बांगलादेशात प्रवेश : ध्येयपूर्ती कडे
आतापर्यंत आपल्या देशात असल्यामुळे कोणीतरी ओळखीचा मिळेल, अशी एक शक्यता होती. मात्र जिथे कोणीच ओळखीचा भेटणार नाही, अशा संपूर्ण अज्ञात, अनोळखी प्रदेशात आम्ही निघालो होतो. कलकत्त्याहून बांगलादेशला न जाताच परत नागपूरला जाण्याची नामुष्की येते की काय? अशा परिस्थितीतून वैध परवाना मिळवून, अर्धी लढाई आपण जिंकल्याचा आनंद आणि अभिमान आम्हाला वाटत होता. दुसरीकडे कलकत्त्याच्या कार्यालयातील सर्व प्रचारक आणि कार्यकर्त्यांचा प्रेमळ आश्वासक आणि उमेद वाढवणारा सहवास/अनुभव, त्यांच्या आठवणी होत्या आणि तिसरीकडे आपण ज्यासाठी निघालो होतो त्याच्या अगदी आता आपण जवळ पोहोचत आहोत, असा क्षण जवळ येत आहे, आपण आता प्रत्यक्ष बांगला देशात प्रवेश करणार. याची एक अनामिक हुरहूर आणि उत्साह मनामध्ये होता.
सीमेवरचा प्रसंग
भारत-बांगलादेश सीमेच्या जवळ आम्ही पोहचायला लागलो तशी एक वेगळीच शंका आम्हाला वाटायला लागली. वाटेत कोणी काही गडबड केली तर, जवळ असावा म्हणून आम्ही एक रामपुरी चाकू आणि एक गुप्ती सोबत ठेवली होती. बॉर्डर वर चेकिंग करताना या वस्तू, हे आमचं सामान तपासताना त्यांना सापडल्या तर काय होईल? या भीतीने आणि त्या सापडू नये व आमच्याजवळ पुढे राहाव्या या हेतूने, आम्ही त्या दोन्ही गोष्टी बाहेर पाणी झिरपून पाणी थंड होईल अशा कॅनव्हासच्या वॉटरबॅगमध्ये लपवल्या. आणि पुढे धडधडत्या अंतकरणाने त्या बॉर्डरच्या चौकीमध्ये पोहोचलो, तिथून आता सुरळीत आम्ही बाहेर कसे पडू? एवढाच मनात विचार होता. तिथल्या सैनिकांनी आमच्याकडे पाहिलं, आमचा वेश, सायकल, भारत-बांगलादेश बोर्ड पाहून त्यांना खूप छान वाटले, आणि नागपूर वरून इतक्या दुरून आलोय म्हटल्यावर तर त्यांना खूपच विशेष वाटले आणि मग तिथे चौकशी राहिली बाजूला. तपासणी काहीच केली नाही आणि उलट आमच्यासाठी चहा नाश्ता मागवला. आमच्या सोबत गप्पा करीत आम्हाला तो खाऊ घातला आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला. आमच्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता! आपण तयारी कशी केली होती, त्याचं काम कसं पडलं नाही, हे आठवून नंतर आम्हाला हसू येत होतं.
बांगलादेशात प्रवेश केल्यावर आणि परत भारतात येताना रुपयाचे टकामध्ये व टकाचे रुपयात रूपांतर करून घ्यावे लागले. चेक पोस्टच्या बाजूला रस्त्यावर असे रुपांतर करणारी बरीच दुकाने होती.
जेस्सोर-फरिदपूर-माणिकगंज
अशा रीतीने आम्ही पुढे जात असतानाच फरीदपूर नावाचे गाव लागलं. हे गाव म्हणजे जिथे मुजीबुर रहमान यांचे आई-वडील रहायचे ते गाव. येथे शहा नावाच्या हिंदू गृहस्थाकडे आमची व्यवस्था करण्यात आली. पुढचे गाव माणिकगंज. या गावी पाणी इतकं जड होते की जसे कधी कधी आपण तोंडाची चव काही खाल्ल्याने खराब झाली की ती जाण्यासाठी पाणी पितो. तर या गावी उलट होते की पाणी प्यायल्यामुळे तोंडाची चव खराब झाली होती, आणि ती जाण्यासाठी म्हणून आम्ही काहीतरी गोड खाल्लं. या रस्त्यात जेस्सोर हे मोठे गाव, जिल्हा स्थान होते. तेथे एका स्टुडिओमध्ये आम्हाला प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेचे, प्रेताचे, हानीचे काही फोटो पाहायला मिळाले. जेस्सोर कॅन्टोनमेंटला भेट दिली. तेथील इन्चार्जने जीपमधून सगळे दाखविले आणि युद्धाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती पण दिली. जहागीर नगर विश्व विद्यालय हे ढाक्याच्या आधी आहे ते पण आम्ही पाहिले.
आणीबाणीचा प्रसंग
एका खेड्यात मुक्कामाची वेळ आली. दिवे नसलेल्या एका खेड्यात एका खानावळीत आम्ही जेवायला गेलो. कंदिलाच्या उजेडात जेवण सुरू होते. मी त्या खानावळ मालकाला म्हटले, आम्ही सायकल प्रवासी आहे तेव्हा अर्धेच पैसे घे. तो यासाठी तयार नव्हता. हे ऐकून आमच्या बाजूला जेवत असलेल्या एकजण उठला आणि त्याने त्याच्यावर बंदूकच रोखली. तू बिहारी आहेस का? का या भारतीयांकडून पैसे घेतो? असे खानावळ मालकावर संतापला. आम्हीच घाबरलो, की आता काय होत? गोळीबार होतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली. आम्ही त्याला आवरायला लागलो. शेवटी परिणाम स्वरूप असं झालं की त्या हॉटेल मालकाने आमच्याकडून काहीच पैसे घेतले नाही. त्या वेळेला तेथील सामान्य माणसालाही भारताबद्दल किती प्रेम होतं हे या घटनेवरून आपल्या लक्षात येते. यातील गंमतीचा भाग असा ही, बांगलादेशला युद्धाच्या निमित्ताने भारताने मदत केली, मुक्ती वाहिनीच्या सगळ्या सैनिकांजवळ प्रचंड प्रमाणामध्ये बंदुका होत्या. सरकारने आता युद्ध संपले आहे तेव्हा तुम्ही आपली शस्त्रे सरकारजमा करा, असं आवाहन केलं होतं. पण लोकांनी पाच पैकी २ शस्त्र सरेंडर करायचे आणि तीन आपल्या जवळ राहू द्यायचे, असे केले त्यामुळे लोकांच्या हातामध्ये रिवाल्व्हर, बंदुका होत्या, आणि रात्री बे रात्री केव्हाही गोळीबाराचा आवाज येणं, ही काही नवलाई नव्हती.
असे मार्गक्रमण करीत आम्ही पद्मा नदीच्या काठावर पोहचलो. पद्मा नदी गंगेची मुख्य धारा. भारतीयांच्या दृष्टीने गंगा भारतातच संपते. पण गंगेची मुख्य धारा पद्मा ही किती प्रचंड आहे, याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि एवढ्या मोठ्या नदीवर पूल नाही त्यामुळे ज्याला फेरी जहाज म्हणतात, अशा जहाजावर गाड्या, मोटार सायकल, स्कूटर जे काय असेल ते चढवून आणि त्यातून मग पलीकडे जाणे हा एकच मार्ग. अर्थात आम्ही सुद्धा त्याच रांगेत लागलो. चिक्कण माती इतकी की, दगड काय खडासुद्धा सापडणार नाही. त्यामुळे रस्ते बांधायचे असेल तर ते सुद्धा खडीच्या ऐवजी मातीच्या विटा करून रस्त्यावर टाकणार मग त्याच्यावर रस्ता बांधणार, अशी बंगालची स्थिती. अशा या नदीच्या चिक्कण मातीच्या काठावर लाकडाचे मोठे ओंडके टाकून त्याच्यावरून ट्रक किंवा गाड्या जहाजाच्या आत जात. असं करता करता एखादी गाडी बाजूला पडली की चार-पाच तासाचा खोळंबा! आमच्या समोरच एक गाडी घसरली, त्यामुळ आम्हालाही तिथेच थांबावं लागल. या प्रकारामुळे घाई कोणालाच करता येत नाही. अखेर आम्ही त्या जहाजावर चढलो. पाऊस सुरू झाला होता. फेरी जहाजाने पद्मा ओलांडताना अकरा किलोमीटर अंतर पार करावे लागले. तेव्हा दुसर्या किनार्यावर लागलो. पद्मानदी ओलांडल्यावर ओरिया घाटावर आम्ही त्या दिवशी मुक्काम केला. पद्मा नदीची आणखी एक गंमत म्हणजे ही नदी आपले पात्र सतत बदलत असते त्यामुळे नदीच्या काठावरची दुकाने नेहमी आपली जागा बदलत असतात. बंगाल चे साहित्य, काव्य, मन या नदीने व्याप्त केले आहे. एकदा अवश्य पाहावी, असे वाटते. ब्रह्मपुत्रा पुढे बांगलादेशात येते तिचे नाव होते जमुना. पद्मा आणि जमुना, (ब्रह्मपुत्रा) या दोन महानद्यांचे पुढे मीलन होतं आणि ती मेघना म्हणून पुढे समुद्राला मिळते. ही मेघना किती प्रचंड असेल याची आपण कल्पना करू शकतो. या मेघना नदीच्या काठावर आम्ही उभे असता आमच्या समोरच पाहता पाहता एक होडी तिच्या फळ्या अन् फळ्या वेगळ्या झाल्या. नावाडी पट्टीचे पोहणारे होत म्हणूनच वाचले. गंगोत्री पासून अखेर समुद्राला मिळेपर्यंत गंगेचा पूर्ण प्रवास मला पाहता आला, हे माझे अहो भाग्य.
आणखी पुढे प्रवास केल्यावर ढाका समोर दिसायला लागले. तेथे सुद्धा हीच अवस्था! ढाक्यात प्रवेश करायचा म्हणजे अशा जहाजांनीच. फक्त एक छोटा
ऑटो जाऊ शकेल असा एक लोखंडी पूल तिथे होता. त्या पुलावर ऑटो किंवा सायकल रिक्षा, पायी आणि सायकली जात होत्या. २४ मे ला निघाल्यापासून महिन्याभराने त्या पुलावरून आम्ही अखेर एकदाचा ढाक्यात प्रवेश केला. नागपूर ते ढाक्का या आमच्या सायकल यात्रेचा प्रवासाचा एक टप्पा आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केला.
— अनिल सांबरे
9225210130
(क्रमशः)
Leave a Reply