परळी तालुक्यातील हाळम हे छोटे खेडेगाव आहे. माझे मूळ गाव हाळम आहे. पण लहानपणापासून परळीला राहत होतो. शाळेला सुट्ट्या लागल्या की हाळम गावी जायची खूप ओढ निर्माण व्हायची. सर्व नातेवाईकांमध्ये राहण्याची मजा काही न्यारी असायची. सर्व भावंडं सुट्ट्यांमध्ये एकत्रित यायचे.
अंदाजे आठ वर्षाची असतानाची एक गोष्ट आज आठवली.
हाळम गावात माझं घर पारा जवळ आहे. मला हाळम मधील सायंकाळ व रात्र फार फार आवडायची. आम्ही सर्व पारा जवळ असणाऱ्या धर्मशाळेत बसायचो. सतत हनुमान मंदिरात भजन कीर्तनमहोत्सवाचे कार्यक्रम चालू असायचे. फार फार आठवतो तो टाळाचा गजर, मृदुंगा फार उत्साहवर्धक वातावरण असायचे .
माझे पप्पा खूप छान पोथी वाचतात. हे मला हाळमला गेल्यावर कळलं. माझी आजी सुमित्रा आम्ही सारी नातवंडं लाडाने आजीला माय म्हणायचो. माय खूप प्रेमळ होती. वाड्यात सर्व माईला सोमाताई म्हणून ओळखायचे. आजीच्या ज्या मैत्रीणीना समजायचं की सोमाताईचा बालाजी परलीवरून आला आहे. सर्वांचा एकच गलका असायचा. सर्व जण खूप आवडीने भेटायला यायचे. रात्री पोथी वाचणारा माणूस जो कोणी असेल त्याला स्पष्ट शब्दात सांगण्यात येई की आज बालाजी पोथी वाचणार . तो लई छान पोथी वाचतो. मला मनातल्या मनात
माझ्या पप्पाची मी मुलगी असण्याचा खूप अभिमान वाटायचा.
पप्पाची पोथी ऐकताना तेवढ्या लहान वयाची असताना झोप येत नव्हती. खुप खुप भारावून जायची मी त्या भक्तिमय वातत्वरणाने . सर्व साधारण शेतकरी कुटुंबातील वारकरी संप्रदायातील भक्तीचा अनमोल वारसा लाभलेला आमचा परिवार. गुट्टे नावाचा खुप अभिमान वाटायचा.
दररोज दुपारी आम्ही बहिणी आणि वाड्यातील साऱ्या मैत्रिणी पारावर आंधळी कोशिंबीर , मला दे आंबा , काच कोयऱ्या , छापरा पाणी , चम्मफुल , भर , सागरगोटे , असे विविध खेळ खेळायचो.
आमच्या वाड्यात एक गोविंदा आहे. आणि त्याला सर्व बारा भाकऱ्या म्हणायचे. माझ्या बाल मनाला प्रश्न पडला की, या गोविंदाला बारा भाकऱ्या का म्हणत असतील ? राधा आणि मी माईला प्रश्न विचारला. माय सांगू लागली की बारा भाकऱ्या आपल्या गावातला बारा भाकऱ्या खाणारा पहिलवान आहे. म्हणून त्याचं नाव तस पडलं आहे. पहिलवान शब्द ऐकून आम्हाला भीती वाटली. कशामुळे तर तो एक शक्तिमान पहिलवान आहे.
आम्ही रोज प्रमाणे पारावर बैठे खेळ खेळत होतो.
अनेक वडील धारी मंडळी पारावर गार लागत म्हणून दुपारी आराम करायला पारावर यायची. त्यात माझ्या आजीच्या बहिणीचे म्हणजे हरमायचे पती आमचे मावस आजोबा पण विश्रांती घेण्यासाठी तिथे आलेले होते. त्यांना चांगलीच गाढ झोप लागली. झोपेत त्यांचे तोंड उघडे राहायचे. त्यांचे वय पंचाहत्तर असेल बहुतेक . त्यांना झोपेत तोंड उघडे ठेवण्याची सवय होती. आम्ही पारावर खेळत होतो.
तितक्यात बारा भाकऱ्या पारावर आला. त्याने आजोबांचे उघडे तोंड पाहून सुनील काकांच्या किराणा दुकानात धूम ठोकली. आम्ही तो आला म्हणून घाबरून खंब्याच्या आडून लपून पाहत होतो. आता तो नेमक काय करतो म्हणून आम्हाला उत्सुकता लागली होती. आणि मनात खूप भीती वाटत होती.
त्याने एका हातात खडी मीठ आणि दुसऱ्या हातात ज्वारी अश्या वस्तू मुठीत आणल्या होत्या. आणि आमच्या मावस आजोबा जे झोपेत उघडे तोंड ठेवून झोपले होते त्यांच्या तोंडात त्या दोन्ही वस्तू त्याने तोंड गच्च भरेपर्यंत टाकल्या. आम्हाला खूप वाईट वाटत होते. कारण आजोबा खूप शांत झोपलेले होते. आम्हाला काय करावं काही कळे ना.
थोड्या वेळानंतर आजोबांना जाग आली. त्यांना तोंड बंद करता येत नव्हतं. तोंडातील तो ज्वारी आणि मिठाचा बोकणा थुंकला . आणि ते थेट आमच्या जवळ विचारण्यासाठी आले. तोंडातील बोकना कोणी तोंडात टाकला?
बारा भाकऱ्या सुनील काकांच्या दुकानाच्या काउंटरवर बसला होता. आणि तिथून तो हसत मजा पाहत होता. आम्ही नाव सांगणार इतक्यात त्याने मोठ मोठे डोळे वटारून आम्हाला न सांगण्यासाठी परत डोळे वटारून पाहिले.
एक तर आम्ही वयाने लहान आणि तो मोठा पहिलवान कोण येड त्याच्या वाटेला जाईल . त्यात राधा आणि मी त्या दिवशी घरी होतो. बाकी सर्व जण शेत्तात गेलेले . आम्ही दोघी घाबरलो. आणि आम्ही आम्हाला काही माहीत नाही अस म्हणालो.
आजोबांच्या तोंडात मीठ टाकल्यामुळे त्यांचे तोंड सोलून निघाले होते. आमच्या बाल मनाला कळत होत की बारा भाकऱ्या चुकीचा वागला. पण तो सोट्या निर्लज्जपणे हसत होता.
तात्पर्य : स्वतःचा तात्पुरत्या आनंदासाठी वडीलधाऱ्या माणसा ना त्रास होईल अशी कृती कधीच करू नये.
सौ. जयश्री अर्जुन मुंडे
अंबाजोगाई
Leave a Reply