MENU
नवीन लेखन...

बेभान

रंगात आलेला गरबा थांबला .
क्रूझवर शांतता पसरली .
निवेदक पुढं आला . म्हणाला,
” ज्यांना आमच्याबरोबर नृत्य करण्याची इच्छा आहे , त्यांनी डान्सफ्लोअरवर यायला हरकत नाही . ”
त्याचे वाक्य संपायच्या आत ‘ते ‘ डान्सफ्लोअरवर गेले आणि पाठोपाठ आणखी पाचदहा जण डान्सफ्लोअर वर धावत गेले .

डीजेच्या तालावर पुन्हा गरबा घुमू लागला .
सगळ्यांचं लक्ष ‘ त्यांच्या ‘ वर केंद्रित झालं होतं .
आणि ते नृत्यात दंग झाले होते .

– जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा …

स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या पायथ्याशी बांधलेल्या जागेजवळ येऊन क्रूझ थांबला .
इतका वेळ नाचूनसुद्धा न दमलेले ‘ ते ‘
हसतमुखाने खाली उतरले .

त्यांच्या पाठोपाठ मीही उतरलो .
जवळ गेलो आणि हस्तांदोलन केलं , अभिनंदन केलं .
” कशासाठी ? ”
त्यांनी विचारलं .
” खूप छान नाचलात तुम्ही , याही वयात ”
” किती असेल माझं वय ? ”
” ऐंशी ? ”
मी अंदाजानं विचारलं .
” येस , केस नंबर एटी ”
त्यांनी सांगितलं .

” आता आणखी प्रश्न नकोत . ”
त्यांनी बजावलं .

अचानक ते अबोल झाले आणि क्रूझच्या डेकवर गेले .

मला स्वस्थ राहवेना .
मीही त्यांच्या पाठून डेकवर गेलो .
पण काही बोललो नाही .

सूर्यास्त झालाच होता .
नर्मदेचं पाणी शांत होतं पण गहिरेपण जाणवत होतं .
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शिल्पावर स्पॉटलाईटचा प्रकाश पडू लागला होता .

मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो .
” आपली ओळख नाही , पण हसतमुख माणूस अचानक अबोल झाला तर कुतूहल वाढतं ना , म्हणून आलो तुमच्या जवळ .”
” माझं वय ऐंशी . जवळपास सगळं जग पाहिलंय मी .खूप कमावलं आणि सत्कार्यासाठी उधळण सुद्धा केली . आता असा जीव रमवतो . ”
” मुलं कुठं असतात तुमची ? ”

त्यांचा चेहरा वेदनेनं पिळवटून निघाल्यासारखा झाला .

” सॉरी , मी विचारायला नको होता का हा प्रश्न ? ”

त्यांनी पापण्यांना ओथंबून आलेली आसवं , रुमालानं हलकेच टिपली .त्या रुमालाची हळुवारपणे घडी घातली , आणि रुमाल खिशात ठेवला .
” भावेश म्हणाला होता , डोळ्यातून अश्रू काढू नका कधी आणि चुकून आलेच तर जमिनीवर पडू देऊ नका . भावेश माझा एकुलता एक मुलगा . तो तरुणपणी कॅन्सरनं गेला आणि त्या धक्यानं माझी बायको गेली . कोरोनाचं निमित्त होऊन सून पण गेली . जाताना म्हणाली , मगन ला सांभाळा . त्याला नृत्यात करिअर करायचं आहे . सगळं जग नावाजेल इतकं मोठं आणि आनंदी करा त्याला . ”
” मगन म्हणजे तुमचा नातू ? ”
” होय . तो सीए करीत होता , नृत्यात पारंगत होत होता , पण डान्सफ्लोअरवर डान्सची प्रॅक्टिस करताना अचानक कोसळला , कधीही न उठण्यासाठी . मी प्रचंड उद्ध्वस्त झालो . कोलमडून पडलो . पण सावरलो आणि ठरवलं पुढचं सगळं आयुष्य दुसऱ्यांना हसतमुख ठेवण्यासाठी घालवायचं . इतरांना प्रेरणा मिळेल असंच वागायचं . म्हणून मी वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील नाचतो . बेभान होतो आणि नाचतो . केवळ माझ्या नातवासाठी . वाटतं , नाचता नाचता , बेभान होऊन काम करता करता केव्हातरी खाली पडून …”

त्यांचा स्वर कातर झाला .

पण क्षणात ते सावरले .
” अरे आपण इथं काय करतोय , खाली डान्सफ्लोअरवर जाऊन गाणी तरी गाऊया . ”

मी काय म्हणतोय याची वाट न बघता ते कॅप हलवत जिन्यानं खाली उतरले सुद्धा .

– पलीकडच्या घाटावर माता नर्मदेची महा आरती सुरू झाली होती . दिवे उजळले होते .ज्योती प्रकाशमान झाल्या होत्या . मी मात्र नर्मदेच्या पाण्यातली कृत्रिम दिव्यांची प्रतिबिंब बघत राहिलो होतो .
‘ त्यां ‘ चे शब्द आठवत होतो .

” आता केवळ नातवासाठी मी बेभान होऊन नाचतो .”

क्रूझवरून उतरताना ते मला पुन्हा दिसले . सगळ्यांच्या घोळक्यात . सर्वांना हसवत जात होते .

– अचानक माझ्या लक्षात आलं , ते कॅप काढून हलवत होते , माझ्याकडे पाहून .
आता माझेच डोळे पाणावले , बेभान होऊन !

( सत्य घटनेवर आधारित )

– डॉ . श्रीकृष्ण जोशी ,

रत्नागिरी

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 126 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..