कन्फेशन ‘ करताना अथवा आपल्या चुकांचा कबुली जवाब देताना पाचव्या पायरीत जो आदरणीय व्यक्तीचा उल्लेख आहे त्या बाबतीत सांगताना सरांनी आजच्या समूह उपचारात… अशी आदरणीय व्यक्ती कोण असावी असे आपल्याला वाटते ? हा प्रश्न सर्वाना विचारला ..एकाने सांगितले की त्याचे आजोबा त्याच्या दृष्टीने आदरणीय आहेत ..एकाने त्याच्या एका यशस्वी मित्राचे नाव सांगितले ..मी माझ्या एका नातलगाचे नाव सांगितले जो अध्यात्मिक विचारांचा होता ..सर्वांची उत्तरे ऐकून समाधानाने स्मित करत सर बोलू लागले ..मित्रानो , आपण योग्य विचार करत आहात ..पाचव्या पायरीत ईश्वराजवळ म्हणजे ईश्वरासामान असलेल्या आपल्या नातलगांपाशी ..स्वताच्या अंतर्मनाशी तसेच अन्य आदरणीय व्यक्तीजवळ आपल्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली देण्यास सांगितले आहे ..
या कबुलीजबाबात एक अडचण अशी येते की आपण गतजीवनात केलेल्या अनेक चुकांची स्पष्ट कबुली आपल्या जवळच्या नातलगांपाशी देणे कठीण असते ..अनेकदा आपण नशेत ..अथवा नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी ..किवा नशेत असताना एखाद्या विकाराच्या आहारी जावून खूप खालच्या पातळीचे अनैतिक वर्तन केले असल्याची शक्यता असते ..जे वर्तन जवळच्या नातेवाईकांना कधीच समजू नये अशी आपली इच्छा असते ..कारण त्यातून त्यांना धक्का बसण्याची शक्यता असते ..किवा त्या गोष्टी सांगितल्याने नातलगांशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध बिघडण्याची शक्यता असते ..उदा . जर नशेच्या भरात मित्रांच्या आग्रहाने एखाद्याने विवाहित असूनही वेश्यागमन केले असेल ..विवाहबाह्य संबंध ठेवले असतील ..तर ते त्याला जवळच्या नातेवाईकांजवळ कबुल करणे कठीण असते ..त्यामुळे त्याच्या नातेसंबंधात बिघाड होण्याची शक्यता वाढते ..किवा पत्नी ..आईवडील ..भावंडे यांच्या दृष्टीने एखादा अक्षम्य गुन्हा केला असेल तर त्याबाबत कबुली त्यांच्याजवळच देणे शक्य नसते ..अशा वेळी मनमोकळे करण्यासाठी म्हणून आदरणीय व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे ..
ही आदरणीय व्यक्ती बहुधा जवळच्या नात्यामधील नसते ..अथवा जी आपल्या कबुलीजवाबाने विचलित होईल अशी नसावी ..तसेच आपण केलेल्या कबुलीचा गैरफायदा घेईल अशीही नसावी ही दक्षता घ्यावी लागते ..किवा ती व्यक्ती अशा गोष्टी खाजगी ठेवेल याची आपल्याला खात्री असायला हवी,,तसेच आपल्याला आपण केलेल्या चुकीबद्दल दोष न देता …समजून घेवून पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणारी असली पाहिजे ..कबुलीजवाबासाठी अशी आदरणीय व्यक्ती निवडणे हे हुशारीचे काम आहे ..उगाच भावनेच्या भरात कोणाजवळही अशी कबुली देणे नक्कीच हितावह नसते ..
सरांनी या बाबत स्पष्ट केले की बहुधा अशी आदरणीय व्यक्ती म्हणून आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या जेष्ठ सदस्याची निवड करू शकतो .. ज्याला अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये ‘ स्पाँन्सर ‘ म्हंटले जाते ..किवा ही व्यक्ती एखादा व्यावसायिक समुपदेशक ..किवा व्यसनमुक्ती केंद्रातील जवाबदार समुपदेशक असली पाहिजे ..अन्यथा आपल्या कबुलीजवाबाने आपली अपराधीपणाची बोच कमी होऊन पुढील योग्य मार्गदर्शन मिळण्याऐवजी एखाद्या नवीन संकटाला सामोरे जावे लागेल ..ही आदरणीय व्यक्ती जर व्यसनमुक्तीच्या बाबत आपल्यालों मदत करणारी असली तर अधिक उत्तम असते ..अशी व्यक्ती निवडताना आपण नीट काळजी घेतली पाहिजे ..आपला कबुलीजवाब आपल्या पुढील मार्गात अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे ..असे सांगत सरांनी पाचव्या पायरीवरील चर्चा संपली असे जाहीर केले ..व्यसनी व्यक्तीचा स्वभाव बहुधा अनैतिकतेकडे झुकणारा असतो त्यामुळे त्याने व्यसनाच्या काळात कौटुंबिक दृष्ट्या , सामाजिक दृष्ट्या , कायद्याच्या दृष्टीने… काही गुन्हे केले असण्याची शक्यता असते ..अशा वेळी कबुलीजवाब जपून द्यावा हे सरांचे म्हणणे आम्हाला तंतोतंत पटले ..
नंतर सरांनी आमच्यातील पाटील नावाच्या एकाला उभे केले व त्याला विचारले ‘ तू परवा रविवारी डिस्चार्ज झालेल्या कोणाजवळ आपल्या घराचा पत्ता व पत्नीचा फोन नंबर दिला होतास ते सांग ? सरांच्या या प्रश्नावर पाटील हडबडला ..त्याचा चेहरा गोंधळल्या सारखा झाला ..’ नाही सर ..मी कोणालाच पत्ता व नंबर दिलेला नाही ..शपथ ” असे म्हणू लागला ..हे नवीन काय ते आम्हाला समजेना ..सरांनी पुन्हा पाटीलला जरा दरडावून विचारले .’ खरे सांग तू ..आम्हाला सगळे समजले आहे ..’ यावर पाटीलने मान खाली घातली …आम्हाला समजले की पाटील खोटे बोलतोय म्हणून ..
सर पुढे सांगू लागले ‘ व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर लवकरात लवकर पडावे हे सर्वांनाच वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु त्यासाठी आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये ..इथे वेगवेगळ्या स्वभावाचे ..वेगवेगळ्या संस्कृतीचे ..वेगवेगळी नशा करणारे लोक उपचार घेत आहेत ..या पैकी कोण मनापासून उपचार घेतोय हे समजणे कठीण आहे ..
कारण व्यसनी व्यक्ती हा दुहेरी व्यक्तिमत्वाचा किवा ढोंगी प्रवृत्तीचा असतो ..तेव्हा येथे मैत्री करताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे ..इथून बाहेर पडल्यावर येथे मैत्री झालेल्या मित्रांना बाहेर भेटणे धोकादायक असू शकते ..कारण जर त्या मित्राने पिणे सुरु केले तर आपणही त्याच्या सोबत ‘ रीलॅप्स ‘ होऊ शकतो ..काही लोक डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्ती जवळ आपल्या घरचा पत्ता किवा फोन नंबर देतात आणि सांगतात की माझ्या घरी जावून घरच्यांना सांग की मी खूप आजारी आहे ..इथे मला खूप त्रास होतोय ..मला उपाशी ठेवतात ..मारतात ..बांधून ठेवतात ..वगैरे ..म्हणजे घरचे लोक घाबरून लवकर मला डिस्चार्ज देतील ..मित्रानो हा मार्ग अत्यंत चुकीचा आणि खोटेपणाचा आहे ..आपण बाहेर व्यसने करून ..खोटे वागून कुटुंबियांना भरपूर त्रास दिलेला आहे ..आता येथे असताना पण आपण असे खोटे निरोप बाहेर पाठवून घरच्या मंडळीना त्रासात टाकणे योग्य नाही..
..या पाटीलने परवा डिस्चार्ज होणाऱ्या एकाजवळ आपल्या पत्नीचा फोन नंबर दिला होता ..तिला लवकर घेवून जा असा निरोप देण्यासाठी …त्या माणसाने डिस्चार्ज होऊन बाहेर पडल्यावर सरळ याच्या पत्नीला फोन करून ..हा इथे खूप वाईट अवस्थेत आहे असा स्वताचे नाव न सांगता खोटा निरोप दिला ..याची पत्नी घाबरली ..तिने आम्हाला फोन करून खरी माहिती विचारली ..आम्ही सर्व काही ठीक आहे ..या असल्या फोनवर विश्वास ठेवू नका असा तिला धीर दिला ..मात्र नंतर ज्याला नंबर दिला होता तो आता रात्री बेरात्री वारंवार फोन करून याच्या पत्नीला याला लवकर घरी घेवून या असा आग्रह करतोय ..एकदा तर त्याने म्हणे दारू पिवून याच्या पत्नीला फोन केला ..आता हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा ..हे ऐकून आम्हाला सगळ्यांना त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा रागच आला ..तसेच त्याच्याजवळ पत्नीचा फोन नंबर देवून तिला फोन करायला लावणाऱ्या पाटीलचा देखील राग आला ..शेवटी ती व्यक्ती पत्नीला त्रास देतेय हे ऐकून पाटीलने सरांना त्याचे नाव सांगितले ..
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५
Leave a Reply