नवीन लेखन...

बेभान झुंडींचे बळी

आधुनिक शिक्षण, मिळालेले ज्ञान आणि आत्मसात केलेल्या बुद्धीच्या जोरावर आजचा माणूस प्रगत आणि संवेदनशील झाला असल्याचे समजले जात असले तरी, या पृथ्वीतलावर असणाऱ्या इतरांप्रमाणे माणूस हा सुद्धा एक प्राणीच असल्याने त्याच्यातील उपजत प्राणी गुणधर्म अद्यापही नष्ट झाले नसल्याचे सभोवताली घडणाऱ्या घटनांवरून समोर येत आहे.

माणूस हा तसा समाजशील. पण, प्राण्यांच्या कळपाची प्रवृत्ती माणसातही तितकीच ठासून भरलेली आहे. या प्रवृत्तीला पोषक एकादा प्रसंग समोर आला की माणसातील सुशिक्षितपणा आणि सामाजिकता अलगदपणे गळून पडते. व त्याची मूळ रानटी वृत्ती ज्वालामुखीसारखी उफाळून येते.आणि बेफाम झालेला माणसाचा हा झुंड मग हिंसेचा कडेलोट करतो. पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ जमावाकडून घडलेल्या अमानुष हत्याकांडातही अशाच हिंस्त्र ‘कळपप्रवृत्तीचे’ प्रत्यंतर आले.

चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे बेभान झालेल्या जमावाने चोर समजून दोन साधू आणि वाहन चालकाची निर्घृणपणे हत्या केली. कळपाच्या किंव्हा झुंडीच्या वृत्तीला ना विवेक असतो ना विचार. त्यांना ढोबळ गोष्टी तेवढ्या समजतात. त्यामुळे या झुंडीकडून हिंसा केली जाते. पालघर मध्येही तेच घडले.

असे सांगितले जाते, की गडचिंचले आणि परिसरात गेल्या काही दिवसांत चोर, दरोडेखोरांच्या अफवांचे पेव फुटले होते. या अफवेच्या पार्श्वभूमीवर लोक लाठ्या-काठ्या घेऊन गस्त घालत होते. नेमक्या त्याच वेळी संबंधितांची गाडी जमावाला आडमार्गाच्या रस्त्यावरून जाताना दिसली. चोर असल्याची अफवा उडाली आणि सारासार विवेकाला सोडचिठ्ठी दिलेल्या झुंडीने त्या गाडीवर हल्ला चढवला. विशेष म्हणजे, पोलिस घटनास्थळी हजर झाल्यानंतरही माणसांचा ‘कळप’ शांत झाला नाही; तर लाठ्या काठ्यांनी तो त्या तीन निष्पाप जीवांना बडवत राहिला. गुरुवारी १६ एप्रिलला रात्री घडलेल्या या घटनेचे व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हत्याकांडाचे गांभीर्य समोर आले. चित्रफितीतील अमानुषता कुठल्याही संवेदनशील माणसाला विचलित करणारी आहे.

एका माणसाने दुसऱ्या हाडामासाच्या माणसाला मारण्यासाठी कधीच कोणतेही कारण योग्य ठरविल्या जाऊ शकणार नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यात जे घडले त्याचं आत्मपरीक्षण करावे लागेल. या हत्याकांडानंतर आता राज्यात राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोप उफाळून आले आहेत. कोरोना मुळे देशासह महाराष्ट्र संकटात असतांना सदर अमानवीय घटनेला वेगळा रंग देऊन राजकीय पोळ्या भाजण्याचा खटाटोप केला जातोय, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटलं पाहिजे. त्यामुळे, एकेकाळी प्रगल्भ असलेल्या, जगाला विचार देणाऱ्या आपल्या समाजाचं असं अध:पतन का व्हावं, यावर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

गत काही वर्षांपासून देशात झुंडशाहीचे जोरदार वारे वाहत असून, ही प्रवृत्ती हकनाक निरपराध लोकांचे बळी घेताना दिसून येत आहे. मानवी उत्क्रांतीच्या काळात वनपशूंचे हल्ले रोखण्यासाठी मानव शारीरिक हिंसेचा उपयोग करायचा. ते नैसर्गिकही होते. परंतु आजच्या काळात मानवाने बुद्धी आणि भावनांचा वापर करून एका सुसंस्कृत आणि सभ्य समाजाची निर्मिती केली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी हिंसक कृती मानवी समाजाला शोभणारी नाही.

प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. जमावबळी, हत्या, आत्महत्या, अत्याचार अशा घटनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून त्यातील क्रौर्य कमालीचे वाढले आहे. महत्वाचे म्हणजे अगदी छोट्या-मोठ्या कारणावरून आशा प्रकारच्या नृशंस घटना घडणे सभ्य मानव समाजासाठी घातक म्हणाव्या लागतील.

पालघर जिल्ह्यात घडलेली घटना म्हणजे माणुसकीची हत्याचं. आपल्या गुरूचे निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे महंत कल्पवृक्षगिरी उर्फ चिकणे महाराज त्यांचे सहकारी महंत सुशीलगिरी आणि वाहनचालक नीलेश तेलगडे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईतील कांदिवलीहून सुरतकडे निघाले होते. लॉकडाऊनमुळे चारोटी टोलनाका येथील पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ न देता परत जाण्याचा सल्ला दिला. कोणत्याही परिस्थितीत सुरत गाठायचे असल्यामुळे, ते परत फिरून विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री साडेनऊच्या सुमारास पोहचले. त्यावेळी सदर परिसरात चोर सुटले असल्याची अफवा पसरली होती. गाडीत बसलेल्यांना चोर समजून जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. जमाव तणावात असल्याचे लक्षात येताच ड्राइव्हरने पोलिसांना फोन केला. पोलीसही घटनास्थळी पोहोचले मात्र समजून घेण्याची तयारी कुणाचीच नव्हती. बेफाम असलेल्या माणसांच्या कळपाने पोलिसांनाही जुमानले नाही. एक सत्तर वर्षाचा वृद्ध आणि दोन तीस वर्षीय युवकांना ठेचून काढताना अगोदर खातरजमा करावी, असा विचार कुणाच्याही मनाला शिवला नाही. रस्त्यावर सांडणारे रक्त पाहून कुणाचीतरी माणुसकी जिवंत व्हायला हवी होती, कुणाचे तरी हृदय कळवळायाला हवे होते. परंतु असे काहीच झाले नाही. मारणाऱ्यांनी आणि बघणारयांनीही या क्रूर घटनेचा एकप्रकारे आसुरी आनंदच घेतला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे, हे सभ्य मानव समाजाचं लक्षण आहे का? असा सवाल कुणी उपस्थित करत असेल, तर तो सहाजिक म्हटला पाहिजे.

एका साध्या अफवेतुन, गैरसमजुतीतून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणावरील एक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय, अशा घटनांवर राजकारण करणे, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.

पालघरची घटना पूर्वनियोजित असल्याचा आरोप, काहींकडून करण्यात येतोय. मात्र, तपशीलात बघितलं तर चारोटी टोलनाका पोलिसांनी समोर जाऊ दिलं नाही, म्हणून मृतकांची गाडी जव्हार-दाभाडीमार्गे वळल्याचे दिसते. त्यामुळे या घटनेला पूर्वनियोजित म्हणताना वास्तविकता तपासून पाहण्याची गरज आहे.

अर्थात, या सगळ्या बाबी तपासाअंती स्पष्ट होतीलच! नव्हे तर, सदर प्रकरणातील वास्तविकता जनतेसमोर मांडून दोषींवर कडक कारवाई करण्याचं आव्हान पोलिस यंत्रणेला पेलावे लागेल. तद्वतच, अफवांमधून पसरणारा विखार, त्यातून तयार होणाऱ्या झुंडी आणि निरपराधांची हत्या, या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारच्या कारवाईतून जायला हवा. परंतु, सद्यस्थितीत समाजमन कलुषित होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल.

आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संकटाशी झुंज देत आहे. केंद्र सरकार सहित महाराष्ट्र सरकार, सरकारच्या सगळ्या यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटत आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक विद्वेष उफाळून येणार नाही, या दृष्टीने राजकारण्यांनी जबाबदारीने वागायला हवे.

पालघर जिल्ह्यात जे काही अमानवीय कृत्य घडलं, ते संबंध मानवजातीला काळीमा फासणारे आहे. त्याकडे नुसतं ‘घटना’ म्हणून बघता येणार नाही, तर त्यामागे वाढत चाललेली वृत्ती लक्षात घ्यावी लागेल. आज माणूस अधिकाधिक हिंसक आणि क्रूर होत चालला आहे. जणू काही माणसामधील सहनशीलताच संपुष्टात आल्याचं हे चित्र भयावह आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. अपराधीक कृत्य करणारा जमाव जितका समाजासाठी घातक असतो, तितकाच बघ्याची भूमिका घेणाराही दोषी असतो. त्यामुळे माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. अन्यथा विकृतीने बेफाम झालेली झुंडशाही एकदिवस मानवी समाजाला मानवी मूल्यांच्या तळाशी घेऊन जाईल, यात शंका नाही.

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..