नवीन लेखन...

योगा …हमसे नही होगा ! ( बेवड्याची डायरी – भाग ११)

दुपारचे जेवण आटोपून सगळे जरा विश्रांती घेत होते ..आता मला चांगली भूक लागू लागली होती .. पहिले दोन दिवस पोटात दारू नसल्याने काही खाण्याची इछाच नसे .. मळमळत होते ..मात्र आता शरीरावरील दारूचा प्रभाव संपला असावा .. बहुतेक जण विश्रांतीच्या मूड मध्ये होते .. काही तरुण मुले कोपऱ्यात भिंतीशी बसून थट्टा मस्करी करीत होते ..शेरकर काका तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने त्यांच्यात सामील झाले होते ..दोन जण बुद्धिबळाचा पट उघडून डोके लावत बसलेले ..तर चार जण कँरम भोवती .. एकंदरीत चांगले खेळीमेळीचे वातावरण झालेले .. माझा जेमतेम डोळा लागत होता तोच पुन्हा एकदा ती कर्कश्श बेल वाजली .. माझ्यासारखे नवखे धडपडून उठून बसले ..आता योगाभ्यास होणार होता असे कळले ..

माझा व योगाभ्यास यांचा छत्तीसचा आकडा होता पूर्वीपासून .. लहानपणी मी व्यायाम वगैरे खूप केलाय ..जोर ..बैठका .. अशा गोष्टी मी केल्या होत्या ..पुढे सगळे सुटले .. भलतेच सुरु झाले होते .. योग्याभ्यास म्हणजे ऋषीमुनींनी करायची गोष्ट असे माझे ठाम मत होते ..सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील या गोष्टी असल्या तरी ..आपल्याला काही मोठे योगी बनायचे नाही ..या विचाराने मी योगाभ्यासापासून चार हात दूरच राहिलो होतो .. इथे मात्र सर्वाना योगाभ्यास करणे सक्तीचे होते .. नाईलाजाने मी जरा मागेच बसलो .. योगाभ्यास घ्यायला आलेले सर ..अंगाने किडकिडीत होते ..चेहऱ्यावर मात्र प्रसन्नता होती .. त्यांनी सर्वाना अभिवादन केले .. तिकडे माँनीटर योगाभ्यास बुडविण्यासाठी नेमक्या वेळी लघवी..संडास वगैरे निमित्ताने बाथरूम मध्ये जावून बसलेल्या चुकार लोकांना शोधून बाहेर काढून ..हॉल मध्ये आणून बसवीत होता .. एकंदरीत आठदहा लोक योगाभ्यास चुकविण्याच्या मागे होते …सरांना ते माहित असावे ..सरांनी त्यांना सर्वाना पुढच्या रांगेत बसविले ..

मग ‘ योगेन चित्तस्य ..’ अशी प्रार्थना म्हंटली ..’ मित्रांनो आज आपण आधी योगाभ्यासाबद्दल नीट माहिती घेवूयात ..म्हणजे सर्वाना व्यसनमुक्ती केंद्रात योगाभ्यास का घेतला जातो याचे कारण कळेल ..तसेच मन लावून योगाभ्यास करण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल .. ‘ सरांनी पुढे एक प्रश्न विचारला ‘ योग ‘ म्हणजे काय ? ‘ आम्ही सर्व मख्खपणे त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिलो .

‘ चला ..कोणीच उत्तर देत नाहीय असे दिसतेय .. ‘ योग ‘ म्हणजे दोन गोष्टींचे एकत्र येणे असे म्हणता येईल .. संस्कृत मधील ‘ युज ‘ या शब्दापासून योग हा शब्द आलाय ..इथे शरीर आणि मन यांचे एकत्र येणे या अर्थाने ‘ योग ‘ हा शब्द वापरला जातो ..एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शरीर आणि मनाची एकाग्रता ..संतुलन ..अतिशय महत्वाचे असते .. व्यसनमुक्ती केंद्रात यावे लागणाऱ्या व्यक्तीचे मन अतिशय चंचल असते हे गृहीत आहे .. अनेक वेळा मनाने या पुढे दारू प्यायची नाही ..असे ठरवूनही ..शारीरिक ओढीमुळे आपण दारू प्यायलो आहोत ..आणि काहीवेळा शारीरिक त्रास होत असताना ..दारू पिणे शरीरीला झेपणार नाही हे ठावूक असताना देखील मन दारूकडे ओढ घेते म्हणूनही आपण दारू प्यायलो ..थोडक्यात सांगायचे तर आपण ठरविलेल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी शरीर मनाचे एकत्र येणे आवश्यक होते ..मात्र ते आपल्याला जमले नाही .येथे योगाभ्यास करून सगळ्यात आधी आपण शरीर मन एकाग्र करण्याचे शिकणार आहोत ..यासाठीच योगाभ्यास बहुधा डोळे मिटून केला जातो ..म्हणजे डोळे मिटून शरीराच्या विशिष्ट हालचाली करणे ..विशिष्ट आसने करणे ….ज्यामुळे आपले स्न्यायु ..सांधे ..पचन संस्था ..मेंदूची ग्रहणशक्ती ..मज्जा संस्थेची कार्ये यांना बळकटी मिळेल …

व्यसनाधीनतेमुळे अनेक वर्षे आपण आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे .. योगाभ्यास करून आपण शरीर आणि मन निरोगी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत .. योगाभ्यास हा फक्त ज्यांना साधू संन्यासी व्हायचेय ..मोठे योगी बनायचेय त्यांनीच करायचा असतो हा एक सर्वसाधारण गैरसमज आहे ..अष्टांग योग ..ध्यान साधना ..समाधी वगैरे अवस्था अगदी पुढील पायऱ्या आहेत .. इथे तसे काही नसणार आहे तर फक्त आपले शरीर आणि मन बळकट करण्यासाठी हलकी आसने आपण करणार आहोत ..अगदी प्रत्येकाला सहज शक्य होतील अशी आसने इथे घेतली जातील तेव्हा कंटाळा न करता एकाग्रतेने योगाभ्यास करणे आपल्या व्यसनमुक्ती साठी खूप फायदेशीर ठरेल .

सर सांगत असलेली माहिती मला नवीन होती ..माझे गैरसमज दूर व्हायला त्यामुळे मदत झाली .. पुढे सर म्हणाले इथे घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक आसनांचे फिशिष्ट फायदे आहेत ते मी वेळोवेळी सर्वाना सांगीनच .. सध्या इतकेच सांगतो की ‘ योगा मेक्स यु ..हेल्दी ..हँप्पी ..अँड क्रियेटीव्हली इफिशियंट ‘ सरांनी याचा मराठीत पुन्हा अर्थ सांगितले ..योगामुळे तुम्ही निरोगी ..आनंदी ..आणि सृजनात्मक शक्ती प्राप्त करू शकाल .. सरांचे बोलणे माझा उत्साह वाढवणारे होते .. चला काही फायदे होवोत की न होवोत .. आपण करून पाहायला काय हरकत आहे …मग सरांनी सर्वाना डोळे मिटून उताणे झोपायला सांगितले .. हात शरीराच्या बाजूला ठेवा .. मान सरळ किवा सोयीस्कर वाटेल तशी एका बाजूला कलती ठेवा .. डोळे हलकेच मिटलेले .. सगळे शरीर सैल सोडा ..शरीरात कोठेही कसलाही ताण जाणवणार नाही अश्या अवस्थेत पडून रहा .. आपण आता शरीर मनाला उत्तम विश्रांती देणारे आसन करणार आहोत .जे दिसायला अगदी सोपे आहे मात्र योग्यप्रकारे करण्यास अवघड आहे ..ज्याला सर्व आसनांचा ‘ राजा ‘ संबोधले जाते असे ‘ शवासन ‘ करणार आहोत ..सर सांगत होते त्यापद्धतीने मी उताणा झोपलो ..डोळे मिटले .. सरांचा आवाज दुरून ..खोल जागेतून आल्यासारखा वाटत होता .. !

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..