कळे तेव्हां अर्थ, गहन जीवनाचा ।
लागते जावे, जेव्हा सामोरे, यातनांना ।।
खेळ भासे शून्य, व्यवहारी जगाचा ।
सख्या विन, उरले न मोल, भावनांना ।।
उरले न मोल, भावनांना ।।१।।
वाटे अंधारा सवे, भिती दिवसाची ।
निराधार झाला, आधार जीवनाचा ।।
दारुण अवस्था, विमनस्क मनाची ।
अर्थहीन रुदन, वाली न आसवांचा ।।
वाली न आसवांचा ।।२।।
मीरेपरी, मानूनि सखा ईश्वरा ।
द्यावा आकारा, अपुल्या जीवनाला ।।
ईश्वरीं भाव ठेवूनि, आयु वेचावे ।
पिढीसाठी पुढल्या, जीणे सजावे ।।
अपुले, जीणे सजावे ।।३।।
सत्वपूर्ण, जीणे अवघे ठरावे ।
मनांपासूनि स्वये चंदनापरी झिजावे ।।
वाटले जरी, कुणासाठी कां जगावे ।
जीणे अपुले, आदर्श इतरां ठरावे ।।
आदर्श इतरां ठरावे ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
७ जून २००९
“हॉटेल पॉलिनिया”दार्जिलिंग
–– सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply