मी मूळ सोलापूरचा. सोलापूरजवळ नळदुर्ग म्हणून गाव आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात तिथे माझा जन्म! कोकणामध्ये माझा पहिला प्रवास झाला तो गोव्यावरून परत येताना मित्रांसमवेत आणि ती पहिली ओळख माझी कोकणची! त्यानंतर हेदवीला आमचा एक प्रयोग होता नाटकाचा, त्या निमित्त कोकणात उतरून असा पहिला प्रवास झाला. हळूहळू कोकणाशी संपर्क वाढला. त्यानंतर माझे सासरेबुवा कोकण रेल्वे मध्ये होते, त्यामुळे 1988 मध्ये त्यांच्याकडे येणे-जाणे हळूहळू वाढू लागले. रत्नागिरीला पऱ्याच्या आळीमध्ये मयेकर बिल्डिंग – जी तेव्हा रेल्वे कॉर्टर केली गेली होती – तिथे ते राहत होते; दुसरी गोष्ट म्हणजे मी इंजिनिअर असल्याने कोकण रेल्वेच्या सर्व्हेला आम्ही काही जण गंमत म्हणून जायचो. कोकण रेल्वेचा पहिला ब्रिज बांधायचा होता, त्याच्या सर्व्हेला आम्ही जायचो आणि जे अगदी काठीने साप उचलून बाजूला टाकणं वगैरे प्रकार आम्ही केलेले आहेत. तिथले इंजिनियर्स म्हणजे तरुण मुलं होती. बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण दुर्दैवाने तेव्हा जे तरुण इंजिनियर्स कोकण रेल्वेसाठी काम करत होते ते बरेचसे अँक्सीडेंटमध्ये त्या काळामध्ये गेले. खरं तर एखादा मोठा प्रोजेक्ट्स होत असताना असं काहीतरी घडत असतंच. तेव्हा त्याचाही अनुभव माझ्या पाठीशी आहे, कारण मी ते अपघात स्वतः समोर बघितलेले आहे. ते दुःख माझ्याबरोबर आहे.
नंतर मग मी काही थोडा काळ नाटकाचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होतो. मग चिपळूणचे प्रयोग वगैरे तेव्हा मी घेत होतो. असाच एक चिपळूणचा प्रयोग संपवून हेदवीला मग पुढे जायचं होतं आणि तिथे एक भयंकर घटना आमच्यासोबत घडली ती म्हणजे चकवा. जी मंडळी झोपली होती त्यांना काही कळलं नसावं, पण जी मंडळी जागी होती त्यांना मात्र ते कळत होतं; कारण फिरून-फिरून गाडी पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी यायची. असंच पुढे पुन्हा एकदा आम्ही कुठला तरी प्रयोग करून येत होतो, तेव्हा साखरप्याजवळ एक चकवा मला असाच एकदा लागला होता. असे दोन चकव्यांचे अनुभव कोकणात प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत.
खास कोकणातले म्हणून जे काही पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत, त्यांचा या प्रवासा वेळी मला आस्वाद घेता आला. मला अजूनही आठवणीत आहे ती कोकणातली कढीपत्ता घालून केलेली कढी! नारळाचे दूध वापरून ती केलेली असते, तिची चव काही औरच असते. आणि ती गरम गरम खाण्यातच मजा आहे. म्हणजे नुकतीच ती चुलीवरून किंवा गॅसवरून उतरवायची आणि गरम गरम चाखायची; गार झाल्यानंतर ती कढी खाण्यामध्ये फारशी मजा येत नाही असं म्हणतात. तसंच हंगामाप्रमाणे कोकणात फिश, आंबे यांची तर काय चंगळच असते. कोकणात गेलात आणि या गोष्टी खाल्ल्या नाहीत तर कोकणचा अनुभव घेतला नाही असं मी म्हणेन. त्यात मी ‘खवय्या’ असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मी तिथून घेत असतो आणि खात असतो.
नाटकाची माझी कोकणातली अशीच आणखी एक आठवण आहे. चिपळूणला आम्ही एक नाटक घेऊन गेलो होतो आणि प्रयोग करता करता अचानक लाईट गेले. बराच वेळ लाईट येईनात, तेव्हा आम्ही नाटक तसंच करायचं ठरवलं आणि साउंड वगैरे नसताना बॅटरीवर दोन फ्लड लाईट्स लावले नि तसा आम्ही प्रयोग केला. प्रयोग स्पर्धेतला होता. तेव्हा ते नाटक पहिलं आलं होतं आणि तेव्हा हे नाटकवाले कसे आहेत बघा, साऊंड नसतानाही यांचा आवाज कसा लोकांपर्यंत पोहोचतो आणि किती एनर्जी नि आवाज ही मंडळी लावतात वगैरे आमचं कौतुक छापून आलं होतं.
तेव्हाच मधु मंगेश कर्णिक यांच्याशी भेट झाली. नंतर मग गणपतीपुळेला गेल्यानंतर मुद्दामहून आम्ही केशवसुतांच्या गावी एक फेरफटका मारला आणि नंतर पुळ्याच्या गणपतीला सतत जाणं व्हायला लागलं. तिथे मग केळकरवाडी मध्ये जाणं झालं, राहणं झालं. तिथे केळकरवाडीत शेणाने सारवलेली जमीन, आजूबाजूला सुंदर वृक्ष, बाग आणि समोर समुद्र. तिथल्या एखाद्या डेरेदार आंब्याच्या वृक्षाला खालपर्यंत लागलेला आंबासुद्धा जरी कोणी तोडला, तरीही अगदी लहान मूल रडावं तशा पद्धतीने केळकर यांच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं इतका तो झाडांच्या भावना समजून घेणारा माणूस आणि अशीही आंब्यावरही प्रेम करणारी कोकणी माणसं मी अनुभवली. तिथल्या शाळेचे जे हेडमास्तर होते, त्यांची ती केळकरवाडी आहे. गणपतीपुळे जवळ अगदी समुद्रकाठी आणि शेजारीच केतकीच बन वगैरे!
त्या सगळ्या सुंदर अनुभवानंतर माझा चिपळूणचा एक प्रयोग झाला, कोकण रेल्वेचा प्रवास झाला आणि मग कोकणाची अवीट आवड माझ्यात निर्माण झाली. पुढे जेव्हा जेव्हा प्रयोगानिमित्त किंवा फिरायला म्हणूनही गोव्याला जायचं असलं की, आम्ही कोकण मार्गेच जायला लागलो. मला एकच मुलगी आणि योगायोगाने तिचा जन्मही कोकणातलाच – करमरकर हॉस्पिटल, रत्नागिरी! कारण नोकरीच्या निमित्ताने सासरेबुवा तिकडे होते आणि माहेरपणाला गेलेल्या माझ्या पत्नीची प्रसूती तिथेच झाली. त्यानिमित्ताने रत्नागिरीशीही आमचं नातं जोडलं गेलं. मग कधीही गोव्यात जाणं झालं तर येता येता सावंतवाडीला उतरायचं. सावंतवाडीची ती प्रसिद्ध लाकडी खेळणी मुलीसाठी घ्यायची नि माघारी यायचं. अशा प्रकारे सोलापुरातल्या माझ्यासारख्या माणसाचं कोकणाशी नातं घट्ट होत गेलं, ते नातं वाढलं, वृद्धिंगत झालं आणि हळूहळू कोकण मनांत घर करून बसलं.
जेव्हा मी ’अवघाची संसार’ मालिका करत होतो तेव्हा कोकणातून प्रतिक्रिया मात्र फार यायच्या. शूटिंगच्या निमित्ताने माझं फार कोकणात जाणं कधी झालं नाही. मला वाटतं एकाच चित्रपटाचं शूटिंग तिथे दोन-तीन दिवसासाठी म्हणून मी तिथे केलेलं होतं. कोकणवासीयांचं प्रेम मात्र माझ्यावरती भरपूर आहे. कारण आताही ’आई कुठे काय करते’ सिरीयल करतोय, तेव्हा कोकणातून प्रतिक्रिया मला आवर्जून येतात. आप्पांच्या भूमिकेचं कौतुक होतं. कलेवर प्रेम करणारी ही माणसं आहेत आणि मला वाटतं पु. ल. देशपांडेंनी म्हटलंय ते खरंय – कोकणी माणूस म्हणजे फणस; बाहेरून काटे आणि आतून एक रसाळ फळ! पण मला वाटतं की, हेही समीकरण आता बदलत चाललंय. त्यामुळे आता आतून बाहेरून गोडवाच फक्त जास्त दिसतोय कोकणी माणसांचा! पिढी बदलतेय असं म्हणायला हरकत नाही.
मी MSEB त डेप्युटी इंजिनियर म्हणून काम करत असल्यामुळे माझं सहा महिन्यासाठी पोस्टिंग झालं ते चिपळूण जवळ पेडांब्याला, त्या निमित्ताने तिथं राहणं झालं. न्यू कोयना सबस्टेशनला सहा महिने होतो. तेव्हा ’पवित्र रिश्ता’ नावाची सिरीयल सुरू होती आणि नोकरी करत करत जसं मला जमेल त्या दृष्टीने ती करत होतो. कोकणात सहा महिने असताना मग दाभोळ, गुहागरला नेहमी जायचो. गुहागरला तेव्हा समुद्रावर बसायचं, समुद्राची ती गाज कानात साठवून ठेवायची आणि पुन्हा नवीन उभारी घेऊन कामावर परत यायचं. तर असा मी मनाने पक्का कोकणवासी झालो.
-किशोर महाबोले
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply