नवीन लेखन...

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग २

कलकत्ता दिशेने प्रत्यक्ष प्रवास
मनात होता एक प्रचंड उत्साह, आणि एक अनामिक हुरहूर. पुढचा प्रवास कसा होईल? करू शकू की नाही? मनात आहे ते पाहू किंवा नाही? अज्ञात भविष्यात काय आहे? पण हे सगळे प्रश्न तारुण्यातील उत्साहामुळे मागे पडले, आणि आम्ही क्षितिजाकडे बघत पुढे निघालो. पाहता पाहता आम्ही दुपारी दोनपूर्वी भंडारा गाठले.

भंडारा ते रायपूर
तेव्हा आताच्या सारखा मोठा रस्ता नव्हता. भंडाऱ्याला विश्वासच्या ओळखीचे आसोलकर म्हणून होते. त्यांचा पत्ता आमच्याजवळ होता. त्यांच्या घरी आम्ही पोहोचलो, त्यांनी आनंदाने आणि उत्साहाने आमचे स्वागत केले. सायकलिंगमुळे भूक चांगली लागली होतीच, आम्ही पोटभर जेवलो आणि दुपारी पाचच्या सुमारास भंडारा सोडले.

त्यादिवशी रस्त्यामध्ये कुठेही न थांबता आम्ही रात्री पोहोचलो साकोलीला. कापगते यांच्याकडे मुक्काम केला. मोठे गाव त्याच्यापासून पुढे बरंच दूर आहे असं कळलं, आणि रात्र पण होत आली होती. दुसऱ्या दिवशी देवरीला पोहोचलो, तेथे ओळखीचे कोणीच नव्हते, तेव्हा जवळच चिचोली चेकपोस्टवर असलेल्या एका तक्तपोसावर आम्ही प्रवासातील दुसरी रात्र काढली. तिसर्या दिवशी राजनांदगाव येथे संघचालक बलदेवप्रसाद मिश्र यांनी आमचे आतिथ्य केले. आणि दुर्ग, भिलाई असे मजलदरमजल करीत आम्ही रायपूरला पोहोचलो. भर उन्हाळ्याचे दिवस, डांबरी रस्त्यावर डांबर पिघळलेलं, डांबरात टायरचा रप् रप्, आवाज यायचा. रायपूर विद्यापीठांमध्ये विश्वासच्या ओळखीचे प्रा. शांताराम कुळकर्णी होते. त्यांच्याकडे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी संघ कार्यालयात आम्ही भेटायला गेलो. नागपूरचे भैय्याजी दाणी यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीपादजी दाणी तेथे जिल्हा प्रचारक होते. त्यांनाही आम्हाला भेटून आश्चर्य आणि आनंद वाटला. रायपूरच्या आधी आरंग या गावी जनसंघ आमदार चैतरामजी साहू यांच्याकडे आमचा मुक्काम झाला.

रायपूर पर्यंतच्या प्रवासात आमच्या लक्षात आलं की आपण जे स्वयंपाकाचे सामान घेतलेले आहे, त्यामुळे सायकल जड होते आणि त्याची आवश्यकता पण पडत नाही. आपल्याला स्वयंपाक करणे शक्य होत नाही आणि म्हणून ते सर्व सामान रायपूरलाच ठेवून आम्ही ओरिसातील संबलपूरच्या दिशेने निघालो.

सरदारजींचे ट्रक प्रवासाचे निमंत्रण
रस्त्यात एका धाब्यावर आम्ही नाश्तासाठी थांबलो. एक ट्रक डायव्हर सरदारजी पण नाश्त्याला आलेला होता. जेव्हा त्याला कळलं की आम्ही सायकल ने इतक्यात लांबच्या प्रवासाला निघालो आहोत, तेव्हा तो आमच्या जवळ आला आणि म्हणाला, “कशाला सायकल ने जाता? मी पण कलकत्त्या कडे निघालो आहे. माझ्यासोबत चला. सायकली ट्रक मध्ये टाका, लवकर पोहोचू.” त्यावर त्याला मी म्हणालो, “सरदारजी हमे सायकल से जाना नही होता, तो हम निकलते ही क्यूँ! हम तो ट्रेन से भी जा सकते थे!” त्याला आमचा मुद्दा पटला, आणि त्याच्या शुभेच्छा घेऊन आम्ही पुढे निघालो. एकोणीस किलोमीटरवर एक रस्त्या वरच रेस्ट हाऊस आहे. योगायोगाने तेथील खानसामा तिथेच उभा होता. त्याने आम्हाला पाहिले आणि चौकशी केली, तेव्हा त्याला कळलं की आम्ही बांगलादेशला निघालो आहे. यामुळे तो इतका जास्त भारावून गेला की त्याने आग्रह केला की तुम्ही आता माझ्या इथे जेवण करूनच जा. आमची थांबायची, जेवण करण्याची इच्छा नव्हती. कारण दिवसभराच्या दृष्टीने जेवढे अंतर कापायला पाहिजे, एवढे कापलं नव्हतं. पण तो आम्हाला सोडायला तयार नव्हता. आग्रहाने आम्हाला जेवायला घालूनच त्याने पुढे जाऊ दिले. लोकांचे असे अकृत्रिम प्रेम, जागोजागी आमच्या वाट्याला आले. प्रेम, कौतुक स्वीकारत छत्तीसगड संपून आम्ही ओरिसा मध्ये प्रवेश केला. छत्तीसगडमधून जाताना रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ५-६ फूट उंचीची सापांची वारूळे खूप मोठ्या संख्येने दिसत होती. छत्तीसगडमध्ये तलाव पण मोठ्या प्रमाणावर आहेत.

ओरिसातील अनुभव
ओरिसाची पण अशीच एक आठवण सांगण्यासारखी आहे. एका गावी रस्त्यावरील पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गेलो. पोलीस इन्स्पेक्टरने चहा तरी पिऊन जा, असा आग्रह केला. त्याचा नेहमीचा चहावाला केटलीभर चहा घेऊन आला. आम्ही प्रत्येकी दोन-अडीच कप चहा प्यायलो. शेवटी केटली रिकामी झाली. यावर तो पोलीस इन्स्पेक्टर चहा वाल्यावर खूप नाराज झाला. ही तरुण मुलं बांगलादेशला निघाली आहेत आणि तू इतका कमी चहा का आणला? तो म्हणाला, “मी आता पुन्हा आणतो.” त्याला आमच्याबद्दल कळलं तर तो आमच्यासोबत येण्याचा हट्टच करू लागला. खूप प्रयत्नाने त्याची समजूत काढली. या दोघांनाही धन्यवाद देऊन आम्ही पुढे निघालो. सम्बलपूर संघ कार्यालयात आम्ही मुक्कामी होतो. प्रांतप्रचारक बाबूराव पाळधीकर होते. तिथून पुढे ढेेंकानालमार्गे आमचा प्रवास होणार होता.

कोणार्क सूर्य मंदिर

ओरिसात असताना प्रवासात रात्र झाली. गाव काही लागेना. अशा ठिकाणी आलो की मागे मुक्कामाला परत जातो म्हटले, तर पुष्कळ पुढे आलो होतो. निर्मनुष्य रस्ता… त्याची भीती वाटायला लागली. वर फेस पॉवर ट्रान्समिशन तारा दिसत होत्या हिमतीने तसेच पुढे जात राहिलो. थोड्या वेळात एक पॉवर स्टेशन लागले मग तेथेचं अंग टाकले. तोपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते.

ओरिसामध्ये आम्ही हिराकुंड धरण पाहिले. जगन्नाथ पुरी चे दर्शन घेतलं. कोणार्क येथील सूर्य मंदिर पाहून विस्मित झालो. आजही माझ्या डोळ्यासमोर तो समुद्र किनारा आणि ते सूर्य मंदिर येते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी कोणार्कचे सूर्यमंदीर पाहिले पाहिजे, असे वाटते. मानवी प्रतिभेचा इतका उत्तुंग, सुंदर अविष्कार दगडातून कोरून आपल्या समोर ठेवणार्या अनाम कलाकारांना आपण जेवढे प्रणिपात करू तेवढे थोडेच आहे. आजही असं भव्य-दिव्य कोरीव शिल्प आपण निर्माण करू शकत नाही.

अतिथी देवोभव’चे दर्शन!
ओरिसाच्या प्रवासात दोन आठवणी मोठ्या जबरदस्त आहे. एक प्रसंग- दुपारची वेळ होती. कडकडीत ऊन होतं. आम्ही एका अगदी लहान खेड्यामध्ये होतो. एक शेतकरी भेटला, तो म्हणाला, तुम्ही माझ्या घरी जेवायला चला. त्याचे संपूर्ण घर बांबूचे होते. त्याच्या घरी जेवणात आम्हाला माशाचा रस्सा आणि भात वाढला. मी मासे खात नाही, असं सांगितलं, तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. आणि मग त्याला वाईट वाटू नये म्हणून मी त्या वेळेपासून मासे खाणं सुरू केलं कारण यापुढेही जेवायला काय मिळेल हे माहित नव्हते. अतिशय गरीब, साधा, ग्रामीण शेतकरी पण त्याच्यामध्ये आतिथ्य पुरेपूर भरलेले होते. “अतिथी देवो भव” ही संस्कृती आपल्या समाजात कशी खोलवर मुरलेली आहे. याचे दर्शन त्या दिवशी आम्हाला झाले. भारतीय संस्कृती बोलण्यातून नाही, तर कृतीतून त्याने आम्हाला दाखविली.

काळ आला होता पण!
दुसरा प्रसंग- सायकल चालवित रात्री २ वाजता महानदीच्या पुलावर आम्ही पोहचलो होतो. महानदी खरोखर नावाप्रमाणे महानदी. तिचा प्रवाह बघण्याच्या उत्सुकतेमुळे आम्ही सायकल वरून उतरलो. या पुलाला लागूनच एक रेल्वेचा पूल होता. विश्वासला असं वाटलं की आपण त्यावर उडी मारावी, म्हणजे रेल्वेच्या पुलावरून आपल्याला पाणी चांगलं पाहता येईल. कठड्यावर चढून तो आता उडी खाली मारणार… तेवढ्यात माझं लक्ष गेलं, आणि मी त्याला मागे ओढलं, नाही तर विश्वासची उडी महानदीतच पडली असती. कारण दोन्ही पुलात थोडेसे अंतर होते, पण ते चिकटून आहेत, असा भास होत होता. आणि त्या रात्री २ वाजता तिथे वाचवायला दुसरे कोणीही नव्हते. दोन पुलांमध्ये तीन फुटाचे अंतर होते. आज इतक्या वर्षानंतरही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो, व थरकाप होतो. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!

भुकेपुढे काही नाही
या प्रवासात रोज आमचा प्रयत्न राहायचा, की सकाळी लवकरात लवकर गाव सोडायचं, आणि उन्ह चढेपर्यंत जास्तीत जास्त मोठा टप्पा गाठायचा. साधारण ११ वाजता सायकलिंग थांबवून जिथे कुठे असू तिथे जेवण करून ३ वाजेपर्यंत मुक्काम करायचा. ३ वाजता उन्ह उतरणीला लागले की तेथून निघायचे अन् रात्रीच्या आधी मिळेल त्या गावी मुक्काम करायचा. ओरिसात असेच एका छोट्या गावी संध्याकाळी आम्ही पोहोचलो. खायला काहीच नव्हतं. गावात वीज पण नव्हती. तिथे एका छोट्या दुकानातून मुडी म्हणजे मुरमुरे विकत घेतले. तिथे एक पोलीस चौकी होती. जवळच तेथील पोलिसाचे घर होतं. त्याला म्हटलं थोडसं तेल, तिखट आणि मीठ दे, आणि त्याच्या घराच्या समोरच आम्ही जमिनीवर पेपर वर मुरमुरे ठेवले. घरी येऊन त्यानी तिखट, मीठ दिले, तेलही टाकले. पहिला घास खाल्ला आणि सरसो तेलाचा घमघमाट आला. सरसो तेल तोपर्यंत आयुष्यात कधीही खाल्ले नव्हते. पण भुकेमुळे त्या सरसोच्या कच्चा चिवड्यावरच ताव मारावा लागला. आणि नंतर पुढे संपूर्ण प्रवासभर सरसो तेलाचेच जेवण आम्हाला मिळत गेलं. आम्हाला ते आवडूही लागले.

लोकांना रात्री झोपेतून उठवून पत्ता विचारणे
कोणत्याही गावात पोहोचल्यावर आधी आम्ही पुढच्या मोठ्या गावांची माहिती गोळा करायचो. इथल्या माणसांच्या ओळखीचं पुढे कोण आहे? किती अंतर आहे? पोलीस स्टेशन कुठे आहे? कारण सर्वात सुरक्षित जागा पोलीस स्टेशनच. त्याप्रमाणे दुसर्या दिवशीचे प्लॅनिंग करायचो. कधीकधी गंमत व्हायची. गावात मध्यरात्री पोहोचल्यावर उन्हाळ्याच्या दिवसात सर्वजण बाहेरच रस्त्याच्या बाजूला खाटा किंवा बाजा टाकून झोपलेले असायचे, चित्रविचित्र अवस्थेत! चौकशी तर करावीच लागणार, कारण माहिती काहीच नाही. त्यामुळे लोकांना झोपेतून उठवून त्यांना विचारल्याशिवाय आम्हाला पुढे जाता यायचं नाही. रात्री बारा साडेबाराला पत्ता विचारायला कोणाला उठवले तर त्याची काय चिडचिड होईल, आपण समजू शकतो. एकीकडे हसू पण यायचं. पण आमचा नाईलाज होता, लोकांना झोपेतून उठवून पत्ता विचारत आम्ही ठरलेल्या जागी पोहचत असू.

सन्मानपूर्वक जेवणे : रोजचाच प्रश्न
या संपूर्ण प्रवासात दररोज सकाळी-संध्याकाळ गावामध्ये आपल्या जेवायची सोय करणे हा प्रश्न होताच. रोज नवे गाव, नवी माणसं. पैसे नसताना तुम्हाला जेवायचं असेल तर तुमच्याजवळ साधारणपणे दोन मार्ग असतात. एक भीक मागणं आणि दुसरा चोरी करणं. पण हे दोन्ही मार्ग न निवडता तुम्हाला सन्मानपूर्वक जेवायला मिळेल, अशी व्यवस्था करणं हे मोठं आणि वेगळंच काम आहे. आणि हे सकाळ-संध्याकाळ दिवसातून दोनदा करायचं. त्यामुळे कुठल्याही अपरिचित ठिकाणी, खिशात पैसे नसतांना हे करणं याच्यासारखे काहीही शिक्षण नाही. खिशात पैसे नसताना घराबाहेर प्रवास करणे हे एक जबरदस्त प्रशिक्षण आहे. हे आपण मुलांना दिलं पाहिजे. कोणत्याही विद्यापीठात त्याला जे शिक्षण मिळणार नाही ते शिक्षण, अनुभव, ते ज्ञान मिळवून स्वतःला बदलणं, या सगळ्या प्रवासात त्यांना शिकता येईल.

जमलेल्या लोकांना आपले साहसी प्रवास वर्णन ऐकायचे असते. त्यांना अर्धे सांगत नाही तर पुन्हा काही लोक जमा व्हायचे. त्यांना सर्व पहिलेपासून ऐकायचे असायचे. अशातून प्रभावित होऊन ते प्रेमाने, सन्मानपूर्वक आमची जेवायची व्यवस्था करीत असत.

अशा रीतीने वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जात आम्ही पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश केला. आमचं ध्येय होतं कलकत्ता. संघ कार्यालयाचा पत्ता होता २६, बिधान सारणी. नागपूरच्या संघ अधिकार्यांचे पत्र पण आमच्या सोबत होते. नागपूरहून २५ एप्रिलला निघाल्यानंतर आम्ही ९ मे ला संध्याकाळी कलकत्त्याला पोहोचलो.

अनिल सांबरे
9225210130
क्रमशः

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..