संवेदनशील माणूस समुद्रप्रेमी असतोच. त्यात भरतीच्या वेळच्या लाटा अनुभवणं म्हणजे काय ते शब्दांत सांगता येणार नाही. तो अनुभव ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. उसळणाऱ्या समुद्राचे, फेसाळणाऱ्या लाटांचे, त्यांच्या एकमेकींवर आदळण्याचे, एकमेकीत विसर्जीत होण्याचे आणि तेव्हा प्रत्येक वेळी निर्माण होणाऱ्या नादाचे, घनगंभीर आवाजाचे वर्णन करणे केवळ अशक्य. विश्वनियंत्याच्या असाधारण कल्पकतेचे ते एक विराट, विलोभनीय दर्शन असते. समुद्राचे हे अतिशय शक्तिशाली आणि सोंदर्यपूर्ण रूप असते. त्याचे संहारक, विध्वंसक, प्रलयंकर ऊग्र रूपही आपल्याला ज्ञात असते.
आपल्या स्मरणात अनेक समुद्रकिनारे असतात: दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, गोवाबीच, कारवार किनारा, कन्याकुमारीचे टोक, आंध्र, चेन्नई किनारा.. पण हे सारे सपाट आणि पांढऱ्या शुभ्र वाळूंचे. भारतात अनेक ठिकाणी डोंगराचे आक्राळविक्राळ, खडकाळ सुळे समुद्रात घुसताना दिसतात.
सर्वच समुद्र नीळसर रंगाचे असतात. पण हा निळा रंगही एक नसतो. आपल्याकडील निळ्या रंगाला धूसर, काळपट किनार असते. मॉरिशस, श्रीलंका, अंदमान, मालदीव इथले समुद्र विलक्षण नीळसर दिसतात. त्या निळाईत प्रसन्नतेची आकर्षक झाक असते. तिथे फेसाळणाऱ्या लाटा आणि परस्परांवरील आघातातून, घर्षणातून पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या विविध चित्राकृती, नक्षी मनोवेधक वाटतात. भरतीच्या वेळी पुरुष-दीडपुरुष उंचावत, घोड्यांच्या आयाळीसारख्या दिसणाऱ्या, झेपावणाऱ्या लाटांमध्ये उत्तुंगता सामावलेली असते.
समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र, मुलायम वाळू त्याचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करीत असते.
क्षितिजापाशी दूरवर अस्ताचली जाणारे सूर्यबिंब सौंदर्यात अधिकच भर घालीत असते आणि विविध जहाजे. शिडाच्या होड्या चित्रात रंग भरीत असतात.
समुद्रदर्शन हा एक विलक्षण आनंददायक अनुभव असतो. मग तो आपल्याकडील असो वा अमेरिकीतील-काही फरक पडत नाही.
— डॉ. अनंत देशमुख
(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)
Leave a Reply