आम्ही भाजी निवडत असताना माॅनीटर भाजी निवडण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींकडे लक्ष ठेवत होता ..काही जण नुसतेच समूहात बसून हातात एखादी गवार शेंग घेवून अथवा मेथीची काडी घेवून गप्पा मारत बसले होते …माॅनीटरचे लक्ष जाताच ते भाजी निवडतोय असे भासवत ..भाजी निवडता निवडता तोंडे सुरूच होती सगळ्यांची ..हास्यविनोद सुरु होते ..एकदोन टवाळ लोक गुपचूप वार्डातील जरा ‘ मंद ‘ असलेल्या लोकांना लसणाची पाकळी फेकून मारत होते .. कामचुकार लोक सारखे उठून बाथरूम ..संडासकडे जावून टाईमपास करत होते ..त्या सगळ्यांना वारंवार माॅनीटर हाकलत होता ..मी बराच वेळ मांडी घालून बसल्याने जरा पायाला मुंग्या आल्यासारखे वाटले म्हणून उठून उभा राहिलो ..मग बाथरूम कडे गेलो ..
एकदम शेवटच्या बाथरूम मध्ये गेलो ..मला आश्चर्याचा धक्काच बसला ..इथे एक जण कोपऱ्यात दडून बसला होता ..बहुधा माॅनीटरच्या नजरेतून तो सुटला होता ..मला पाहून तो उठून उभा राहिला ..त्याचा चेहरा भेदरल्या सारखा झाला होता ..डोळे स्थिर नव्हते ..’ अरे इथे काय बसलास ? चल कि तिकडे भाजी निवडायला ‘ असे म्हणालो त्याला तर त्याने कानावर हात ठेवले आणि पुन्हा खाली बसला ..काय प्रकार आहे ते समजेना ..मी बाहेर जावून माॅनीटरला तो प्रकार सांगितला ..माॅनीटरने त्याला हाताला धरून बाहेर आणले ..हा सुमारे पंचविशीचा युवक होता ..तो येथे दाखल होऊन जेमतेम चार पाच दिवस झालेले ..खूपच अशक्त वाटत होता ..तसेच चालताना जरा लंगडल्या सारखा चाले ..तो आल्यापासून सारखी तळपायाची आगआग होते म्हणून तक्रार करत असे ..त्याला डॉक्टरनी तपासून औषध गोळ्या लिहून दिल्या होत्या ..दारूचा दुष्परिणाम म्हणून त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये समस्या निर्माण होऊन तेथे आगआग होते असे डॉक्टरांचे म्हणणे पडले होते ….
त्याला चालताना खूप त्रास होई म्हणून तो जास्तीत जास्त वेळ बसून राही किवा पलंगावर झोपून राही ..आजचा त्याचा हा बाथरूम मध्ये लपून बसण्याचा प्रकार अजबच वाटला मला ..माॅनीटरने जेव्हा त्याची थोडी प्रेमाने विचारपूस केली तेव्हा म्हणाला ..कानात खूप आवाज येत आहेत माझ्या ..शिव्या देण्याचे ..रागावल्याचे ..खूप आरडा ओरडा ..गोंधळ ..गाड्यांचे ..होर्नचे आवाज …या आवाजानं घाबरून तो लपून बसला होता बाथरूममध्ये .. माॅनीटरने त्याला धीर दिला ..मग एक गोळी आणून दिली ..ती गोळी घेवून त्याला झोपण्यास सांगितले …हा देखील एक दारूचा दुष्परिणाम आहे हे मला समजले ..हा तरुण मानसिक रुग्ण बनला होता ..दारूचा दुष्परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन त्याला असे आवाज कानात ऐकू येत होते ..त्याने दारू सेवन न करता आता व्यवस्थित दीर्घकाळ उपचार घेतले पाहिजेत असे माॅनीटरचे म्हणणे पडले ..
इथे आल्यापासून दारू आणि मादक पदार्थांच्या दुष्परिणामांचे एक एक भयानक प्रकार माझ्या समोर यते होते ..दारूमुळे केवळ लिव्हर खराब होते असे मी ऐकून होतो .परंतु मेंदू …त्वचा ..डोळे …शरीरांतर्गत असणाऱ्या रक्तवाहिन्या ..किडनी ..हृदय ..अश्या शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात हे समजल्यावर ..बरे झाले आपण इथे उपचार घेण्यास आलो ही भावना अधिक दृढ होत गेली माझी …एकाच्या लघवी आणि संडास या बद्दलच्या संवेदना क्षीण झालेल्या होत्या ..तो एकदम उठून पळत पळत बाथरुमला जात असे ..किवा कधी कधी त्याला लघवी अथवा संडास येतेय हे कळत नसे..तो अशा वेळी कपडे खराब करी ..मग सगळे झाल्यावर ते त्याच्या आणि आमच्याही ध्यानात येई ..तो ओशाळून जाई खूप ..त्याला औषध सुरु होते ..त्याच्या तपासण्याही झाल्या होत्या ..त्याला मेंदूच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी इंजेक्शन्स सुरु होती ..
दाखल झाल्यावर एकाच्या त्वचेची सालपटे निघू लागली होती.. साप जसा कात टाकतो तशीच ..दारूच्या सेवनामुळे त्याच्या अंगावरची त्वचा पूर्ण निकामी होऊन आता आतून नवीन त्वचा निर्माण होऊन जुनी त्वचा हळू हळू निघून जात होती म्हणे ..याला गमतीने वार्डातील लोक ‘ अजगर ‘ म्हणत असत ..एकाच्या पित्ताशयात समस्या निर्माण झाल्याने .. अचानक त्याचे पोट दुखू लागे ..अगदी गडबडा लोळे तो पोटदुखीने मग त्याला गोळी दिल्यावर बरे वाटे ..एकाचे पोट खूप वाढलेले ..अगदी दिवस भरत आलेल्या बाईसारखे ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..त्याला म्हणे जलोदर झालेला होता ..लिव्हरचे कार्य खूपच बिघडलेले होते त्याच्या ..त्यालाही नियमित औषधे सुरु होती ..त्याच्या खाण्यात जरा वातूळ पदार्थ आला की त्याचेही पोट दुखे खूप ..एकदोन जण क्षयरोगाची लागण होता होता थोडक्यात वाचलेले ..तर सुमारे पाच सहा लोक दारूमुळे अपघात होऊन पायाचे अथवा हाताचे हाड जायबंदी होऊन शस्त्रक्रिया झालेले..कंबरदुखी ..पाठदुखी अशी दुखणी सुरु झालेलेही बरेच लोक होते ..
मी असा विमनस्क विचार करत असताना ..मला सरांनी बोलावले आहे असा निरोप आला म्हणून बाहेर ऑफिसात गेलो ..सरांनी नेहमीप्रमाणे हसतमुखाने स्वागत केले ..मला वाटले बहुतेक परवा घरी जाण्यासाठी अलकाकडे हट्ट केला ..अन्नत्याग केला म्हणून बोलावले असावे..सरांनी माझी डायरी मागितली ज्यात मी रोज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित होतो ..सर काळजीपूर्वक सगळी उतारे वाचत होते ..वाचून झाल्यावर मग म्हणाले ..’ विजयभाऊ तुम्ही छान लिहिता उत्तरे ..अगदी मनापासून ..एकंदरीत आपण येथे उपचारांना आलो ते फार बरे झाले असाच सूर आहे तुमच्या लिखाणाचा ..’ सरांनी केलेली तारीफ ऐकून बरे वाटले मला ..पुढे ते म्हणाले ..इथे राहत असताना अनेकदा तुम्हाला लवकर बाहेर पडावे असे वाटेल ..कंटाळा येईल इथल्या दिनक्रमाचा ..मात्र तरीही मनाला समजवावे लागते की माझ्या सुरक्षित भविष्यकाळासाठी ही काही दिवस येथे राहणे ही एक गुंतवणूक आहे ..त्याचे फायदे नक्कीच मिळतील तुम्हाला ..मी होकारार्थी मान हलवून हसलो ..मग त्यांनी विषय काढलाच परवाचा ‘ परवा वाहिनी भेटीला आल्या होत्या ना ..काय म्हणत होत्या ..आनंद झाला असेल न त्यांना तुमची तब्येत सुधारत आहे हे पाहून ? ” खरे तर मी हट्ट केला होता अलकाकडे हे सरांना ठाऊक होते .. त्यांनीच कितीही हट्ट केला ..धमक्या दिल्या ..तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष करावे हे अलकाला सांगून तिला धीर देवून मन घट्ट करण्यास सुचवले होते तिला ..मी ओशाळून खाली मान घातली ..नुसताच बसून राहिलो ..
सर म्हणाले ” एकंदरीत तुमची चूक तुम्हाला उमजलेली दिसतेय तर ..छान झाले तुम्ही पत्नीच्या भावना समजून घेतल्या ते ..तुम्हाला येथे शिक्षा म्हणून ..अद्दल घडावी म्हणून ..अथवा त्रास व्हावा म्हणून येथे दाखल केले गेले नसून ..तुमचे शारिरीक आरोग्य ..मानसिक आरोग्य सुधारावे ..तुमच्या व्यक्तिमत्वाला लागलेले हे व्यसनाधीनतेचे ग्रहण कायमचे सुटावे म्हणून उपचारांसाठी येथे ठेवले आहे हा विचार सतत मनात असू द्या ..म्हणजे वेळोवेळी मनात येणारे नकारात्मक विचार तुम्हाला हाकलता येतील ” मी नुसताच मान डोलवत होतो ..सरांनी मला शुभेच्छा दिल्या आणि जाण्याची जाण्याची खुण केली .वार्डात परत येताच नेहमीप्रमाणे शेरकर काका आलेच जवळ …त्यांना कुतूहल होते सर मला काय म्हणाले याबद्दल ..मी सांगितले सरांनी वहीची तारीफ केली..मला अजिबात रागावले नाहीत परवाच्या प्रकाराबद्दल ..यावर ते म्हणाले .. ” आपले सर ‘ मीठी छुरी ‘ आहेत ..अजिबात त्रास न होऊ देता ऑपरेशन करतात ” ..मग मिस्कील हसून मला टाळी दिली .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५
Leave a Reply