
फार पूर्वी मानवी तस्करी या स्फोटक विषयावर तेंडुलकरांनी “कमला ” हे नाटक लिहिलं होतं. बालगंधर्वला ते बघताना काहीतरी अघटित, डोक्याच्या पलीकडचं बघत असल्याचे वाटत राहिले. खेडेगावांमधून होणाऱ्या मानवी तस्करीबाबत माहिती गोळा करण्यासाठी दिल्लीतील पत्रकार जयसिंग स्वत: या बाजारातून कमला नामक एका तरुणीला विकत घेतो, एका पत्रकार परिषदेत भारतातील हे भीषण शहारेदायी वास्तव मांडतो आणि खळबळ उडवून देतो. नंतर तो आणि त्याची बायको सरिता या कमलामध्ये भावनिकरीत्या कसे गुंतत जातात, यावर हे नाटक बेतले होते.
दळवींप्रमाणे तेंडुलकरही नात्यांच्या गुंताड्यात आपल्याला वेढत असतात आणि सोडून निघून जातात. तेंडुलकर दळवींपेक्षा थोडे धाडसी, विस्फोटक ! त्यांच्या सगळ्याच नाटकांनी रंगमंचाला गदागदा हलवून सोडलंय.
तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकामध्ये मांडलेले मुद्दे आणि विषय यांना काळाचे बंधन नाही. ‘कमला’मध्ये मांडला गेलेला मानवी तस्करीचा विषय आजही तितकाच गंभीर आहे. पण, त्याचबरोबर माणसाचे होणारे व्यापारीकरण हा या नाटकाचा मूळ विषय आहे. आपल्या फायद्यासाठी नाटकाचा नायक कमलाचा एक वस्तू म्हणून वापर करतो. पण, त्याच वेळी नाटकाच्या पुढच्या वळणावर तो आणि त्याची पत्नी सरितासुद्धा या व्यापारीकरणाचा एक भाग होऊन जातात.
एवढं सविस्तर लिहिण्याचे कारण अर्थातच या विषयावरील “बाजार ” !
वधूची विक्री, एका गल्फमधील श्रीमंत भारतीयाला ! विक्री हा एकच समान धागा ! “कमला” दिल्लीत तर “बाजार ” हैद्राबादमध्ये ! स्मिता, नसीर, फारुख शेख, सुप्रिया पाठक, सुलभा देशपांडे- दृष्ट लागावी अशी स्टारकास्ट !
चित्रपटातील आणखी एक पात्र म्हणजे पार्श्वभूमीवरील हैद्राबाद ! ( यापूर्वी ” धरम “, ” मोहल्ला अस्सी ” , ” मुक्ती भवन” अशा अनेक चित्रपटांना वाराणशी ने सबळ पार्श्वभूमी पुरविली आहे. अगदी अलीकडचा नीना गुप्तावाला ” द लास्ट कलर “)
मूळ कथानक फारुख -सुप्रिया या तरुण जोडीभोवती, तर परिघावर स्मिता-नसीर यांचे संयमित नाते ! ” फिर छिडी रात ” हे एकमेव बागेतील प्रसन्न गाणं ! इतर गाण्यांमधून भळाळलेल्या वेदना ! बाकी सर्वदूर डार्क. हैद्राबादी वस्त्रे, भाषा, लहेजा, भडक रंगसंगती आणि कथानकही अंगावर येणारे ! प्रेमातील हळुवारपणा,नजाकत या “नज्म ” मध्ये अभावाने भेटली.
आपला नाही वाटला “बाजार “!
अतिशय तीक्ष्ण स्मिता आणि संयत नसीर भावले जरूर, पण भिडले नाही. ” करोगे याद तो ” जे खोलवर रुतून गेले ,ते आजवर तिथेच आहे.
” कमला ” मात्र अधिक ठाव घेणारे निघाले.
आम्ही वालचंदला असताना मिरज मिशन हॉस्पिटल आणि वानलेसवाडीला ” हवापाण्यासाठी (?)” अरब मंडळी येत, तेथे फेरफटका मारीत आणि उपचार (?) झाले की जाताना सोबत भारतीय बेगम घेऊन जात असत असे नवल कानी पडे.
या वृत्तातील सत्य आम्ही कधी खरवडून पाहिले नाही. उत्सुकतेने मिरजेच्या बाजारात चक्कर मारली की आम्हांला एक-दोन तरुण अरब (विनापाश) हिंडताना मात्र जरूर आढळायचे.
काही वर्षांनी “बाजार ” बघताना हा मिरजेतील बाजार आठवला आणि त्यातून मारलेले निर्हेतुक फेरफटके ! हाती काही नाही.
“बाजार” च्या बाजारातून असाच फेर फटका मारल्यासारखे वाटले. दोन-तीन अभिनयाचे तुकडे, चार घायाळ गाणी आणि ——- उदास,विषण्ण पण हात मात्र रिकामे !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply