नवीन लेखन...

झडती.. कडक तपासणी – (बेवड्याची डायरी – भाग ३१ वा)

सकाळी प्रार्थनेच्या वेळीच माॅनीटरने जाहीर केले की आता प्रार्थना झाल्यावर सर्वांनी आपापल्या लॉकर मधून ताबडतोब चहाचे ग्लास काढून घेवून ..आपल्या लॉकरची किल्ली इथे कार्यकर्त्याकडे जमा करायची आहे ..आज सर्वांच्या लॉकरची तपासणी करणार आहोत आम्ही ..हे ऐकून सगळ्याचा आश्चर्य वाटले ..काहीजण कुरबुर करू लागले ..हे काय नवीन लफडे ? आम्ही काय चोर आहोत का ? वगैरे चर्चा सुरु झाली ..एकंदरीत सर्वाची या प्रकाराबद्दल नाराजी दिसली ..कोणीतरी म्हणाले की वार्डात कोणीतरी ब्राऊन शुगर लपवून आणली आहे अशी ‘ खबर ‘ आहे म्हणून ही झडती घेण्याचे काम सुरु आहे ..मात्र सगळ्यांनी चहाचे ग्लास काढून घेवून किल्ली दिली कार्यकर्त्याच्या ताब्यात ..चहा घेवून झाल्यावर मग माॅनीटर आणि त्याचे साथीदार एकेका लॉकर जवळ जावून ..ज्याचा लॉकर आहे त्याला सोबत घेवून त्याच्या समक्ष त्याच्या लॉकरची तपासणी करू लागले ..

कुतूहलाने आम्ही सगळे गर्दी करून कोणाच्या लॉकरमधून काय निघते हे पाहत होतो ..सुमारे तासभर हा प्रकार चालला ..जेमतेम आठ दहा लॉकर असे निघाले ज्यात कपडे ..तेलाची छोटीशी बाटली ..लोणच्याची बाटली ..इतर सटरफटर वस्तू नीट व्यवस्थित ठेवलेल्या होत्या ..बाकी बहुतेक लॉकर मध्ये या सर्व वस्तू कोंबल्यासारख्या भरलेल्या आढळल्या .शेरकर काकांचा लॉकर उघडताना मजा आली ..ते लॉकरची किल्ली देण्यास कुरकुर करत होते ..त्यांच्या लॉकर मधून इतर सामानासोबातच खोबरेल तेलाच्या रिकाम्या झालेल्या आठदहा प्लास्टिकच्या बाटल्या ..दहा पंधरा चमचे .. आंघोळीचे अर्धवट वापरलेले चारपाच साबण ..दोन तीन हातरुमाल ..भांडी ड्युटीसाठी किचन मध्ये गेले असताना कोणाच्याही नकळत तेथून उचलून आणलेले आठदहा कांदे ..मिरच्या ..असा इतर अनधिकृत ऐवज सापडला ..

एकाच्या लॉकर मध्ये मासिके आणि वर्तमान पत्रातून फाडून घेतलेले सिने अभिनेत्रींचे अर्धवट कपड्यातील फोटो सापडले ..हे कशाला इथे ? असे विचारल्यावर तो खजील झाला ..दुसऱ्या एकाच्या लॉकरमध्ये त्याच्या सामानाखेरीज ..इतरांच्या चारपाच अंडरवेअर..दोन तीन बनियन ..अर्धवट लिहिलेल्या डायऱ्या.. डझनभर पेन ..असा माल सापडला ..त्या वस्तू बाहेर पडताच आमच्यातील चारपाच जण ..अरे ही तर माझी अंडर्वेअर आहे ..हा बनियन माझा आहे असे ओरडू लागले .. झडती घेणार्यांना नेमका कशाचा शोध आहे ते आम्हाला समजत नव्हते ..एकाच्या लॉकर मध्ये किचन मधील चाकू सापडला ..कार्यकर्ते बारकाईने प्रत्येक लॉकरचा कोपरान कोपरा धुंडाळत होते … एकाच्या लॉकर मध्ये शंभर रुपयांच्या दोन नोटा अगदी काळजीपूर्वक बारीक घडी करून लॉकर मध्ये घातलेल्या कागदाच्या खाली लपवून ठेवलेल्या आढळल्या …झडतीचे सगळे काम पार पडल्यावर कार्यकर्त्यांनी अनिधिकृत असलेल्या वस्तू ताब्यात घेवून ..किल्ल्या दिल्या आम्हाला ..व प्रत्येकाला आपला लॉकर व्यवस्थित लावायला लावला..

कार्यकर्ते बाहेर आफिसात निघून गेल्यावर ..आम्ही सगळे घोळक्याने चर्चा करत होतो ..समूह उपचारांची बेल वाजल्यावर सगळे बसले ..सरांनी समूह उपचारांना आत आल्याबरोबर ..लॉकर्सच्या झडती बद्दल दिलगिरी व्यक्त केली …म्हणाले ..मित्रांनो ही अशी झडती घेतली म्हणून आपल्यातील अनेकांना राग येणे स्वाभाविक आहे ..मात्र वार्डात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे आवश्यक असते ..तसेच या निमित्ताने आपलं लॉकर नीट व्यवस्थित लावला गेला हा फायदा आहेच ..अशी झडती घेण्यामागे प्रमुख कारण हे होते की ..किचन मधून एक चाकू गायब झालेला आहे हे आमच्या लक्षात आले होते ..तसेच वार्डातील बऱ्याच लोकांच्या अंडरवेअर ..बनियन ..व काही इतर वस्तू गहाळ झाल्याच्या आमच्याकडे तक्रारी होत्या .. भांडी ड्युटीच्या निमित्ताने प्रत्येक जण किचन मध्ये जात असतो ..तेथून कांदे मिरच्या लोक वार्डात उचलून आणत आहेत हे आढळले होते..

सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता रविवारी पालक भेटायला आल्यावर एकाने पालकांकडून ..येथे मला बिस्किटे .चिवडा वगैरे विकत घ्यायला लागतात असे सांगून दोनशे रुपये मागून घेतल्याचे आम्हाला समजले होते …येथे राहत असताना तुम्हा सर्वांच्या खिश्यात अजिबात पैसे नसावेत असा आमचा कटाक्ष असतो ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर आपल्याला इथे दारू ..अथवा इतर कोणतेही मादक पदार्थ सेवन करायला मिळत नाहीत ..मात्र या व्यसनांची मानसिक ओढ खूप तीव्र असल्याने .. अनेकदा असे मादक पदार्थ बाहेरून कोणाकडून तरी मागवता येतील का असा विचार काहींच्या डोक्यात सुरु असतो ..अनेकांनी बाहेर हॉस्पिटल मध्ये दाखल असताना वार्डबॉयला पैश्याचे आमिष देवून …अथवा हॉस्पिटल मध्ये भेटायला येणाऱ्या मित्रांकडून व्यसने मिळवलेली आहेत ..काही लोकांच्या मनात येथून पळून जाण्याचे विचार सुरु असतात ..त्यांना येथील शिस्तबद्ध जीवन जगणे आवडत नाही ..इथे बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत असतात ..त्यातून सुटका करून घ्यावी असा बंडखोरीचा विचार करून ते टोळी बनवून ..कार्यकर्त्यांना दमदाटी करून पळून जाण्याच्या विचारात असतात ..

अर्थात हा मोठा अविचार असतो ..कारण तुम्ही येथून पळून जाण्यात जरी यशस्वी झालात तरी ..तुम्ही शेवटी आपल्या घरीच जाणार ..आम्ही पुन्हा तुम्हाला घरून पकडून आणू शकतो हे विसरता कामा नये ..व्यसनाधीनते मुळे अनेक प्रकारचे मानसिक विकार उदभावू शकतात किवा काहीना व्यसनी होण्याच्या आधीपासून काही मानसिक विकार असू शकतात ..त्यात एक ‘ क्लँप्टोमॅनिया ‘ नावाचा आजार आहे ..ज्यात व्यक्ती इतरांचा डोळा चुकवून …त्यांच्या वस्तू चोरून आपल्याकडे ठेवतात असे लक्षण आढळते ..खरे तर अनेकदा त्या वस्तू चोरणाऱ्या व्यक्तीच्या उपयोगाच्या नसतात ..किवा त्या उपयोगात आणल्यादेखील जात नाहीत ..तरीही विशिष्ट प्रकारच्या अशा वस्तू दिसल्यावर त्या व्यक्तीला आपला ‘ हाताळपणा ‘ थांबविता येणे अशक्य होते ..यात वेगवेगळ्या प्रकरचे चमचे ..पेन्स ..हात रुमाल ..छोटे कपडे अश्या प्रकारच्या किरकोळ वस्तू असतात..आपण पहिले की एकाच्या लॉकर मधून आपल्याला एकाच्या लॉकर मध्ये झडती घेताना इतरांच्या अंडरवेअर ..बनियन्स ..डायऱ्या वगैरे आढळल्या ..अश्या वस्तू गहाळ करण्यामागे नक्कीच वाईट हेतू नसला तरी ..हे ‘ हाताळपण ‘ योग्य नसते ..त्यावर उपचार घेतले पाहिजेत ..कारण अशा छोट्या छोट्या मानसिक व्याधी देखील आपल्याला पुन्हा व्यसन करण्यास प्रवृत्त करू शकतात ..सर देत असलेली माहिती ऐकून झडती घेतल्याबद्दलचा सर्वांचा राग निवळत होता ..मग ही अशी झडती घेणे आवश्यक आहे हे आम्हाला पटले ..

सरांनी ज्यांच्या ज्यांच्या लॉकर मध्ये अशा अनधिकृत वस्तू मिळाल्या त्यांना आम्ही काही शिक्षा करणार नाही आहोत ..मात्र त्यांनी या पुढे असे प्रकार करता कामा नयेत अशी ताकीद दिली ..एकाने प्रश्न विचारला ..सर पण एकाच्या लॉकरमध्ये नट्यांचे अर्धवट कपड्यातील फोटो सापडले आहेत ..त्याचे कारण काय ? हा कोणता आजार ? ..सर्व खिदळू लागले या प्रश्नावर ..ज्याच्या लॉकर मध्ये ते फोटो सापडले तो खाली मान घालून बसला होता ..सरांनी सांगितले ..ही जरा नाजूक बाब आहे ..लैंगिक संबंधांची ओढ ही पत्येक व्यक्तीच्या मनात असतेच ..मात्र सर्वाना ती इच्छा पूर्ण करता येणे शक्य नसते … इथे तर नाहीच नाही ..ज्यांना लैंगिक तृप्तीचे अधिकृत मार्ग नाहीत असे लोक लैंगिक तृप्ती करता हस्तमैथुन करतात हे शास्त्रीय सत्य आहे ..मग लैंगिक उत्तेजनेसाठी हे असे फोटो ..अश्लील साहित्य ..पोर्नोग्राफिक फिल्मस वगैरेंचा उपयोग होतो ..अर्थात इथे इतर काही उपलब्ध होऊ शकत नाही ..म्हणून मासिकातले ..वर्तमान पत्रातले नट्यांचे फोटो कामी येतात …सगळे पुन्हा हसू लागले .. सर पुढे म्हणाले इथे पुढे आपण लैंगिक समस्यांवर बोलणारच आहोत ..मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच हे लक्षात घेतले पाहिजे ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..