नवीन लेखन...

बियोन्ड हॉरिझॉन (काल्पनिक विज्ञान कथा)

नमस्कार, पहिल्यांदाच विज्ञान आणि अध्यात्म वर आधारित काल्पनिक कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि तीन भागात आहे.

श्री.जयंत नारळीकर सर ह्यांच्या लहानपणी वाचलेल्या विज्ञान काल्पनिक कथा ही ह्या मागची प्रेरणा आहे. सर्वांना हा माझा प्रयत्न आवडेल अशी आशा..

प्रकरण पहिले

रोज सकाळी लवकर उठून सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्र म्हणणारा समीर आज नऊ वाजून गेले तरी उठला नव्हता. आईला काळजी वाटू लागली. शक्यतो आई समीरच्या बेडरुममध्ये जात नसे. समीरला त्याच्या प्रयोगांमध्ये किंवा अभ्यासात डिस्टर्ब झालेला चालत नसे. पण अजुन उठला का नाही हे बघायला समीरच्या आईने समीरच्या बेडरूमचे दार उघडले. समीर अजून बिछान्यात होता.

‘अरे! समीर, आज कॉलेज नाहीये का? किती वाजले बघ!’ असे म्हणत तिने समीरच्या कपाळावरून आणि डोक्यावरून हात फिरवला. हाताला डोकं गरम लागले.

‘बापरे! काय झाले ताप आला की काय?’ असे म्हणत तिने समीरला हलकेच उठवले आणि ड्रॉवर मध्ये असलेले थर्मामीटर काढून समीरच्या काखेत लावले.
या हालचालींमुळे समीरला किंचित जाग आली आणि त्याने डोळे किलकिले करून आईकडे पाहिले. डोळ्यांना थोडे अंधुक दिसत होते. आईने ताप पाहिला तर 101 ताप होता. कदाचित पावसाळी हवा आणि शनिवार-रविवारची लोणावळा ट्रीप बाधली असावी असे आईला वाटले.

समीरच्या आईने समीरला उठवून तोंड धुऊन घ्यायला सांगितले आणि ती किचन मध्ये त्याच्या साठी मऊसूत उपमा बनवायला गेली. समीरही उठून वॉश बेसिनकडे गेला. पण त्याला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता.

कसेबसे तोंड धुऊन तो बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसला. पण त्याला फार वेळ बसवत नव्हते. उठून आत मध्ये जाणार तेवढ्यात आई गरमा-गरम उपम्याची डीश आणि गरम पाणी घेऊन आली.

‘आई, मला काही खायला नकोय ग! मला जरा आराम करावासा वाटतोय.’

‘असू दे! दोन घास खाऊन ही गोळी घे आणि मग झोप!’ असे म्हणत आईने त्याला जबरदस्तीने थोडासा उपमा खायला लावला. खाऊन झाल्यावर एक क्रोसिन गोळी आणि पाणी दिले. ते घेऊन समीर सावकाशीने उठून आपल्या बेडवर जाऊन पडला. त्याला काहीतरी वेगळेच जाणवत होते.

‘असेल व्हायरल फीवर! दोन-तीन दिवसात बरा होईल!’ असे समीरचे डॉक्टर बाबा म्हणाले.

दोन-तीन दिवस उलटून गेले तरी ताप उतरण्याची चिन्हे दिसत नव्हती. गोळी घेऊन तेवढ्यापुरता तो उतरत होता आणि परत चढत होता. समीरला त्याच्या डोळ्यांची दृष्टी जरा क्षीण झाल्यासारखी वाटत होती. कानाला ही खूप दडे बसले होते. आणि अशक्तपणा सुद्धा कमी झाला नव्हता.

जय आणि रोहित हे समीरचे जिवाभावाचे मित्र, रोज येऊन त्याची चौकशी करत होते. समीरची अवस्था बघून त्यांना जरा टेन्शन यायला लागले. समीरच्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घालावी का नाही अशा संभ्रमात ते असताना, समीरच्या आईने त्यांना बोलावले.

त्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शन बघून तिने विचारले, ‘नक्की काय झाले आहे? तुम्हाला इतके टेन्शन का आले आहे? समीरची अशी अवस्था घडायला काही गोष्टी झाल्या आहेत का? काही असेल तर आम्हाला स्पष्ट सांगा!’

तितक्यात समीरचे बाबाही समोर आले आणि म्हणाले,’तुम्ही लोणावळ्याहून आल्यानंतर समीर असाच शांत शांत आहे आणि त्याला सारखी झोप येत आहे. आधी आम्हाला वाटले की ट्रीपमुळे दमला असेल. पण मंगळवार सकाळपासून हा ताप आलाय आणि बाकीही तब्येत खराब झाली आहे तुम्ही कुठली गोष्ट आमच्यापासून लपवत नाही आहेत ना?’

आता लपवण्यात काही अर्थ नाही असा विचार करून रोहितने थोडे चाचरत बोलायला सुरुवात केली.

‘काका! मला माहिती नाही की, तुम्ही अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवाल. पण मला असे वाटते की समीरची ही अवस्था लोणावळ्याच्या त्या प्रसंगानंतर झाली.’

हे ऐकल्यावर आईच्या हातातून पाण्याचा ग्लास पडला. समीरच्या बाबांनी आईला शांत केले आणि सर्वजण हॉलमध्ये डायनिंग टेबलवर येऊन बसले. तत्पूर्वी समीरच्या बाबांनी समीरच्या बेडरूमचे दार लावून घेतले.

‘आता सांग, नक्की काय झाले आहे?’ बाबा म्हणाले.

‘काका आणि काकू आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला काही सांगितले नव्हते, कारण तुम्हाला कदाचित टेन्शन येईल किंवा तुम्ही भूत वगैरे असं काही मानत नाहीत त्यामुळे आम्ही संभ्रमात पडलो होतो की तुम्हाला घडला प्रसंग सांगावा का नाही. पण आता समीरची तब्येत बघून आम्हाला लोणावळ्याला जे घडले ते सांगावेसे वाटते कदाचित त्याचा संबंध इथे असू शकतो.’

रोहित आणि जयच्या चेहर्यावर आता कमालीचे टेन्शन दिसत होते. समीरचे बाबा म्हणाले,’ घाबरू नका!

पाणी प्या आणि सविस्तरपणे आम्हाला सर्व सांगा. आपण त्याच्यावर काहीतरी उपाय करू शकतो किंवा त्या अनुषंगाने आपण ट्रीटमेंट करू शकतो.’
‘बरं!’ असे म्हणत रोहितने सुरुवात केली. ‘काका! तुम्हाला माहितीच आहे. आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. आम्हाला ऍड्रोमिडा गॅलॅक्सीमध्ये होणारा उल्कावर्षाव बघायचा होता. वर्षातून एकदाच होणारा हा उल्कावर्षाव आम्हाला मिस करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही शहरापासून दूर लोणावळ्याला वस्तीच्या बाहेर एका रिसॉर्ट मध्ये बुकिंग केले, जेणेकरून तिथे माणसांची वहिवाट नसेल आणि पूर्ण अंधार असेल म्हणजे मग उल्कावर्षाव आम्हाला नीट बघता येईल.’

‘हो, ते माहिती आहे. पुढे!’ समीरचे बाबा म्हणाले.

‘तर! आम्ही जे रेसोर्ट बुक केले होते, ते गावाच्या वस्तीच्या बाहेर थोडे लांबवर आणि एका छोट्याशा टेकडीवर होते. रिसॉर्ट म्हणजे एक छोटा बंगला होता. वस्तीपासून थोडे लांब असल्यामुळे तिथे बाकी कोणी नव्हते. फक्त आमचे आम्ही होतो. बंगल्याच्या मागे थोडे लांबवर जंगल होते आणि तिथे दुसरा छोटा बंगला होता. आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा तो बंगला रिकामाच होता, त्यामुळे आम्ही मालकाला ‘आम्हाला त्या बंगल्यात राहायचे आहे तर तशी सोय करून दे’ असे सांगितले.

रिसॉर्टचा मालक अम्हाला मागच्या बाजूच्या बंगल्यात जाऊ द्यायला तयार नव्हता. सुरुवातीला त्याने अनेक छोटी मोठी कारणे सांगून पाहिली. आम्ही ऐकत नाही असे म्हटल्यावर तो हलक्या आवाजात आम्हाला म्हणाला, तो बंगला चांगला नाही. तिथे वाईट शक्तींचा वास आहे. खूप लोकांना तिथे विचित्र अनुभव आले आहेत. असे म्हणतात की तिथे भूत-पिशाच्चांचा वावर आहे. त्यामुळे त्या बाजूला कोणी जात नाही. आणि मीही तुम्हाला तिथे जाण्याची परवानगी देऊ शकत नाही.

‘काका, तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही भुताखेतांवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे मालकाचे बोलणे आम्ही मनावर घेतले नाही आणि मालक झोपल्यावर, सर्वत्र सामसूम झाली की आपण त्या बंगल्यात कडे जाऊयात आणि खरे काय ते शोधून काढूयात, असे मनात ठरवले. आम्ही या गोष्टीने एक्साईट झालो की काहीतरी नवीन थ्रिलिंग करायला मिळणार या ट्रीप मध्ये! आम्ही मालकांना ‘ओके! आम्ही नाही जात’ असे सांगून कटवले. रात्री सर्वत्र निजानीज झाल्यावर आम्ही हळूच रिसॉर्टच्या मागच्या बाजूने बंगल्याकडे गेलो बंगला बाहेरून तर चांगला होता. बाहेरून फक्त कडी घातलेली होती. त्यामुळे आमचे काम अजून सोबत सोपे झाले. कडी उघडून आम्ही बंगल्यात प्रवेश केला. बंगला बर्यापैकी रिकामा होता. विशेष काही फर्निचर नव्हते. एखाद टेबल, एक दोन खुर्च्या असा ऐवज होता. बंगल्यात बटने शोधून आम्ही बटणे चालू केली. बंगल्यातल्या सगळे बल्ब गेले होते. फक्त एक पिवळा छोटा बल्ब चालू होता. तिथे आम्हाला काही वेगळे काही जाणवले नाही. आम्ही तिथे थोडा वेळ गप्पा मारत बसलो.

‘हे भूत वगैरे खरं काही नसतं रे! नुसत्या अफवा असतात. उगीच लोकांना घाबरवून ठेवायचे!’ जय म्हणाला.

‘हो! अरे, असे म्हणतात पूर्वीच्या काळी जिथे खजिना लपवलेला असतो, तिथे अशा अफवांचे तर पीक असायचे. जेणेकरून लोक तिकडे जाणार नाहीत आणि खजिना सुरक्षित राहील.’

‘हो! मी पण अस ऐकल आहे. ऐ, इथे पण असा काही खजिना तर नसेल?’ इति रोहीत.

त्याच्या या वाक्यावर समीरने पुष्टी दिली. ‘चल! आपण या बंगल्यात सगळीकडे फिरून येऊया. बघू कुठे काही सापडते का?’

‘पण किती अंधार आहे इथे!लाईटच नाहीये!’ ‘असु, दे! आपल्या मोबाईलना टॉर्च आहेत ना! आपण टॉर्च ऑन करूया’ असे म्हणत आम्ही तिघांनी टॉर्च ऑन केले आणि पूर्ण बंगल्याला एक फेरी मारली. बंगल्याच्या आसपास तर काही वेगळे नव्हते. आम्ही फिरता-फिरता बंगल्याच्या मागच्या बाजूला गेलो. मागच्या बाजूला पूर्ण जंगल होते आणि भिन्न काळोख होता . समीर पहिल्यापासून धाडसी आहे, अशा वेळेला तो सगळ्यात पुढे होता. त्याच्या हातात त्याचा मोबाईल होता आणि मोबाईलचा टॉर्चच्या उजेडात तो पुढे पुढे जात होता. मी आणि जय थोडेसे घाबरलो होतो, तरीही त्याच्या मागून हळू हळू जात होतो. दाट झाडीमुळे, चंद्राचा प्रकाश सुद्धा तिथे जमीनीपर्यंत पोहोचत नव्हता. पायाखाली येणारा सुका पाचोळा, पावलांचा आवाज आणि सर्वत्र भयाण अंधार या सर्व वातावरणाचा माझ्यावर आणि जयवर थोडा परिणाम नक्कीच झाला. आम्ही अगदी सावधगिरीने हळूहळू इकडे तिकडे बघत जात होतो. आता आमच्यात आणि समीरमदध्ये जरा गॅप पडली होती. समीर पुढे जात राहिला. अचानक समीरचा पाय एका खडकाला अडखळला आणि समीर खाली पडला. त्याच्या हातातला मोबाइल सुद्धा खाली पडला. मोबाईलचा टॉर्च बंद झाला. धडपडत समीर उठला आणि मोबाईल शोधू लागला. त्याच्या एका हाताला मोबाईल लागला. घाईघाईने त्याने मोबाईलवरची दोन-तीन बटणं दाबली आणि टॉर्च सुरू झाला.

आणि अचानक वातावरणात बदल झाला. भयाण शांतता पसरली. पूर्ण अंधार झाला आणि जय-रोहितसुद्धा दिसेनासे झाले. समीरने चौफेर नजर फिरवली. सगळीकडे फक्त आणि फक्त काळोख दिसत होता. मात्र एक भयानक तीव्र आवाज कानावर आदळत होता. कानाचे पडदे फाटून आता त्यातुन रक्त येईल की काय इतक्या जोरात तो कानावर आदळत होता.

तो आवाज असह्य होऊन समीरने कानावरच हात दाबून धरले आणि डोळे बंद करून घेतले. त्या आवाजाने समीरचे डोकेही दुखायला लागले होते आणि समीरची अवस्था अक्षरशा एका आंधळ्या माणसासारखी झाली. त्याला काहीच दिसेना. शरीरात एक प्रकारची थरथर किंवा कंपने सुरू झाली. या कंपनांमुळे समीर थरथरायला लागला आणि त्याच्या हातातला मोबाईल खाली पडला. हातातून मोबाईल खाली पडल्यावर, मोबाईल स्विच ऑफ झाला आणि समीर मोबाईल उचलण्यासाठी वाकला आणि तसाच खाली जमिनीवर कोसळून निपचित पडला. तेवढ्यात हे त्याने आम्हाला नंतर सांगितले. कारण आम्ही जेंव्हा त्याच्याजवळ पोहचलो, तेंव्हा तो जमिनीवर निपचित पडला होता. ते बघून आम्ही दोघे घाबरलो. जवळच्या बाटलीतले पाणी समीरच्या चेहऱ्यावर मारले.
‘समीर! उठ! काय झाले तुला?’ असे त्याला गदागदा हलवत म्हणालो. पाच एक मिनिटांनी समीर शुद्धीवर आला. पण त्याला खूप अशक्त वाटत होते. अंगातील ताकद निघून गेल्यासारखे वाटत होते. आम्ही त्याला दोन्ही बाजूंनी आधार देत कसेबसे चालवत रीसॉर्ट पर्यंत आणले. नक्की काय घडले असावे, याचा कोणालाच अंदाज येईना.

‘उगीच विषाची परिक्षा नको! आता कुठे बाहेर जायला नको.’ असे म्हणून आम्ही रूम मध्ये झोपलो. सकाळी थोडी उशिरा जाग आली. समीरही जागा झाला. त्याला जरा फ्रेश वाटत होते. पण काल काहीतरी विचित्र घडले होते याची जाणीव सतत त्याच्या शरीरात होत होती. मग आम्ही फ्रेश होऊन नाश्ता घेऊन पुन्हा एकदा त्या जंगलाकडे निघालो. काय असेल तिथे? काय झाले असावे? या विचारात आम्ही जंगलापर्यंत पोहोचलो. पण कालच्या गोष्टींचा काहीही मागमूस नव्हता. थोडावेळ तिथेच थांबून आम्ही परत फिरलो. आमचे उल्कावर्षाव पहाण्याचे स्वप्न पण भंगले होते.

‘आता आपण जरा रिसॉर्टच्या स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करूया म्हणजे तेवढाच आपल्या मनाला विरंगुळा! कालच्या प्रसंगातून आपण बाहेर येऊ!’ म्हणून आम्ही मनसोक्त स्विमिंग केले. दुपारी जेवणाच्या वेळेला भरपूर मस्त जेवण करून परत पुन्हा आराम केला. समीरला तर आता अतिशय अशक्त वाटत होते. आणि कालच्या प्रसंगामुळे किंवा काल दिवसभर फिरल्यामुळे असेल. रेस्ट झाली की बरे वाटेल असे समजून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळी रिसॉर्ट वरचा चहा घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत खूप ट्राफिक लागले. त्यामुळे पुण्याला पोचायला उशीर झाला. झाल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नका असे एकमेकांना बजावले आणि आपापल्या घरी गेलो. सोमवारी सकाळी समीरला दमल्यासारखे वाटतच होते, तरीही तो उठून कॉलेजला गेला. सोमवारी त्याचे महत्त्वाचे असाईनमेंट सबमिट करायचे होते, त्यामुळे तो तसाच कॉलेजला गेला असाइन्मेंट सबमिट करून ‘मला जरा बरं वाटत नाही’ असे सांगून लवकर घरी परत आला त्याला अस्वस्थ वाटत होतं. तो सोफ्यावर पाय पसरून झोपी गेला.

समीर, वीस-एक वर्षाचा हुशार, अभ्यासू मुलगा! लहानपणापासून खगोलशास्त्राची विशेष आवड! समीरची आई संस्कृत प्राध्यापिका , तर समीरचे वडील प्रख्यात डॉक्टर! अभ्यासात पहिल्यापासून हुशार असल्यामुळे समीरसुद्धा वडिलांसारखा डॉक्टर किंवा इंजिनियर होईल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याला खगोलशास्त्राची खूप आवड असल्यामुळे त्याच विषयात आपण संशोधन करावे असे लहानपणापासूनच वाटत होते. शाळेची एक एक पायरी उत्तम रित्या पार पाडून समीर आता बारावी सायन्सला होता. बारावीत नक्की चांगले मार्क मिळणार हे तर ठरलेलेच होते.
‘ पुढे काय करायचं ठरवलं आहेस?’ समीरचे बाबा. ‘तुला मेडिकलला जायला आवडेल का इंजीनियरिंगला? काय विचार केला आहेस?’ समीरच्या बाबांनी विचारले. ‘ बाबा! मी इंजिनियर होणार नाही आणि डॉक्टरही!’

‘काय?’ बाबांना मोठा धक्काच बसला. समीरच्या बाबांची समीरकडून खूप अपेक्षा होती. ‘अरे! मग काय ठरवलं काय आहेस तू?’

‘बाबा, तुम्हाला माहिती आहे मला लहानपणापासून खगोलशास्त्राची आवड आहे. मी माझं करिअर त्यातच करणार आहे.’

‘अरे! पण खगोलशास्त्राची आवड इंजिनिअर डॉक्टर होऊन सुद्धा जोपासू शकतो.’

‘नाही बाबा! आवड जोपासणे आणि आवडीच्या क्षेत्राचा अभ्यास करणे खूप फरक आहे.’

‘ बर! ठीक! मग त्यासाठी कुठला कोर्स वगैरे? काही कुठली चौकशी केली आहेस का?

‘हो बाबा! मी सगळी चौकशी केली आहे. इथे आयुका मध्ये बी. एस्.सी. – ऍस्ट्रो फिजिक्स आहे आणि मी तिथेच ऍडमिशन घेणार आहे.’ बी. एस्.सी. ऐकून बाबा थोडे निराश झाले पण समीरवर भरवसा होता.

‘जे करशील ते नेटाने कर आणि तुझा टॉप परफॉर्मन्स दे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’ असे म्हणून बाबांनी आणि आईनेसुद्धा त्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. अपेक्षेप्रमाणे उत्तम यश मिळवले. बारावीत 99 टक्के मार्क मिळवून त्याची हुशारी त्याने पुन्हा सिद्ध केली आणि त्याला आयुकामध्ये ऍडमिशन मिळाली. तो मन लाऊन अभ्यास करु लागला.

मुळातच असलेली हुशारी आणि आणि खगोलशास्त्राची आवड या दोन्हीमुळे तो वर्गामध्ये कायम प्रथम राहिला. त्याची जिज्ञासू वृत्ती आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याची वृत्ती यामुळे लवकरच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रिय झाला. प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये खगोलशास्त्र विषयक बरीच सूत्रे होती. कॉलेजच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तो आईकडून या सूत्रांत बद्दल जाणून घेत होता. त्यामुळेच खगोल शास्त्र विषयातील त्याच्या ज्ञानात अजून भर पडत होती. कॉलेजमध्ये प्राध्यापक वसिष्ठ हे तर त्याचे दैवतच होते. त्यांच्याशी तो अधून मधून संस्कृत मधील या सूत्रांवर सुद्धा चर्चा करत असे आणि सरांकडून त्याला त्या सूत्रांचे योग्य ते विश्लेषण मिळत असे.

जय आणि रोहित हे दोघे असेच खगोल शास्त्राच्या आवडीने झपाटलेले आणि काहीतरी नवीन प्रयोग करून बघण्याची इच्छा असणारे होते. त्यामुळे या तिघांच्या वेव्हलेंग्थ जुळायला वेळ लागलाच नाही. लवकरच ते जीवश्चकंठश्च मित्र बनले आणि वेळ मिळेल तसा एकत्र येऊन आकाश दर्शनाचा आनंद लुटत राहिले.

नुकतीच सेकंड इयर बीएससीची फायनल एक्झाम संपली होती. आणि म्हणून ते लोणावळ्याला गेले होते. दिवसभर आसपासचा परिसर बघून कुठून जास्त चांगले आणि मोकळे आकाश दर्शन होईल असे तीन-चार स्पॉट्स त्यांनी बघून ठेवले. रात्री जेवण झाल्यावर रिसॉर्टच्या मालकाची गप्पा मारताना भुताखेतांच्या विषय निघाला आणि त्यांच्या उत्सुकतेचा किडा त्यांना शांत बसू देईना. म्हणून मग सर्वत्र निजानीज झाल्यावर मालकाच्या नकळत त्या बंगल्याकडे गेले होते. तिथे घडलेला प्रसंग काका-काकूंना सांगून त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला. डॉक्टर असल्यामुळे त्यांनी या गोष्टीवर फार विश्वास ठेवला नाही. पण समीर परत आल्यावर त्याच्या तब्येतीत झालेला बदल मात्र त्यांनी नक्कीच हेरला होता.

समीरच्या बाबांनी त्याला त्याच्या एका इ.एन्.टी. स्पेशॅलिस्ट मित्राकडे नेले. ‘कानाला दडे का बसले याचे कोडे तर उलगडता आले नाही. पण ऑडीओग्राफी केल्यावर डॉक्टरांनी सांगितले, काळजीचे कारण नाही. कानाच्या आतील बाजूला असणाऱ्या फ्लुईड प्रेशर बदलांमुळे हे दडे बसले आहेत आणि त्याचा श्रवणशक्ती वर परिणाम झाला आहे. त्याला आपण गोळ्या आणि औषधे देऊन बरे करू शकतो, पण त्याला थोडा वेळ जाईल आठवड्याभरात त्याचे कानाचे काम पूर्ववत होईल. असे डॉक्टरांनी सांगताच समीरच्या आई-बाबांना दिलासा मिळाला. त्याच्या कानाची ट्रीटमेंट चालू झाली. हळूहळू ताप कमी होत होता. बाबांनी त्याला लगेच मल्टी-विटामिन गोळ्या सुद्धा सुरू केल्या होत्या आणि दोन दिवसांनी त्याचा ब्लड रिपोर्ट करून रिपोर्ट वर लक्ष ठेवून होते. बाबांचे दुसरे मित्र आय स्पेशालिस्ट होते. समीरला त्यांच्याकडेसुद्दा नेले. ब्लड रिपोर्टमध्ये शुगर सुद्धा नॉर्मल होती. मग असे अंधुक दिसायचे काय कारण असावे? समीरच्या बाबांच्या मित्रांनी त्याच्या डोळ्यांची कसून तपासणी केली. तपासणीत आढळले, अचानक खूप ताण वाढल्यामुळे रेटीनाच्या काही पेशी टेम्पररी डेड झाल्या आहेत. पण आय ड्रॉप आणि गोळ्यांनी त्या परत नॉर्मलला येऊ शकतील. त्यामुळे डोळ्यांचीही ट्रीटमेंट सुरू झाली. वेळेवर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे समीरचे कान आणि डोळे आता हळूहळू नीट काम करायला लागले. त्याची ताकदही भरून निघत होती. या सगळ्यांमध्ये समीरचे कॉलेज पंधरा दिवस बुडले होते. अखेर शेवटी तीन आठवड्यांच्या पूर्ण विश्रांतीनंतर समीर पूर्ववत झाला आणि कॉलेजला गेला. समीर कॉलेजमध्ये आल्यावर प्रोफेसर वशिष्ठ यांनी त्याला आपल्या घरी बोलावले आणि त्याच्या तब्येतीची चौकशी केली. देवीप्रसादला त्याच्यासाठी कॉफी करायला त्याला आपल्या प्रयोगशाळेत नेले. समीर आता पूर्ण बरा आहे, याची खात्री पटल्यावर प्रोफेसर वसिष्ठांनी समीरला लोणावळ्याला नक्की काय घडले हे मला क्रमवार सांगू शकतोस का? असे विचारले.
समीरने घडलेला प्रसंग पुन्हा एकदा प्रोफेसर यांना सांगितला. मोबाईल हातातून खाली पडल्यानंतर त्याने तो उचलताना गडबडीत कशी बटन दाबली गेली, त्यानंतर तो उच्च आवाज, डोळ्यासमोर मिट्ट काळोख हे सगळे सविस्तर समीरने प्रोफेसर यांना सांगितले. हे सगळं ऐकल्यावर प्रोफेसर वशिष्ठ गहन विचारात पडले आणि समीर बरोबर काय झाले असावे याचा त्यांना अंदाज आला. पण आत्ताच सगळे समीरला सांगायला नको. तो नुकताच आजारातून उठत आहे, असा विचार करून त्यांनी समीरला ‘काळजी घे आणि उरलेला अभ्यास कसा भरून काढता येईल हे बघ’ असे सांगून निरोप दिला.

समीर सरांच्या घरून निघाला खरा! पण डोक्यात एक विचार घेऊन…सरांनी इतक्या डिटेल मध्ये लोणावळ्याला काय घडले हे का विचारले? आणि काय घडले हे कळताचं त्यांचा चेहरा इतका गंभीर का झाला?

ह्याच्या काही महिन्यांपुर्वी सरांबरोबर केलेल्या चर्चेचा आणि त्यातून अर्धवट केलेल्या प्रयोगाचा काही संबंध तर नाही?….. असा विचार करीत समीर घरी पोहोचला.

क्रमश:

— यशश्री पाटील.

#beyondhorizon #ScienceFiction #BeyondHorizon

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..