेर लग्न न करणाऱ्या नागा मुलींनी आता बांगलादेशी मुस्लिमांसोबत संसार थाटले आहेत. याविषयी तिथले राजकीय पक्ष उघडपणे बोलायला तयार नसतात, पण सूमी (किंवा सेमा) जमातीच्या नागा मुली आणि बांगलादेशी यांच्या संततीला आता नागा न म्हणता ‘सुमिया’ जमात म्हटले जाते. थोडक्यात, १९ ते २० लाख लोकसंख्येच्या नागालँडमध्ये घुसखोरांची संख्या तीन लाख- म्हणजे २० टक्क्यांच्या आसपास आहे. दिमापूर तर ‘मिनी बांगलादेश’ बनले आहे.अनेक वेळा नागालँडमध्ये पकडलेल्या घुसखोरांना आसाममधल्या संघटनांनी बांगलादेशमध्ये पाठविण्याच्या आधीच आसाममध्ये ठेवून घेतले.
त्रिपुरात घुसखोरी तीन प्रकारची
बांगलादेशाची घुसखोरी त्रिपुरामध्येही सुरू आहे.या राज्याची लोकसंख्या १५ ते २५ लाखाच्या मधे आहे.घुसखोरांची संख्या तीन चार लाख म्हणजे २०/२५ टक्क्यांच्या आसपास असावी.येथे घुसखोरी तीन प्रकारची आहे.पहिला प्रकार म्हणजे असे घुसखोर जे आपली नावे मतदार यादीत घालण्य़ात यशस्वी झाले आहेत. दुसरा प्रकारचे घुसखोर सध्या अनेक भागात पसरले आहेत व काही वर्षात ते मतदार बनतील.तिसर्या प्रकारचे घुसखोर जे काम करायला सकाळी भारतात पण रात्री परत जातात बांगलादेशमधे .
त्रिपुराची राजधानी आगरतला. विमानतळाला लागूनच भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमारेषा. तिला लागून या बॉर्डर जवळच दिसतो एक भलामोठा सायकल स्टॅण्ड. बांगलादेशी नागरिक रोजीरोटीसाठी पलीकडून येतात. रिक्षा लावतात. दिवसभर काम करतात. आणि घरी परत जातात.
मेघालय मधे बांगलादेशी घुसखोरी
मेघालयाची राजधानी शिलाँगपासून ७0 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ‘डावकी’ नावाचं गाव. डावकी’त पोहचले तर समोर दिसते, भारत-बांगलादेश बॉर्डर म्हणजे एक नदी. भारताची शेवटची पोस्ट म्हणून तिथे चौकी व तिथेही दोन-तीनच जवान पहार्यावर. समोर बोटींची रांगच रांग लागलेली. लोक त्या बोटीत बसून अलीकडे-पलीकडे येत-जातात. नदीपार समोर बांगलादेश. हा किनारा भारत, तो बांगलादेश. सर्रास वाहतूक होते, सामानसुमान वाहून नेलं जाते, माणसं येतात. अनेक जण तर रोज सकाळी नदीपार करून येतात, काम करतात, संध्याकाळी घरी परत जातात. देशाच्या सीमा त्यांना रोखत नाहीत. जी माणसं ये-जा करताना दिसतात त्यांच्याकडे तरी कुठं असतात व्हिसा नि पासपोर्ट.
मेघालयातील वाढते बांगलादेशी स्थलांतरित
मेघालय सरकारच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०१३ पर्यंतच्या गेल्या पाच वर्षांत; १८,९५१ राज्यात बांगलादेशी पकडले गेले. यांपैकी ९७८ लोकांवर खटला चालला आणि उर्वरितांना बांगलादेशात परत पाठवले गेले. २०१५ मध्ये १२६ लोकांवर खटला चालला आणि ३,०३७ लोकांना बांगलादेशात परत पाठवले गेले.
पकडलेले बांगलादेशी घूसखोर, मेघालयाच्या जैन्तिया हिल्स जिल्ह्यातील कोळसा खाणीत काम करतात.बांगलादेशी नागरिकांच्या ओघास कारणीभूत एक घटक कोळसा खाणींत असलेली स्वस्त मजूरांची आणि हाताने कामे करणार्यांची गरज. मेघालयातील कोळसा खाणींत उतरण्यास स्थानिक जनजाती तयार होत नसल्याने, अनधिकृत बांगलादेशी हे काम करतात.
बांगलादेशींनी मेघालय न्यायालयात जाउन मतदानाचा हक्क मिळवला
मेघालय उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, राज्यात २४ मार्च १९७१ ला किंवा त्यापूर्वी राज्यात प्रवेश केलेल्या आणि इथेच स्थिरावलेल्या बांगलादेशींना, भारतीयच मानण्यात यावे आणि त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावीत. मुळात बांगलादेशातून आलेल्या, ४० हून अधिक निर्वासितांनी केलेल्या अर्जावर न्यायालयाने हा निकाल दिला होता.
अशा प्रकारे भारतीय न्यायव्यवस्थेचा उपयोग करून घेऊन ते भारतात घुसत आहेत.आपण बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढुच शकत नाही पण बांगलादेशी आपल्याच न्यायालयात जाउन मतदानाचा हक्क मिळावा म्हणुन खटपट करतात आणि यशस्वी होतात.याला काय म्हणावे?
बांगलादेशी स्थलांतरित, प बंगाल,आसामात नागरिकत्वाचा पुरावा प्राप्त करून घेऊन मग मेघालयात प्रवेश करतात.ते भारतीय आहेत असे सिद्ध करण्याकरता, कुठल्याही गणपंचायतीकडून गणपंचायत प्रमाणपत्र घेऊनच ते मेघालयात येतात. उर्वरित भारतात प्रवेश करण्याकरताही नेमकी हीच कार्यपद्धती ते वापरतात. त्या पंचायतीही खोट्या असू शकतात आणि त्यांची कागदपत्रेही खोटी असू शकतात.मेघालय सरकार, अनधिकृत स्थलांतरितांच्या नागरिकत्वाबाबत आसामातील पंचायतींनी दिलेला किंवा आसाम सरकारकडून मिळालेला कुठलाही पुरावा ग्राह्य धरत आहे.अशा प्रकारे ही तरती लोकसंख्या, कुठलाही वैधता-तपास न होता, मतदार यादीत स्थान मिळवत आहे.
ह्या अनधिकृत स्थलांतरितांनी जर राज्यात राजकीय सत्ता प्राप्त केली तर काय होईल? मूळच्या मेघालयाचे भवितव्य काय?
बांग्लादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज
सीमा भागामध्ये शेकडो गावे अशी आहेत, ज्यात आज हिंदू नावालाही शिल्लक नाहीत.याचे नव्याने सर्वेक्षण लगेच केले पाहिजे.घुसखोरांची समग्र माहिती गोळा करून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल.
स्थानिक राजकारण्यांचे प्रतिनिधीं, नोकरशहा व पोलीस ज्यानी शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे , मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे करुन देण्याचे दुष्क्रुत्य केली त्याना शिक्षा झाली पाहीजे.
सरकार, सुरक्षा दले व सीमाभागातील जनता यांच्या संबंधांत सुधारणा होणे गरजेचे आहे.घुसखोरी थांबविण्याबाबत ही इच्छाशक्ती दाखविल्यास निम्मा प्रश्न मिटू शकतो.
देशाच्या सुरक्षेची चाड असणार्या सर्व पक्षांनी हा धोका वेळीच ओळखला पाहिजे-आसाम आणि लगतच्या राज्यांनाही घुसखोरमुक्त राज्ये बनवू, अशी घोषणा केली पाहिजे. एकाही घुसखोराला तिकीट देणार नाही, हेही जाहीर केले पाहिजे. बांग्लादेशी घुसखोरी हा येणार्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज आहे.ह्या अनधिकृत स्थलांतरितांनी जर राज्यात राजकीय सत्ता प्राप्त केली तर मूळच्या जन जातीचे भवितव्य काय?
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply