‘टॉमी, बाळा ते छी आहे. तिकडे जाऊ नको’
‘विकी, कुल डाऊन, कम हिअर. लेट्स गो अहेड’
‘ज्युली, नो.. डोंट डु द्याट, इट्स डर्टी’
डोक्यावर पांघरूण घेऊन झोपेत हे बाहेरचे संवाद ऐकतांना कुणीतरी आपल्या लहान मुलांशी बोलतोय असेच वाटते. किती गोड मुले असतील असे मनात विचार येतात. पण कधी चुकून लवकर उठून बाल्कनीत आल्यावर खरे काय ते समजते. ट्रॅक सूट घातलेली मालकीन किंवा बर्म्युडा घातलेला मालक, टॉमी अथवा विकीकडे अगदी कौतुकाने पहात स्टॉप घेत घेत वॉक करत असतात, अन ते बेनं घाणीत तोंड घालत असतं. बहुतेक कुत्र्यांना मराठी समजत नाही. इंग्रजीतून बोललं तरच त्यांना कळतं अन आपलं गुबगुबीत शरीर हलवत ते पुढं निघतं.
पण कितीही समजावलं तरी ते शेवटी ते कुत्रंच! घाणीत हुंगणारच! रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांना मात्र ते आवडत नाही. आपल्या अधिकार क्षेत्रात घुसखोरी करणार्या धष्टपुष्ट जातभाईने आयत्या बिळावर रेघोट्या मारणे त्यांना पचत नाही. ते भुंकायला लागतात तसा हा लगद्या मालकीनीच्या पायाला खेटून उभं राहतं.
या तुकतुकीत कुत्र्यांचे एक वैशिष्ट्य आहे. घाणीत तोंड घातलं तरी शिटायला मात्र त्यांना स्वच्छ जागा लागते. (अस्सल मराठीतला शब्द वापरला तर रूमाल काढावा लागेल म्हणून ‘शिटायला’ हा शब्द वापरला!). एखाद्या घरातील लवकर उठणारी बाई गेटसमोर स्वच्छ झाडून घेते आणि काही वेळाने रांगोळी काढण्यासाठी बाहेर येवून पाहते तर तिच्या आधीच तिथे रांगोळी काढलेली दिसते. बिचारी ‘मोकाट कुत्र्यांचा खूप त्रास आहे’ असा मेसेज कॉलनीच्या ग्रुपवर टाकून समाधान मानून घेते.
जवळपास सगळ्या शहरात हे चित्र दिसते. पनीर पिझ्झा खाऊन गुबगुबीत झालेलं कुत्रं मालकासोबत डुलत डुलत अख्ख्या कॉलनीत फिरून वजन हलकं करूनच घरी जातं. त्याच्या सर्व विधी आटोपतांना मालकाच्या चेहर्यावर इतके संतुष्टीचे भाव उमटतात की जणू काही त्यांचाच भार कमी झालाय.
एक मोठी दोरी किंवा साखळी नावासाठीच त्याच्या गळ्यात बांधलेली असते. त्यांना खात्री असते की आपले कुत्रे (सॉरी, टॉमी! कुत्रे म्हटलेलंही काही जणांना आवडत नाही!) खूप आज्ञाधारक आहे. मॉर्निंग वॉक करणारा एखादा बाजूने जात असेल तर ‘काही करत नाही, जा तुम्ही..’ असा सल्ला देतात. पण मालकावर रागावलेला एखादा कुत्रा एखादवेळी एखाद्यावर आपला राग काढतोच. त्यानंतर काही दिवस त्याला घरीच राहण्याची शिक्षा मिळते आणि ज्याच्यावर राग काढला तो सोळा इंजक्शन घेत बसतो.
एक महाशय कुत्रे शिटायला निघाले होते. त्यांच्या जवळून एक मुलगा दुधाची बॅग घेऊन चालला होता. काही कळायच्या आत कुत्र्याने कचकन त्या मुलाच्या पायाचा चावा घेतला. बिचारा रडू लागला तर हे त्याच्यावरच ओरडायला लागले ‘दिसत नाही का कुत्रा आहे ते? दुध बॅग घेऊन त्याच्या जवळून चाललास तर तो अंगावर येणारच ना!’ बिचारा रडत लंगडत घरी गेला. पंधरा दिवस शाळा बंद, दवाखाना चालू! एका मालकीनीने तर दोरीही सोडून दिली होती. तिला आपल्या विकीवर संपूर्ण विश्वास होता! एक तरूण जोडपे जात असतांना कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. मालकीन जागेवरच बसून हसत म्हणाली ‘काही करत नाही, नुसता अंगावर येतो. इंजक्शन दिले आहे त्याला, काळजी करू नका.’ गर्भगळीत झालेल्या त्या जोडप्यांनी दुसर्याच दिवशी कॉलनी सोडली! कुत्र्यांचा द्वेष करणारे एक जोडपे होते. एकदा मुलाकडे अमेरिकेला गेले. परत आल्यावर त्यांच्यात अमुलाग्र बदल जाणवला. एक लुसलुशीत लुसी नावाची कुत्री घेऊन ते सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले. (फिरायला चाललो हे मागास वाटतं, मॉर्निंग वॉक म्हणलं की कसं, जरा गेटप येतं!). मी कधी नव्हे ते पहाटे उठून गेटचे कुलूप उघडत होतो. माझ्याकडे पाहून हसत म्हणाले ‘परवाच आलो अमेरिकेहुन’. त्यांनी सांगितले नसते तरी त्यांच्या अंगावरचा रंगीबेरंगी टीशर्ट अन बर्म्युडा पाहून कुणीही ते ओळखले असते! ‘हो का? वा छान’ मी म्हणालो.
‘हो ना. काय तिथले रस्ते, काय ती स्वच्छता… धूळ तर नावाला दिसत नाही. पहाटे फिरायला जाणारे लोक कुणाशीही बोलत नाहीत. आपण भलं आपलं काम भलं. कुत्रे घेऊन झपझप जातात. त्यामुळे वेळ वाया जात नाही ना!’ अमेरिका कौतुक पुराण सुरू झाले. ‘तिथले लोक बोलत नाहीत, मग तुम्ही कशाला बोलत आहात?’ असं विचारणार होतो, पण गिळून टाकलं. ‘पाण्याची पीएच व्हॅल्यु तपासूनच रोज पाणी पितात. आपल्यासारखे डायरेक्ट नळाचे पाणी कुणीच पित नाही तिकडे’ त्यांचा पट्टा थांबायचे नाव घेईना. तेवढ्यात त्या लुसीने माझ्या डोळ्यादेखत आपला कार्यभाग उरकला. ते गृहस्थ चक्क तोंडाने ‘शु…शु…’ करत तिच्या कळीला कळकळीने मदत करू लागले. ते पाहून मलाच कळ आली. सकाळचे अजून सर्व राहिले होते.
‘अमेरिकेतही असे चालते का हो?’ मी कळ काढली. ‘छे, छे. तिथे दंड लागतो. कुत्र्याचे मालक पॉट अन गार्बेज बॅग सोबतच घेऊन निघतात.’ ते कौतुकाने सांगू लागले. ‘मग इथं काय होल वावर इज आवर वाटलं काय रे तुला?’ असं म्हणता म्हणता मी परत गिळून टाकलं. लुसी मोकळी झाली तसे ते निघाले अन मी मोकळे व्हायला मोकळा झालो. तेव्हापासून लुंगी किंवा विजार घालणारे बर्म्युडावर दिसले (अर्थात काही अपवाद वगळून) की मी ओळखतो, हे अमेरिकेला जाऊन आले! मुलीच्या अथवा सुनेच्या डिलीव्हरीसाठी यांची अमेरिका वारी घडली असणार यात शंकाच नाही! चुकून लुंगी घोट्याच्या वर आली तरी अवघडून जाणारे हे लोक आता बिनधास्त बर्म्युडा घालून फिरतात याचे खरेच कौतुक वाटते.
एक गृहस्थ हातात पाण्याची बॉटल घेऊन चालत होते (सॉरी, मॉर्निंग वॉक करत होते). बर्म्युडा, टीशर्ट अन डोक्यावर हॅट. मी लगेच ओळखलं हे कुठे जाऊन आले ते. त्यांच्याशी गप्पा मारत असतांना टपरीवर चहा घेऊत म्हणालो. ते म्हणाले ‘नको, किती घाण आहे इथे. मी बाहेर पाणीही पित नाही. सोबत मिनरल वॉटर घेऊनच फिरतो’.
बाटलीतल्या पाण्याचा एक घोट घशाखाली ओतून ते पुढे म्हणाले ‘मुलगा तिथेच सेटल झालाय. अबाबाबा….एक एकर!’ मी विचारले ‘काय? शेत विकलं की काय?’ ‘नाही हो, एक एकरात घर बांधलंय त्यानं. काय झाडी, काय गार्डन, काय लक्झरी…’
‘एकदम ओक्के!’ त्यांना तोडत मी हसत म्हणालो. ते तिकडे असल्यामुळे त्यांनी बातम्या पाहिल्या नव्हत्या, त्यांना ओक्के कळलेच नाही.
‘मग काय! घराभोवती चार चकरा मारल्या ज्युली सोबत की बस! काहीच वेगळं करायची गरज नाही.’
‘ज्युली म्हणजे…’ डोळे बारीक करून मी शंका व्यक्त केली. ‘अहो कुत्री हो. तिकडे बहुतेक घरात कुत्रे पाळतात. घरचा मेंबरच असतो तो.’ ‘हो का, वा छान. मुलगा सुन इकडे येणार नाहीत मग आता.’ मी. ‘इथे त्यांच्या टॅलेंटला वावच नाही तर कशाला येतील इकडे?’
‘बेट्या, तू तुझा मुलगा, इथल्याच मातीत वाढलात, याच धुळीत लोळलात, इथले पाणी पिऊनच मोठे झालात, इथे शिकूनच टॅलेंट मिळवलंत, अन वर तोंड करून इथे टॅलेंटला वाव नाही म्हणतोस? सरळ सांग ना, पैसा खूप मिळतो म्हणून. टॅलेंट विकलं की पैसा मिळतोच ना, त्यात काय! खरंच टॅलेंट असेल तर अमेरिकेत जाण्यापेक्षा अमेरिकेला इथे आण म्हणावं तुझ्या पोराला! आहे का हिम्मत?’ हे सर्व मनात म्हणत टपरीवरच्या मग्ग्यातल्या पाण्यासोबत गिळून टाकलं अन त्यांना ‘बाय’ करून घरी गेलो.
घरी पोहोचलो तर दारात डिलीव्हरी बॉय! मुलीने पाठवलेले पार्सल घेऊन आत जाऊन उत्सुकतेने उघडलं तर आत चक्क बर्म्युडा!
कपाळावर हात मारणार तेवढ्यात मुलीचा मेसेज आला ‘आवडली का बर्म्युडा?’ मी रिप्लाय केला ‘तुझा अमेरिकेला जायचा विचार आहे की काय?’ तिचे उत्तर आले ‘अजिबात नाही’. मी ‘शाब्बास’ असा मेसेज पाठवून लगेच ते पार्सल माळ्यावर टाकलं अन ब्रश करायला गेलो…
नितीन म. कंधारकर
छ. संभाजीनगर.
Leave a Reply