नवीन लेखन...

बेवड्याची डायरी – भाग ४ – कर्कश्य बेल

टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ..टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ्र्र्र्र्र..कर्कश्य आवाजात तिसर्यांदा बेल वाजली तेव्हा मी वैतागून तोंडावरचे पांघरून काढले अन डोळे उघडले ….आसपास बहुतेक लोक उठलेले होते .मी भिंतीवरच्या घड्याळात पहिले सकाळचे साडेपाच झाले होते ..बापरे इतक्या लवकर उठायचे ? आसपासचे लोक उठून आपापल्या चादरी घडी करण्यात आणि गाद्या गुंडाळून ठेवण्यात गुंग झाले होते ..मी काल रात्री सुमारे आठ वाजता जो गोळ्या घेऊन थोडेसे जेवून पलंगावर पडलो होतो ते थेट आता बेल वाजल्यावर मला जाग आली होती ..अजूनही बराच अशक्त पणा जाणवत होता … इतका वेळ मला झोप कशी लागली याचे मला नवल वाटले ऐरवी मी घरी खूप उशिरा झोपत असे व सकाळी उशिरा उठत असे ..इथे बहुतेक उलटे होते लवकर झोपणे ..आणि लवकर उठणे ..

वार्डला लागून असलेल्या एका छोट्या खोलीत दोन पलंग होते त्या पैकी ऐक पलंग मला झोपायला दिला होता ..तर बाकीचे ..लोक वार्ड मध्ये खाली गाद्या घालून झोपत असत . मी नवीन असल्यामुळे किमान तीन दिवस तरी मला पलंग मिळणार होता अशी माहिती काल मला एकाने दिली होती ..तसेच तीन दिवस येथील सर्व उपचार पद्धतींमधून मला सवलत मिळणार होती ..हे असे का ? तर म्हणे सुरवातीला दारू बंद केल्यावर काही शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतात म्हणून त्यातून निघेपर्यंत पलंग आणि आराम मिळणार …बरे वाटले ..चला निदान दारू बंद केल्यावर काही त्रास होतो याची जाणीव तरी आहे या लोकांना ..काल रात्री मला खूप गाढ झोप लागली होती याचे कारण मला दिलेल्या गोळ्या होते या गोळ्या कोणत्या आहेत त्याचे नाव विचारले पाहिजे एकदा ..म्हणजे घरी कधी दारू सोडण्याचा प्रयत्न करायचा झाल्यास घेता येतील असा विचार मनात आला ..लगेच स्वतःच्याच या विचारांची गम्मत वाटली मनात ..एकीकडे दारू सोडण्यासाठी उपचार घेण्यासाठी दाखल झालो होतो आणि त्याच वेळी बाहेर पुन्हा सुरु झाली तर बंद करताना झोप कशी येईल यासाठी गोळ्या माहित करून घेण्याचा विचार येत होता .काल मनात खूप उलटे सुलटे विचार येत होते आणि एकंदरीत मी येथे उगाच दाखल झालो अशी भावना दृढ झाली होती ..पण आज सकाळी मात्र जरा बरे वाटत होते…

मी पलंगावर उठून बसताच तो तरुण मुलगा जवळ आला प्रसन्न पणे मला त्याने गुडमॉर्निंग केले आणि बाजूला बसला ‘ विजयभाऊ काल छान झोप लागली होती ना ?’ ..’ हो तर ..अगदी काल रात्री ८ ला जो झोपलो तो आताच मला जाग आली ‘ मी देखील हसून उत्तर दिले …आता सर्वांची थोडी शारीरिक कवायत होईल थोड्या वेळात तुम्ही तोंड वगैरे धुवून घ्या ..माझ्याकडे काहीच सामान नव्हते आणले मी सोबत ..त्याला तसे सांगितले तसे म्हणाला ..अरे हो विसरलोच होतो ..काल संध्याकाळी तुमच्या घरून तुमचे सामान आले आहे सगळे ..हा मला आश्चर्याचा धक्काच होता ..काल संध्याकाळी मी बायकोला फोन करायचा ..सरांना भेटायचे म्हणून मागे लागलो तर याने सर् उद्या भेटतील असे सांगितले होते ..सरांनी ही बायको उद्या येईल असे सांगून माझी बोळवण केली होती आणि मग हे समान केव्हा आले ? मनात समजलो आपल्याला काल उल्लू बनवले होते या लोकांनी ते …

तो माझ्याच कडे पाहत होता जणू माझे विचार वाचत असल्या सारखे सावरून म्हणाला हे सामान तुमच्या पत्नीने नाही आणले तर कोणीतरी माणूस येऊन देवून गेला ..’ त्याची माझी भेट तरी करून द्यायची होती तुम्ही ” मी उद्गारलो .त्यावर तो नुसताच हसला ‘ अहो आता जास्त विचार करू नका तुम्ही ‘ असे म्हणत त्याने एकाला हाक मारून बाहेरून माझे सामान आणायला पिटाळले ..एका प्लास्टिक च्या पिशवीत दोन बर्मुडा ..ऐक ट्रँकसुट दोन टी शर्ट , अंडरवेअर ..बनियान..टॉवेल , अंघोळीचा साबू ..कपडे धुण्याचा साबू ,टूथब्रश .पेस्ट ..माझा दाढीचे सामान ठेवायचा प्लास्टिकचा डबा असे सगळे साग्रसंगीत सामान होते कोपऱ्यात मला आवडणारी लसणाची चटणी पण एका बाटलीत भरून दिलेली होती…

त्याने मला त्याच्या मागे येण्यास सांगीतले..एका वार्ड मध्ये भिंतीला लागून कोपऱ्यात पाच सहा कपाटे होती त्याला कप्पे होते त्या पैकी एका कप्यात त्याने माझे सामान ठेवले आणि कप्पा बंद करून त्याला कुलूप घातले व त्या कुलपाची चावी एका काळ्या दोऱ्यात अडकवून तो दोरा माझ्या गळ्यात घातला ..’ हा तुमचा लॉकर आहे , लक्षात ठेवा याचा नंबर ..आणि ही चावी पण सांभाळून ठेवावी म्हणून गळ्यात घातली आहे ..मी त्याच्याकडे पाहून हसलो ‘ म्हणजे तुम्ही काल माझी आणि पत्नीची भेट होऊ दिली नाहीत तर ? ‘ ‘ अहो , इतके दिवस तुम्ही घरीच तर होतात इथे येऊन जेमतेम तुम्हाला चोवीस तास होतील आणि इतक्या लवकर कंटाळला की काय ? त्याने प्रतिप्रश्न केला . ‘ पण ..पण ..’ ‘ पण बिण काही नाही आता तुम्ही काही दिवस बाहेरच्या जगाचा विचार करणे सोडून दिले तर इथे तुम्हाला छान वाटेल आणि फायदाही होईल ‘ त्याने अनुभवी बोल सुनावले . ..

मी नुसतीच मान डोलावून लॉकर मधून टूथ पेस्ट ब्रश काढला माझ्या साठी खास नवी पेस्ट आणलेली दिसत होती हिने आणि ब्रशही नवाच होता हे पाहुन जरा बरे वाटले..तेथे बरीच कपाटे होती एका कपाटाला १२ कप्पे होते ( लॉकर ) म्हणजे बरेच जण राहत होते तर इथे ..वार्ड मध्ये अजूनही अनेक जण माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते ..बाथरूम , संडास कोपऱ्यात होते एकूण सात संडास बाथरूम आणि त्याचा उपयोग करण्यासाठी जरा गर्दीच दिसली ..मला अश्या गर्दीची सवय नव्हती म्हणून तेथे घुटमळत होतो तितक्यात एकाने मला वाट करून दिली ‘ अरे नया दोस्त है , इनको पहेले जाने दो ‘ असे इतरांना सांगितल्यावर मला विनासायास बाथरूम ..संडास वापरता आले ..बाहेर येऊन पुन्हा पलंगावर बसलो तर ..टूथ ब्रश हातातच राहिलेला ..पुन्हा उठून लॉकरकडे गेलो गळ्यातील चावी लावून कुलूप उघडले आणि आत ब्रश ठेवला ..

हा ऐक तापच होता ..घरी वस्तू जागच्या जागी ठेवायची मला कधीच सवय नव्हती इथे प्रत्येक वेळी वस्तू काढली की उपयोग करून परत लॉकर मध्ये व्यवस्थित ठेवण्याचा नवीन उपद्व्याप मागे लागला . …आता चहा हवा होता .
कालचा तो म्हातारा जवळ आला मला त्याने नाव विचारले यावर मी ‘ विजय’ असे त्रोटक उत्तर दिले ..त्याचे समाधान झालेले दिसले नाही आडनाव विचारले तर आडनाव सांगितले मग त्याने स्वतची ओळख करून दिली त्याचे नाव मुकुंद शेरकर होते मात्र त्याला सगळे जण काकाच म्हणत असावेत . मी त्याला चहा बद्दल विचारले तर त्याने माहिती पुरवली चहा पी .टी . व प्रार्थना झाल्यावर मिळेल . घरी उठल्याबरोबर तोंड धुतले की मला चहा लागत असे इथे घर नाही हे पुन्हा जाणवले … वार्ड मध्ये सगळे जण रांगेत उभे राहून लहान पणी शाळेत करतात तशी कवायत करत होते ऐक ..दोन ..तीन ..चार च्या ठेक्यावर छान चालले होते कुतूहलाने ते पाहायला मी देखील वार्ड मध्ये जाऊन उभा राहिलो समोर तो मॉनीटर सगळ्यांकडे तोंड करून आकडे मोजत कवायत घेत होता सगळ्या दारुड्यांना असे येथे शिस्तीत कवायत करताना पाहून हसू आले मला.

..ते म्हातारे काका देखील अगदी पुढे उभे होते रांगेत .कवायत करून झाली तशी सगळे रांग सोडून एकत्र गोळा झाले ‘ अरे विजय भाऊ , आप नये आये हो ना ? चलो यहां सामने आकर सबको अपनी पहेचान करवादो ‘ मॉनीटर ने मला समोर बोलावले आणि माझे नाव ..गाव आणि व्यसन सगळ्यांना मोठ्याने सांगायला सांगितले ..जरा बिचकतच मी पुढे झालो आणि नाव… गाव सांगितले मात्र व्यसन सांगताना जरा चाचरलो ‘ दारू ‘ असे म्हणण्या ऐवजी ‘ ड्रिंक्स घेतो ‘ असे म्हणालो तसे सगळे हसले व सगळ्यांनी मला अभिवादन केले..

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..