जे टाळणे अशक्य , दे शक्ती ते सहाया , जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया ,
मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय ,
माझे मला कळाया , दे बुद्धी देवराया !
अशी प्रार्थना होती सरांच्या मागोमाग सर्वानी प्रार्थना म्हंटली मग सरांनी हीच प्रार्थना फळ्यावर लिहिली व म्हणाले ” मित्रानो , आता आपण सगळ्यांनी जी प्रार्थना म्हंटली ती प्रार्थना अल्कोहोलिक्स एनाॅनिमसच्या प्रार्थनेवरून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मराठीत रुपांतरीत केली आहे..तिचा सखोल आणि सविस्तर अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत ” सरांचे वकृत्व छान वाटले … ते हिंदीत बोलत होते त्यामूळे उपचारांसाठी दाखल असलेल्या , मध्यप्रदेश , छत्तीसगढ , उत्तर प्रदेश येथील बांधवाना आणि इतरभाषीय लोकांना देखील समजणे सोपे होते . सरांनी सर्वाना ऐक प्रश्न विचारला सांगा पाहू जगात काय काय टाळणे आपणास अशक्य आहे ? सगळे जण विचारात पडले मग एकाने उत्तर दिले ‘ मौत ‘ , दुसरा उद्गारला ‘ जन्म ‘ पुन्हा सगळे शांत होते सर् आम्हाला विचार करायला प्रवृत्त करत होते मग एकाने उत्तर दिले ‘ दुखः ‘ … अपघात , ‘ ..
अगदी बरोबर सर् म्हणाले पुढे सर् बोलू लागले ‘ एका माणसाला नेहमी आपण आनंदी असावे असे वाटते व ही मानवी प्रवृत्तीच आहे पण ..जगात प्रत्येकाच्या मनासारखे सगळे घडत नाही कारण आपण ज्या निसर्गात राहतो त्याचे काही नियम आहेत …निसर्गनियमानुसार आपल्या जिवनात कधी सुख येते तर कधी दुखः येते ..कधी एखाद्या जिवलग माणसाचा मृत्यू होतो ..तर कधी कोणाचा जन्म होतो ..दिवस उगवतो .मावळतो आणि रात्र होते ..भरती येते .पुन्हा ओहोटी असते , काळीकुट्ट अमावस्या येते तशीच अल्हाददायक पौर्णिमा देखील असते . ओघवत्या भाषेत सर् बोलत होते आणि सगळे मन लावून ऐकत होते…
ओघवत्या भाषेत सर् बोलत होते ‘ तर मित्रानो ज्या निसर्गामुळे आपला जन्म झाला , आपण मोठे होतो आहेत . श्वास घेतो आहोत , त्या निसर्गाचे काही नियम हे कदाचित आपल्याला खूप जाचक वाटत असतात कारण माणूस हा नेहमीं प्रत्येक गोष्टीत ‘ आनंद ‘ शोधात असतो व निसर्ग नियम, त्याच्या नेहमी आनंदी राहण्याच्या आड येत असतात ..मात्र तरीही प्रत्येकाला जगावे तर लागतेच ..पण जर आनंद मिळत नसेल तर ?..तो आनंद शोधण्यासाठीच तर आपण ‘ व्यसन सुरु केले होते , म्हणजे …आपल्या पैकी अनेक जणांना दारू का पिता किवा व्यसन का करता असे विचारले तर ते ..खूप टेन्शन आहे जिवनात ….खूप दुखः आहे ..मला नोकरी मिळत नाही ..घरात कटकटी होतात ..अशी वेगवेगळी कारणे सांगतात . म्हणजे या कारणांनी त्रस्त होऊन आपण ‘ आनंद ‘ शोधण्यासाठी म्हणून व्यसनाचा आधार घेतो ..
याचाच दुसरा अर्थ असा की निसर्गाला … त्याच्या नियमांना …आपल्याला टाळताही येत नाही ..आणि सहनही करता येत नाही असा होतो .आपण प्रार्थनेच्या दुसऱ्या ओळीत म्हंटले आहे ‘ दे शक्ती ते सहाया ” याचा अर्थ आपण मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी , नशा न करता , निराश न होता , दुखः न करता , सहन करण्यासाठी परमेश्वराजवळ शक्ती मागतो आहोत . सरांचे बोलणे मला पटत होते ..बरोबर होते त्यांचे म्हणणे ..मी अगदी सुरवातीला , मित्रांचा आग्रह ..पार्टी ..समारंभ या निमिताने आणि कुतूहलाने दारू प्यायलो होतो व तो अनुभव मला खूप आवडला होता ..नंतर मग जेव्हा जेव्हा माझ्या मनाविरुद्ध काही घडे .तेव्हा दारूने दिलेला तो आनंद पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी मी दारू पिण्यातील सातत्य आणि प्रमाण वाढवत गेलो .. जेव्हा जेव्हा मला इतरांनी दारू का पितोस असे विचारले तेव्हा तेव्हा मी त्यांना टेन्शन ..दुखः ..कटकटी अशीच कारणे सांगितली होत….
सर् पुढे बोलू लागले ..पुढची ओळ आहे ” जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कराया ‘ ..म्हणजे जरी आपण कोठे जन्म घ्यावा ..आपले आईवडील कसे असावेत ..आपले आईवडील गरीब असावेत की श्रीमंत .आपण कोणत्या जातीत किवा कोणत्या धर्मात जन्माला यावे ..आपण कधी मरावे ..आपलयाला एखादा नैसर्गिक आजार व्हावा किवा नाही ..आपल्याला मुलबाळ होईल की नाही ..भविष्यात आपल्याला अपेक्षित असे सगळे सुख मिळेल किवा नाही या व अनेक गोष्टी जरी आपल्याला टाळता किवा बदलता येणार नसल्या तरी काही गोष्टी करणे मात्र आपल्या हाती आहे ..म्हणजेच शक्य साध्य आहे . सरांनी पुढे आम्हाला प्रश्न विचारला की आता तुम्ही सांगा काय काय करणे शक्य आहे ते ? शेरकर काकांनी उतर दिले ‘ जेवण ‘ त्यांचे हे उत्तर एकूण सगळे हसू लागले ..सर काकांना म्हणाले ‘ काका , सगळे दात शिल्लक जेवण करायला ? ‘ . पुन्हा सगळे हसले ….
एक जण म्हणाला ‘शिक्षण ‘ ..प्रगती ..अगदी बरोबर सर् सांगू लागले ” मित्रानो जरी अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असल्या या निसर्गात , तरी त्या पैकी काही गोष्टी बदलणे आपल्या हाती आहे ..आपले आईवडील जरी गरीब असले व आपल्याला हवे तसे शिकवू शकले नाहीत तरी .. मोठे झाल्यावर आपण नक्कीच स्वतः कष्ट करून पार्ट टाईम नोकरी करून पुढील शिक्षण घेऊ शकतो ..तसेच आपली उंची , रंग , शरीराची ठेवण कशी असावी ही जरी आपल्या हाती नसले तरी आपण व्यायाम ..योगासने करून आणि निरोगी जिवनशैली अंगीकारून आपले शरीर सुदृढ ठेवू शकतो.. हे आपणास नक्कीच शक्य आहे ..तसेच प्रामाणिक पणे आणि जास्तीत जास्त कष्ट करून ..बचत करून ..आपण आपली आर्थिक स्थिती देखील बदलू शकतो आपण जरी कधीतरी म्हातारे होऊन मरणार असलो तरी तो पर्यंत आपले आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न कारणे आणि स्वतःसाठी आणि आपल्याशी संबंधित लोकांसाठी उपयुक्त आणि सुखी जिवन जगणे नक्कीच आपल्या हाती आहे…
सरांनी या वर डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण दिले ‘ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण कोणत्या कुटुंबात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नाही ते समजले मात्र आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जास्तीत जास्त उच्च शिक्षण घेणे तरी आपल्याला शक्य आहे हे त्यांना उमजले आणि त्यांनी ते साध्य करून जगापुढे आपल्या वर्तनाने आदर्श ठेवला स्वतः सोबतच हजारो कुटुंबियांना आत्मविश्वास दिला ..प्रगतीची दिशा दिली ..! ‘ नेल्सन मंडेला याने देखील वर्णद्वेष संपविण्यासाठी दीर्घकालीन लढा दिला ..छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ मोगलांच्या जुलमी राजवटीतून जनतेला वाचविण्यासाठी मावळ्यांची सेना तयार करून ‘ स्वराज्य ‘ स्थापन केले …इंग्रजांची गुलामी झुगारून देण्यासाठी ..भगतसिंग , राजगुरू , सुखदेव , चाफेकर बंधू , टिळक , सावरकर , सुभाषचंद्र बोस , लाला लजपतराय , सरदार पटेल , मंगल पांडे ..’ महात्मा गांधी ‘…. खूप नावे सांगता येतील ज्यांनी स्वतच्या सुखाचा त्याग करून देशाला . ‘ स्वातंत्र्य ‘ मिळवून देण्यासाठी निर्धार केला व वेगवेगळ्या प्रकारे लढा दिला..ते सगळे जर दुखः आहे , टेन्शन आहे , अशी कारणे देत व्यसने करीत बसले असते तर आज हे दिवस आपल्याला दिसले नसते . म्हणजेच जरी परिस्थिती विपरीत असली ..मनाविरुद्ध घडत असेल तरी आहे त्या परिस्थितीत आपणास जे काही कारणे शक्य आहे ते साध्य करण्यासाठी आपण निर्धार केला पाहिजे .मग सर् शेरकर काकांना म्हणाले ‘ काका , तुम्हाला जेवण करण्यासाठी ‘ दातांची कवळी बसवणे ‘ नक्कीच शक्य आहे ..अर्थात इथून गेल्यावर व्यसनमुक्त राहिले तरच .! सगळे पुन्हा हसले ..शेरकर काका जरा लाजले ….
पुढची ओळ आहे ‘ मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय ? ,माझे मला कळाया दे बुद्धी देवराया ‘ याचा अर्थ सरळ आहे मित्रानो की , आपणास काय काय करणे शक्य आहे आणि काय काय अशक्य आहे ते नेमके न समजल्यामुळे आपण दिशाहीन झालो व व्यसनांच्या वाटेवर पुढे पुढे जात राहिलो आणि आपल्याला ‘ व्यसनाधीनता ‘ हा मनो शारीरिक आजार जडला ..जरी आता परत मागे फिरणे आणि भूतकाळात जाऊन आपण केलेल्या चुका टाळणे आपल्याला शक्य नसले तरी ..येणाऱ्या सोनेरी भविष्यकाळा साठी येथे नीट उपचार घेऊन ..सगळे आत्मसात करून ..व प्रामाणिक पणे ते आचरणात आणून ‘ व्यसनमुक्त ‘ जिवन जगणे आणि पुन्हा विकासाची वाट पकडणे आपल्याला नक्कीच शक्य आहे . मात्र आपला सगळ्यांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे ..आत्मविश्वास नष्ट झाला आहे … म्हणून वारंवार निर्धार करूनही आपण त्याच त्याच चुका करत गेलो ..आता या पुढे , आपण खूप शहाणे आहोत ..खूप हुशार आहोत ..शिकलेले आहोत … श्रीमंत आहोत , वगैरे विचारांनी आपला अहंकार न वाढवता येथे ‘ व्यसनमुक्ती ‘ साठी जी काही पथ्ये सांगितली जातात त्याचा नम्रतेने अवलंब करण्याची बुद्धी आपल्याला त्या परमेश्वराने द्यावी म्हणून ही प्रार्थना आहे ..
इथे परमेश्वर म्हणजे विशिष्ट जातीधर्माचा देव नाही तर निसर्ग आहे ..या निसर्गाकडे आपण सदसदविवेक मागतोय… लहानपणी जसे आपण देवाला नमस्कार करून ‘ सर्वाना चांगली बुद्धी दे ‘ असे मागणे मागत होतो तसेच हे मागणे आहे खरे तर इथे कोणीच मंदबुद्धी किवा बिनडोक नाहीय तर उलट सगळे बुद्धिमान आहेत मात्र आपल्या बुद्धीचा नेमका आपल्या आणि सर्वांच्या फायद्यासाठी कसा उपयोग करावा याचा ‘ सद्सदविवेक ‘ आपण गमावला आहे व स्वतच्या बुद्धीचा चांगला उपयोग करण्यासाठी आपण या प्रार्थनेनत सहनशीलता …धैर्य ..मानसिक शक्ती आणि विवेक ‘ मागतो आहोत . पाहता पाहता १ तास होत आला होता ..वेळ कसा पुढे सरकला ते समजलेच नाही . शेवटी सरांनी सर्वाना आज सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ तुम्हाला काय समजला ? असा प्रश्न दिला व सर्वाना आपल्या डायरीत त्याचे उत्तर लिहायला सांगितले ‘ .
— तुषार पांडुरंग नातू
( बाकी पुढील भागात )
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५
( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)
Leave a Reply