मी स्वतची ओळख करून देताना नाव.. .गाव ..सांगून झाल्यावर व्यसन कोणते ते सांगताना सरळ सरळ दारू असे न म्हणता ‘ ड्रिंक ‘ असे म्हंटल्यावर सगळेजण का हसले ते मला समजेना ..त्यावर एकजण ‘ कोणते ड्रिंक ? थम्सअप की लिम्का ? असेही ओरडला परत सगळे हसले ..मला कसेतरीच झाले ..परत जागेवर येऊन उभा राहिलो . नंतर एकाने समोरच्या भिंतीवर असेल्या बोर्डवर लिहिलेली प्रार्थना वाचली सगळ्यांनी त्याच्या मागे ती प्रार्थना म्हंटली आणि सुप्रभात चा नारा दिला गेला व चहा वाटप सुरु झाले स्टुल वर किटली ठेवून त्या मोठ्या किटलीतून प्रत्येकाच्या ग्लासात चहा ओतण्याचे काम ऐक जण करत होता ..सगळे शिस्तीत रांगेने येऊन चहा घेत होते ..
चहा घेण्यासाठी सर्वाना रांगेत उभे राहिलेले पाहून जरा गम्मत वाटली ..मला असल्या रांगेची वगैरे सवयच नव्हती कधी ..अगदी गँस सिलिंडर आणण्यासाठी देखील गेलो असता रांग पाहून माझे डोके फिरत असे ..सकाळपासून चहा हवासा वाटत होता म्हणून नाईलाजाने रांगेत उभा राहिलो तर मॉनीटर जवळ येऊन म्हणाला तीन दिवस तुम्हाला रांगेत उभे न राहण्याची सवलत मिळू शकते कारण नवीन आलेल्या लोकांना व्यसन न केल्यामुळे शारीरिक त्रास होत असतात तसेच मानसिक अवस्थता असते ..मला अशक्तपणा वाटत होताच थोडासा पण अशी सवलत घेणेही आवडले नाही म्हणून त्याने दिलेल्या ग्लासात रांगेने चहा घेतला …
चहा घेताना शेजारी बसलेल्या एकाला विचारले की मघा तुम्ही सगळे ” मी ‘ ड्रिंक्स ‘ घेतो असे म्हंटल्यावर का हसलात ? ” तर तो पुन्हा हसला … म्हणाला ” अहो , बहुतेक सगळेच असे दारू म्हणण्या ऐवजी ‘ ड्रिंक ‘ म्हणतात ..कारण दारू म्हंटले की जरा लेव्हल खाली आल्यासारखे वाटते माणसाला व ‘ ड्रिंक ‘ म्हणणे मोठेपणा वाटतो शिवाय ड्रिंक असे म्हंटले की आपण दारूमुळे होणारे दुष्परिणाम नाकारून मनातल्या मनात दारूचे उदात्तीकरण केल्यासारखे होते.. खरे तर वर्ष सहा महिन्यातून आणि अगदी एखादा पेग घेतला जातो तेव्हा ड्रिंक असे म्हणण्याची प्रथा आहे भारतात ..आपण सगळे रोजच दारू पीत होतो ..स्वतःला आणि कुटुंबियांना त्रासही होत होता आपल्या पिण्याचा…अगदी देशी किवा गावठी दारू पिणारे देखील इथे आले की दारूला ‘ ड्रिंक ‘ म्हणतात याची गम्मत वाटते इथे …आपल्याला वाटते की ‘ ड्रिंक्स ” घेतो असे सांगितले की आपण एकदम उच्च दर्जाची दारू पितो तसेच कमी पितो ..पण असे ड्रिंक म्हंटले तरी दारूचे परिणाम काही कमी होणार नसतात ..ही म्हणजे आपण स्वताची फसवणूक करतो नाही का ? ” ..त्याचे म्हणणे मला पटले आणि स्वतची गम्मत देखील वाटली . चहा घेऊन नंतर अंघोळीला गेलो ..घरी मी आंघोळीला जाताना अलका ला आवाज दिला की ती टॉवेळ .कपडे ,,गरम पाणी असा सगळा सरंजाम बाथरूम मध्ये तयार ठेवत असे इथे मात्र स्वतःलाच सगळे करावे लागणार हे लक्षात आल्यावर आपण पत्नीवर किती अवलंबून आहोत हे जाणवले मात्र तरीही तिच्या म्हणण्यानुसार दारू सोडू शकलो नाही याचा खेद वाटला …
बाथरूम समोर नंबर लावून अंघोळ उरकली अंघोळ करून छान फ्रेश वाटले …तो पर्यंत नाश्त्याची वेळ झालेली होती ..मला लॉकर देताना मॉनीटर ने ऐक कप्पे असलेली स्टीलची थाळी आणि ऐक चमचा देखील दिला होता व ती थाळी प्रत्येकवेळी नीट धुवून ठेवायची असेही बजावले होते ..ती थाळी न चमचा घेऊन पुन्हा नाश्त्याच्या रांगेत उभा राहिलो ..पोहे होते नाश्त्यासाठी ..गरम गरम पोहे खाताना घरी कधी अलकाने नाश्ता करणार का असे विचारल्यावर तिच्यावर मी चिडत होतो हे आठवले . नाश्ता झाल्यावर परत एकदा चहा दिला गेला ..आणि मग ‘ समूह उपचार ‘ म्हणजे ‘ ग्रुप थेरेपी ‘ ‘ होणार असे समजले . मला तीन दिवस आराम करण्याची मुभा होती तरी मी सगळ्यांबरोबर समूहात बसलो ..
ऐक नवीन माणूस ‘ समूह उपचार घेण्यासाठी उभा होता इथे काही कार्यकर्ते निवासी आहेत तर काही बाहेरून येणारे आहेत असे समजले होते मला .सर्वाना सर् असे संबोधण्याची पद्धत होती व सगळे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे व्यसनी होते.. आता तेच व्यसनमुक्ती च्या कार्यात सहभागी आहेत ही माहिती समजल्यावर त्यांचे कौतुकही वाटले.. मला ही सगळी माहिती ते शेरकर काका पुरवीत होते..
— तुषार पांडुरंग नातू
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५
( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)
Leave a Reply