नवीन लेखन...

स्वभावदोषांचे उच्चाटन.. नव्या व्यक्तिमत्वाला आकार (बेवड्याची डायरी – भाग ४२ वा)

” आपल्या व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती तसेच ..सुखी , समाधानी , संतुलित आणि उपयुक्त जिवन व्यतीत करणे खूप कठीण आहे ” ..

असे सांगत सरांनी आज समूह उपचारात पुन्हा ‘ आत्मपरीक्षण ‘ या संकल्पनेवर जोर दिला ..” हट्टी .जिद्दी …आत्मकेंद्रित ..बेपर्वा ..टोकाच्या नकारात्मक भावना ..आळशीपणा ..चालढकल करण्याची वृत्ती ..इतरांना दोष देण्याचे तत्वज्ञान ..बेजवाबदारपणा ..इतरांच्या भावनांची किंमत नसणे ..स्वताचेच खरे करून दाखवण्याचा अट्टाहास ..अश्या प्रकारच्या व्यसनी व्यक्तिमत्वाच्या स्वभाव वैशिष्ट्यांची चर्चा सरांनी केली ..खरे तर नेहमी स्वतःच्या बचावासाठीच एक व्यसनी धडपडत असतो ..प्रत्येक वेळी तो चुका करतो आणि आपल्याला इतरांनी माफ करावे असा त्याचा आग्रह असतो ..त्याच वेळी तो इतरांच्या झालेल्या चुका मात्र लक्षात ठेवून असतो ..त्या चुकांचा वारंवार उल्लेख करून तो ..स्वतःवर किती अन्याय झाला आहे याचा पाढा मनात वाचत रहातो ..

त्यातून आत्मकरुणेचा भाव निर्माण होऊन ..आपण किती गरीब आहोत ..बिच्चारे आहोत ..हे जग खूप स्वार्थी आहे ..आपल्यावर किती अन्याय झालाय ..याचा हिशोब मनात ठेवत मानसिक संतुलनासाठी आधार म्हणून दारू किवा इतर मादक द्रव्यांचे सेवन करत रहातो .. स्वतःला आपण जोवर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ..स्वतःचा शोध घेत नाही ..तटस्थपणे आपल्या चुकांचे परीक्षण करीत नाही …तोवर आपल्या विनाशाला पूर्णपणे आपणच जवाबदार आहोत हे समजणार नाही ..

शक्यता आहे की अनेक वेळा परिस्थिती ..आसपासची माणसे ..अघटीत घटना ..यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडत असेल ..परंतु अशा वेळी दारूचे सेवन करून परिस्थिती बदलत नाही ..अथवा समस्या सुटत नाही ..तर समस्या वाढते …इतकी वाढत जाते ..की पुढे पुढे संघर्ष करण्याची क्षमता गमावून केवळ व्यसने करत राहणे हाच एक पर्याय आपल्यापुढे शिल्लक उरतो ..त्याऐवजी जर आपण जिवनावरील तसेच आपल्या चांगल्या कर्मांवरील श्रद्धा जोपासली ..अखंड ठेवली तर नक्कीच आपल्या सकारात्मक क्षमता वापरून आपल्याला नव्याने उभे राहता येईल ..

” किती लोकांना आपल्या स्वभावात काही दोष आहेत आणि ते काढून टाकले पाहिजेत हे मान्य आहे ? ” सरांच्या या प्रश्नावर बहुतेकांनी हात वर केले आणि होकार दर्शवला ..एक जण तसाच मख्ख पणे बसून होता ..काय रे तुला सुधारावेसे वाटत नाही का ? असे सरांनी विचरताच तो म्हणाला ‘ सर माझ्या घरी माझे वडील देखील दारू पितात रोज संध्याकाळी ..त्यांना कोणी काही बोलत नाही मात्र मला येथे दाखल केलेय घरच्या मंडळीनी ..असे का ? ” त्याच्या प्रश्नावर सर स्मित करत म्हणाले .. अगदी बरोबर प्रश्न पडलाय तुला..तुझ्या वडिलांनी देखील दारू सोडली पाहिजे असे तुला वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु इथे आपण स्वताच्या व्यसनमुक्तीसाठी दाखल झालो आहोत ..सध्या आपण फक्त स्वतःबाबत विचार करतो आहोत ..तू जर निश्चयाने प्रामाणिकपणे दारू सोडलीस तर नंतर तू वडिलांना देखील व्यसनमुक्तीसाठी मदत करू शकतो ..वडील पितात ..इतर नातलग पितात ..असे समर्थन करून आपण स्वतःचे व्यसन न्याय्य करू पाहतो आहोत ..एखादी चूक वडीलधारी माणसे करत असतील तर तीच चूक आपण केल्यास काही हरकत नाही हे तत्वज्ञान योग्य नाही ..तुझ्या वडिलांचे वय ..त्याच्या क्षमता ..त्याच्या जवाबदा-या ..यांची तुलना करता .कुटुंबीयांनी .. तू तरुण आहेस ..तुझे सगळे भविष्य घडायचे आहे ..तुला आधी उपचार दिले पाहिजेत असे ठरवले असले पाहिजे ..

..किवा वडिलांपेक्षा तुझ्या व्यसनमुक्तीला त्यांनी प्राधान्य दिले आहे.. हे खरेतर तुझ्या भल्या करिता आहे ..आता येथून सगळे चांगल्या प्रकारे आत्मसात करून तू बाहेर पडून व्यसनमुक्त राहिलास तर तुझ्या वडिलांना देखील उपरती होईल उपचार घेण्याची ..तू त्यांना मदत देखील करू शकशील व्यसनमुक्तीसाठी ..मात्र ते पितात म्हणून मी पितो हे समर्थन सर्वथा दुबळे आहे ..तू तुझ्या आईचा कधी विचार केला आहेस का ? नवरा आणि मुलगा दोघेही दारू पितात याचा आईला किती मानसिक त्रास होत असेल ? ती कशी सांभाळत असेल तुम्हा दोघांना ? तिची बिचारीची किती कोंडी होत असेल ? हा विचार कर आणि आधी स्वतःच्या व्यसनमुक्ती साठी प्रामाणिक प्रयत्न कर ” सरांनी सांगितलेले त्याला पटलेले दिसले ..त्याने होकारार्थी मान हलवली .

” आपल्या स्वभावातील दोष आपल्यासाठी हानिकारक आहेत हे मान्य केल्यानंतर ते आपल्या व्यक्तिमत्वाला पोखरून टाकून कुटुंबात ..समाजात आपल्याला बदनाम करत आहेत हे लक्षात घ्यायला हवे .हे स्वभावदोष काढून टाकून एका नव्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यास या पुढे आपण सज्ज झाले पाहिजे ..त्याची सुरवात पाचव्या पायरीपासून होईल असे म्हणत सरांनी पाचवी पायरी फळ्यावर लिहिली..

..” आम्ही ईश्वराजवळ ..स्वतःपाशी ..तसेच दुसऱ्या आदरणीय व्यक्तीपाशी आमच्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली दिली ” सरांनी फळ्यावर लिहिलेली पायरी कोड्यात टाकणारी होती ..आपल्या चुकांची कबुली देण्याविषयी त्यात सुचवले होते ..मी जरा विचारात पडलो ..आजवर मी केलेल्या चुकांचे समर्थन केले होते ..आता त्याच सगळ्या चुका कोणाजवळ तरी कबूल करणे माझ्यासाठी कठीणच गोष्ट होती ..बहुतेक सरांनी आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचले असावेत ते हसून म्हणाले ” घाबरू नका ..ही चुकांची कबुली देणे कठीणच आहे हे मी जाणतो .. एक मराठी म्हण आहे ‘ मान सांगावा जनात ..अपमान सांगावा मनात ” त्या नुसार आपण नेहमी आपल्या बाबतीत आपले यश ..सन्मान ..कर्तुत्व ..याबाबत आसपासच्या सर्वाना कळावे म्हणून धडपडत असतो ..आणि बहुधा आपल्या चुका ..अपमानाचे प्रसंग ..आपल्यामुळे झालेले नुकसान.. अशा गोष्टी इतरांपासून लपवून ठेवण्याचा जीवापाड प्रयत्न करत असतो ..त्यामुळे आपल्या चुकांची जाहीर कबुली देणे अवघडच आहे आपल्यासाठी ..या पाचव्या पायरीला ‘ कन्फेशन ‘ अथवा बदलाच्या सुरवातीची नांदी म्हणता येईल ..

ख्रिस्चन धर्मात अशा ‘ कन्फेशन ‘ ला खूप महत्व आहे ..आपण सिनेमात अनेकदा असे दृश्य पाहतो की जेथे ..चर्च मधील शांत गंभीर वातावरणात ‘ कन्फेशन ‘ बॉक्स मध्ये चेहऱ्यावर अतिशय प्रेमळ आणि आश्वासक भाव असणारा फादर ..समोर असलेल्या व्यक्तीचे ‘ कन्फेशन ‘ ऐकतो ..आणि नंतर त्याला दोष न देता धीर देतो ..मार्गदर्शन करतो …अशी कबुली देणे ही बदलाची उपरती मानली जाते ..आत्मशुद्धीची ही एक महत्वाची सुरवात आहे..सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ अशी चुकांची कबुली देण्याबाबत सर्व धर्मानी मान्यता दिलेली आहे..असे केल्याने आपल्या मनातील अपराधीपणाची बोच निघून जाण्यास मदत मिळते ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..