शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला असं काहीसं ऐकल्याचं आठवत असेल नं? अशी सूचना येताच पाठकणा ताठ करून आणि सावरून बसलं जायचं. बसणं…..आपल्याला नित्यानेमाची असलेली क्रिया. कधी तरी आपण या क्रियेचेही शरीरावर काही परिणाम होऊ शकतात याचा विचार करतो का? काय? बसण्याचे दुष्परिणाम?! हो. आपल्या शरीराची एकंदरीत ठेवण पाहता ते दीर्घकाळ बसणे या क्रियेला अनुकूल असणारे नाही. किंबहुना तसे केल्यास शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम दिसतात. यातील काही महत्वाचे दुष्परिणाम आवर्जून वाचा.
१. दीर्घकाळ बसण्याने पाठीच्या कण्यावर दाब येतो. निसर्गतः S या आकारात असलेला कणा हळूहळू सरळ होऊ लागतो आणि पाठदुखी कायमची मागे लागते. मानेचा किंवा कमरेचा स्पॉंडिलोसिस ही दीर्घकाळ बसणाऱ्या व्यक्तींमध्ये नेहमी आढळणारी तक्रार असते ती यामुळेच.
२. एकाच जागी विशेष हालचाल न करता बसून राहणे हे कफ दोष आणि मेद धातूंची अवजवी वाढ करणारे आहे. कफपासून निर्माण होणारे त्रास अशा व्यक्तींना प्रामुख्याने होतात. त्यातच जोडीला एसी असेल तर मग क्या कहना?!
३. बसण्याचे सुख सतत अनुभवणे हे आयुर्वेदाने प्रमेह या व्याधीमागील एक कारण सांगितले आहे. आधुनिक वैद्यकानुसार दीर्घकाळ बसण्याने हृदयरोग, डायबेटीस, यकृत आणि किडनीचे विकार यांची शक्यता बळावते.
४. सतत बसल्याने पाय दुमडले जातात आणि विशेषतः गुडघ्यांचे स्नायू आखडून तेथील रक्तप्रवाह खंडित होतो. यामुळे सतत बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास मागे लागतो. एरव्हीदेखील आपल्या शरीरातील रक्त नामक सतत गतिमान असलेल्या धातूच्या योग्य वहनासाठी शरीरही गतिमान असणे आवश्यक असते हे लक्षात घ्या.
५. सतत बसण्याने गुदद्वारावर अवाजवी दाब येतो. त्याचे रूपांतर पुढे मूळव्याधीच्या त्रासात होते. अनेकदा ही गोष्ट आपल्या ध्यानीमनीदेखील नसते. मात्र बैठे काम असणाऱ्या व्यक्तींनी याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे.
आमच्या कामाचं स्वरूपच बैठं आहे; उपाय काय?
अगदी सोपे उपाय आहेत.
१. एकाच स्थितीत न बसता पायांची उघडझाप करणे, बसलेली अवस्था सतत बदलणे या स्वरूपात काही ना काही चलनवलन शरीराला द्यावं.
२. दर अर्ध्या-पाऊण तासाने आपल्या जागेवरून उठून एक छोटीशी चक्कर मारून यावी. तेही शक्य नसेल तर जागेजवळच उभे राहून चक्क छानपैकी आळस द्यावा! आळस देताना झालेल्या स्ट्रेचिंगमुळे उत्तम लाभ होतो; शिवाय फुफ्फुसांत जास्त प्राणवायूदेखील खेचला जातो. मात्र केवळ हाच उपाय लक्षात ठेवला असं न करता वरील दोन्ही गोष्टी आवर्जून करा.
यापुढे बसलेले असताना गाफील राहण्याऐवजी ‘बैठे बैठे सावधान’ हा कानमंत्र आवर्जून ध्यानी ठेवा.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply