नवीन लेखन...

बेवड्याची डायरी – भाग १० – “हॅलुस्नेशन” च्या गमती जमती !

मॉनीटर मला भ्रम ..किवा भास होण्याबद्दल सविस्तर माहिती देत असतानाच तेथे शेरकर काका आले .. ही ऐक वल्ली होती ..प्रत्येक गोष्टीत काहीतरी मस्करी करणे ..हा शेरकर काकांच्या डाव्या हाताचा मळ होता..वयाच्या ६५ व्या वर्षी ..माणूस इतका कसा कार्यक्षम आणि गमत्या असू शकतो याचे मला नवल वाटे ..आजकाल साठीनंतर सारखे हे दुखते ..ते दुखते.आता आमचे काय राहिले आहे ..असे म्हणणारी माणसे मी खूप पहिली आहेत पण ..या वयातही तरुणांना लाजवेल असं उत्साह आणि मिस्कील पणा शेरकर काकांकडून नक्कीच शिकण्यासारखा होता .. त्यांच्या बाबत एकाने मला माहिती सांगितली होती की काकांची चांगली शेतीवाडी आहे घरी .. मात्र ते कशाकडे लक्ष देत नाहीत ..मोठा मुलगा सगळे व्यवहार पाहतो .. घरी सतत अवस्थ राहतात व बाहेर मित्रांमध्ये जाऊन दारू पितात ..मग घरी आल्यावर आरडा ओरडा सुरु होतो ..असे जास्त वेळा झाले की मुलगा सरळ मैत्री च्या लोकांना फोन करून यांना घेऊन जायला सांगतो . साधारण तीन चार महिने झाले की पुन्हा घरी घेऊन जातो ..काका काही महिने चांगले राहतात व नंतर परत पिणे सुरु करतात ..परत मैत्रीत येतात .. त्यांच्या मते दारू हा त्यांचा प्रॉब्लेमचा नव्हता तर मुलाचे आणि कुटुंबियांच्या वागण्यामुळे त्यांना दारू प्यावी लागत होती …मला वाटले जो पर्यंत काका इतरांच्या चुका शोधात बसतील आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहतील तो पर्यंत त्यांचे व्यसनमुक्त राहणे कठीणच होते ….

काका मला सेंटर मध्ये उपचार घेताना अचानक भ्रमाच्या अवस्थेत गेलेल्या किवा भास झालेल्या लोकांच्या गमती सांगू लागले ..एक जण म्हणे दाखल होऊन चार दिवस झाले होते ..चार दिवस त्याला थोडा अशक्तपणा जाणवत होता ..भूक कमी होती ..व रात्री झोप नीट येत नव्हती ही तक्रार होती त्याची त्यावर औषध सुरु होते ..पाचव्या दिवशी एक दुसरा १५ दिवस झालेला जेव्हा बाथरूम मधून अंघोळ करून टॉवेल गुंडाळून वार्डात कपडे घालण्यासाठी आला . त्याच्या लॉकर मधून कपडे काढत असतांना हा नवीन गडी एकदम त्याच्या अंगावर धावून गेला ..त्याच्या पाठीवर ऐक जोरदार चापट मारून त्याला रागावू लागला ‘ तुला काही लाज लज्जा आहे की नाही ?.. इतक्या परक्या लोकांसमोर असे टॉवेल वर फिरतेस ?..वगैरे मोठमोठ्याने ओरडू लागला .. कोणाल काही कळेच ना की हा असं काय बोलतोय .. ज्याच्या पाठीवर मारले तो तर बावचळला होता .. हा मात्र त्याला रागवतच होता .. चल आत्ताच्या आत्ता निघून जा माझ्या घरातून .. असे म्हणू लागला मग मॉनीटर च्या लक्षात आले की हा ..भ्रमाच्या अवस्थेत गेलाय आणि त्या अवस्थेत तो त्या टॉवेल वर असणाऱ्या माणसाला आपली पत्नी समजतोय ..इतक्या माणसात आपली पत्नी पत्नी फक्त टॉवेल वर वावरते आहे हे पाहून त्याचे पित्त खवळले होते ..

सगळा प्रकार लक्षात येताच मॉनीटर त्याला समजावू लागला .. बराच वेळ तो गोंधळल्या सारखा होता मग थोडा भानावर आला आणि माफी मागू लागला ..सर्वाना वाटले चला आता हा या अवस्थेतून भानावर आला असणार ..पुन्हा अर्ध्या तासाने हा एकाला विचारू लागला ..मुहूर्त टळून गेलाय तरी अजून लग्न का लागत नाहीय ? ..हे इतके पाहुणे कंटाळले असतील ..लवकर लग्न लावा .. म्हणजे काही वेळाने तो परत भ्रमाच्या अवस्थेत गेला होता ..या वेळी तो त्याला वाटत होते की वार्ड मधील सगळे लोक त्याचे नातलग ..पाहुणे आहेत आणि ते त्याच्या मुलाच्या लग्नाला आले आहेत … हा भ्रमाचा प्रकार म्हणजे ऑन – ऑफ असा होता म्हणजे काही काळ ती व्यक्ती भ्रमाच्या अवस्थेत जाते तर काही काळाने पुन्हा भानावर येते ..पुन्हा भ्रमात जाते .वर वर जरी हे गमतीदार वाटले तरी ..मला जाणवले की ज्याला भ्रम होत आहेत अश्या व्यक्तीच्या बाबतीत त्याला जे भासते ते सगळे सत्य असते व अशी मेंदूची फसगत करणारी दारु मेंदूचे कितीतरी नुकसान करत असते आज पर्यंत दारूमुळे लिव्हर वर परिणाम होतो हे मी ऐकून होतो .मेंदू वर देखील असे गंभीर परिणाम होतात हे येथे समजले .. शिवाय त्या भ्रमाच्या अवस्थेतून बाहेर पडल्यावर त्या व्यक्तीला आपण भ्रमात काय काय बडबड केली किवा काय कृत्ये केली ते आठवतच नाही ..हे तर अधिकच वाईट….

एक जण म्हणे ..एकदा अचानक जेवणाच्या वेळेला त्याचे सगळे सामान लॉकर मधून काढून पिशवीत भरून जेवण घ्यायला जे लोक उभे होते त्यांच्या रांगेत उभा राहिला .. समोरच्याला त्याने गाडी किती लेट आहे असे विचारले .. ज्याला विचारले तो देखील नवीनच होता त्याला काय उत्तर द्यावे ते कळेना .. हा मात्र अगदी गंभीर पणे रेल्वे स्टेशन वर उभा राहून गाडीची वाट पाहत असल्यासारखा उभा होता .. मॉनीटर च्या लक्ष्यात आल्यावर त्याला औषध देवून झोपवले गेले ..एकजण दाखल होऊन दोन दिवस झाले होते ..आणि भ्रमाच्या अवस्थेत गेला .. त्याला असे वाटले की तो एका बार मध्येच आहे …त्याने मॉनीटरला ऐक लार्ज पेगची आर्डर दिली ..गम्मत म्हणून मॉनीटरने त्याला स्टील च्या ग्लासात ग्लुकोज घालून त्यात पाणी टाकून प्यायला दिले ..तर याने ऐटीत आधी त्या ग्लासातले दोन थेंब बोटाने बाहेर उडवले ..घटा घटा ग्लास रिकामा केला ..ते ग्लुकोज पिताना त्याने अगदी दारू पीत असल्या सारखा जरा कडवट चेहरा केला होता . परत त्याने रिपीट ची देखील ऑर्डर दिली होती नंतर . आपण येथे आलो ते बरे झाले असे मला वाटू लागले ..बाहेर दारू पिताना दारूमुळे होणारे सगळे दुष्परिणाम मला कधीच माहित झाले नसते व दारू किती भयंकर आहे ते देखील समजले नसते कधीच .. आता वाटत होते की अलकाने अगदी योग्य वेळी मला येथे दाखल केले होते..

— तुषार पांडुरंग नातू

( बाकी पुढील भागात )
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

1 Comment on बेवड्याची डायरी – भाग १० – “हॅलुस्नेशन” च्या गमती जमती !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..