मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर सारखे अदृश्य होणारे ब्रेसलेट प्राप्त झाले तर काय काय कराल हा सरांचा प्रश्न सूचक होता ..सगळ्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवल्या ..सर्वाची उत्तरे ऐकून सर म्हणाले ..आता जी उत्तरे दिलीत तुम्ही त्यात एकानेही देशसेवा करण्याबद्दल ..गरीब…दिन दुबळे यांचे जीवन सुखी करण्याबद्दल ..किवा सर्व विश्वाचा काही फायदा करून देण्याबद्दल विचार मांडला नाही ..बहुतेकांनी स्वताच्या स्वार्थाच्या इच्छा बोलून दाखवल्या ..नियम मोडणे ..चोरी करणे ..वगैरे विचार मनात आले ..म्हणजेच जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वता:च्या इच्छेने जगण्याची संधी उपलब्ध होते ..त्याच्यावर कोणतेही बंधन नाही ..कोणताही दबाव नाही ..अशी परिस्थिती असते ..तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात स्वैराचाराच्या गोष्टी येतात ..आपल्या मनात असलेल्या इच्छा या फक्त स्वतःच्याच नव्हे तर आपल्याशी संबंधित इतर लोकांच्या भल्याच्या आहेत कि नाहीत हे नीट समजेपर्यंत आपण स्वतच्या इच्छेने जीवन जगायला मिळावे हा अट्टाहास सोडून देणेच आपल्या आणि इतरांच्याही हिताचे असते ..
हेच तिसऱ्या पायरीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे ..कदाचित आपल्या व्यसनी होण्याचे कारण देखील हेच आहे ..आपण दारू किवा इतर व्यसने आपल्या मर्जीने करत गेलो ..मला माझ्या पद्धतीने जीवन जगण्याचा हक्क आहे असे समर्थन करत गेलो स्वतच्या पिण्याचे ..आपले कुटुंबीय ..स्नेही ..शुभचिंतक ..आपल्याला वारंवार व्यसने करण्यापासून परावृत्त करत राहिले ..मात्र आपण कोणाचेही ऐकले नाही ..उलट त्यांच्याशी वाद घातला ..दुरुतारे केली ..प्रसंगी भांडलो ..त्यांना शत्रू मानून जिद्दीने ..हट्टाने ..स्वताच्या मनासारखे वागत गेलो ..खरे तर तंबाखू ..दारू ..व इतर व्यसने वाईट असतात ..त्यामुळे प्रचंड नुकसान होत हे आपण लहानपणापासून ऐकलेले असते ..प्रत्येकाच्या गल्लीत ..गावात ..व्यसनामुळे बरबाद झालेला व्यसनी आपण पाहिलेला असतो ..तरीही व्यसन केल्याने माझे काही वाकडे होणार नाही .मी लिमिट मध्ये पिवू शकेन ..प्यायलो तरी मी नुकसान होऊ देणार नाही ..मी पाहिजे तेव्हा बंद करीन ..मी माझ्या पैश्याने पितो ..मला माझे समजते ..वगैरे समर्थने देत ..किवा आपल्या पिण्याला इतर लोक ..परिस्थिती ..मित्र ..इतरांचे माझ्याशी असलेले वर्तन कसे जवाबदार आहे हे स्वतःला आणि इतरांना पटवून देत गेलो ..हा आपला अहंकार होता..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत नेमक्या या अहंकारावरच बोट ठेवले आहे ..
दुसऱ्या पायरीत ..आपण स्वतःच्या शरीराचे मालक आहोत ..आपले जीवन आपल्या पद्धतीने आपण जगले पाहिजे .. हा आपला अहंकार कमी करण्यासाठी ..आपलं जन्म कसा निसर्गनियमानुसार झालाय ..आपल्या मोठे होण्यात अनेकांचा कसा हातभार आहे ..हे सांगून जीवनावरील मालकी हक्काची भावना सोडून देवून ..माझ्या जीवनावर निसर्ग ..नातलग ..समाज यांचा कसा अधिकार आहे हे सांगून ..आपल्यापेक्षा उच्चशक्ती जीवनात कार्यरत आहेत ..त्या शक्तीला समजून घेवून ..त्या शक्तीच्या नियमानुसार वागले तर सगळे ठीक होते हा विश्वास ठेवण्यास सांगितले आहे ..त्या नुसार जीवन व्यतीत करण्याबद्दल तिसऱ्या पायरीत सांगितले आहे ..म्हणजेच यापुढे मनात आलेली कोणतीही गोष्ट करताना केवळ स्वतःच्या मनात आले आणि केले असे न करता ..दुसऱ्या पायरीत उल्लेख केलेल्या ईश्वराच्या सल्ल्याने जर आपण वागत गेलो तर नक्कीच आपल्या विचारात आणि वर्तनात सकारात्मक बदल होत जातील ..असे सांगत सरांनी समूह उपचार संपवला ..आम्हाला डायरीत लिहायला प्रश्न दिला ..’ स्वताच्या इच्छेने जिवन व्यतीत करण्याने आपले काय काय नुकसान झालेय ते लिहा ? ”
मी डायरीत उत्तर लिहित बसलो .. काही लोक काय लिहायचे ते न सुचल्याने नुसतेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..सर त्यांना म्हणाले ..यात जास्त विचार करण्यासारखे काही नाहीय ..फक्त जसे वागलो ते लिहायचे आहे ..इतका विचार व्यसन करण्या आधी केला असतात तर किती बरे झाले असते ..सगळे हे ऐकून हसू लागले ..सरांचे बरोबरच होते ..आम्ही व्यसन करत असताना ..व्यसनाच्या आहारी जात असताना ..कसलाही सारासार विचार केला नव्हता …म्हणून तर व्यसनी झालो होतो …एक जण माझ्या जवळ येवून माझ्या डायरीत डोकावू लागला ..हा प्राणी इथे उपचारांकरिता तीन वेळा आलेला होता ..म्हणजे ‘ सिनियर ‘ होता ..इतक्या वेळा उपचार घेवूनही ..याला नेमके काय लिहावे हे समजत नव्हते याचे मला नवल वाटले ..त्याला म्हणालोच मी ..’अहो ..आता सरांनी सांगितलेय कि सगळे उलगडून ..आपण स्वताच्या इच्छेने कसे जगलो …त्यामुळे काय नुकसान झालेय हे लिहा ‘ तो खजील झाला ..म्हणाला ‘ हे सगळे ठीक आहे हो ..पण मी इथून बाहेर पडल्यावर फक्त एकद्च प्यायलो ..तरी मला यांनी धरून आणले आहे इथे ‘ लगेच माँनीटर तेथे आला ..’ अरे तुला तीन वेळा उपचार दिले तेव्हा ..आपण या पुढे एकदाही दारू प्यायची नाही हेच शिकवले होते ना ? ..तरीही तू म्हणतोस कि फक्त एकदा प्यायलो ..तू इथून बाहेर पडल्यावर पुन्हा स्वताच्या इच्छेने एकदा का होईना दारू प्यायलास ..म्हणून तुला पुन्हा आणले उपचारांसाठी ..अजून तुला स्वताची इच्छा सोडून देता येत नाहीय म्हणून वारंवार यावे लागतेय ..या पुढे पिण्याच्या पहिले ‘ मी आज दारू पिवू का ?’ अशी आई वडिलांची ..पत्नीची परवानगी घे ..ते हो म्हणाले तरच दारू पी ..हे जेव्हा तू शिकशील तेव्हाच व्यसनमुक्त राहशील …!
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५
Leave a Reply