लक्षणीय माहिती
– संपूर्ण प्रवास वर्णन करताना अनेक बाबी सांगायच्या राहिल्या. काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा उल्लेख करतो.
– सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या या आठवणी आहेत. जशा व जितक्या आठवतील तशा लिहिल्या आहे. त्यात थोडे मागेपुढे व कमीजास्त पण होऊ शकते.
– २५ एप्रिल १९७२ ला आम्ही नागपूर सोडले आणि ९ सप्टेंबर १९७२ ला परत नागपूरात आलो.
– सायकल प्रवासात हाफ पॅन्ट आणि जर्सी असा आमचा वेश होता. सततच्या उन्हामुळे चेहरा, हात-पाय हे चांगलेच काळे पडले होते.
– कुठेच काही सोय नाही झाली तर पोलिस स्टेशन मध्ये जायचं. पोलीस स्टेशन ही सर्वात सुरक्षित जागा समजायची. आमचा अनुभवही असाच राहिला. सर्व ठिकाणी आमची जशी जमेल तशी त्यांनी चांगली व्यवस्था केली. त्यामुळे बाहेर अनोळखी प्रदेशात जाणारे यांनी हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवावा.
– अनेक लोक आम्हाला विचारायचे की तुम्हाला काही डाकू भेटले नाही का? तर सुदैवाने आम्हाला कुठे डाकू भेटले नाही, मात्र एका ठिकाणी पैसे चोरीला गेले.
– रस्त्यामध्ये टायर ट्यूब बदलावे लागले. पंक्चर होणे, सायकल खराब होणे अशा छोटया-मोठ्या गोष्टी होतच होत्या. साधारणतः मोठ्या गावात असलं की अधून मधून आपली सायकल चांगली करून घ्यायची. तेल पाणी करून घ्यायचं. एक सारखे सीटवर बसून बसून सीट दुखायची कधीकधी मांड्या पण घासल्या जायच्या. शक्य तितके चांगले मऊ सीट कव्हर लावून घेतले होते.
– सायकल प्रवास असल्यामुळे कुठलीही खरेदी केली नाही. कुठल्याही भेटवस्तू सोबत आणल्या नाही. फक्त फोटो आणि पत्र सोबत ठेवले.
– आश्चर्य वाटेल इतक्या छोट्या बॅगमध्ये आमचे दोघांचेही सामान होते. इतके कमी, आवश्यक साहित्य आमच्या जवळ होतं आणि त्याच्या भरवशावर आमचा पूर्ण प्रवास झालाही.
– आमच्या साध्या छोट्या कॅमेऱ्याने काढलेले काही फोटो खूप छान निघाले. रोल संपला की मोठ्या गावांमध्ये जाऊन डेव्हलप करणे हे काम होते.
– अनेक फोटो आम्ही काढले खरे परंतु त्यापैकी अनेक एक्स्पोज केले नाही. काही एक्स्पोज केले ते प्रिंट नाही केले. फोटो प्रिंटिंगला पैसे लागायचे. तेव्हा आजच्या सारखी डिजिटल फोटोची सोय नव्हती.
– आम्ही प्रत्येक जिल्हास्थानी गेल्यावर तेथे जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांची भेट घेत असू त्यांना आपला प्रवास सांगणे आणि अधिकृत पत्र घेणे, असे आवर्जून करायचो. त्यांच्याकडून एक चांगलं प्रशस्तीपत्र मिळायचं आणि कधीकधी काही पैसे पण मदत म्हणून मिळायचे. यामुळे महत्त्वाचे असं व्हायचं की, नंतर कुठे त्रास व्हायचा नाही. काही स्थानिक अधिकारी नियमाला धरून चालणारे असतात ते त्यामुळे फारसे प्रश्न न विचारता आपले सगळे मार्ग मोकळे करतात. जेस्सोर, खुलंना, राजशाही, दिनाजपुर, चितगाव, सिल्हेट अशा सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकार्यांचे प्रशस्तीपत्रक आमच्याजवळ आहेत.
– आमच्या प्रवासात आम्ही कलकत्ता, ढाका, चितगाव, पाटणा अशा रेडिओ स्टेशन वरून आमचे साहसी प्रवास वर्णन सांगितले.
– रस्त्यात काही कॉलेजेस/शाळेमध्ये पण आमचं छानपैकी स्वागत होई आणि आमचे अनुभव कथनाचा कार्यक्रम होत. आम्ही हिंदी-इंग्रजी-बंगाली अशा मिश्र भाषेत बोलत असू.
– काही मोठ्या शहरात पत्रकार आमच्या मुलाखती घेत आणि छापत असत. एकदा एक पत्रकार भेटला आणि त्याने आमचेशी गप्पा केल्या आणि दुसर्या दिवशी आम्ही पेपर पाहिला तर त्यांनी लिहिले, मी सायकल चालवत होतो आणि माझी टक्कर झाली दोन मुलांशी. मग मी त्यांची ओळख करून घेतली. प्रत्यक्षात अशी काही टक्कर झाली नव्हती. पण पेपर वाले कशा बातम्या बनवतात, याचा तो पहिला अनुभव त्या वेळेला आला.
– प्रवासात नारळ पाणी खूप मिळायचे, खूप प्यायचो. तेव्हा २५ पैशाला नारळ पाणी मिळायचं.
– तसेच अननसाच्या कापलेल्या फोडी करून मिळायच्या. सकाळी रोज आम्ही नाश्त्यात खायचो. ५० पैशात पूर्ण अननस कापून फोडी करून मिळायचे.
– सकाळ दुपार संध्याकाळ आमचा मांसाहार चालू होता कधी बिर्याणी तर कधी भूर्जी, कधी मासे कधी चिकन तर कधी मटण. एकदा गंमत झाली. आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये गेलो त्यांनी आम्हाला मेनू कार्ड आणून दिलं त्यातून काहीच बोध होत नव्हता पण शेवटी ऑर्डर द्यायची म्हणून चिकन शब्द असलेला चार शब्दांचा एक मोठा मेनू वेटरला सांगितला. तो साडेतेरा रुपये प्लेट होता. आणि थोड्यावेळाने त्यांनी दोन कोंबडे पूर्ण सोललेले आणि भाजलेले आणून ठेवले. पैसे दिल्यामुळे जितके खाता येईल तेवढे आम्ही ते खाल्लं. पण पदार्थ माहीत नसताना मेनू मागू नये हा धडा त्यावेळेला मिळाला.
– तिथे आम्ही लग्नपार्टीला पण गेलो. दोन-तीन वेळा असा प्रसंग आला की आम्ही ज्यांच्याकडे होतो त्यांना पार्टीला जायचं होतं आणि आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो. बंगाली लोकांमध्ये ज्याला मिष्टी दही म्हणतात (गोड दही) त्याच्या परातीच्या पराती असतातच. आणि बाकी गोड काही असले तरी लग्नामध्ये मिष्टी दही पाहिजेच.
– आपल्या रस्त्याच्या बाजूला कडूलिंब किंवा वडाचे झाड असतात तसं बंगालमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला फणसाची झाडे असतात आणि फणस खोडापासूनच लागलेले असतात.
– सर्वसामान्य माणसाचा पेहराव म्हणजे लुंगी आणि वरती शर्ट.
– बंगालमध्ये खेड्याची रचना अशी असते की तलावाच्या त्याचं बंगालीमध्ये नाव पुकुर. (म्हणजे पुष्करचा अपभ्रंश) त्याच्या सगळ्या बाजूने घरे. प्रत्येक घराची मागची बाजू सरोवराकडे. तिथेच आंघोळ करणार, तिथेच कपडे धुणार, तिथेच मासे पकडणार. घरच्या भाजीसाठी लोक ताजे मासे पकडणार आणि घरी घेऊन येणार, भाजी करणार. रोज रोज ताजे मासे.
– पोलीस स्टेशन असो की हॉस्पिटल त्याच्या एरियामध्ये एक छोटासा तलाव असणार आणि सगळे आंघोळ आणि कपडे धुण्याचा कार्यक्रम हे लोक तिथेच तिथेच करणार. अर्थात आम्ही पण तिथेच आंघोळ करायचो.
– ओरिसात एका गावी आम्ही ज्यांच्या घरी उतरलो होतो त्याच्या बाथरुम मध्येच खालून एक नाली गेली होती आणि ती म्हणजे त्यांचा संडास. टू इन वन. आम्ही अवाक झालो.
– आम्ही कामचलाऊ बंगाली पण शिकून घेतले होते. हिंदी/उर्दू/बंगाली/इंग्रजी मिश्रीत बोलून आम्ही आमचे काम निभवत असू. पण भाषेमुळे कुठेच अडले नाही.
– कोणत्याही बंगाली माणसाला भेटल्यावर त्याला कळले की, तुम्ही बंगाली बोलू शकता आणि मासे खाता तर मग तुमची दोस्ती जमलीच म्हणून समजा.
– आमार सोनार बांगला हा त्यावेळेचा प्रसिद्ध नारा होता. जय घोष होता.
– अवामी लीगच्या ठिकठिकाणच्या नेत्यांनी/कार्यकर्त्यांनी आमची बऱ्याच ठिकाणी चांगली व्यवस्था केली.
– घरच्यांनी आम्हाला संपर्क कसा करायचा हा प्रश्न होता. त्यावर उपाय म्हणून आम्ही पंधरा दिवसांनी जेथे पोहचू तेथील पत्ता घरच्यांना कळवित असू व विशिष्ट तारखेपर्यंत पोहचेल, अशा बेताने घरचे आम्हाला पत्र पाठवित. त्या गावी पोहचल्यावर आम्हाला ते पत्र मिळत असे. इतका द्राविडी प्राणायम होता. पण घरचे पत्र मिळाताच आणि वाचून वेगळेच समाधान होत होते. आम्ही परत घरी पत्र पाठवित असू.
– बांगलादेशात नंतर आम्ही सायकलनेच प्रवास असा आग्रह न ठेवता जसे वाहन मिळेल तसाही काही प्रवास केला. त्यामुळे कधी एखादी जीप, कधी खटारा बस, कधी रेल्वे असा, पण आम्ही प्रवास केला. परिस्थिती पाहून ठरवावे लागले.
– खरे म्हणजे प्रवास इतका लांबेल, असे आम्हालाही वाटले नव्हते. परंतु सर्वच अनिश्चित, त्यात माहिती पण नाही आणि विश्वासची दोन तीन वेळा तब्येत बिघडली, अशक्तपणा यामुळे आमचा प्रवासाचा काळ वाढत गेला. अशा विविध कारणाने नागपूर पोहचण्याची आमची तारीख सारखी लांबणीवर पडत होती.
– नंतर नंतर आम्हीपण कंटाळून गेलो होतो व केव्हा एकदा नागपूरला पोहचतो असे आम्हालाही झाले होते.
संपूर्ण प्रवास वर्णन अखेरपर्यंत वाचल्या बद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.??
–अनिल सांबरे
9225210130
समाप्त
Leave a Reply