अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या दुसऱ्या पायरीत सरांनी ईश्वर किवा उच्च शक्तीचे स्वरूप …तसेच प्रत्येकाच्या जिवनात ती उच्चाशक्ती निसर्ग ..नातलग ..समाज यांच्या रूपाने कशी अस्तित्वात आहे हे मागच्या वेळी उलगडून सांगितले होते ..मला ते पटलेही होते ..एखादा विशिष्ट देव ..धर्म ..बाजूला ठेवून आपल्यावर प्रेम करणारे नातलग ..आपल्याला जीवन आनंदीपणे व्यतीत करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत करणारा समाज ..नैसर्गिक ..कौटुंबिक अथवा सामाजिक नियम ..इतकेच काय पण आपण देशात रहातो त्या देशाचे कायदे हे सर्वच ईश्वर या व्याख्येत मोडत असतात ..या सर्व गोष्टी आपल्याला मर्यादेने जगण्यास शिकवतात ..निसर्गाने प्रत्येक जीवाला काही क्षमता दिलेल्या आहेत तशाच काही मर्यादा देखील घातल्या आहेत ..या मर्यादा जे लोक मान्य करत नाहीत ते बंडखोरी करतात ..स्वतच्या मर्जीने जीवन व्यतीत करू इच्छितात ..त्यामुळेच त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो ..हे नियम जाचक वाटून ते क्रोधीत होतात ..निराश ..वैफल्यग्रस्त होतात ..त्यांचे जीवन जगणे अधिक अधिक कठीण होते …आपले सगळे अहंकार बाजूला ठेवून ..आपल्या मर्यादा समजून घेवून ..या ईश्वरी शक्तीला समजून घेतले तर ..या शक्तीला सहकार्य करत नक्कीच आनंदीपणे जगणे अधिक सोपे होते ..
आजच्या समूह उपचारात सरांनी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या तिसऱ्या पायरीवर चर्चा करण्यास सुरवात केली ..तिसऱ्या पायरीत म्हंटले आहे की.. ” आम्ही आमच्या इच्छा व जिवन आम्हास समजलेल्या ..उमगलेल्या परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला ” ..ही पायरी वाचून सरांनी एक प्रश्न विचारला ..’ आपल्या पैकी कोणा कोणाला स्वताचे जिवन हे आपण स्वतः निर्माण केले आहे असे वाटते ? त्या लोकांनी हात वर करावा ‘ ..कालच दुसऱ्या पायरीबद्दल समर्पक चर्चा झालेली असल्याने कोणीच हात वर केला नाही ..सगळ्यांना किमान आपले जिवन आपण स्वतःनिर्माण केलेले नाहीय हे समजले असावे बहुतेक ..सर हसले ..छान ..म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे ..की आपलं जन्म होण्यास ..आपले पालनपोषण होण्यास ..आपले योग्य पद्धतीने शिक्षण होण्यास .. कारणीभूत असणारे अनेक घटक आहेत जे आपल्याला मदत करीत गेले ..तरीही जेव्हा पासून आपल्याला समज आली अथवा आपला ‘ स्व ‘ म्हणजेच ‘ मी ‘ जागृत झाला तेव्हापासून आपण विविध प्रकारच्या इच्छा जोपासण्यास सुरवात केली ..
त्या इच्छापूर्तीचा आग्रह धरला ..त्या इच्छापुर्तीतच आपले सुख दडले आहे असा आपला समज होता ..आपले खाणेपिणे ..कपडे घालणे ..मित्र निवडणे ..आवडी निवडी ..अथवा आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे हे ठरवणे …असे सगळे अधिकार आपण सर्वांनी अगदी नीटच गाजवण्याचा प्रयत्न केला ..जेव्हा जेव्हा आपल्या अधिकारांवर कुटुंबीयांनी मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला अथवा त्यांची मर्जी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आपल्याला अन्याय झाल्यासारखे वाटले आपलं ‘ स्व ‘ दुखावला गेला ..मग आपण बेदरकारपणे दुरुत्तरे करू लागलो ..घरातील मोठ्या माणसांच्या ..नातलगांच्या सूचनांचा अव्हेर करू लागलो ..आपल्याला अपेक्षित असलेले सुख ..आनंद ..शोधण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयोग करत गेलो ..
एखाद्या व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जगावे असे वाटणे स्वाभाविक आहे.. मात्र आपल्या इच्छा आपल्या भल्याच्या आहेत की नाहीत हे समजण्याची आपली क्षमता नसल्याने .. आपल्या आयुष्यात दुर्दैवाने व्यसनांचा शिरकाव झाला ..तंबाखू ..दारू ..तसेच इतर सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये ‘ अॅडीक्टीव्ह पाॅवर ‘ म्हणजेच ‘ सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीन करून घेण्याची क्षमता ‘ असल्याने ..नकळत त्या पदार्थांच्या आहारी गेलो ..पाहता पाहता आपण व्यसनाधीनता या गंभीर आजारात अडकलो ..आपल्या अहंकारामुळे आपण यात अडकू शकतो हे आपल्याला समजले नाही …तसेच अडकल्यावर देखील आपण अडकत चाललो आहोत ..अडकलो आहोत हे आपण हे आपण स्वतःशी मान्य करू शकलो नाही..कोणाची मदत घेण्यास तयार झालो नाही त्यामुळे अधिक अधिक अडकत गेलो ..विविध प्रकारचे नुकसान होत राहिले .. या आजारातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपण आता सर्व प्रथम स्वतच्या मर्जीने जिवन जगण्यास मिळावे हा अट्टाहास काही काळ बाजूला ठेवला पाहिजे…
सर हे सर्व सांगत असताना आम्ही सगळे कान देवून ऐकत होतो ..सरांची व्यवस्थित उलगडून सांगण्याची शैली छानच होती ..पुढे त्यांनी सर्वाना एक प्रश्न विचारला ‘ जर समजा की तुम्हाला ‘ मिस्टर इंडिया ‘ या सिनेमा मध्ये अनिल कपूर सारखे अदृश्य होण्याचे ब्रेसलेट प्राप्त झाले ..तर सर्व प्रथम कोणकोणत्या गोष्टी आपण कराल ? ‘ प्रश्न जरा गमतीशीरच होता ..आठ दहा जणांनी उत्तरे देण्यासाठी हात वर केले ..शेरकर काकांचा हात देखील वर झाला ..एकेक जण उत्तरे देवू लागला ..सर मी कोणालाही नकळत राष्ट्रपती भवनात जावून फिरून येईल ..मी हॉटेलमध्ये जावून गुपचूप महागडे पदार्थ खावून येईल ..मी ‘ रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ‘ मध्ये जावून भरपूर नोटा घेवून येईन ..मी माझ्या शत्रूचा खून करीन ..मी सगळे जग विनातिकीट फिरून येईन ..मी ज्वेलरीच्या दुकानात जावून खूप दागिने आणीन माझ्या पत्नीसाठी ..अश्या प्रकारची उत्तरे सगळे देवू लागले ..शेरकर काका म्हणाले ‘ मी दारूच्या कारखान्यात जावून विदेशी मद्याच्या खूप बाटल्या आणीन ‘ सर्व मनापासून हसले ..जणू सर्वांच्या मानतील सामायिक इच्छाच शेरकर काकांनी बोलून दाखवली होती ..
मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर सारखे अदृश्य होणारे ब्रेसलेट प्राप्त झाले तर काय काय कराल हा सरांचा प्रश्न सूचक होता ..सगळ्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवल्या ..सर्वाची उत्तरे ऐकून सर म्हणाले ..आता जी उत्तरे दिलीत तुम्ही त्यात एकानेही देशसेवा करण्याबद्दल ..गरीब…दिन दुबळे यांचे जीवन सुखी करण्याबद्दल ..किवा सर्व विश्वाचा काही फायदा करून देण्याबद्दल विचार मांडला नाही ..बहुतेकांनी स्वताच्या स्वार्थाच्या इच्छा बोलून दाखवल्या ..नियम मोडणे ..चोरी करणे ..वगैरे विचार मनात आले ..म्हणजेच जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वता:च्या इच्छेने जगण्याची संधी उपलब्ध होते ..त्याच्यावर कोणतेही बंधन नाही ..कोणताही दबाव नाही ..अशी परिस्थिती असते ..तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात स्वैराचाराच्या गोष्टी येतात ..आपल्या मनात असलेल्या इच्छा या फक्त स्वतःच्याच नव्हे तर आपल्याशी संबंधित इतर लोकांच्या भल्याच्या आहेत कि नाहीत हे नीट समजेपर्यंत आपण स्वतच्या इच्छेने जीवन जगायला मिळावे हा अट्टाहास सोडून देणेच आपल्या आणि इतरांच्याही हिताचे असते ..
हेच तिसऱ्या पायरीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे ..कदाचित आपल्या व्यसनी होण्याचे कारण देखील हेच आहे ..आपण दारू किवा इतर व्यसने आपल्या मर्जीने करत गेलो ..मला माझ्या पद्धतीने जीवन जगण्याचा हक्क आहे असे समर्थन करत गेलो स्वतच्या पिण्याचे ..आपले कुटुंबीय ..स्नेही ..शुभचिंतक ..आपल्याला वारंवार व्यसने करण्यापासून परावृत्त करत राहिले ..मात्र आपण कोणाचेही ऐकले नाही ..उलट त्यांच्याशी वाद घातला ..दुरुतारे केली ..प्रसंगी भांडलो ..त्यांना शत्रू मानून जिद्दीने ..हट्टाने ..स्वताच्या मनासारखे वागत गेलो ..खरे तर तंबाखू ..दारू ..व इतर व्यसने वाईट असतात ..त्यामुळे प्रचंड नुकसान होत हे आपण लहानपणापासून ऐकलेले असते ..प्रत्येकाच्या गल्लीत ..गावात ..व्यसनामुळे बरबाद झालेला व्यसनी आपण पाहिलेला असतो ..तरीही व्यसन केल्याने माझे काही वाकडे होणार नाही .मी लिमिट मध्ये पिवू शकेन ..प्यायलो तरी मी नुकसान होऊ देणार नाही ..मी पाहिजे तेव्हा बंद करीन ..मी माझ्या पैश्याने पितो ..मला माझे समजते ..वगैरे समर्थने देत ..किवा आपल्या पिण्याला इतर लोक ..परिस्थिती ..मित्र ..इतरांचे माझ्याशी असलेले वर्तन कसे जवाबदार आहे हे स्वतःला आणि इतरांना पटवून देत गेलो ..हा आपला अहंकार होता..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत नेमक्या या अहंकारावरच बोट ठेवले आहे ..
दुसऱ्या पायरीत ..आपण स्वतःच्या शरीराचे मालक आहोत ..आपले जीवन आपल्या पद्धतीने आपण जगले पाहिजे .. हा आपला अहंकार कमी करण्यासाठी ..आपलं जन्म कसा निसर्गनियमानुसार झालाय ..आपल्या मोठे होण्यात अनेकांचा कसा हातभार आहे ..हे सांगून जीवनावरील मालकी हक्काची भावना सोडून देवून ..माझ्या जीवनावर निसर्ग ..नातलग ..समाज यांचा कसा अधिकार आहे हे सांगून ..आपल्यापेक्षा उच्चशक्ती जीवनात कार्यरत आहेत ..त्या शक्तीला समजून घेवून ..त्या शक्तीच्या नियमानुसार वागले तर सगळे ठीक होते हा विश्वास ठेवण्यास सांगितले आहे ..त्या नुसार जीवन व्यतीत करण्याबद्दल तिसऱ्या पायरीत सांगितले आहे ..म्हणजेच यापुढे मनात आलेली कोणतीही गोष्ट करताना केवळ स्वतःच्या मनात आले आणि केले असे न करता ..दुसऱ्या पायरीत उल्लेख केलेल्या ईश्वराच्या सल्ल्याने जर आपण वागत गेलो तर नक्कीच आपल्या विचारात आणि वर्तनात सकारात्मक बदल होत जातील ..असे सांगत सरांनी समूह उपचार संपवला ..
आम्हाला डायरीत लिहायला प्रश्न दिला ..’ स्वताच्या इच्छेने जिवन व्यतीत करण्याने आपले काय काय नुकसान झालेय ते लिहा ? ”
मी डायरीत उत्तर लिहित बसलो .. काही लोक काय लिहायचे ते न सुचल्याने नुसतेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..सर त्यांना म्हणाले ..यात जास्त विचार करण्यासारखे काही नाहीय ..फक्त जसे वागलो ते लिहायचे आहे ..इतका विचार व्यसन करण्या आधी केला असतात तर किती बरे झाले असते ..सगळे हे ऐकून हसू लागले ..सरांचे बरोबरच होते ..आम्ही व्यसन करत असताना ..व्यसनाच्या आहारी जात असताना ..कसलाही सारासार विचार केला नव्हता …म्हणून तर व्यसनी झालो होतो …एक जण माझ्या जवळ येवून माझ्या डायरीत डोकावू लागला ..हा प्राणी इथे उपचारांकरिता तीन वेळा आलेला होता ..म्हणजे ‘ सिनियर ‘ होता ..इतक्या वेळा उपचार घेवूनही ..याला नेमके काय लिहावे हे समजत नव्हते याचे मला नवल वाटले ..
त्याला म्हणालोच मी ..’अहो ..आता सरांनी सांगितलेय कि सगळे उलगडून ..आपण स्वताच्या इच्छेने कसे जगलो …त्यामुळे काय नुकसान झालेय हे लिहा ‘ तो खजील झाला ..म्हणाला ‘ हे सगळे ठीक आहे हो ..पण मी इथून बाहेर पडल्यावर फक्त एकद्च प्यायलो ..तरी मला यांनी धरून आणले आहे इथे ‘ लगेच माँनीटर तेथे आला ..’ अरे तुला तीन वेळा उपचार दिले तेव्हा ..आपण या पुढे एकदाही दारू प्यायची नाही हेच शिकवले होते ना ? ..तरीही तू म्हणतोस कि फक्त एकदा प्यायलो ..तू इथून बाहेर पडल्यावर पुन्हा स्वताच्या इच्छेने एकदा का होईना दारू प्यायलास ..म्हणून तुला पुन्हा आणले उपचारांसाठी ..अजून तुला स्वताची इच्छा सोडून देता येत नाहीय म्हणून वारंवार यावे लागतेय ..या पुढे पिण्याच्या पहिले ‘ मी आज दारू पिवू का ?’ अशी आई वडिलांची ..पत्नीची परवानगी घे ..ते हो म्हणाले तरच दारू पी ..हे जेव्हा तू शिकशील तेव्हाच व्यसनमुक्त राहशील …
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५
Leave a Reply