नवीन लेखन...

‘बारामतीचा रामभाऊ’

‘गुणगौरव’मध्ये ऑफिस सुरू केल्यावर अनेक प्रकारची माणसं संपर्कात आली. बिल्डींगच्या बाहेरच्या बाजूला एकतपुरेंनी दोन दुकाने एकत्र करुन ऑफिस केबिन भाड्याने दिलेल्या होत्या. त्या केबिनमध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय थाटले होते. त्यातील एका केबिनमध्ये रामभाऊ इस्टेट एजंटचा व्यवसाय करीत होता.
रामभाऊ हा पोलीस खात्यातला चाळीशी उलटलेला रंगेल आणि रंगेल पैलवान गडी होता. जिरे कट कटींग केलेल्या डोक्यावर मनोज कुमारच्या ‘शोर’ चित्रपटासारखी कॅप, रूंद चेहऱ्यावर देवीचे व्रण, धष्टपुष्ट तब्येत, कमरेवरील पट्याला न जुमाननारे सुटलेले पोट, काळी पॅन्ट व पायात अकरा नंबरच्या चपला. चालताना तो आपले दोन्ही हात मागेपुढे करीत चालत असे.
बिल्डींगमधील टाॅयलेट हे आमच्या ऑफिसच्या दरवाजाला लागूनच असल्याने रामभाऊ टाॅयलेटसाठी आल्यावर त्याची आमच्याशी नजरानजर होत असे. एकदा ऑफिसमध्ये कोणी बसलेले नसताना तो आत आला. त्याने ऑफिसमधील मांडलेली स्मृतिचिन्हे पाहून, ही तुम्ही तयार करता का? असे आम्हाला विचारले. त्याला बसायला सांगून ही स्मृतिचिन्हे आम्हाला मिळालेली आहेत हे सांगितले. हे ऐकून त्याला आश्र्चर्य मिश्रीत आनंद झाला, लागलीच त्याने बाहेर जाऊन तीन स्पेशल चहाची ऑर्डर दिली. चहा पिऊन झाल्यावर रामभाऊ स्वतःबद्दल सांगू लागला, ‘मी मूळचा बारामतीचा. घरी आई-वडील व मोठा भाऊ आणि त्याची फॅमिली. मी पोलीसमध्ये भरती झालो आणि माझी बारामती सुटली. दहा वर्ष नोकरी झाल्यानंतर एकदा मला लाच घेताना अॅन्टीकरप्शनवाल्यांनी रंगेहाथ पकडलं व मला घरी बसवलं. मी खूप प्रयत्न केला मात्र अजूनही मला पुन्हा नोकरीत काही घेतलं नाही. राजकारणातील मोठ्या ओळखी असूनही रामभाऊचे काम कोणीही केले नाही. मग त्याने इस्टेट एजंटचा व्यवसाय सुरु केला. वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यावर त्याच्याकडे काही गिऱ्हाईकं यायची. त्यांना तो जागा, फ्लॅट दाखवायचा.
पोलीस खात्यातील माणूस आपल्या ओळखीचा म्हटल्यावर हा कधीही आपल्या उपयोगी पडेल असं आम्हाला वाटलं होतं. आमच्या एका मित्राला लायसन्स नाही म्हणून पोलीसाने पकडलं होतं. आम्ही रामभाऊला त्याला मदत करायला सांगितलं. रामभाऊ त्याला घेऊन गेला तरी मित्राला दंड हा भरावाच लागला. म्हणजेच रामभाऊ भरवशाचा गडी नव्हता. असाच अनुभव अनेकदा आला.
रामभाऊला आम्ही चित्रपटांची काम करतो हे कळल्यावर त्याने आम्हाला एखाद्या तरी चित्रपटात काम मिळवून द्या, अशी गळ घालू लागला. त्यातही त्याला व्हिलनचे काम करण्याची हौस होती. कारण व्हिलनला नायिकेवर जबरदस्ती करता येते. आमच्या सुदैवाने आणि त्याच्या दुदैवाने तशी संधी त्याला आम्ही काही देऊ शकलो नाही.
मी कसा हुशार, हे तो एखादी गोष्ट रचून-रंगवून सांगत असे. पोलीस खात्यात असताना त्याने कधी स्वतः तर कधी सहकाऱ्यांबरोबर जुलूम, जबरदस्ती, अन्याय केल्याच्या घटना त्याने गप्पांच्या ओघात आम्हाला सांगितल्या होत्या. कदाचित त्याचमुळे त्याची आत्ता अशी परवड होत असावी.
कधी कधी रामभाऊ आठवडाभर दिसत नसे. परत आल्यावर बारामतीला जाऊन आलो असं सांगत असे. दरम्यान रामभाऊचे वडील आधीच गेले होते, आता आईचे निधन झाले. मोठ्या भावाने त्याला काहीच न दिल्याने रामभाऊची कोर्ट कचेरी सुरू झाली.
एकदा त्याने घरगुती अडचण सांगून परत देण्याच्या बोलीवर उसने पैसे मागितले. ते मिळाल्यावर चार वेळा धन्यवाद देऊन तो निघून गेला. दरम्यान एकतपुरेंचे भाडे न देऊ शकल्यामुळे त्याला केबिन सोडावी लागली. आता त्याची भेट महिन्यातून एखादेवेळी होऊ लागली. आल्यावर तो स्वतःच्याच अडचणी सांगत रहायचा. म्हणायचा, मी तुमचे उसने घेतलेले पैसे नाही देऊ शकलो तर तुम्हाला एखाद्या कामातून दोनच्या ठिकाणी चार हजार मिळतील, त्यावेळी माझेच पैसे मिळाले, असं समजा. त्याचं हे तत्त्वज्ञान आमच्या डोक्याबाहेरचं होतं.
रामभाऊच्या मुलाने नोकरीला लागल्यावर प्रेमविवाह केला होता. रामभाऊ कुठे काही काम मिळतंय का हे पाहण्यासाठी पायपीट करीत होता. असाच एका सायंकाळी तो ऑफिसवर आला. त्याने सांगितले की, कसबा पेठेत एका मंदिरात पुजाऱ्याचे काम मिळते आहे. आम्हाला ते ऐकून बरे वाटले. किमान त्यामुळे रामभाऊच्या प्राथमिक गरजा तरी भागणार होत्या. त्यानंतरच्या आठवड्यात भेटल्यावर त्याने सांगितले की, मी पोलीस खात्यातून निलंबित झाल्याचे कळल्यावर त्यांनी नकार दिला आणि ‘रामाचा वनवास’ पुन्हा सुरू झाला.
सहा महिन्यांनी एके दिवशी दुपारी रामभाऊच्या मुलाचा फोन आला. त्याने हृदयविकाराच्या झटक्याने वडील गेल्याचे सांगितले. ऐकून वाईट वाटले. कुणाशी बोलताना कधी बारामतीचा उल्लेख आला की, रामभाऊची आठवण झाल्याशिवाय राहत नाही…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-८-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..