सन २०१०. छत्तीसगढ मधील बस्तर गावात ७६ जवानांची जाळून केलेली क्रूर हत्या ! ही एक सत्य घटना!! आपल्या वाचनात आलीच असेल. छत्तीसगढ मधील एका साध्या इमारतीत सी आर पी एफ चे जवान विश्रांती घेत आहेत . विश्रांती न घेता , मिळेल ते खाणे खाऊन , सलग ४८ तास माओवादी नक्षलींचा शोध घेत , त्यांच्याशी लढून परत आलेल्या आणि थकून एका पडक्या इमारतीत झोपलेल्या जवानांवर पेटत्या मशाली फेकून नक्षलवादी क्रूरपणे जाळत आहेत . जीव वाचवण्यासाठी जे जवान हाती लागेल ते शस्त्र घेऊन बाहेर येताना त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव होतो आहे . त्यातून जे पुढे येतील त्यांना धनुष्य बाणाने ठार मारलं जात आहे .
आणि एका कॅम्पवर झालेल्या हल्याचा क्रूर आनंद नक्षलवादी घेत आहेत . नाचत आहेत . जवानांच्या प्रेतांची विटंबना करत आहेत .
७६ जवान शहीद झाले आहेत .
त्या हल्यानं अस्वस्थ झालेली प्रामाणिक सेनाधिकारी नीरजा माधवन संतापानं पेटून उठली आहे .
एकूणच नक्षलवादी कारवायांवर प्रकाशझोत टाकणारी बस्तर , द नक्सल स्टोरी ही हिंदी मूव्ही मी काल पाहिली. आणि प्रचंड अस्वस्थ झालो .
माओवाद्यांना , दहशतवाद्यांना लाजवेल असे क्रौर्य करणारे नक्षलवादी पाहिल्यावर आपण मूव्ही बघत आहोत हे भान जाते आणि रक्त पेटून उठते .
स्वत:च्या देशात तिरंग्याचा सन्मान केला , वंदे मातरम् हे राष्ट्रगीत गायले हा या प्रदेशातल्या नक्षलवाद्यांच्या दृष्टीने गुन्हाच ठरतो . त्यावेळी राष्ट्रगीत गाण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्याचे , गावातील स्त्री पुरुषांचे जे हाल केले जातात ते पाहवत नाही . बायको मुलांसमोर त्याच्या देहाचे बत्तीस तुकडे करून , ते पोत्यात भरून त्याच्याच बायकोला घेऊन जाण्याचा प्रसंग असो वा गावातील झोपड्या जळताना लहान मुलाला त्यात फेकण्याचे दृश्य असो , संताप अनावर होतो . आणि सिस्टीम पुढे आपण काही करू शकत नाही ही जाणीव झाली की हतबलता येते . सरकार कुणाचेही असो सिस्टीम आपलीच आहे , या वाक्याचा प्रत्यय चित्रपट बघताना वारंवार येतो .
भारतातल्या सीमेलगतच्या प्रदेशातील खनिज संपत्ती आपल्यालाच मिळावी म्हणून मूळच्या रहिवाश्यांना गाव सोडण्याची , त्यांची ससेहोलपट करण्याची , त्यासाठी रक्तरंजित संघर्ष करण्याची जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था कार्यरत आहे , त्याचा बुरखा या चित्रपटाने फाडला आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावरून , एन जी ओंच्या माध्यमातून येणारे करोडो रुपये हे आपल्यालाच कसे मिळतील या प्रयत्नात असणाऱ्या तथाकथित डाव्यांची, त्यांना सामील असणाऱ्या व्यवस्थेची , त्यासाठी ध्येयधोरणे ठरवणाऱ्या राजकारण्यांची ही जबरी कहाणी आहे . सगळेच लांडगे एकमेकांना सामील असल्याने न्यायव्यवस्था सुध्दा कशी हतबल होते हेही समजते .
नातीगोती संपवण्याचे , संस्कृती संपवण्याचे , संदेह निर्माण करून आपापसात झुंजवत ठेवण्याचे आणि त्यासाठी कसलाही विधीनिषेध न बाळगणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या माध्यमांचे वर्तन , हा एक कंगोरा यानिमित्ताने पाहायला मिळतो .
प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीचे नाटक आणि त्यातील आधी ठरवून ठेवलेल्या निकालाचे काय करायचे या द्विधा मनःस्थितीत असलेल्या वकिलाच्या मनाची घालमेल इथे पाहायला मिळते .
देशातील पाच विद्यापीठात आपली पाळेमुळे खोलवर रुजली आहेत आणि त्या आधारावर या देशातील लोकशाही संपवून लवकरच डाव्यांची अनिर्बंध सत्ता येईल अशी स्वप्ने पाहणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू डाव्यांचा पर्दाफाश या चित्रपटाने केला आहे . आपली शिक्षण व्यवस्था कुणाच्या हातात जात आहे याची कल्पना नसणाऱ्यांचे डोळे या चित्रपटाने नक्कीच उघडतील . आपण कुणाच्या हातचे बाहुले बनून देशविघातक कारवायात सहभागी होत आहोत , याची जाणीव विद्यार्थी वर्गाला नक्की होईल .
म्हणून बस्तर , द नक्सल स्टोरी हा चित्रपट बघायला हवा . तरुणांनी , पालकांनी , समाज धुरिणांनी हा चित्रपट पाहायलाच हवा , असे मला वाटते . २०१० पूर्वी या देशात काय चालले होते , त्याची झलक यात पाहायला मिळते . खऱ्या घटनेवरील या चित्रपटाने मन अस्वस्थ केले . चित्रपटातील अनेक दृश्ये हृदय पिळवटून टाकणारी आहेत .
आपले जवान कोणत्या परिस्थितीत बाहेरच्या आणि नक्षलवाद्यांसारख्या घरच्या शत्रूंशी लढत आहेत हे बघून मन सुन्न होते . ना अद्ययावत हत्यारे , ना चांगली संपर्क यंत्रणा , ना चांगले अन्न पाणी कपडे , अनोळखी प्रदेश , पायाखाली आणि रस्त्यातून जाताना केव्हाही बॉम्बस्फोट होईल अशी परिस्थिती आणि तरीही देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेली शारीरिक आणि मानसिक सज्जता याची जाणीव होते .
आपण जवानांप्रती नेहमी कृतज्ञ असायला हवे , एवढी भावना पक्की होते . आपण बस्तर , द नक्सल स्टोरी हा चित्रपट जरूर बघा . ओ टी टी प्लॅटफॉर्मवर झी फाईव्ह वर तो उपलब्ध आहे .
मी जाहिरात करत नाही ही . आपल्यातील संवेदनशीलतेला हाकारतो आहे . आणखी खूप लिहिता येईल या चित्रपटाविषयी . पण समीक्षा हा उद्देशच नाही माझा . आपल्या देशाच्या सीमावर्ती भागात आणि राज्यांतर्गत भागात काय चालले आहे , आंतरराष्ट्रीय स्तरावर , भारताच्या अंतर्गत भागात कोण किती लक्ष घालत आहे , याचा मागोवा घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा , असे मला वाटते .
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
Leave a Reply