नवीन लेखन...

बेळगांव निवासी प. पू. आई श्री कलावतीदेवी यांच्या सहवसातील अनुभव

मुलत: आमचे घराणे तसे नास्तिकच. परंतु माझ्या आईमुळे लहानपणीच परमार्थाचा मार्ग मिळाला आणि गोडी लागली. थोडक्यात सांगायचे म्हणजे घरामध्ये माझी आई पूर्ण आस्तिक तर वडील पूर्ण नास्तिक. आमच्या घरात एकंदर सहा माणसे होती. कै. ताराबाई मराठे माझी आई, वडील कै. यशवंतराव मराठे, सर्वात मोठी बहीण ती. मंदा, मी, चि. सतिश व चि. चंद्रकांत आशी आम्ही एकंदर चार भावंडे. माझ्या आईला तिच्या माहेरी देवाधर्माची आवड वाढेल अशा लहानपणी संस्कार झाल्यामुळे तिचे लहानवयीच लग्न होऊन सुद्धा प्रपंचात पडल्यावर आपले यजमान कट्टर नास्तिक आहेत, हे समजल्यावर सुद्धा तिचे मन अजिबात विचलीत न होता त्यात सुद्धा देवाचा काहीतरी चांगलाच उद्देश असेल असे वाटून प्रपंच करून देवाची उपासना अधिक करण्याकडे तिने आपले लक्ष केंद्रित केले. लग्नानंतर एक-दोन वर्षाच्या अंतराने आम्ही चार भावंडे जन्माला आलो. एवढ्या काळात भर म्हणून तिला देवी, टायफॉईड, टी.बी. प्ल्यूरसी अशा अनेक रोगांनी पछाडले. “श्री राम जय राम जय जय राम” जप करण्याची तिला लहानपणापासून सवय होती. शिवाय लग्न झाल्यावर श्री समर्थांचा दासबोध वाचणे हा तिचा नित्यक्रम होता. माझ्या आईची तब्बेत वरचेवर बिघडत असे. म्हणून वडील पुष्कळ संतापायचे परंतु माझ्या आईने देवाची उपासना नित्य नियमित करणे चालूच ठेवले. श्रीरामाच्या देवळात रोज जाणे तसेच शनिवारी मारूतीला जाणे हा पण नेम असे. आई जाईल तिथे मी जायचो म्हणून माझे सुद्धा देवळात जाणे घडायचे. गावात कोणी साधु-सत्पुरूष आले असे एखाद्याने सांगितले की तिचे लगेच तिथे जाणे व्हायचे. बरोबर तिच्या प्रश्नांचे गाठोडे असायचेच. परंतु किती ठिकाणी जाणे झाले तरी समाधन मिळेना. समर्थांच्या दासबोधांत “गुरु कसे असावेत” आणि नसावेत याचे वर्णन वाचताना श्रीसमर्थांसारखे गुरू आपल्याला या युगात भेटतील का? हा प्रश्न तिला वरचेवर भेडसावित असे. आधी देवाची उपासना केली तर गुरूची भेट लवकर होते. त्याचप्रमाणे तिचे बाबतीत घडले. १९५६ साली ठाण्याला बेळगांवच्या प. पू. आई श्री. कलावतीदेवी या आल्या आहेत, त्यांच्या दर्शनाला तू येशील का? असे तिच्या मैत्रिणीने विचारल्यावर “हो” असे लगेच उत्तर देऊन दुसऱ्याच दिवशी ती मैत्रिणी बरोबर त्यांच्या दर्शनाला गेली. (त्यावेळी प. पू. आईंचा मुक्कम श्री भडकमकर ब्राह्मण सोसायटी ठाणे यांचे घरी होता.) प्रथम दर्शनीच माझ्या आईला प. पू. आईंच्या दर्शनाने समाधान झाले. आईच्या बरोबर मी नेहमी जायचो म्हणून तिच्यामुळेमला सुद्धा प. पू. आईंचे दर्शन वयाच्या ९ व्या वर्षी झाले. प. पू. आईंचे दर्शन घेतल्यापासून घरी येईपर्यंत त्यांना आपण गुरू करावे असा निर्णय माझ्या आईने घेतला. परंतु आपल्याला रामनामची आवड आणि त्यांच्या मंत्र तर “ॐ नमः शिवाय” मग कसे काय जमणार? असा विचार पण तिच्या मनात आला. त्याच दिवशी रात्री नित्यनेमाप्रमाणे श्री. पांगरकरांच्या दासबोधावर असलेले श्रीसमर्थांचे कफनी घातलेले चित्रास नमस्कार करून माझी आई झोपी गेली. दुसरे दिवशी पहाटे तिला स्वप्न पडले. त्या स्वप्नांत दासबोधावरील असलेल्या चित्रातील पोशाख घालून श्री समर्थ आले आणि सिंहासनावर बसले. समोर प. पू. आई ह्या पण सिंहासनावर बसलेल्या होत्या. माझी आई मध्ये उभी होती. समर्थानी प. पू. आईंना आणि प. पू. आईनी समर्थांना नमस्कार केल्याचे तिने बघितले माझ्या आईकडे बघून समर्थ म्हणाले “सध्या मी स्त्रीरूपात अवतार धारण केला आहे.” आणि प. पू. आईंकडे बोट करुन त्यांनी सांगितले की, “तू हिला शरण जा. म्हणजे तुझे सर्व प्रश्न मिटतील.” स्पप्नातील दृष्यामुळे माझी आई खडबडून जागी झाली. पहाते तर कोणीच नाही. पण समर्थांमुळे मला गुरु लाभले या गोष्टीचा आनंद होऊन आजच आपण प. पू. आईंचा अनुग्रह घ्यायचा असे तिने ठरविले आणि दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेहमी जिभेवर येणाऱ्या रामनामाच्या जपाऐवजी “ॐ नमः शिवाय” हा मंत्र तिच्या तोंडून बाहेर पडला. त्याच दिवशी तिने ठरविल्याप्रमाणे प. पू. आईंचा अनुग्रह घेतला आणि तिच्यामुळे आमच्या सर्व कुटुंबाला प. पू. आईंच्या कृपेने पांघरुण लाभले.

प. पू. आईंचा अनुग्रह घेतल्यापासून माझ्या आईचे मन त्यांनी घालून दिलेल्या भजनाच्या नेमामध्ये स्थिर झाले आणि तिचा आणि तिच्यामुळे माझा (माझी शाळा सांभाळून) भजनाचा नेम चालू झाला. देवाच्या कृपेने माझ्या आईचा व माझा आवाज चांगला असल्यामुळे आम्ही भजनात उंच पट्टीत भजन म्हणायचो. भजनात सतत आमचा आवाज येत असल्याने आमच्या समोर आई भजनाच्या वेळेत येऊन बसायच्या त्यावेळी मध्येच डोळे उघडून न्याहाळणी करायच्या. त्यावेळी आईंनी आमच्यावर टाकलेल्या कृपाकटाक्षाने आम्हाला भजन म्हणण्यात अधिक स्फूर्ती मिळावयाची. माझ्या आईने अनुग्रह घेतलेल्या दुसऱ्या दिवशीच मी पण प. पू. आईंचा अनुग्रह घ्यायचा असे मनाशी ठरविले. पण ही गोष्ट मी माझ्या आईला सुद्धा सांगितली नाही. कारण ती एक अंतःस्फूर्ती होती. त्यावेळेला म्हणजे १९५७ साली ठाण्यातील नामदेववाडी येथे प. पू. आईंचे गुरु “श्री सिद्धरुढ” महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव प. पू. आईंच्या उपस्थितीत चालू होता. विशेष म्हणजे त्यावेळी प. पू. आईनी स्वतः आरास केली होती. सकाळच्या भजनाचा कार्यक्रम झाल्यावर अनुग्रहाची वेळ असायची एवढेच मला माहीत होते. घरातील काहीतरी वस्तु आणण्याकरता माझ्या आईने चार आणे दिले होते. त्याचा उपयोग माझ्या बाल बुद्धीनुसार मी केला. दोन आण्याचा घवघवीत हार आणि दोन आण्याचे पेढे या वस्तु मी वाटेत विकत घेतल्या आणि रस्त्याने जवळजवळ धावतच प. पू. आईंच्या ठिकाणी अनुग्रह घेण्याकरिता गेलो. त्यावेळी प. पू. आई आसनावर एकट्याच विराजमान झाल्या होत्या आणि दरवाज्यात सेवेकरी उभे होते. “मला अनुग्रह घ्यायचाय” असे मी त्यांच्याजवळ सांगताच “तु लहान आहेस, तुला अनुग्रह मिळणार नाही” असे त्यांनी सांगितले. परंतु माझ्या अंतरीची हाक प. पू. आईंना पोचल्यामुळे आईंनी माझ्याकडे पाहून ‘काय बाळ! आलास?” असे म्हटले. साहजिकच सेवेकऱ्यांनी माझा मार्ग मोकळा केला आणि आईंच्या प्रेमाकर्षणामुळे मी त्यांच्या अगदी जवळ गेलो. रस्त्याने धावतच गेलो असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील दमछाक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी खुणेनेच मला खाली बसावयास सांगितले. दोन-तीन मिनिटे झाल्यावर त्यांनी मला “काय काय आणलेस?” असे सांगताच माझ्या मनातील इच्छा ओळखून प.पू. आईंनी माझ्याकडून हार घालून घेतला आणि लगेच काढून ठेवला आणि पेढ्याची पुडी हातात घेऊन “काय! आईला खाऊ आणलास का? ” असे विचारले आणि नंतर “ॐ नम: शिवाय” हा मंत्र सांगितला. अशा तऱ्हेने प. पू. आईंनी माझी इच्छा पूर्ण केली आणि मी आईंकडून अनुग्रह घेतला. ही गोष्ट दुपारच्या भजनानंतर माझ्या आईला तिच्या मैत्रिणींकडून समजली आणि तिला सुद्धा खूप आनंद झाला.

मी इयत्ता ९ वी त असताना मे महिन्याच्य सुट्टीत माझ्या आईच्या काही मैत्रिणी बेळगांवाला श्रीहरिमंदीरात जाणार होत्या. असे माझ्या आईला कळल्यावर शाळेला सुट्टी असल्यामुळे मी सुद्धा त्यांच्या बरोबर एकदा श्रीहरिमंदीर बघून यावे, असे माझ्या आईला वाटले. त्याचप्रमाणे तिने मला सांगितले. तिने मला सांगितल्यावर मी काहीच बोललो नाही. कारण प. पू. आईंचे भजन मला पुष्कळ आवडायचे. परंतु बेळगांवला जाऊन श्रीहरिमंदीर बघावे असे केव्हा माझ्या मनात आले नाही. थोडक्यात म्हणजे मी माझ्या आईच्या आग्रहाखातर बेळगांवला गेलो. त्यावेळी शाळेत कॉलऱ्याची लस टोचून घेतल्याची रिॲ‍क्शन होऊन माझ्या अंगावर कसले तरी वण उठून भरपूर खाज यायची. तशाच परिस्थितीत मी बेळगांवला गेलो. माझ्या आईने एका भगिनीजवळ चि. अमर करता प. पू. आईंकडून काहीतरी सेवा मागून घ्या, असे सांगितले होते. त्या वयात मला “सेवा” या शब्दाचा अर्थसुद्धा अजिबात कळत नव्हता. अशातऱ्हेने माझे बेळगावला प्रथम जाणे झाले. तिथे गेल्यावर आमची उतरण्याची सोय श्रीहरिमंदिरातच प. पू. आईंनी केली होती. त्यावेळी प. पू. आई सर्वांशी खूपच समरसून वागत असत. तिथे आईंनी आमच्या सर्वांची मोठ्या आस्थेने चौकशी करुन स्वत: आम्हाला उतरायच्या खोल्या दाखविल्या. सामान कुठे ठेवायचे? संडास बाथरुम कोठे आहे? पाणी तापवायचे भांडे, पालापाचोळ्याची जागा, अंथरुण-पांघरुण तसेच भगिनींच्या ताब्यात सामानाने भरलेली स्वयंपाकाची खोली मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने दिली. याच्या अगोदर प. पू. आईंनी स्वतः हातपाय धुवायचे पाणी देऊन कोण चहा घेते, कोण कॉफी घेते अशी विचारपूस करुन त्याप्रमाणे ते देऊन सर्वांना आनंदित केले. आमचे सर्व आटपून आम्ही भजनाच्या नेमाला (सकाळच्या) गेलो. परंतु आमच्या बरोबर आलेले एक बंधू हे मात्र आंघोळ करुन चहा घतल्यावर पेपर आणण्याकरता म्हणून श्रीहरिमंदिराच्या आवाराच्या बाहेर प.पू. आईंची आज्ञा न घेता गेले व सकाळचे सात ते साडे आठ हे भजन संपल्यावर फिरत फिरत आले. त्यावेळी प. पू. आई स्वत: भजनाच्या वेळेच्या अगोदर दहा मिनिटे हातात भजनाची पिशवी घेऊन येत असत. भजनाच्या पिशवीत भजनाचे पुस्तक व झांज जोड असे. तिथे गेल्यावर त्या त्या वाराचे भजनाचे पान काढून त्या नामस्मरणाला सुरुवात करीत व भजनाची वेळ झाली की स्वतः “श्री सद्गुरुनाथ महाराज की जय” असा जयजयकार करून भजनाची सुरवात करीत असत. प्रत्येक भजनाची सुरुवात प. पू.आई अशा तऱ्हेने करायच्या की, बंधू-भगिनींना सर्वानाच त्यांच्या पट्टीत भजन म्हणता यायचे. वास्तविक आईंची भजने सगळीच तोंडपाठ होती. तरी सुद्धा “आधी केले मग सांगितले” या संतोक्तीप्रमाणे प. पू. आईंनी स्वत:च्या आचरणाने आम्हा सर्व भक्त मंडळींना भजनाचा जागेतून स्वतःच्या खोलीत येत असत. आम्ही पण सकाळचे भजन संपल्यावर आम्हाला उतरायला दिलेल्या खोलीत सर्वजण आलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाच मिनिटात प. पू. आई आम्हा सर्वाना कागदाच्या तुकड्यावर फराळ घेऊन आल्या आणि एकेकाला देऊ लागल्या. तेव्हा फराळाचा एक कागद उडाला ते बघून प. पू. आईंनी जे बंधू फिरायला गेले होते ते कुठे दिसत नाहीत, असे विचारले. तेव्हा त्यांच्या पत्नीने ते पेपर आणावयास गेले होते. असे सांगितले तेवढ्यात मागाहून ते बंधू हातात पेपर घेऊन आले. प. पू. आई त्यांच्या पत्नीला म्हाणल्या, ‘श्रीहरिमंदिरात रहायचे तर कुठलीही गोष्ट मला विचारल्याशिवाय करायची नाही आणि एकदा इथे आल्यावर परत जातानाच श्रीहरिमंदिराचे आवार इथला आनंद घेऊन सोडायचे.” हे शब्द पाठीमागे उभे असलेल्या त्या बंधूंच्या कानावर पडताच त्यांनी जिभ चावली कारण त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली होती. दुसऱ्या दिवसापासून ते बंधू हे साहजिकच भजनाला वेळेवर हजर राहू लागले. संतांचे बोलणे कधीच वायफळ नसते. त्यामुळे ते आम्हा प्रापंचिक माणसासारखे काहीतरी बोलून व्यर्थ वेळ कधीच घालवित नाहीत. परंतु बोध करण्यास काहीतरी कारण मिळले तर मात्र आळस न करता एकही संधी वाया दवडीत नाहीत असा मला अनुभव आला कारण आमच्या बरोबरचे बंधू भजनाला श्रीहरिमंदिरात वेळेवर हजर राहिले नाहीत, या त्यांच्या चुकीने आम्हाला सर्वांना “श्रीहरिमंदिरात कशाकरता यायचे?, श्रीहरिमंदिराचे नियम काणते आहेत? ” या सर्व गोष्टींची माहिती प. पू. आईंनी अतिशय साध्या भाषेत करुन दिली. श्रीहरिमंदिरात रोज सकाळी ९ ते १० प्रार्थनेला (नित्योपासना) वेळेवर जाणे असा आमचा दिनक्रम चालू झाला. सकाळचे भजन झाल्यावर रोज निरनिराळे फराळाचे पदार्थ प. पू. आई स्वत: घेऊन यायच्या. जेवणाच्या वेळेला आपण स्वत: बनवलेले पदार्थ घेऊन यायच्या व आम्हांला प्रेमाने वाढायच्या. परत संध्याकाळी भजनाला जायच्या आगोदर चहा-कॉफी होत असे व रात्रीचे जेवण ९ च्या अगोदरच उरकत असे. श्रीहरिमंदिराच्या आवारात मोठ्याने बोलायचे नाही. प्रार्थनामंदिरात “ॐ नमः शिवाय” शिवाय दुसरे काहीच बोलावयाचे नाही. प. पू. आईंनी सांगितलेलीच सेवा करायची. आईंनी हाक मारली तरच जायचे. प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचे. प. पू. आईंना काही विचारायचे झाल्यास आईंच्या खोलीच्या बाहेर तीन वेळा “ॐ नमः शिवाय” म्हणणे याचे शिक्षण आईंच्याकडून आम्हा सर्वांना मिळाले. कधी कधी भजनाचा कार्यक्रम झाल्यावर प. पू. आईंचे बोधपर प्रवचन होत असे. परंतु ते आमच्या सर्वांच्या डोक्यावरुन जायचे. त्यावेळी श्रीहरिमंदिराच्या आवाराची व कुंपणाची देखभाल प. पू. आई स्वत: करीत असत. त्यामुळे प. पू. आईंना लहर आली की प्रार्थनेच्या वेळेव्यतिरीक्त शतपावली घालीत असत. दुसरे दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर प. पू. आई सहज आल्या व तुमची जेवणे झाली का? असा प्रश्न केला. आम्ही सर्वांनी होय असे म्हटल्यावर आता थोडी विश्रांती घ्या असे म्हणाल्या. पण त्यांच्या बोलण्याचा खरा अर्थ आम्हाला न कळल्यामळे आम्ही सर्वजण गाढ झोपी गेलो. त्यामुळे प. पू. आईं परत येऊन गेल्या हे त्यांनी आम्हाला सांगितलवरच कळले. त्यावेळी आईंनी दुपारची विश्रांती म्हणजे श्रीहरिमंदिराची जी प्रकाशने आहेत त्याचे वाचन करणे, मनन करणे, जप करणे, वहीत “ॐ नमः शिवाय” लिहून काढणे, श्रीहरिमंदिराच्या आवारातील पालापाचोळा गोळा करणे यापैकी काहीतरी करण असा “दुपारच्या विश्रांतीचा” अर्थ सांगितल्यावर आम्ही सर्वजण चरकलो. दुसऱ्या दिवशी पासून आमच्या सगळ्यांचा वेळ कसा गेला ते आम्हाला प. पू. आईंचा निरोप घेईपर्यंत कळले नाही. एकदा श्रीहरिमंदिराच्या आवारात प. पू. आई शतपावली घालीत असता प. पू. आईंनी मला हाक मारली आणि फिरता फिरता “अंगावर काय उठले रे?” असे म्हणाल्या. त्यावर कॉलऱ्याची लस शाळेत टोचून घेतल्याची रीॲक्शन झाली असे मी प. पू. आईंच्या सांगण्यावरुन चि. अमरला काहीतरी सेवा द्या. असे म्हणाल्या असता प. पू. आईंनी त्यांना दोन मोठे खड्डे दाखविले व त्याला या खड्यात टाकायला सांगा असे सांगितले. प. पू. आईंनी दिलेले औषध मी त्याच रात्री लावले आणि काय आश्चर्य! दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर मला माझ्या अगावर एकही व्रण दिसेना एकंदरीत लस टोचून घेतलयाची जी रिॲक्शन झाली होती तिची पुसटशी खुण सुद्धा अंगावर राहिली नाही. हा मला त्यांच्या सहवासात आलेला पहिला मोठा अनुभव होय. आईंनी मला दिलेली सेवा सांगितली. तेव्हा या खड्डयतील माती त्या खड्यात टाकायची हा काय वेडेपणा असा विचार माझ्या मनात बालवयानुरुप आला. दोन्ही खड्डयात आहे ती माती काय वाईट आहे? असा प. पू. आईंनी प्रश्न विचारला तर आपण काय उत्तर देणार? त्यापेक्षा त्यांनी सांगितलेले तेवढे आपण करावे म्हणजे झाले. असा विचार करुन मी ती सेवा केली. पण ती सेवा केल्यावर घरातील आईसुद्धा आपल्यावर जेवढे प्रेम करणार नाही, तेवढे प. पू. आई करतात असे वाटू लागले. रोज थोडा बोध त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्याने ठाण्याहून बेळगावला जातांना माझ्या अंगात जो निरुत्साह होता तो पार नाहीसा होऊन मी उत्साही आणि आनंदी बनलो. शाळेच्या सुट्टीत भरपूर खेळायचे सोडून आपण बेळगावला कुठे जायचे? हे बेळगावला जायच्या आगोदर वाटत होते ते किती चुकीचे होते हे प. पू. आईंचा सहवास, प्रेम, बोध मिळाल्यावर समजले. “गुरुसेवा” या शब्दाचा अर्थ थोडा थोडा समजू लागला. आठ दिवस झाल्यावर घरी परत यायच्या अगोदर प. पू. आईंचा निरोप घ्यायला गेलो असताना आपण घरी जाणार याचा आनंद होण्याऐवजी इथे आठ दिवस राहून लुटलेले प्रेम, प. पू. आईंचा सहवास आता उद्यापासून आपल्याला मिळणार नाही या विचाराने माझे तसेच आमचे सर्वांचे मन दु:खी झाले. शेवटी मोठ्या जड अंतःकरणाने आम्ही प.पू. आईंचा निरोप घेऊन घरी सुखरुपपणे परत आलो. अशा तऱ्हेने मला माझ्या बेळगावला पहिल्या जाण्यातच परमोच्च आनंद, सुख, समाधान मिळाले.

पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून माझी आई कै. ताराबाई व वडील श्री. यशवंतराव उर्फ बापू यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या जागेत प. पू. आई इ. स. १९७३ ते १९७७ अशी ५ वर्षे ठाण्यात आल्यावेळी आमच्या जागेत उतरत होत्या. १९५७ साली प. पू. आईंचा मुक्काम सिद्धकला निवास येथे असताना ठाणे येथील भक्तमंडळींना सात दिवस स्वर्गसुखाचा आनंद मिळाला. रोज संध्याकाळच्या भजनात प. पू. आई भजनाला येऊन बसून सर्व भक्त मंडळींना दर्शन द्यायच्या. तसेच रोज रात्रीचे भजन झाल्यावर प. पू. आईंचे प्रवचन होत असे. अशातऱ्हेने सात दिवसात रविवारच्या सकाळच्या बालोपासनेचे धरुन एकूण प. पू. आईंची आठ प्रवचने झाली व असा सोहळा गेल्या १८ वर्षात झाला नाही असे प. पू. आईंनी माझ्या आईला जाहीर करायला सांगून ती कसे सांगते ते ऐकायला सुद्धा त्या बसल्या होत्या. मुलाचे कौतुक ज्याप्रमाणे आई न कंटाळता करते, त्याप्रमाणे प. पु. आईंनी “सिद्धकला निवास” ही वास्तू पवित्र केली. इतकेच नव्हे तर घरात आणलेल्या प्रत्येक वस्तूचे आमच्या हट्टाखातर प. पू. आईंनी उद्घाटन केले. या ५ वर्षात प. पू. आईंच्या जवळ सेवा करण्याचे भाग्य लाभले. त्याचबरोबर सद्गुरुंजवळ सेवा करणे किती कठीण आहे, याचापण आम्हाला अनुभव आला.

प. पू. आईंचे शिक्षण फक्त कानडी तीन इयत्ता झालेले होते. तरी त्यांनी काही पुस्तके लिहीली असून ती सर्व मराठीतूनच आहेत. ती अत्यंत सोप्या भाषेत असून बोधपर आहेत. पुस्तकांची नांवेपण गमतीशीर वाटतात. माझ्या मते ही पुस्तके प्रत्येक माणसाला जीवनांत आठ वर्षापासून साठवर्षापर्यंत अत्यंत उपयोगी पडणारी अशी आहेत.

पुस्तकांची नावे खालील प्रमाणे आहेत.

१) परमार्थमार्ग प्रदीप: भाग १ ला (नित्योपासना क्रम वारांची भजने) या पुस्तकात सर्व देवांची स्तुती असलेले अभंग असून रोज सकाळ व संध्याकाळ म्हणण्यासाठी सात वारांची भजन पद्धत आखली आहेत.

२) परमार्थमार्ग प्रदीप- भाग २ रा (श्रीहरिप्रेमलहरी उत्सवातील भजने) या पुस्तकात श्रीहरिमंदिरात होणाऱ्या सर्व उत्सवातील भजनाची पद्धत आखली आहे.

३) बालोपासना: प. पू. आईंनी खास बाळगोपाळांकरीतां हे पुस्तक छापले व बालमनावर संस्कार करणार कोण? हा यक्षप्रश्न सोडविला. सहवासात येणाऱ्या प्रत्येक भगिनीला बालोपासना देवून मुलांची आंघोळ झाली की पाठ देण्यास सुचविले. त्याप्रमाणे त्यांनी करू लागल्यावर मुलांचे पूर्वीचे वळण बदलत गेले व त्यांच्यात सुधारणा झाली. सध्या लाखो मुलांना या बालोपासनेची ओळख झाली असून ती त्यांनी अत्यंत प्रिय झालेली आहे.

४) नित्योपासना: नोकरीला जाणाऱ्या पण खास करून बंधुकरितां हे एक छोटेसे पुस्तक छापून नोकरीला जाता येता बस किंवा आगगाडीमध्ये वाचण्याचे करा असे सांगितले त्यामुळे त्यासर्वांना ऑफिसला जाण्या येण्याची दगदग जाणवेनाशी झाली आणि त्यामुळे सहजच घरात शांती नांदू लागली.

५) गोपाळकाला: यापुस्तकात हरिभक्तीच्या, गुरूभक्तीच्या, युक्तीच्या, शक्तीच्या, विरक्तीच्या, मूर्खपणाच्या, शहाणपणाच्या, चतुरपणाच्या, हजरजबाबीपणाच्या, विनोदीपणाच्या, रागाच्या, लोभाच्या, नितीच्या, रीतीच्या इत्यादि छोट्या माठ्या गोष्टींचे तात्पर्यासह मिश्रण आहे.

६) सत्वशील राजे: यात अंबरीष, चंद्रहास, गोपीचंद भर्तुहरी, नल, ध्रुव, भद्रायु, शिबी, श्रियाळादि राजांची संक्षिप्त चरित्रे आहेत.

७) संतमेळा: यात महाराष्ट्रातील पुंडलिक, ज्ञानेश्वर, रामदास, तुकारामादि संत, कर्नाटकातील पुरंदरदास, कनकदास, चिदंबद दीक्षित, सिद्धारूढ महाराज इत्यादि संत, मद्रासकडचे मारणनेर, बंगालकडचे लोचनदास, काश्मिरचे परमानंदजी, उत्तर हिंदुस्थानातील चैतन्यप्रभू, कबीरदास, तुलसीदासादि संतांची थोडक्यात माहिती दिली आहे.

८) सुबोधभानु: यात श्रीमन् शंकरायार्य, श्रीबसवेश्वर, वर्धमान महावीर, गुरूनानक, हजरत महम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, झरतुष्ट्र, गौतमबुद्ध यांची संक्षिप्त जीवन चरित्रे व याज्ञवल्क्यांचे सामर्थ्य, अष्टवक्र मुनींचा बोध, जडभरत, रहुगण राजा आणि यदु-अवधुत यांच्या संवाद आहे.

९) त्रिवेणीसंगम: या पुस्तकात सुकन्या, सुमती, सावित्री, रेणुकादेवी, वृंदादेवी, कात्यायनी, अनसूयादि पतिव्रता स्त्रिया, मीराबाई, हेमरेड्डी यल्लमा, जनाबाई, सखुबाई, कर्माबाई, अक्कामादेवी इत्यादि परमभक्त स्त्रिया व मदलसा, हेमलेख चुडाला इत्यादि ज्ञानी स्त्रियांची चरित्रे आहेत.

१०) श्रीकृष्णप्रताप: श्रीकृष्णाची जन्मापासून निजधामाला गेल्यापर्यंतची कथा असून त्यांत सुबोध भरलेला आहे.

११) कथासुमनहार: यात रामायण आणि महाभारतातील गोष्टी आहेत.

१२) सिद्धारूढ वैभव: यांत प. पू. आईंचे सद्गुरु श्रीमद् परमहंस सिद्धारूढस्वामी यांचे चरित्र असून त्यांत ठिकठिकाणी बोधवचने दिली आहेत.

१३) बोधामृत: यांत प्रश्नोत्तरे, मुमुक्षोद्धार, साधकोद्धार मनास बोध आणि गुरुशिष्य संवाद आहे.

१४) गुरूमाय गुणगान: ३०८ ओव्यांमध्ये प. पू. आईंचे चरित्र आहे. खूप भक्त याचा नेम करतात.

१५) प. पू. आईंचे चरित्र: विशालाक्षी लिखित प. पू. आईंचे चरित्र आहे. प्रपंच करूनच परमार्थ करायाचा हे त्यांचे मुख्य सांगणे. या चरित्राचे सात भाग असून प्रत्येक भागाला उल्हास म्हणतात. सोमवारपासून रविवारपर्यंत रोज एक उल्हास वाचला की चरित्राचे पारायण होते.

— श्री. अमरेंद्र मराठे.

सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १० वा. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..