काल रात्रभर नीट झोप लागलीच नाही …पोटात जेवण नाही म्हणून असेल कदाचित ..शिवाय डोक्यात राग होताच मला काल घरी न सोडल्याचा ..सकाळी मी पीटी करता उठलोच नाही ..मुद्दाम तोंडावर चादर घेवून पडून राहिलो ..कार्यकर्ता उठवायला आला तेव्हा ..माझी तब्येत बरी नाही असे कारण सांगितले ..शेरकर काका मला दोन वेळा उठवण्याचा प्रयत्न करून गेले… मी त्यानाही दाद दिली नाही ..’ ओ गांधी बाबा उठा की आता चहा तरी घ्या ‘ तिसऱ्यांदा शेरकर काका जवळ येवून मला उठवू लागले ..त्यांनी मला गांधी बाबा नावाने मारलेली हाक खटकलीच ..काल पासून मी अघोषित उपोषण सुरु केले होते म्हणून ते मला गांधीबाबा म्हणत आहेत हे जाणवले ..मी रागाने उठून बसलो व त्यांना म्हणालो ‘ काका तुमचे इतके वय झालेय ..मात्र शहाणपणा काडीचा नाहीय तुमच्यात ‘ यावर ते नेहमीप्रमाणे मिशीत हसले ..त्यांच्या हातात चहाचे तों ग्लास होते ..’ जाऊ दे यार ..वयाचा आणी शहाणपणाचा काही संबंध नसतो ..चहा तर घे ..’ माझ्या बाजूला बसकण मारत त्यांनी बिस्किटाचा पुडा उघडला .. भूक लागली होती ..परंतु माझे अघोषित उपोषण मात्र सोडायचे नव्हते मला ..मी शेरकर काकांकडे न पाहता तोंड फिरवून बसलो ..’ अरे जाऊ दे नको घेवूस चहा ..पण बोल तरी जरा माझ्याशी ‘ काका चिवटपणे मला चिकटून राहिले ..
” विजयभाऊ अहो ..असा राग चांगला नसतो आपल्या माणसांवर ..असे मनाविरुद्ध घडतच असते ..जेवणावर राग काढून काही साध्य होत नाही ..इथले कार्यकर्ते अजून एक दिवस वाट पाहतील तुम्ही जेवता की नाही याची ..मग सरळ डॉक्टरना बोलावून तुम्हाला सलाईन लावतील ..तुम्ही जास्त विरोध केलात तर बांधून ठेवून सलाईन लावतील ” हे ऐकून मी विचारात पडलो .. जरा अंतर्मुख झालो ..कालचा सगळा प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला माझ्या …काल सरांनी सर्वाना नेहमीप्रमाणे सूचना दिली होती ..’ आज पालकांच्या भेटीचा दिवस आहे ..ज्या लोकांना इथे येवून दहा दिवस पूर्ण होत झालेले आहेत ..तसेच वार्डातील ज्यांचे वर्तन नीट आहे अशा लोकांच्या पालकांना आम्ही भेटीस परवानगी दिली आहे …मला माहित आहे की इथे व्यसनमुक्ती केंद्रात रहाणे म्हणजे बहुतेक लोकांना शिक्षा वाटत असेल ..कारण इथे बहुतेक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात ..पत्येक वेळी तुम्हाला अॅडजेस्टमेंट करावी लागतेय ..
व्यसनी व्यक्तीच्या हट्टी आणि जिद्दी स्वभावात बदल करण्यासाठी ते आवश्यकच असते…मात्र येथे मनासारखे वागता येत नाही म्हणून सर्वांनाच आपण लवकरात आपल्या घरी जावे असे वाटते ..इथे कोणालाही कायमचे राहायचे नाहीय ..उपचार पूर्ण झाल्यावर सर्वाना घरी जायचेच आहे .. व्यसनमुक्ती साठी आणि उज्वल भविष्यासाठी आपल्याला येथे आणले गेलेय ..यावे लागलेय …किवां काही स्वतःहून आलेत म्हणा हवे तर ..पण पालक आपल्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ..आपल्यात घडणारे बदल पाहण्यासाठी भेटायला येतात ..कोणीही आपल्या पालकांजवळ मला घरी घेवून चला म्हणून हट्ट करू नका ..त्यातून हेच सिद्ध होईल कि अजूनही तुमच्यात सुधारणा झालेली नाही ..उलट हट्ट केला तर पालक नाराज होऊन तुमचे इथले वास्तव्य वाढवण्याचा विचार करतील हे ध्यानात ठेवा ..बाकी आपण सुज्ञ आहातच ‘ ….
मी मनातून आज अलका भेटीला येईल म्हणून आनंदलो होतो ..तिच्याकडे घरी ने असा हट्ट करण्याचा माझा अजिबात विचार नव्हता ..प्रत्यक्ष संध्याकाळी ती भेटीला आली तेव्हा तिचा प्रफुल्लीत चेहरा पाहून मला भरून आले होते ..मला पाहताक्षणी तिचे चमकलेले डोळे सांगून गेले कि ती अतिशय आतुरतेने माझ्या भेटीची वाट पाहत असावी .. जवळ बसताच तिची नेहमीसारखी बडबड सुरु झाली .. बोलताना ती इतकी निष्पाप दिसत होती की तिच्या चेहऱ्यावरचे विभ्रम मी पाहतच राहिलो ‘ अहो लक्ष कुठेय तुमचे ..मी काय म्हणतेय ऐकताय ना ‘ असे म्हणत तिने मला भानावर आणले ..म्हणाली मुले पण मागे लागली होती आम्ही पण येतो बाबांना भेटायला म्हणून पण मीच नको म्हंटले ..पुढच्या वेळी नक्की आणीन मुलांना ..मग तिने माझी चौकशी सुरु केली ‘ कसे वाटतेय इथे ? जेवण कसे आहे ? सगळ्या उपचारात भाग घेता का ? वैगरे ..मी जमेल तशी उत्तरे देत होतो ..खरे तर तिच्याकडे मला घरी ने असा हट्ट करण्याचा माझा कुठलाच विचार नव्हता ..इथले सगळे नीट शिकूनच डिसचार्ज घ्यायचा हे मी ठरवले होते ..तरीही कसा कोण जाणे अलकाशी बोलता बोलता माझा विचार बदलत गेला ..पहिल्यांदाच मी पत्नी आणि मुलांपासून इतके दिवस दूर राहत होतो ..सुरवातीचे एक दोन दिवस वगळता मी इथे चांगल्या पद्धतीने जुळवून घ्यायला लागलो होतो .. इथे शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या फायद्याच्या आहेत हे देखील लक्षात आले होते ..पण अलकाशी बोलता बोलता वाटले ..दहा दिवस खूप झालेत आता ..यापुढे आपण दारू अजिबात पिणार नाही याची खात्री वाटू लागली होती मला..उगाच अजून जास्त दिवस राहून फारसे काही साध्य होणार नाहीय .. ..
सहज एक चान्स घ्यावा म्हणून अलकाला म्हणालो ‘ आता मला पटलेय चांगलेच कि दारूमुळे आपले सर्वांचेच किती नुकसान केलेय ते ..यापुढे मी अजिबात प्यायची नाही असे ठरवलेय ..तू सरांना सांगितलेस तर ते मला डिसचार्ज सुद्धा देतील ‘ माझे हे बोलणे ऐकून अलका एकदम स्तब्ध झाली …नुसतीच माझ्या तोंडाकडे पाहत राहिली ..कदाचित माझ्या मनाचा वेध घेत असावी ..म्हणाली ‘ अहो ..पूर्ण कोर्स केल्याशिवाय किवा सरांनी सांगितल्याशिवाय तुम्हाला येथून नेता येणार नाहीय असे कालच सरांनी मला फोनवर सांगितलेय ..’ ‘ म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीय तर अजून ? ..थोडे दुखावला जावून मी विचारले ..’ इथे विश्वासाचा प्रश्नच नाहीय हो ..तुम्हाला डिसचार्ज देणे योग्य राहील कि नाही हे ठरवणारी मी एकटीच नाहीय ..सरांची परवानगी लागते त्यासाठी ..आपण आता बरे झालोत हे आजारी व्यक्तीने नाही तर त्याच्या उपचारकाने ठरवले पाहिजे ना ? ‘
” अग पण ..मी इथे स्वताच्या मर्जीने आलोय ..शिवाय आता मी सांगतोय ना की मला बरे वाटतेय .अजिबात दारूची आठवण येत नाहीय ..यापुढे मी अजिबात पिणार नाही ..तुझी शपथ ” असे म्हणत मी तिच्या डोक्यावर हात ठेवला ..यावर अलका गडबडली ..आपण तिची शपथ घेतली की ती भावनाविवश होते हे मला चांगलेच ठावूक होते ..मग म्हणाली …” अहो पण या पूर्वी पण तुम्ही अनेकवेळा माझ्या शपथा घेतल्या आहेत तरी दारू सोडली नाही ” हे ऐकून मला राग येवू लागला..” पण त्या वेळी मी उपचार घेतले नव्हते म्हणून शपथ मोडल्या ” मी काहीतरी समर्थन देवू लागलो.” … ” बरे पाहू मी विचारते सरांना .” .असे म्हणून पटकन उठून बाहेर ऑफिसात गेली ..मी वार्डातच बसून तिची वाट पाहू लागलो ..साधारण दहा मिनिटांनी परत आली ..’ सरांनी नाही म्हंटले आहे ..’ असे म्हणत खाली मान घालून बसली ..
मी इथे आल्यापासून इतका चांगला सहभाग घेतोय सगळ्या उपचारात तरीही सरांनी माझ्या डिसचार्ज करिता नकार द्यावा याचे मला वैषम्य वाटले ..राग वाढत गेला .. कुत्सितपणे म्हणालो ” तुला घरच्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास आहे तर ? ” अलका खाली पाहतच म्हणाली ‘ या पूर्वी इतके वेळा विश्वासघात केलंय तुम्ही की आता विश्वास ठेवणे कठीणच जातेय मला ..अनेक वेळा माझ्या शपथा झाल्यात ..मुलांच्याही शपथा घेवून झाल्यात ..मात्र तुमचे पिणे काही कायमचे बंद होत नव्हते ‘ तिच्या या बोलण्याने मी दुखावलो गेलो ..अपमानित झाल्यासारखे वाटू लागले ..
अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी …माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ‘ घटस्फोट ‘ या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता …कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..
तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला ..” नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? ” त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले ..” होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे ” .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला ” छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच ” हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे ” असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली ..” अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत …तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? ” पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..
एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..’ अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..
अलका जायला उठल्यावर म्हणालो ..” बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला ” माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..’ काय मग ? खुश ना ? ‘ मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..’ ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले ..
जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती ..” विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला .” त्याने पिशवी माझ्यापुढे केली ..” नको अहो ..मला भूक नाहीय ..” शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली …मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले ..” अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता ..” ” काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी ” असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..
रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..
रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती..” विजय भाऊ ..कुठे हरवलात ? ” काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली …बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण ..
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५
Thanks sir please send mi ur artical