नवीन लेखन...

दोस्त, दोस्ती आणि बरच काही…

Best Friend Day च्या निमित्ताने
अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचे दोस्त आणि दोस्ती कुणाशी ना कुणाशी होत असते. फारच थोडे लहानपणापासून एकलकोंडे असतात ते अगदी मोठे झाल्यावरही . असो, तर ही दोस्ती कुणाशी काही काळापुरती होते, कुणाशी होते आणि अल्पकाळात संपुष्टातही येते, तर कुणाशी अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत टिकून रहाते.
“आम्ही लंगोटी यार आहोत ,”
हे वाक्यच दोस्तीची व्याख्या सांगून जातं. दोस्ती ही त्याने त्याच्याशी आणि तिने तिच्याशी करायची असं अजिबात नसतं. ती स्वभाव, विचार , आवडीनुसार अगदी कुणाशीही होऊ शकते. मात्र ती निखळ, निस्वार्थ, निधर्मी, निरामय आणि नितळ असावी इतकंच.

आता काही दोत्या….(दोस्तीचं अनेकवचन)अगदी पहिल्यापासून एकमेकांच्या धमाल, मस्तीखोर स्वभावावर झालेल्या असतात. कोणत्याही गोष्टीचा फार खोलात जाऊन विचार करत न बसता, आयुष्य enjoy करायचं हे अशा प्रकारच्या दोस्त्यांचं तत्व असतं. मग लोकं म्हणतात,
“अगदी उथळ आहेत ही कार्टी, पोरकटपणा नुसता भिनलाय यांच्यामध्ये . जरासुद्धा maturity नाही की आजूबाजूचं भान नाही. कोणतीही गोष्ट seriously घ्यायचीच नसते यांना.”

अर्थात अशा दोस्त्या त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत किंवा त्यांच्या प्रतिक्रियांना उत्तरही द्यायला जात नाहीत. कारण त्यांचा स्वतःवर आणि आपल्या दोस्तीवर विश्वास असतो. थोडं विषयांतर करून सांगतो , एका दूरदर्शन मालिकेत असेच वेगवेगळ्या स्वभावाचे धमाल मित्र मैत्रिणी एकत्र रहात असतात. त्यामध्ये एका मित्राच्या घरी त्याच्यामुळेच काही तणाव निर्माण झालेला असतो. त्यावर एक मित्र म्हणतो, की “मित्राच्या घरच्या मंडळींना समजावण्यापेक्षा किंवा त्यांच्यापैकी कोण बरोबर कोण चूक याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या मित्रासाठी जितकं करता येईल तितकं आपण करावं. बस्स !”

तर अशा दोस्त्यांमधल्या कुणालाही जेव्हा खरंच मदतीची गरज असते, मदतीचा हात हवा असतो त्यावेळी याच उथळ, बिनधास्त, पोरकट दोस्त्या मनापासून हात पुढे करतात आणि आपल्या दोस्तीला सहजपणे निभावून नेतात. त्या मदतीमध्ये कोणताही अभिनिवेश नसतो. तेव्हढी गोष्ट पार पडली की पुन्हा एकदा ही मंडळी आपल्या मूळ रूपात प्रवेश करतात.
तर दुसऱ्या प्रकारातल्या दोस्त्या मोजकच बोलणाऱ्या, मोजकच हसणाऱ्या आणि मोजून मापून वागणाऱ्या असतात. यामध्ये वरच्या पहिल्या प्रकारातला कुणी प्रवेशलाच तरी तो फार काळ त्यांच्यात राहू शकत नाही , कारण यांच्याप्रमाणे वागणं बोलणं त्याला जमाणारच नसतं. या दोस्त्यांमध्ये स्वतःला विसरून वेळेला कुणी मदतीला येत नाही परंतु गरजेला योग्य सल्ला मिळतो. दिलेला सल्ला दोस्ताने घ्यावाच असा अट्टाहासही नसतो. मात्र तो अत्यंत प्रामाणिक असतो जो स्वीकारायचा की नाही हे घेणाऱ्याने ठरवायचं असतं. एकूण अशा दोस्त्यांमध्ये सगळे नीटनेटके, व्यवस्थित, सांभाळून रहाणारे, वागणारे असतात. इथे पहिल्या प्रकारासारखा धसमुसळेपणा नसतो. या दोस्त्या जीव तोडून काहीही करत नाहीत , तर प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार केला जातो. हे कधीही एकमेकांना रांगड्या शिव्या वगैरे देत नाहीत. यांची शिव्यांची सीमा मूर्ख इथपर्यंत संपते. इंग्रजीमध्ये silly किंवा mad इथपर्यंत चेहऱ्यावरची घडी फारशी न मोडता थांबते. या प्रकारातले दोस्त एकमेकांना पद्या, शिऱ्या, गण्या,परसू अशा शॉर्टकट नावाने कधीच हाक मारत नाहीत(हे सगळं पहिल्या प्रकारच्या दोस्तीत घडतं) तर प्रदीप, शिरीष, गणेश, प्रसाद अशी स्वच्छ हाक मारतात. बहुधा या दोस्त्यांमध्ये बौद्धिक चर्चा होतात, हे दारू ढोसत नाहीत तर ड्रिंक्स घेतात, आणि आडवं होईपर्यंत न घेता प्रमाणात घेऊन एकमेकांचा निरोप घेतात. एकूण काय तर पहिल्या प्रकारात सगळं अघळपघळ असतं तर दुसऱ्या प्रकारातली दोस्ती आपल्या मैत्रीला एका सभ्य स्तरावर ठेवते.

आता तिसऱ्या प्रकारातल्या दोस्त्यांमध्ये मोडणाऱ्या दोस्तांना दोस्त म्हणणं तितकसं सयुक्तिक नसतं. कारण यामधल्या प्रत्येकाचं मनाने एकमेकांशी काहीही देणं घेणं नसतं. दारू, व्यसनं, या एकाच अजेंड्याखाली सगळे एकत्र आलेले असतात. यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, मित्रत्वाची भावना ,जवळीक अजिबात नसते. कधीही क्षणभरात एखाद्या फालतू कारणाने इथे दोस्ती तुटू शकते, भांडून मारामारी सुद्धा करू शकते. इथल्या दुराव्यात चुटपुट नसते, दोस्त दुरावल्याची खंत नसते. इथे आनंद घेण्यासाठी आपल्यातल्याच दोस्ताला गिऱ्हाईक केलं जातं, त्याला मानसिक स्तरावर सतत छळलं जातं आणि त्याचा आनंद घेतला जातो , कारण या दोस्तीमधल्या मज्जा, धमाल, मस्ती करण्याच्या कल्पनाही फार सवंग असतात. इथे एकमेकांसाठी कुणीही गरजेला उपयोगी पडत नाही, कुणीही कुणाला जाणून समजून घेत नाही. अगदी नेहमी होणाऱ्या पार्ट्याची बीलं भरणाऱ्यालाही वेळेला धुत्कारलं जातं.

तर यापुढच्या दोस्त्यामधले मित्र हे सतत एका सुंदर, आगळ्या, आनंददायी पातळीवर वावरत असतात. यांना नाटक, संगीत, वाचन, लेखन, काव्य, साहित्यचर्चा, भाषणं यामध्ये रमायला मनापासून भावतं. ही मंडळी एकत्रितपणे काही ना काही सामाजिक उपक्रम राबवतात, अगदी मनापासून त्यांची आखणी करतात, मधून मधून ही मंडळी वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांशी संवाद साधतात, गणेश चतुर्थी नंतर चौपाट्या स्वच्छ करतात, या कोरोना काळातही अशा प्रकारातल्या दोत्यानी अनेक ज्येष्ठांना आधार देण्याचं काम मनापासून केलंय. या दोस्त्याना यामध्ये आनंद मिळतो कारण ही दोस्तमंडळी एका भारलेल्या परोपकारी विचाराने एकत्र आलेली असतात.

आता काही मित्रात म्हणा किंवा अनेक समवयस्क आत्ते,मामे,मावस भावंडांमध्ये असलेल्या दोस्तीमध्ये सुद्धा, त्यांनी एकमेकांना फोन केला किंवा एकमेकांची भेट झाली की आपली घट्ट जवळीक दाखवण्याची वेगवेगळी शैली असते. उदा.
“आहेस कुठे गधडे तू” ?
“माझं जाऊदे तुझा पत्ता काय साल्या ?”
“ए चल चल ! उगीच टेपा लावू नकोस”
“मेले, एक फोन करायला काय होतं ग तुला ?”
“तुझं बूड असतं का एका जागेवर ?मला बोलतेय.”
अशा संवादातून आपलं प्रेम दाखवलं जातं. तर दुसऱ्या बाजुला ,
“हॅलो ! बरेच दिवस झाले, आहेस कुठे तू भल्या माणसा ?”
“मी इथेच, तूच हल्ली महाग झालायस्.”
“कित्ती खोटं बोलतेयस .”
“अगं पण मला सांग, एक फोन करायला किती वेळ लागतो ग ?”
“अरे पण तुझ्याही टूर्स सुरूच असतात ना रे, तू कुठे स्थिर असतोस एका जागी ?”
अखेर दोस्ती म्हणजे काय ? तर दोस्ती म्हणजे धमाल साथ,
दोस्ती म्हणजे वेळेला निरपेक्षपणे पुढे केलेला हात,
दोस्ती म्हणजे विचार, दोस्ती म्हणजे आवेग, दोस्ती म्हणजे पेग.
दोस्ती म्हणजे सांभाळणं, दोस्ती म्हणजे कवटाळणं, दोस्ती म्हणजे निस्वार्थ, व्रात्य, दोस्ती म्हणजे सत्य.
अखेर दोस्ती म्हणजे आचार विचार सदाचार.
अन्यथा सगळाच अनाचार , कदाचित व्यभिचार.
दोस्ती , तुम्ही एकमेकांशी कसे बोलता, कपडे कसे घालता, तुमचा खिसा किती भरलेला असतो, एकमेकांना किती वेळ भेटता यावर अवलंबून नसते.
दोस्ती कितीही लांब असली तरी मनात रुजलेली असायला हवी, सतत जिवंत असायला हवी आणि वेळेला ती उमलून यायला हवी इतकंच.

प्रासादिक म्हणे,

–प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..