पुण्यातील वर्तमानपत्रात प्रसिध्ध झालेल्या दोन बातम्यांनी माझे लक्ष वेधुन घेतले आहे. त्यातील एक बातमी आहे ती अद्वैत व नीलम दातार या सुशिक्षीत, चित्तपावन ब्रांहण जोडप्याने शेअर व कमोडिटी मार्केटच्या जोरावर अव्वाच्या सव्वा परताव्याचे अमीश दाखवुन अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गांडा घातला आहे. यामधे अनेक सुशिक्षीत, उच्च शिक्षीत, मध्यम व उच्च मध्यमवर्गीय माणसे बळी पडली आहेत. दुसरी बातमी पुण्याच्या मार्केट यार्ड परीसरातील एका मुनिमाने असाच अव्वाच्या सव्वा परताव्याचे अमीश दाखवत लोकांकडुन केवळ चिठ्ठी चपाटिच्या जोरावर 600 कोटी रुपये गोळा केले आहेत. झटपट श्रीमंत होण्याचा मोह अनेकांना असतो. कमीत कमी वेळात भरपुर पैसा मीळवावा. केलेल्या गुंतवणुकीवर झटपट चांगला लाभ किंवा परतावा/ प्रॉफीट मिळावा असा लोभ अनेकांना असतो. या लोभापायीच अशा गोष्टी घडत असतात.
या प्रकारच्या योजनांचा अभ्यास केल्यावर त्यांचा एक विषिष्ट पॅटर्न माझ्या लक्षात आला आहे.
या योजनांमधे अव्वच्या सव्वा परताव्याचे किंवा फायद्याचे अमीश दाखवण्यात येते. महिन्याला 5 टक्के ते 10 टक्के व्याज मीळवा. 100000 रुपये गुंतवुन तीन महिन्यात 145000 रुपये मीळवा.
125000 रुपये गुंतवुन स्वतःच्या गाडिचे मालक व्हा वर महिना 10000 रुपये कमवा. ठरावीक रक्कम गुंतवा व फ्रीज, टी.वी., वॉशींग मशीन सारख्या वस्तु निम्या कींमतीत मीळवा अशी किंवा या प्रकारची प्रलोभने यात असतात. कायदेशीर व्यवहार, कोर्ट ऍग्रिमेन्ट, जमिनिचे तारण, पोस्ट डेटेड चेक्स या सारखी प्रलोभने पण असतात. याची सुरवात शक्यतो वर्तमान पत्रात प्रासिध्ध होणार्या छोट्या किंवा क्लासिफाईड जाहिरातींपासुन होते. जे सुरवातीचे ग्राहक असतात त्यांच्याशी आश्वासने दिल्याप्रामाणे प्रामाणीकपणे व्यवहार करण्यात येतो. मग भले जाहीरातदाराला स्वतःच्या खिशातुन पैसे द्यावे लागले तरी. अशा रितिने ते समाधानी ग्राहकांची साखळी निर्माण करतात. त्यांची नांवे फोन नंबर देतात. त्यांना मिळालेल्या धनादेशाच्या झेरॉक्स दाखवतात. मग पुढील पायरी ग्राहकांच्या मिटींगा घेणे ही असते. या मिटिंगांमधे या समाधानी ग्राहकांना आवर्जुन बोलविण्यात येते. मग एजंटांची नेमणुक करण्यात येते. आपल्या समाधानी ग्राहकांनाच आकर्षक कमीशनवर एजन्ट बनविण्याची पध्धत अवलंबली जाते. बर्याव वेळा चेन मार्केटींगसारखी पण योजना बनविण्यात येते. मग पुरेसे पैसे जमले की पोबारा करण्यात येतो. अशा प्रकारची फसवणुक करुन पोबारा केलेले लोक सहसा सापडत नाहीत. कारण आपल्याकडे लोकांना लुबाडुन आलेल्या पैशांच्या जोरावर त्यांनी सर्व संबंधिताना मॅनेज केलेले असते. भारतासारख्या भ्रष्टाचार असलेल्या देशात हे सहज शक्य आहे. पण अशा प्रकारच्या योजनांना बळी पडुन अनेक जण स्वतःच्या कष्टाचे व घामाचे जमवलेले पैसे या प्रकारच्या योजनांमधे गुंतवतात हे सत्य नाकारता येत नाही.
एखादे 2 वर्षांचे मुल एका वर्षात 20 वर्षांचे होत नसते. माणसाची वाढ ही काही निसर्ग नीयमांनुसार होत असते. त्याचप्रमाणे पैशांची वाढ ही काही अर्थशास्त्रीय नीयमांनुसार होत असते. बहुगुणी, आखुड शिंगी, कमी खाणारी, भरपुर दुध देणारी कामधेनु स्वस्तात मीळत नाही. जर कोणी अशी कामधेनु स्वस्तात देत असेल तर ती अस्सल कामधेनु नाही असे खुशाल समजावे.
गुंतवणुकीवरील आकर्षक परताव्याचे जे अमीश दाखवले जाते तर एव्हडा परतावा देणे कसे शक्य आहे. हे अर्थशास्त्राच्या कोणत्या नीयमाला धरुन आहे. याचा विचार गुंतवणुकदाराने स्वतःहुन करायला हवा. कारण जर महिना 20 टक्के नफा झाला तरच तो आपल्याला महिना 10 टक्के फायदा देऊ शकतो. महिना 20 टक्के नफा देणारा असा कोणताही सरकारमान्य किंवा कायदेशीर व्यवसाय किंवा धंदा जगात कोठेही नाही. त्याचप्रमाणे कायदेशीर व्यवहार, कोर्ट ऍग्रीमेन्ट ही प्रलोभने पण फसवी असु शकतात. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेली ही ऍग्रीमेन्ट कोर्टात स्टॅन्ड होत नसतात. पोस्ट डेटेड चेक्सचे पण गाजर पुढे धरण्यात येते. पोस्ट डेटेड चेक्स देणे ही काही फार अवघड गोष्ट नसते. जो पर्यंत तो चेक बँकेत लागुन आपल्या खात्यात पैसे जमा होत नाहीत तो पर्यंत त्या चेकला काही कींमत नसते. चेक बाऊन्स झाला तर चेक देणार्यावर कायदेशीर कारवाई कारता येते असा अनेकांचा समज आहे. तो जरी बरोबर असला तरी ही कारवाई वाटते तेव्हडी सोपी व सरळ नाही. प्रॉपर्टी किंवा जमिनिचा एखादा तुकडा गहाण ठेवण्याची लालुच पण दाखविण्यात येते. पण बर्याच वेळा गहाण ठेवलेली प्रॉपर्टी दुसर्याच कोणाच्या तरी नांवावर असते. प्रॉपर्टी गाहाण ठेवणार्याचा त्या प्रॉपर्टीवर कसलाही कायदेशीर अधीकार नसतो.
बरेच जण अशा प्रकारच्या योजनांसाठी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, कमोडिटी मार्केट, रीअल इस्टेट मार्केट अशा प्रकारच्या गुंतवणुकिचा उल्लेख करतात. ही मार्केट्स म्हणजे जणु काही झटपट श्रीमंत करण्यार्या किंवा कमीत कमी वेळात भरपुर फायदा कमवुन देणार्या जादुच्या छड्या आहेत असा आभास निर्माण करण्यात येतो. प्रत्यक्षात ही मार्केट्स समजण्यास फारशी अवघड नसताना सुध्धा ही मार्केट्स समजण्यास फारच अवघड आहेत व आम्ही त्यातले एक्सपर्ट आहोत असे चित्र निर्माण करण्याचा अनेक जाणांचा प्रयत्न असतो. मग त्या साठी डे ट्रेडींग, कमोडिटी ट्रेडींग, फ्युचर ऑपशन्स असे जाडे जाडे शब्द वापरुन लेकांना इंम्प्रेस करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्यावेळी ईतर लोक लोभी असतील तेव्हा तुम्ही घाबरट व्हा. जेव्हा ईतर घाबरट असतील तेव्हा तुम्ही लोभी व्हा. ज्यामधे काही कळत नसेल त्यात गुंतवणुक करु नका अशी गुंतवणुकिची साधी आणि सोपी तत्वे गुंतवणुक गुरु वॉरन बफे यांनी सांगीतली आहेत.
आता ई.स.2012 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. या नवीन वर्षात तरी गुंतवणुकदारांनी अधीक नफ्याच्या लोभाला बळी पडुन अशा प्रकारच्या फसव्या योजनांमधे गुंतवणुक करुन आपले पैसे वाया घालवु नयेत हीच अपेक्षा.
— उल्हास हरि जोशी
Leave a Reply