![P-54597-subir-sen](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2019/01/P-54597-subir-sen.jpg)
बंगाली गायक सुबीर सेन यांचा जन्म १५ मे १९३२ रोजी झाला. हेमंतकुमारसारखा आवाज असलेल्या सुबीर सेन यांना हिंदी चित्रपटांमध्ये फार थोडी गाणी मिळाली आणि तीही शंकर जयकिशन यांच्या मुळे. १९५०च्या काळात हेमंतकुमार फार लोकप्रिय होते. त्यामुळे तशाच आवाजाच्या सुबीर सेन यांना शंकर जयकिशन यांनी ‘आस का पंछी’ चित्रपटात संधी दिली. नायक राजेंद्रकुमार व एनसीसी कॅडेटनी सायकलवरून म्हटलेले सुबीर सेन यांचे गाणे ‘दिल मेरा एक आस का पंछी’ फार लोकप्रिय झाले. ‘विविध भारती’वरही ते खूप गाजले. त्यानंतर शंकर जयकिशनच्याच ‘छोटी बहन’मधील ‘मैं रंगीला प्यार का राही, दूर मेरी मंझिल’ हेही गाणे सुबीर सेनला लोकप्रियता मिळवून गेले. टांग्याच्या टापांच्या तालावर लता मंगेशकर यांच्यासोबतचे हे द्वंद्वगीत लोकप्रिय झाले. ‘कठपुतली’ चित्रपटात ‘मंझिल वही है प्यार की, राही बदल गये’ हे गाणेही लोकप्रिय झाले. ‘दिल लेके जाते हो कहाँ’ हे आणखी एक गाणे!
१९५० ते १९८० या काळात त्याची गाणी बंगालीत खुप गाजली. त्यामानाने त्याला हिंदीत फार थोडी गाणी मिळाली. अतिशय मोजकी पण लक्षात राहणारी गाणी हे सुबीर सेन यांनी हिंदीत गायली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेमंतकुमारशी मिळता जुळता त्याचा आवाज. त्यामुळे त्याची वेगळी छाप हिंदी चित्रपट सृष्टीत पडू शकली नाही. हिंदी चित्रपटांत एक काळी गाण्याची अतिशय निकोप अशी स्पर्धा होती. त्यामुळे हेमंत कुमार सारखा आवाज म्हणून असलेल्या सुबीर सेन यांना खुद्द हेमंत कुमार यांनीच आपल्या चित्रपटात गायला लावले होते. सुबीर सेन यांचे २९ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुबीर सेन यांची गाणी.