काय मंडळी झाली तयारी? बॅगा भरल्या का? सगळे जमले का? काका-काकू दिसत नाहीत कुठे? चला आटपा लवकर…
मी इशान्य भारत. आज तुम्हाला माझ्या घरी नेण्यास आलो आहे. माझ्या सात बहिणी तुमच्या स्वागताला मोठ्या उत्साहाने नटून थटून तयार आहेत. आपल्या महाराष्ट्रात करवीरनिवासींनी महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणूकादेवी व वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. मराठी जनमानसात या शक्तिपीठांचे श्रद्धास्थान अढळ आहे. देवीच्या ५१ शक्तीपिठातील अग्रस्थानी असलेलं कामाख्या देवीच्या दर्शनाने आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत.
गुवाहाटीस्थित निलांचल पर्वतावर माँ कामाख्या विराजमान आहे. हे योनीपीठ असून या देवस्थानाचा वार्षिकोत्सव जून महिन्यात ‘अंबूवासी मेला’ या नावाने प्रसिद्ध आहे. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यास जगभरातून जवळपास तीस लाख लोक येतात. संपूर्ण ईशान्य भारतावर या देवीच्या आर्शीवादाचा प्रभाव जाणवतो. देवीच्या कृपाप्रसादानेच आमचा सर्व प्रदेश हा सुजलाम् सुफलाम् झालेला आहे. हिरव्या गार वनराईने सजला आहे. गगनाला भिडलेले पर्वतमाथे धुक्यात दडले आहेत. त्यांच्या अंगाखांद्यावर अवखळ ओढे नाले बागडत आहेत. ब्रम्हपुत्रा आणि बराक या दोन नद्या आणि त्यांच्या असंख्य उपनद्या आमचा सारा प्रदेश आणि आमचे जीवनमान दोन्ही व्यापून उरल्या आहेत.
आपल्या बाणांच्या सामर्थ्याने समुद्र मागे सारून कोकणभूमी निर्माण करणाऱ्या महापराक्रमी परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःशस्त्रीय केली. संन्यस्थ होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याने रक्तलांच्छीत परशू ज्या कुंडात धुतला ते स्थान अर्थात परशुरामकुंड हे अरुणाचल प्रदेशात आहे. याच कुंडातून ब्रम्हपुत्रा नदी उगम पावते. आणि लुहीत या नावाने हा प्रदेश ओळखला जातो.
त्रिपुरा राज्यातील अगरताळा नगरीतील त्रिपूर सुंदरी, आणि उत्तर गुवाहाटीतील दीर्घेश्वरी देवी ही आमच्या येथील सुप्रसिद्ध शक्तिपीठे.
रामायण आणि महाभारतातील कितीतरी घटनांचा मी साक्षीदार आहे. आपण दिवाळीची पहिली अंघोळ ज्या नरकासूर वधाचा आनंद साजरा करण्याच्या निमित्ताने करतो, तो नरकासूर आसामातला सोळा हजार राजकन्या त्याच्या तावडीतून सोडवून श्रीकृष्णाने त्या वरल्या! भीमाची बायको हिडिंबा व तिचा पुत्र घटोत्कच हे नागालॅण्डमधल्या दिमापूरचे. अर्जुनाची भार्या नागकन्या उलपी आणि चित्रगंदा याही इथल्याच मातीतल्या.
सहाशे वर्षे अखंडपणे राज्य करणारे हिंदू साम्राज्य आणि आहोम राजंश याचा आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कुठे पुसटसा उल्लेखही नाही तर प्रति शिवाजी मानला जाणारा आमचा पराक्रमी वीर लाचित बरपूकन आणि त्याची सराईघाटची जगप्रसिद्ध लढाई आपल्याला माहीत असण्याची शक्यताच उद्भवत नाही. ज्या मुघलसम्राट औरंग्याच्या प्रलयकारी सेनेला परास्त करणाऱ्या माझ्या लाचितच्या पराक्रमाची गाथा याच सराईघाटावर उभा राहून तुम्हाला ऐकवायची आहे.
शिवरायांच्या गनिमीकावाचा खरा वारसा जपला तो आमच्या दरी खोऱ्यातील असंख्य अज्ञात पराक्रमी वीरांनी. विविध जनजातीतील असंख्य व स्वातंत्र्य योद्धे ज्यांनी इंग्रजांना पळती भूई थोडी केली, त्यांच्या पराक्रमाच्या असंख्य कहाण्या तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि म्हणूनच सांगतो थोडा निवांत वेळ काढून या. आमची ही भूमी दरी खोऱ्यांची, त्यात रहाणाऱ्या नाना जनजातीच्या साध्या सरळ बांधवांची, विविध भाषा, बोली जपणारी.
राजस्थानसारखे मोठ्ठाले राजवाडे, दक्षिण भारतासारखी उंच गोपूरे व अप्रतिम कोरीव शिल्पकाम मिरवणारी देवळे, गोव्या- कोकणासारखा फेसाळता समुद्र किनारा असं काहीच आमच्याकडे नाही. जे तिथे आहे ते आमच्या इथे नाही आणि जे आमच्या इथे आहे ते जगात कुठेच नाही. उगाच बढाया नाही मारत… खरंच..!
अहो, समुद्रात जशी बेटं असतात ना? तशीच नदीतही असतात बरं का! आणि जगातलं सर्वात मोठ्ठ नदीबेट कुठलं माहीत आहे? आमच्या आसामातलं ‘माजूली’ ! ‘संत शंकरदेव’ यांनी आसामातील वैष्णव धर्माची स्थापना केली. या वैष्णव धर्माचे केंद्र माजूली हे बेट आहे. येथे मठांना ‘सत्र’ असे संबोधले जाते. संपूर्ण आसाम राज्यात अशा सत्रांची जाळे उभारणी करून वैष्णव धर्माचा प्रसार केला. तुळशी वृंदावनात तुळशीच्या रोपाची आपण पूजा करतो. पण तुळशीचा वृक्ष कधी पाहिला आहे का? माजूली मधल्या एका सत्रात तुळशीच्या वृक्षाचे खोड ठेवले आहे. ज्याचा व्यास ३ फुट व लांबी २० फुटाहून जास्त आहे.
गुवाहाटी येथील ‘उमानंद’ या बेटावर शंकराचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान मानले जाते. आपण माणसांना नावाने ओळखतो. हाक मारतो. पण आमच्या मेघालयातील (एका भागात) चक्क प्रत्येक माणसासाठी वेगळी अशी शिळ (शिट्टी) वाजवून त्याला हाक मारण्यात येते. बारश्याला जसे आपण नाव ठेवतो तसे इथे प्रत्येकाला स्वतंत्र अशी शिळ (शिट्टी) ची धून ठरवली जाते व तीच त्याची/तिची ओळख बनते. आहे की नाही गंमत.
मेघालयाची ओळख म्हणाल तर ‘चेरापूंजी भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण. आठवलं का? भूगोलाच्या पुस्तकात कुठे तरी वाचलेलं. या चेरापूंजीच्या धबधब्यांची ख्याती संपूर्ण जगात पसरलेली आहे. खोल दरीत झेपावणारे प्रचंड आकाराचे धबधबे पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक इथे येतात.
चूनकळीच्या डोंगरात पावसाचे पाणी झिरपल्याने तयार झालेल्या नैसर्गिक गुफा पाहण्यासाठी एकदा तरी चेरापूंजीला यावचं लागेल. आशिया खंडातलं अच्छा! सर्वात स्वच्छ गाव कुठे आहे माहिती आहे? अर्थात आमच्या मेघालयात. मेघालयातल्या ‘डावकी’ या गावातल्या नदीचे पाणी इतकं नितळ आहे म्हणून सांगू. १५-२० फुट खोल तळसुद्धा अगदी स्पष्ट दिसतो. भारत आणि बांग्लादेशाच्या सीमेवरचं गाव ‘डावकी’.
असो! ‘उन्नाकोटी’ हे नाव ऐकलंय का? नक्कीच ऐकलं नसणार ! उन्नाकोटीचा अर्थ आहे एक कोटी संख्येला एक उणे. अर्थात नव्याण्णव कोटी, नव्याण्णव लाख, नव्याण्णव हजार, नऊशे नव्वाण्णव बापरे ! अहो एवढी शिल्प कोरली आहेत. एकाच डोंगरावर आहे की नाही गंमत. आमच्या शिल्पकलेचं एक जागतिक दर्जाचं प्रदर्शनच आहे त्रिपुरा राज्यातलं हे उण्णाकोटी.
अच्छा! ‘तश्नता तलाव’ तर तुम्ही ऐकून असालच! Floating Lake म्हणतात. मणिपूरमधला ‘लोकटास तलाव’ हा जगातला एकमेव ‘तरंगता तलाव’ म्हणून ओळखला जातो. ईशान्य भारतातील हा सर्वात मोठा तलाव आहे आणि मणिपूरच्या अर्थव्यवस्थेतही या तलावाचे मोठे योगदान आहे. इथे ७० टक्केहून अधिक भाग डोंगराळ प्रदेश आहे. आसामातलं ब्रह्मपुत्रेचं खोरं तेवढाच काय तो सपाट प्रदेश. भातशेती व भाजीपाला ही मुख्य शेती. बाकी या डोंगरदऱ्यातून रानावनातून, घनदाट जंगलातून भटकण्याचा ट्रेकिंग करण्याचा आनंद असा शब्दात मांडता येणार नाही. तो अनुभवण्यासाठीच तर तुम्हाला इथे घेऊन जाण्यास आलो आहे ना. अहो ५६ प्रकारची अरण्य आहेत इथे. ती ही पारंपरिक पद्धतीने, पिढ्यानपिढ्यांनी जपलेली. नाना तऱ्हेचे प्राणी, पक्षी, वनस्पती, फळे आणि फुले आहो. आमच्या इथे जेवढी जैविक विविधता जगात कुठेच नाही. क्षितीजापर्यंत पसरलेले चहाचे मळे, काझीरंगा, ‘मानस’ सारखी अनेक अभयारण्ये, ‘तवांग’ सारखी हिमालयातील बर्फाच्छादीत गिरीशिखरे.
अहो किती! ही यादी संपणारच नाही. पण या सर्वाहूनही अधिक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इथली माणसे. आमचा हा सर्व डोंगराळ प्रदेश. त्यामुळे धड रस्ते नव्हते. दाट जंगल रस्ते नाहीत. त्यामुळे जिथे लोकवस्ती आहे तिथे त्यांची वेगळी भाषा, संस्कृती तयार झाली. अहो, एकट्या अरुणाचल प्रदेशमध्येच २६ मुख्य व १०० हून अधिक छोट्या जमातींचे वास्तव आहे. आदि, अका, अपातानी, निशी जाती. आणि अशाच अनेक… प्रत्येक जमातीचे रितीरिवाज वेगळे, सण, उत्सव वेगळे, कपड्यांचे रंग व डिझाईन वेगळे खान-पान वेगळे. अहो एवढी विविधता आहे म्हणून सांगू… आसाममध्ये बिद्दू आणि सत्रिय हे नृत्यप्रकार तेवढेच प्रसिध्द आहेत. पण बोडो, राभा चाय बागाती जमातीचे नृत्यप्रकार देखील मंत्रमुग्ध करतील तिच कथा इतर राज्यातील नृत्य प्रकारांची. नागा व मणिपुरी रास हे दोन प्रकार थोडेसे तुम्हाला परिचित असतील कदाचित पण अरूणाचल, मिझोरोम व त्रिपुराच्या जमातीच्या नृत्य शैलीशी परिचय करून देण्यासाठीच तर मी तुम्हाला न्यायला आलो आहे.
आणि हो… कुठल्याही प्रकारचे गैरसमज, चुकीच्या माहितीच्या आधारे बनविलेले पूर्वग्रह हे सर्व सोडून या इथल्या निसर्ग सौंदर्याचा, सांस्कृतिक वारशाचा जैव विविधतेचा आकंठ आनंद उपभोगण्यासाठी, आजवर अपरिचित असलेल्या आपल्याच बंधूभगिनींना भेटण्यासाठी! या चला लवकर चला…
–रविंद्र हनमट्टेकर
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply