नवीन लेखन...

रविवारची सफाई.. टिवल्याबावल्या.. (बेवड्याची डायरी – भाग १७)

आज रविवार म्हणून सकाळी कोणाला लवकर उठवले गेले नव्हते ..एक तास उशिरा सगळे उठले ..रविवारी पी.टी…आणि इतर थेरेपीजना सुटी असते हे कालच समजले होते मला ..काल रात्री आमच्यासाठी ‘ डँडी ‘ या सिनेमाची सीडी लावण्यात आली होती ..एक मध्यमवयीन दारुड्याची कथा छान दाखवली गेली होती ..अनुपम खेर ने दारुड्या व्यक्तीची घालमेल ..दारूची ओढ ..कुटुंबियांचेप्रेम ..या कात्रीत सापडलेली व्यक्तिरेखा छान वठवली होती .. सिनेमा पाहताना अनेकदा मला माझ्या मुलीची आठवण झाली ..वडिलांना सुधारणेसाठी प्रेरणा देणारी ..वडिलांवर खूप प्रेम असलेली तरुण मुलगी पूजा भट्ट ने तंतोतंत साकारली होती ..

माझी मुलगी आता सहावीत गेली होती ..तिला नक्कीच दारू वाईट आहे हे समजू लागले असावे ..कारण एरवी माझ्याशी खूप मस्ती करणारी ..बडबड करणारी ..शाळेतल्या गमतीजमती खास मला सांगणारी ..सारखी माझ्या आसपास असणारी स्नेहा आताशा मी पिऊन घरी आलो की माझ्या पासून दूर दूर राही ..चूप चूप असे ..तिच्या चेहऱ्यावरची नाराजी तिला लपवता येत नसे ..हल्ली तिचे आभ्यासातही लक्ष नसते असे अलका म्हणाली होती मला ..एकदा तर अलका म्हणाली ‘ पोरगी वयात येतेय आता ..तुमच्या अशा वागण्याने ती घरात थांबू इच्छित नसते ..क्लास ..शाळा ..झाली की पूर्वी घरी थांबे ..आता काही ना काही कारण काढून जास्तीत जास्त वेळ बाहेर राहण्याचा प्रयत्न असतो तिचा ..पहा ..बर ..पोर भरकटेल उगाच ..घरात जर योग्य प्रेम ..माया ..मिळाली नाही तर मुले ते प्रेम बाहेर शोधतात ..

अलकाला मी उडवून लावले होते ..असे काही नसते ..माझ्या दारूचा आणि तिच्या घरी कमी थांबण्याचा उगाच संबंध जोडू नकोस म्हणून चिडलो होतो अलकावर ..सिनेमा पाहताना मला स्नेहाची खूप आठवण झाली ..वाटले आता या पुढे दारूत जाणारा वेळ मुलांमध्ये घालवला पाहिजे ..सिनेमातील एक गाणे मनात ठसले होते ‘ आईना मुझसे मेरी पहेलीसी सुरत माँगे ‘ ..मलाही अनेकदा मी स्वतः हरवल्या सारखा होई ..दारू जीवनात आल्यापासून हळू हळू माझे व्यक्तिमत्व बदलत गेले होते यात शंकाच नव्हती ..तसा मी अगदी कुटुंबवत्सल वगैरे वर्गात मोडणारा नव्हतो ..तरीही पत्नी मुलांचे प्रेम ..घरातील भावनिक सुरक्षितता ..वगैरे गोष्टीना प्राधान्य देत असे पूर्वी ..मात्र आताशा सगळेच बदलले होते ..उलट घरात आलो की कटकटींचा सामना करावा लागतो असे वाटे ..मुले पत्नी हे दारूच्या आड येणारे शत्रू वाटू लागले होते …हे सगळे व्याप पाठीशी नसते तर किती बरे झाले असते असेही वाटे ..

सकाळी प्रार्थना होऊन चहा झाला ..माँनीटरने वार्डची साफसफाई करण्यासाठी तीन गट तयार केले ..एका गटाला .. वार्ड मधील सर्व सामान वार्ड धुण्याच्या वेळी बाजूला उचलून ठेवणे व नंतर वार्ड सफाई झाली की पुन्हा सामान जागेवर ठेवणे ..दुसऱ्या गटाला वार्ड धुण्यासाठी पाणी पुरवणे ..आणि तिसर्या गटाला खराटे घेवून वार्ड साफ करणे अशी कामे दिली गेली .या कामात सुमारे १५ जण लागले ..बाकीचे आम्ही सारे वार्डच्या एका कोपर्यात बसून सफाईची धावपळ पाहत होतो ..चहा घेवून सगळे ताजेतवाने झाल्याने थट्टा मस्करी सुरु होती …

शेरकर काका तर एकदम खुश होते ..थेरेपीजना सुटी असली कि त्यांना फार उत्साह येई ..कारण त्यांचे फिरकी घेण्याचे काम त्यांना करता येई ..अशा वेळी ते एखाद्या वैतागलेल्या व्यक्ती जवळ जाऊन ..तुम्ही घरी कधी जाणार ? नक्की घरचे नेणार का तुम्हाला घरी ? बहुतेक बायको तुम्हाला घटस्फोट देणार असे ऐकलेय ..वगैरे प्रश्न विचारून हैराण करत ..एखाद्याला ते ..कालच तुझ्या घरातील लोक ऑफिस मध्ये येवून तुझे सहा महिन्यांचे पैसे भरून गेलेत असे मला ऑफिसमधून समजले आहे ..आता सहा महिने इथून सुटका नाही असे सांगून त्याचे ब्लडप्रेशर वाढवत…. तर एखाद्याला तुझे डोळे पिवळे दिसतात ..आजकाल तुझे जेवणही कमी झालेय ..काही समस्या आहे का ? बहुतेक कावीळ झाली असेल तुला असे म्हणून त्याला चिंतेत टाकत असत ..सगळी गम्मत चालली होती..

शेरकर काकांनी हैराण केलेले सगळे मग सारखे माँनीटर कडे जावून त्याच्या कडे स्पष्टीकरण मागत असत ..माँनीटर काकांवर चिडला की काका मिस्कील हसून त्याला डोळा मारत ..जरी शेरकर काका अशी मस्करी वगैरे करणारे होते ..तरीही त्यांचे एक वैशिष्ट्य देखील मी पहिले होते ..ते नेहमी इतरांना मदत करत असत ..त्यामुळे त्यांचा कितीही राग आला तरी त्यांच्याशी भांडत नसे कोणी …साफसफाईचे काम सुरु असताना काकांनी टूम काढली की जे नियमित अंघोळ करत नाहीत त्यांना आज आंघोळ करायला लावायची ..झाले लगेच कोण कोण रोज अंघोळ करत नाहीत याचे संशोधन सुरु केले सर्वांनी ..अतिउत्साही सदस्यांनी चारपाच लोक निवडून काढले जे अंघोळीचा कंटाळा करत असत ..तसेच ..दात घासणे ..दाढी करणे ..स्वतचे कपडे वेळच्या वेळी धुणे वगैरे व्यक्तिगत स्वच्छतेबाबत देखील निष्काळजी होते ..आळशी होते ..त्या चारपाच जणांना मग जबरदस्ती ढकलून अंघोळीला पाठवण्यात येवू लागले ..तीन जण गेले मात्र दोन हट्टी लोक आम्ही नंतर अंघोळ करतो ..आता नाही करणार ..असा वाद घालू लागले ..अगदी हमरातुमरी वर आले होते ते ..

त्यांना अंघोळीला पाठवणे कठीण आहे हे जाणून शेरकर काकांनी गुपचूप जावून दोन बादल्या पाणी भरून आणले ..मग त्यांना काही कारणाने मोकळ्या जागेत बोलावले गेले ..मागून पटकन एकाने पाण्याची बादली त्यांच्या अंगावर टाकली ..ते क्षणभर गोंधळून गेले ..एकदम हक्केबक्के झाले ..मग ओशाळल्या चेहऱ्याने…नाईलाजाने त्यांना बाथरूम मध्ये जावेच लागले ..खराटे घावून वार्डसफाई करणाऱ्या लोकांची देखील काम करताना एकमेकांची मस्करी करणे..अंगावर पाणी उडवणे असे सुरु होते ..वार्डची फारशी धुण्यासाठी त्यावर निरमा पावडर टाकलेली होती ..सगळीकडे निसरडे झालेले ..दोन जण त्यात पाय घसरून पडले ..अर्थात ते सावध असल्याने फारसे लागले नाही ..मात्र सगळे कपडे ओले झालेले ..मग त्यांनीही तेथेच अंगावर अजून दोन बदल्या ओतून घेतल्या ..इतरांच्याही अंगावर पाणी फेकले ..सगळेच ओल्या कपड्यांनी मस्ती करू लागले ..मला या सगळ्याची गम्मत वाटत होती ..दारू पिण्याच्या काळात दुर्मुखलेले ..जीवनाला कंटाळलेले ..सतत चिडचिड करणारे आम्ही दारुडे इथे.. दारू बंद असताना ..जीवनाचा खरा आनंद घेत होतो ..जीवनाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालला होता ..सर्व भानगडी पाहून ..खूप दिवसांनंतर मी मनमोकळा हसलो ..अगदी पोट आणि गाल दुखायला लागले हसून हसून ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..