नवीन लेखन...

बेंगलोरमधली खवय्येगिरी

ते दिवस मला आजही आठवतात जेव्हा इडली,वडा,डोसा हे माझे आवडीचे पदार्थ होते. म्हणजे घरात एखादा फॅन्सी पदार्थ बनवावा त्या रुबाबात माझी आई इडली डोसा बनवायची आणि तेवढ्याच रुबाबात आम्ही ते फस्त सुद्धा करायचोत. मला अजूनही आठवतं, कॉलेज मध्ये ट्रिप ला कुठं जायचं यावर आमच्या खलबती होत असताना साऊथला जाऊया असा आंधळा आग्रह होता माझा. कारण काय तर, साऊथ फूड ! कदाचित अन्नदेवतेने माझ्या मनातलं आणि पोटातलं ऐकलं असावं आणि मला बेंगलोरमध्ये इडली डोसाच्या रिंगणात बसवलं असावं.

एक आठवडा सरला आणि मला आमच्या पीजीच्या नाश्त्याचा मेनू पाठ झाला. सोमवार – डोसा, मंगळवार – खारा बाथ ( हे काय प्रकरण आहे ते पुढे सांगेन) , बुधवार – ईडली, गुरुवार- पुरी, शुक्रवार – डोसा पार्ट 2 किंवा डोसा रिटर्न्स , शनिवार – पुलिहोगरा (चिंच घातलेला भात), रविवार – आलू पराठा. तर हा नाष्टा सकाळी खाऊन पुन्हा हेच दुपारच्या जेवणासाठी डब्यात घेऊन मी क्लासला जायचे. सकाळी गरमागरम खरपूस भाजलेला डोसा दुपारी पार मऊ पडून धारातीर्थी पडायचा आणि ते मिश्रण खाणं जीवावर यायचं. ईडली कधीही खा, बरी लागायची (कदाचित त्यामुळंच हे लोक सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र कधीही इडली खाताना दिसत असावेत). पुऱ्या दुपारच्या वेळी घट्ट होऊन रुसून बसायच्या, फुगून बसल्या तर एकवेळ खाता येतील, पण रुसून बसल्यावर त्यांचा घास तोडण्यासाठी बोटांना बरेच प्रयत्न करावे लागायचे. दुपारचं जेवण ऍडजस्ट करूया असा ठराव झाला, पण रात्रीच्या जेवणात तर फारच करामती. कधी बिटाची भाजी, कधी गाजराची, कधी कधी तर तो भैय्या काय बनवायचा त्याचं त्यालाच ठाऊक. वजन कमी करायचं असेल तर एक हमखास उपाय सांगते, बेंगलोरमधल्या कोणत्याही अशा पीजीवर 2-3 महिने काढा. वजन दिवसेंगणिक फुलक्यांच्या आकारासारखंच कमी होताना दिसेल.

बरं, पीजी वर जेवणाची ही तऱ्हा बघितल्यावर बाहेर जावं म्हणलं तर बाहेरही तेच. सुरुवातीला काही काही पदार्थांची नावं कळायची नाहीत, त्यामुळं मी आपली सेफ साईड राहून इडली किंवा डोसा हेच ऑर्डर करायचे. त्यातही अनेकदा कन्फ्युजन, एकदा इडलीचं कूपन घेऊन मी त्या किचनमधल्या माणसाला दिलं, तर त्याने मलाच प्रतिप्रश्न केला, “डिप्पा ?” मला धप्पा दिल्यासारखा हा काय विचारतोय म्हणून मी विचित्रच नजरेनं त्याच्याकडे बघू लागले. बराच वेळ आमचा असा अबोल संवाद रंगल्यावर त्या बिचाऱ्याने वैतागून कन्नडमध्ये काहीतर पुटपुटत मला इडली सांबर दिलं. नंतर कळलं, की ‘डिप्पा’ म्हणजे तो मला ईडली ही सांबार मध्ये डीप करून पाहिजे का असं विचारत होता.

एकदा मी असाच मेनू वाचत होते; ईडली, वडा, खारा बाथ (ते भात हा शब्द बाथ असा का लिहितात देव जाणे), केसरी बाथ, राईस बाथ, चाऊ चाऊ बाथ ! चाऊ चाऊ भात हे नाव ऐकून मला आधी वाटलं की हा चायनीज भाताचाच एखादा प्रकार असावा. चायनीज आणि त्यातही भात, त्यामुळे हा पदार्थ बरेच दिवस माझ्या दुर्लक्षितांच्या यादीत समाविष्ट होता. त्यातल्या त्यात खारा बाथ (भात) हे नाव जरा बरं वाटत होतं, म्हणून एक दिवस हिम्मत करून मी खारा भात ऑर्डर केला तर समोर चक्क गरमागरम मऊ लुसलुशीत पातळ उप्पीट ! अरेच्चा, ही भानगड आहे होय ! माझा कॉन्फिडन्स वाढला आणि पुढच्या वेळी मी न घाबरता अगदी बिनधास्तपणे केसरी भाताची ऑर्डर दिली, तर अतिशय मऊ, केशरी रंगाचा गोड गोल गरगरीत शिरा माझ्या पुढ्यात, जसं तान्हुल बाळच ! हे दोन्ही अंदाजे मारलेले डाव माझ्याच फेव्हरमध्ये पडले असले तरी मला त्या चाऊ चाऊ भाताच्या वाटे जाण्याची हिम्मत होत नव्हती. पण एक दिवस लक्षात आलं, हे दुसरं तिसरं काही नसून शिरा आणि उप्पीट एकत्र देतात, चाऊ चाऊ भात म्हणून. मग मात्र ही माझी आवडती नाश्त्याची डिश बनली…. अर्थात, जोपर्यंत आम्ही इडली डोशाच्या जंगलातून अस्सल मराठी पोहे मिळण्याचं ठिकाण शोधून काढलं , तोपर्यंतच !

कित्तीही नाही म्हणलं तरी महाराष्ट्रीयन पदार्थांचं वैविध्य माझी खवय्येगिरी प्रचंड मिस करते. एकदा ऑफिसमध्ये असाच विषय निघाला आणि चमचमीत खाद्यपदार्थांच्या विरहाच्या आठवणींत मी विव्हळत असताना माझा एक साऊथचा कलीग मला चेष्टेत म्हणाला, “त्यात काय एवढं? आमच्याकडे काय फक्त इडली डोसा च करत नाहीत. आणि , तसंही तुम्ही महाराष्ट्रातले लोक पोहे आणि वडापाव सोडून दुसरं काय खाता?” झालं. माझा मराठी स्वाभिमान खमंग वडा तळताना गरम कढईतल्या उकळत्या तेलात पाण्याचे तुषार पडावेत तसा चरचरला. ‘पोहे हे फक्त नाष्ट्याला खातात आणि वडापाव हा फक्त संध्याकाळचे स्नॅक्स म्हणून खातात’ हे तर त्याला कळलंच , पण पुढच्या अख्ख्या लंच ब्रेकमध्ये पुरणपोळी, मिसळपाव, धपाटे, थालीपीठ, धिरडे, सतराशे साठ प्रकारच्या कोशिंबिरी, भाज्या, पंचामृत, सोलकढी, मठ्ठा, मोदक , चिरोटे, गूळपोळी …. असे अगणित खाद्यपदार्थ त्याला समजले ( किंवा डोक्यावरून गेले). बिचाऱ्याला घेरी यायचीच बाकी होती, त्यामुळे मी वरणफळ, कोथिंबीर वडी, सुरळीच्या वड्या, पाटवडी, घावन , शेवभाजी अशा ठसक्यांनी भरलेली माझी रायफल बाहेरच काढली नाही…! असो.

शेवटी, डोसा काय किंवा धिरडी काय, नारळाच्या चटणीसोबत खाऊन माझी रसना सर्व-राज्य-समभाव जपते.

— कल्याणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..