नवीन लेखन...

बेताल आणि बेभान

देशात, राज्यात कोरोना महामारीचा कहर सुरु आहे..लॉकडाउनच्या फटक्यात अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे..सीमेवर तणाव आहे..बेरोजगारी आणि आर्थिक संकटामुळे देशातील नागरिक अस्वस्थ झाले आहेत. शेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारांच्या आत्महत्येचा नवा प्रश्न समोर उभा राहिलाय. नैसर्गिक आपत्ती, आर्थिक मंदी, कोरोना आशा विविध संकटात देश होरपळून निघत असतांना राज्यात बेभान राजकारणाचा जो बेताल खेळ सुरु आहे तो निश्चितच अशोभनीय म्हटला पाहिजे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणावतचा ट्विटरवर बेताल टीवटीवाट सुरु आहे, आणि शिवसेनेची, भाजपची नेतेमंडळी बेभान होऊन आरोप- प्रत्यारोपांचा खेळ खेळन्यात दंग झालीये. एकमेकांना नीतिमूल्ये शिकवण्याच्या नादात आपणचं सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करुन टाकल्यात याचंही त्यांना भान उरलेलं नाही ही खरी शोकांतिका आहे. राज्यात कंगना विरुद्ध सत्ताधारी असा सामना सुरु आहे. केंद्रात पंतप्रधान मूळ मुद्यांवर बोलत नाही. देशात निर्माण झालेलं अर्थसंकट ही देवाची करणी असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री करतात. संसदीय अधिवेशनात प्रश्न विचारायला बंदी घालण्यात आली आहे. माध्यमांचा उथळपणा वाढत चाललाय. वृत्तनिवेदकाची भाषा मर्यादा ओलांडू लागली आहे. मुळात, ज्यावर बोलायला हवं ते मुद्दे दुर्लक्षित झाले आहेत. आणि, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं त्यावर सध्या बिनकामाचा काथ्याकूट सुरु आहे. त्यामुळे, हा बेताल तमाशा कधी थांबणार? हा प्रश्न कुठल्याही संवेदनशील माणसाला व्यथित करणारा आहे.

सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही. बोलणे आणि बरळणे यात काही फरक आहे का नाही? नीती, तत्त्व महिलांच्या मान-सन्मानाच्या गोष्टी दुसऱ्याला शिकवत असतांना बाप काढणे आणि ‘उखाडो’ सारखे शब्द खटकणारे आहेत. जी बाब अभिनेत्री कंगना रणावतची तीच शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची. त्यांनीही नाहकचा वाद अंगावर ओढवून घेण्याची जणू काही सवय लागली आहे. कुणी आपल्यावर आरोप करत असेल तर त्याचं उत्तर देताना सभ्यतेची मर्यादा पाळली पाहिजे! हे आता खा. राऊत यांना कोण सांगणार? येऊन दाखवा! करुन दाखवा! फोडून टाकू अशी धमकीची भाषा एकेकाळी शिवसेनेला शोभायची. मात्र आता सेना सत्तेत आहे. आणि खा. संजय राऊत, या नावाचा महाराष्ट्राच्या राजकारणात आज इतका टीआरपी आहे कि त्यांच्या प्रत्येक शब्दाची बातमी होते. त्यामुळे किमान त्यांनी तरी संयम पाळायला हवा. खा. संजय राऊत राज्यातील बुद्धिवादी नेते आहेत.. त्यांना सल्ला देण्याचा पर्यंत आम्ही करणार नाही. परंतु, या सगळ्यामुळे सरकार आणि राज्याची बदनामी होतेय याचा विचार करने जरुरीचे आहे. मीडियाला मसाला हवा असतो..आणि आजघडीला अभिनेत्री कंगना राणावत सह सत्ताधारी आणि विरोधकांनी त्याचा कंत्राट घेतलेला दिसतो. पण या घडामोडीत राज्यातील महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत याचे भान दुर्दैवाने कुणालाही नाही.

शब्द संभाल के बोलिये, शब्द के हाँथ न पाँव रे.. एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव रे..!’ शब्दांचं माहात्म्य वर्णन करण्यासाठी ह्या ओळी अंत्यत चपलख म्हटल्या पाहिजेत. आपण शब्द मृदू वापरतो की कठोर, यावरून तो शब्द औषधीचे काम करतो की घावाचे, हे ठरत असते. शस्त्राने केलेली जखम लवकर भरून येते, पण शब्दाने केलेली जखम भरून येण्यास दीर्घ कालावधी लागतो किंबहुना ती अनेकदा भरूनही येत नाही, त्यामुळे शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. हे उपदेश आता वाचून-एकूण, घासून-घासून गुळगुळीत झालेत. पण तरीही बोलतांना तारतम्य ठेवण्याचे भान मोठं-मोठ्यांना राहत नाही. प्रसिद्धी मिळविण्याचा, (मग ती कशी का असोना) तो राजमार्ग ठरत असल्याचे समोर येत असल्याने कदाचित ठरवून एकाद्या विषयाला फोडणी दिल्या जात असावी ! कारण काहीही असो, पण विषय सोडून बोलणाऱ्यांची संख्या राजकारणातचं नाही तर सिनेश्रुष्टी, पत्रकारिता आदी क्षेत्रातही दिवसोंदिवस वाढू लागली आहे. ही बाब चिंताजनक आहे. खरं म्हणजे आज राज्यसमोर अनेक बिकट प्रश्न आहेत. कोरोनामुळे जनतेसमोर जगण्याचे संकट उभं राहिलं आहे. नैसर्गिक आपत्ती आणि पडलेल्या बाजारामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बेरोजगारीचा आकडा आणि त्यांच्यातील निराशा वाढते आहे. एक ना हजार प्रश्न समोर असतांना सत्ताधारी मात्र या ना त्या कारणाने कंगना राणावत प्रकरणावरचं बोलताना दिसतात. वास्तविक, सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्यात आला आहे. त्यातील जी काय तथ्ये असतील ती तपासातूनच समोर येऊ शकतील! त्यामुळे सकाळपासून संध्याकाळ पर्यंत या एकाच प्रकरणावर वेळ आणि शक्ती खर्च घालवायला हवी का? याचा विचार सत्ताधार्यांनी करायला हवा.लोकशाहीत सरकार जनतेला उत्तरदायी असते आणि जनतेच्या समस्यांची सोडवणूक करणे, हे त्यांचे कर्तव्य असते. त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवे. कारण, जनता हा तमाशा फार काळ सहन करणार नाही..आणि, जनतेलाही फार काळ गृहीत धरता येणार नाही..!!

ऍड. हरिदास उंबरकर
बुलढाणा
9763469184

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..