” का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा
वर्तुळात फिरतो कोष मध्यबिंदूचा;
प्रारंभ नसे ना शेवट या रेषेला
प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला”
रॉय किणीकरांच्या अप्रतिम रुबायांमधील या ४ ओळी!! किणीकरांच्या रचना, बहुतांशी “रुबाया” धर्तीवर आहेत आणि अर्थातच अल्पाक्षरी आहे. मुळात, कविता ही नेहमीच अल्पाक्षरी असते, त्यातून, रुबाया म्हणजे सगळा चार ओळींचा प्रकार. या कवितेत, आपल्या भारतीय रागदारी संगीताच्या एकूणच संपूर्ण आवाक्याचा अंदाज घेता येतो. जिथे आपण संपले असे म्हणतो तिथेच स्वरांचा वेगळा प्रवास सतत सुरु राहणे, हे आपल्याला नेहमी प्रत्ययाला येत असते आणि म्हणूनच, आपण रागदारीचे स्वरलेखन, फक्त आराखड्याच्या स्वरुपात करू शकतो. संपूर्ण आविष्कार आणि सादरीकरण, कायमस्वरूपात नव्हे.
उत्तररात्र कलत असताना पण पहाटेच्या किरणांची चाहूल अस्पष्ट जाणवत असताना, दुरून एखाद्या मंदिरातून, एकतारीचे मंद स्वर ऐकायला येतात. त्या स्वरांना कुठल्याच वाद्याची, तालाची जोड नसते, वाजत असते आपल्याच तंद्रीत आणि त्या स्वरांची बेहोशी आपल्या मनाला वेढून टाकत असते. तोडी रागाबाबत असेच काहीसे म्हणता येते. उत्तरांगातील हा तोडी राग आणि त्यातील स्वरसमूह, खरतर केवळ भक्तिमार्ग हा एकच भाव दाखवतो, हे थोडेसे एकांगी होईल पण तरीदेखील, शांत,गंभीर अशा छटा देखील या रागातून मिळतात. मघाशी मी “उत्तरांग” हा शब्द वापरला, त्याबाबत थोडक्यात. सप्तकाचे २ भाग केले असता, त्यातील पहिल्या भागाला “पूर्वांग” तर दुसऱ्या भागाला “उत्तरांग” म्हटले जाते आणि त्यानुसार रागातील स्वरांचे महत्व अधोरेखित केलेले असते. आता, २ भाग म्हणजे – ” सा”ते “प” स्वर हा पूर्वांग भाग तर “प” पासून “वरचा “सा” हा उत्तरांग भाग. प्रत्येक रागात, स्वरांची अशी ठेवण असते आणि त्यानुरूप रागाचा तोंडावळा ठरत असतो.
आता तोडी रागापुरते लिहायचे झाल्यास, या रागात, वादी स्वर “धैवत” आणि संवादी” स्वर आहे “रिषभ”. वरील मांडणीप्रमाणे, “ध” स्वर हा सप्तकाच्या दुसऱ्या भागात येत असल्याने,रागाचे स्वरूप “उत्तरांग” ठरते. तोडीमध्ये, (कोमल) रे,ग,ध आणि (तीव्र) म वगळता सगळे स्वर शुध्द स्वरूपात लागतात, निर्देशिलेले संवादी स्वर (कोमल) रे आणि वादी स्वर (कोमल) ध, यातच समाविष्ट आहे. हा राग, “षाडव – षाडव” असा आहे. थोडक्यात याचे विवेचन असे, पाच स्वरी आरोह किंवा अवरोह असेल तर “औडव”, सहा स्वरी आरोह किंवा अवरोह असेल तर “षाडव” आणि साती स्वर लागत असतील तर “संपूर्ण” अशी रागाची वर्गवारी शास्त्रात मांडलेली आहे. म्हणूनच मी वरती, तोडी रागाबद्दल, “षाडव – षाडव” असे म्हटले आहे, ते नियमाच्या अनुषंगाने. या रागातील काही प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, “म (को)ध नि सा”,”ग रे नि ध”,”म ध नि सा रे” किंवा “ध नि ध म” यांचा प्रभाव अधिक जाणवतो.
तोडी रागाचे आणखी सुंदर वैशिष्ट्य असे सांगता येईल, हा राग “मंद्र” सप्तकापासून “तार” सप्तकापर्यंत,अनंत प्रकारे विहार करू शकतो, कुठेही अटकाव नाही. त्यामुळे, ज्या गायकाची जशी तयारी असेल त्या कुवतीनुसार हा राग खुलवता येऊ शकतो.
पंडित भीमसेन जोशी आणि राग तोडी याचे नाते फार जवळचे आहे. त्यांच्या गळ्यावर जणू हा राग कोरलेला आहे!! एकतर पंडितजींचा गळा हा मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकतो. याचा परिणाम असा, तोडीसारखा सर्वसमावेशक राग, त्यांच्या कडून ऐकणे ही नेहमीच सुखद संवेदना असते. घुमारेदार आणि आश्वासक सूर ही तर पंडितजींच्या आवाजाची खासियत आहे. “चंग नैनवा” ही खास “किराणा” घराण्याची नाममुद्रा असलेली चीज ऐकणे ही सुंदर अनिर्वचनीय अनुभव आहे. चीज गायला घेताना, लावलेला पहिला सूर हा त्या आवाजाची आणि रागाची खूण. रचना ऐकताना,प्रत्येक स्वर, त्या स्वरामागील नजाकत,पीळ आणि त्या जोडीला येणाऱ्या हरकती, खास ऐकण्यासारख्या आहेत. अर्थात, जरा बारकाईने ऐकले तर सहज ध्यानात यावे, त्यावेळी देखील गायनाची शैली, स्वरोच्चार, दमसास इत्यादी वैशिष्ट्ये तीच होती, जी पुढे जाउन, त्यांच्या गायकीची “ओळख” ठरली. एकतर “किराणा” घराणे, हे नेहमीच इअत घराण्यांच्या मानाने “स्वच्छंदी” घराणे मानले जाते. भीमसेन जोशींच्या सादरीकरणात, एकाबाजूने उस्ताद आमिर खान साहेब तर दुसऱ्या बाजूने, पंडिता केसरबाई केरकर, यांचा प्रभाव जाणवतो पण असे असून देखील गायन, खास “भीमसेनी” ठश्याचे असते. मघाशी मी “किराणा” घराणे “स्वच्छंदी” म्हटले ते इथे स्पष्ट करून सांगता येईल. उस्ताद अमीर खान हे “इंदोर” घराण्याचे प्रवर्तक तर केसरबाई या “जयपुर” घराण्यातील अत्यंत प्रतिष्ठित गायिका!! असे असून देखील भीमसेन जोश्यांनी, दोन्ही घराण्यातील जे “उत्तम” आहे, ते आपल्या गायनात समाविष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. गायनात जोरकस ताना तसेच तार सप्तकात देखील, कुठेही अटकाव न होता, तानेचा विस्मयकारक प्रवास, या रचनेत ऐकायला मिळतो.
आता आपण, रागाच्या “ललित” स्वरूपाकडे बघूया. इतक्या प्रचंड आवाक्याचा राग हाताशी असल्यावर, अर्थात या रागात भक्तीसंगीत खुलले नसते तर नवल. श्रीनिवास खळेकाकांनी या रागाचा अतिशय बहारीचा उपयोग केलेला आढळतो. “अगा करुणाकरा” ही रचना या दृष्टीने ऐकण्यासारखी आहे. तुकारामांचे शब्द आणि खळेकाकांची चाल!!
“अगा करुणाकरा करितसे धावा,
या मज सोडवा लवकरी”.
आधीच तुकारामांच्या या रचनेत ओतप्रोत व्याकुळता पसरली आहे, शब्दांत गेयता आहे, तेंव्हा खळे साहेबांसाठी ही रचना आणि त्या साठी शोधलेला तोडी सारखा आर्जवी राग, हे मिश्रण भलतेच अप्रतिम झाले आहे.
खळ्यांच्या सांगीतिक कौशल्याचा अर्क म्हणजे हे गाणे म्हणता येईल. ओळीची सुरवात, परिचित सुरांनी होते पण पुढे विस्तार मात्र इतका वेगळ्या प्रकारे होतो की सुरवातीचे सूर बाजूला पडून त्याक्षणी ऐकायला येणाऱ्या सुरांनी आपण चकित होतो. अस्सल गायकी अंगाने जाणारी चाल आहे त्यामुळे गाणारी गायिका तितक्याच तयारीची असल्याशिवाय, या गाण्याला “न्याय” मिळणे अवघड!! तेंव्हा तिथे केवळ लताबाई(च) आणि दुसरा कुठला “गळा” न्याय देऊ शकणार!!
पारंपारिक भजनाचा “थाट” बाजूला सारून, आधुनिक पद्धतीची रचना केली आहे पण, तसे करताना, तुकारामांनी अभंगात जो आशय मांडला आहे, त्याला न्याय देण्याची दुहेरी जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याचे दृष्टीला पडते.
या गाण्यात लय किती वेगवेगळ्या स्तरावर फिरत असते, हे बघणे, खास अभ्यासाचा विषय आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढील क्षणात चाल तार सप्तकात जाते पण इतकी झपाट्याने जात असताना देखील गाण्याचा आशय कुठेही एकमेकांशी जरादेखील फारकत घेत नाही, हे विशेष. संगीतकार म्हणून खळेकाका किती श्रेष्ठ होते, याचा हे गाणे म्हणजे पुरावा दाखवता येईल.
“संत ज्ञानेश्वर” या चित्रपटातील “हर नयी किरन से मंगल संदेसा लायी, जागो रे, प्रभात आई”. हे गाणे तोडी रागावर आधारित आहे.
“हर नयी किरन के साथ मंगल संदेश लायी,
जागो रे जागो, प्रभात आयी, प्रभात आयी”.
वास्तविक हे गाणे, काळाच्या ओघात थोडे मागे पडले!! का? या प्रश्नाला काही उत्तर नाही. या गाण्याचा पहिला “आलाप” तोडी रागाची ओळख करून देतो. मन्ना डे सारखा असामान्य गायक हाताशी असल्यावर, संगीतकार देखील चालीत वेगवेगळ्या जागा, नवीन हरकती किंवा चालच एकदम नव्या लयीत गुंफायची, असले अवघड प्रकार करतात.
अर्थात हे गाणे. तोडी रागाचे लक्षण गीत असे म्हणता येणार नाही. गाण्याचा दुसरा अंतरा जरा नीट ऐकला,म्हणजे माझे म्हणणे नेमके समजून घेता येईल. इथे एक गमतीचा मुद्दा. वरील दोन्ही गाणी तोडी रागावर आधारित आहेत, हे तर नक्की. परंतु, गाण्याची चाल जरा नीट लक्ष देऊन ऐकली तर ध्यानात येईल, दोन्ही गाण्यांचे ” स्वभाव” वेगळे आहेत!! स्वभाव म्हणजे चालीचा बंध. तिथेच चाल आणि संगीतकार, यांचा गुणधर्म जाणून घेता येतो तसेच गाणे फुलवण्याची पद्धत अभ्यासता येते.लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने या गाण्याची चाल बांधली आहे. चित्रपटासाठी गाणे करताना, आपण सामान्य रसिकांसाठी देखील रचना करायची असते, याचे नेमके भान या संगीतकार जोडीला होते आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या रचनेतून सतत चित्रपटीय अविष्कार घडवून आणला.
मागील शतकात – ८० च्या दशकात, राहुल देव बर्मन, गुलजार आणि आशा भोसले, या असामान्य त्रयीने एक सुंदर गाण्यांचा अल्बम “दिल पडोसी है” या नावाने तयार केला होता आणि त्यात, हे गाणे समाविष्ट केले आहे.
“भीनी भीनी भोर आयी,
रूप रूप पर चिरके सोना
बलम कलश कब भागी
भीनी भीनी भोर आयी”.
आता, या गाण्यातील सुरवातीचा, आशा भोसले यांनी घेतलेला “आलाप” ऐका आणि वरच्या गाण्यातील मन्ना डे यांनी लावलेला “आलाप” ऐका. गायक/गायिका जर कुशाग्र बुद्धीमत्तेचे असतील तर एकाच रागातून, अगदी सुरवातीचे “आलाप” वेगळे घेऊन, त्याच रागाचे किती विलोभनीय रूप सादर करतात, प्रात्यक्षिक देतात.
गुलजार यांची प्रतिभाशाली कविता, हा नेहमीच सुंदर अनुभव असतो आणि त्याचे या गाण्यात देखील नेमके प्रत्यंतर येते. राहुल देव बर्मन तर नेहमीच काहीतरी “नवीन” करण्याच्या ध्यासाने पछाडलेला संगीतकार. इथे बघा, चाल “गायकी” अंगाची आहे पण, रागाची “प्रतिकृती” नाही. हाताशी आलेली चाल, गाण्यात परावर्तीत करताना, हुशार संगीतकार नेहमीच, स्वत: काहीतरी वैशिष्ट्य त्यात ठेवत असतो. या गाण्यात राहुल देव बर्मनने तेच केले आहे. सुरवातीच्या आलापीनंतर, त्याने समेची मात्रा गाठताना, कुठल्या शब्दावर सम ठेवायची तसेच एकदा सम नक्की केल्यावर, पुढे ती कशा प्रकारे विस्तारित करायची, हे सगळे इतके व्यामिश्र आणि अभ्यासपूर्ण आहे की, केवळ वरवर गाणे ऐकून, आपण या गाण्याला नेमका न्याय देणे शक्यच नाही. या गाण्यात, दुसऱ्या अंतऱ्यानंतर छोटीशी “सरगम” आहे पण ती देखील लयीच्या अंगाने तसेच त्याने जो “मीटर” ठरवून दिला आहे, त्या बंधनात ठेऊन घेतलेली आहे. संगीतकार म्हणून राहुल देव आणि गायिका म्हणून आशा भोसले, यांचा नेमका दर्जा दाखवून देणारी, ही “तर्ज” आहे.
हे गाणे असेच तोडी रागावर आधारलेले आहे. “नंद नंदन दिठू पडिया” हे मीरेचे भजन आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि लता बाईंच्या प्रतिभेचा अर्क असलेली रचना आहे.
सुरवातीच्या बासरीच्या आलापित तोडी राग दडलेला आहे आणि पुढे त्याच आलापीचा सुंदर विस्तार केलेला आहे. अर्थात, गाणे अगदी, “टिपिकल” मंगेशकरी वळणाचे आहे. ऐकतानाच ध्यानात येते, ही चाल साध्या गळ्याला पेलणारी नाही. संपूर्ण गाणे म्हणजे खरेतर तोडी रागाची “आळवणी” आहे, असे म्हटले तरी फारसे चुकीचे ठरू नये.
संपूर्ण गाणे हे समर्पण वृत्तीचे तसेच आळवणीचे गाणे आहे पण असे देखील त्यात, इतक्या बारीक हरकती आहेत, बारकाईने ऐकताना थक्क व्हावेसे वाटते. इथे कुठलाही शब्द सहज, सरळ येत नाही!! प्रत्येक शब्दामागे कमीतकमी एखादी तरी छोटीशी हरकत तरी आहे किंवा दीर्घ आलाप आहे. त्यामुळे गायला गाणे फार अवघड होऊन बसते. तालाच्या प्रत्येक मात्रेची जाण आणि किंमत माहीत असल्याशिवाय हे गाणे जमणे कठीण. यातील प्रत्येक हरकतीने गाण्याच्या चालीला सौदर्य प्राप्त झालेले आहे.
व्ही. शांताराम दिग्दर्शित “पिंजरा” चित्रपटाच्या अखेरीस, ज्याला चित्रपटीय भाषेत climax म्हणतात, त्या टप्प्यावर हे दीर्घ स्वगताच्या धर्तीवर बांधलेले गाणे – “कशी नशिबाने थट्टा आज मांडली”, हे गाणे संगीतकार राम कदमांनी सजवलेले, खास तोडी रागाची ओळख म्हणून सांगता येईल.
“दहा दिशांनी दहा मुखांनी
आज फोडिला टाहो
आंसवात या भिजली गाथा
श्रोते ऐका हो.
माझी काळजाची तार आज छेडिली
कशी नशिबाने थट्टा आज मांडिली.”
खरतर दीर्घ गाणे करायचे म्हणजे एक परीक्षा(च) असते. गाणे रेंगाळण्याची भीती बरीच असते किंवा चालीत एकसुरीपणा येऊ शकतो परंतु इथे राम कदमांनी चातुर्याने गीताचे वेगवेगळे “खंड” पाडले आहेत आणि मूळ चालीला आणि त्याच बरोबर तोडी रागाच्या सुरांनाही फिरवून घेतले आहे. सुधीर फडक्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत गाणे गायले आहे.
सत्तरीच्या दशकात, “अमर प्रेम” नावाचा सुंदर चित्रपट आला होता. चित्रपटातील सगळीच गाणी बेहतरीन आहेत पण तरीही “रैना बीती जाये” हे गाणे म्हणजे केवळ बेजोड चालीचा अलौकिक आविष्कार, असे म्हणता येईल.
“रैना बीती जाये, शाम ना आये;
निंदिया ना आये”.
जर का कविता म्हणून या गाण्याकडे बघितले तर एखादी बंदिश असावी, या थाटाची रचना आहे.
गाण्याची सुरवातच मुळी एका असामान्य आलापीने होते. हा आलाप इतका अवघड आहे की केवळ लताबाई(च) तशा आकाराचा आलाप घेऊ शकतात. चित्रपट संगीतात बरेचवेळा वापरलेला “केरवा” ताल आहे पण त्याची योजना खास राहुल देव बर्मन थाटाची आहे. खरेतर यात आणखी एक गंमत आहे. या रचनेच्या चालीत ” खमाज” राग देखील मिसळला आहे पण त्या रागाचे रंग तितकेसे गडद नाहीत आणि परिणामस्वरूप तोडी रागाचीच सावली अधिक आढळते. चाल अतिशय रमणीय आहे पण गायला अतिशय अवघड आहे. त्यातून गाण्यातील तालाचे स्वरूप पारंपारिक नसल्याने, समेची मात्रा नेमकी गाठून गाण्याचा विस्तार करणे, ही गळ्याची वेगळीच परीक्षा आहे.
खरतर या रागात इतक्या वेगवेगळ्या भावनांच्या, व्यक्तित्वाच्या चाली आहेत की सगळी गाणी आणि त्यावर थोडे टिपण असे लिहावे लागेल आणि तरीदेखील काही तरी निसटून जाईल.
— अनिल गोविलकर
Leave a Reply