शीर्षक: Beyond Horizon.. (क्षितिजापलीकडले)
प्रकरण दुसरे
समीर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना आठवत घरी निघाला.. काय घडले होते काही महिन्यांपूर्वी???
काही महिन्यांपूर्वी……
प्राध्यापक वसिष्ठ आपल्या बी. एस्.सी. – ऍस्ट्रो फिजिक्सच्या वर्गात बिग बँग थियरी शिकवत होते. लहानपणापासून प्राध्यापक खूप हुशार! खगोल शास्त्राची खूप आवड. सुट्ट्यांमध्ये जमेल तसे रात्री आकाश न्याहाळणे हा त्यांचा आवडता छंद! कुठल्या तरी विज्ञान प्रदर्शनात एक हाताने बनवलेली दुर्बीण बघून त्यांनी पण घरीच दुर्बीण बनवण्याचा प्रयत्न केला होता. नव- नवीन प्रयोग करून बघण्याची तर त्यांना लहानपणापासूनच आवड!
खेळ ही कसले त्यांचे, तर आज ह्या ग्रहावर घर, उद्या त्या ग्रहावर, मग कोणी तरी एलियन्स् येणारं, त्याच्या बरोबर युद्ध असे अतर्क!! घरचं वातावरण पूर्ण धार्मिक, आई ग्रुहीणी तर वडील वेद-शास्त्राचे गाढे पंडीत. त्यामुळे सहाजिकच प्राध्यापकांची अनेक स्तोत्रे मुखोद्गत!
तर अशा वातावरणात वाढलेले प्रोफेसर वसिष्ठ इंजिनिअरिंग/ मेडिकलला सहज मिळणारी एडमिशन डावलून, – ऍस्ट्रो फिजिक्स मधे ग्रॅज्यूएशनसाठी गेले. तिथेच पुढे एम्.एस्सी, पी.एच.डी. करून प्रोफेसर म्हणून रुजू झाले. प्रचंड मेहनत, बुद्धिमत्ता आणि शिकवण्यात हातखंडा ह्या गुणांमुळे लवकरच ते सर्व शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. हळू हळू एकेक पायरी चढत आता ते हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले होते. युनिव्हर्सिटीने त्यांना युनिव्हर्सिटीच्या आवारातच शिक्षक वसाहतीमध्ये कॉलनीपेक्षा थोडा लांब एक बंगला दिला होता. बाजूलाच एक सर्व्हंट क्वार्टर होते, ज्याचे त्यांनी प्रयोगशाळेत रूपांतर केले होते. अनेक छोटे मोठे प्रयोग येथे यशस्वीरीत्या पूर्ण करून नव-नवीन सिद्धांत मांडले होते.
आताही ते अशाच एका प्रयोगामध्ये गुंतले होते. मात्र हा प्रयोग फार वेगळा होता आणि धोकादायक होता. कोणाला कुणकुण लागली असती तर त्यावर बंदी आली असती किंवा त्याचा दुष्ट लोकांनी दूर उपयोग केला असता. त्यामुळे हे जोखमीचे काम ते रात्रीच्या वेळी कोणी डिस्टर्ब करायला नसताना करत होते.
बिग बँग थियरीसुधा ते इतक्या सहजतेने विविध दाखले देत शिकवत होते. गहन/ क्लिष्ट विषय सोपा करून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. ते खूप तल्लीन होऊन शिकवत होते. कशी शून्यातून विश्व निर्मिती झाली. बोलताना त्यांच्या तोंडून “अणू पासूनी ब्रह्मांड एवढे होत जात असे” वाक्य निघून गेलं आणि त्यांच्या मनाने कौल दिला. अचानक काही तरी सापडलं त्यांना. एखाद्या गूढ अंधाऱ्या गुहेत एखादी प्रकाशाची बारीक तिरीप दिसावी असे काही तरी त्यांना वाटले. ते अचानक गप्प झाले. आणि तब्येतीचे कारण सांगून क्लास अर्धवट सोडून तडक ते आपल्या घराकडे निघाले.
समीर त्यांच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म बदल टिपत होता. त्याला काही तरी वेगळे जाणवले. सगळी लेक्चर्स झाली की आपण सरांना त्यांच्या घरी जाऊन भेटुयात असे मनाशी ठरवून तो दिवस कधी संपतोय ह्याची अधिरतेने वाट बघू लागला. इकडे प्राध्यापक घरी आले आणि झरझर आपल्या जाडजूड वहीची पाने उलटून काही तरी संदर्भ शोधू लागले.
वही कसली, आत्ता पर्यंत केलेल्या प्रयोगांची टाचणे, नोंदी, काही महत्त्वाचे संदर्भ ह्या सगळ्यांना एका धाग्यांमध्ये गुंफलेला जाड-जूड ग्रंथच म्हणा ना! आणि त्यांना हवा होता तो संदर्भ मिळाला.
लहानपणी मनावर झालेले धार्मिक संस्कार, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संस्कृतची उपजत जाण ह्या जोरावर त्यांनी गीता, वेद, भागवत पुराण अशा ग्रंथांचाही थोड फार अभ्यास केला होतं. त्यावरून गीतेतले काही श्लोक आणि बिग बँग थियरीचा संबंध जोडायचा प्रयत्न केला होता.
‘विश्वची उत्पत्ती माझ्यातून आहे. मी अविनाशी पुरुषोत्तम आहे.’ हे पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, चार पाच हजार वर्षांपूर्वी…
आता अलीकडे आलेली बिग बॅग थियरी हेच सांगते ना, अती प्रचंड ऊर्जा असणार्या एका छोट्या कणापासून म्हणजेच अत्यंत तेजोमय अशा लहानशा अणूपासून हे विश्व बनले आहे आणि त्यातूनच पुढे ग्रह तारे आकाशगंगा बनल्या आहेत. आणि विश्वची सतत उत्पत्ती आणि वाढ होत आहे. हाच संदर्भ घेत त्यांचे पुढच्या प्रयोगावर संशोधन सुरू होते.
आता त्यांनी उत्साहाने पुढच्या नोंदी आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्या आधी देवी प्रसादला प्रयोग शाळेत एक गरमा गरम फिल्टर कॉफी आणून द्यायला सांगितली आणि ते कपडे बदलून प्रयोग शाळेकडे गेले.
देवीप्रसादने इतक्या वर्षांच्या अनुभव वरून ताडले की आता सर काही ८-१० तास बाहेर येत नाहीत. त्याने सरांसाठी कॉफी बनवली आणि प्रयोग शाळेत घेऊन गेला. “तुझं काम झालं की दरवाजा ओढून घे आणि तू घरी जा” असे सांगत सरांनी त्याच्या हातातून कॉफीचा मग घेतला.
परत बंगलीवर येऊन देवीप्रसादने घर आवरून ठेवले. सरांना आवडणारी निशिगंधाची फुले त्यांच्या झोपायच्या खोलीत बेड जवळच्या फुलदाणीत नीट सजवून ठेवली. संध्याकाळ होत आली तशी देवाजवळ दिवा लाऊन, दिवाणखान्यात मंद धूप लावला. घराचे वातावरण अगदी प्रसन्न झाले. मग सरांना आवडते तशी मऊसूत भाताची खिचडी करून ती एका बाउलमध्ये घालून ओव्हन मध्ये ठेवली, म्हणजे सर आले की ती गरम करून खातील. टेबलावर पाण्याचा जग आणि ग्लास ठेवला. हे सर्व कित्येक वर्षाच्या सवयीने त्याच्या अंगवळणी पडलं होतं. आता तो निघणार इतक्यात समीर आला. समीरचे हे आवडते सर होते आणि समीरही सरांचा लाडका विद्यार्थी होता. त्यामुळे बरेचदा तो सरांच्या घरी शंका विचारायला, चर्चा करायला येत असे. सरही त्यांच्या प्रयोगामध्ये नोंदी करायला मदती साठी त्याला बोलावत असत.
त्यामुळे समीरचे येणे देवीप्रसादसाठी नवीन नव्हते. त्याला सर दुपारपासूनच प्रयोग शाळेत आहेत, मी निघतो तुम्ही तिकडे भेटा त्यांना असं सांगून देवीप्रसाद घरी जायला निघाला. जाण्यापूर्वी त्याने समीरसाठी सुद्धा कॉफी बनवली.
समीरला आश्चर्य वाटलं, तब्येत बरी नाही म्हणून सर घाई घाईने घरी आले आणि दुपारपासूनच प्रयोग शाळेत आहेत. म्हणजे नक्कीच काही तरी महत्त्वाच्या विषयावर संशोधन चालू असणार. अशावेळी त्यांना डिस्टर्ब करावं का नाही अशा विचारात समीर दिवाणखान्यात रेंगाळत होता. तितक्यात सर घाई घाईने घरात आले. समीरला घरात बघून एक दोन क्षण चपापले. लगेच स्वतःला सावरून म्हणाले, ‘अरे समीर, ये. ये! तू कधी आलास?’
‘हे काय, आत्ताच येतोय मी. तुमची तब्येत कशी आहे आता? तब्येतीची चौकशी करायला आलो होतो.’
सरांच्या चेहऱ्यावर एक गूढ वलय निर्माण झालं. समीरला सांगावं का नाही ह्या गोंधळात पडले. पण समीर कडून आपल्याला काही धोका किंवा नुकसान तर नक्कीच नाही. झालीच तर मदतच होईल. असा विचार करत सर एक-दोन क्षण थांबले. सर कुठल्या तरी गहन विषयावर काम करत आहेत आणि ते आपल्याला सांगावं की नाही ह्या विचारात ते पडले असावेत हे चाणाक्ष समीरने तत्काळ ओळखले.
‘सर, कसला विचार करताय? मी काही मदत करू शकतो का? आणि माझ्याकडून तुम्ही अगदी निःशंक रहा.’
ह्या त्याच्या वाक्याचे सरांना कौतुकही वाटले आणि न कळत चेहऱ्यावर स्मित उमटले.कशाला इतका विचार करतोय आपण, न बोलताच मनाचे मनाशी संभाषण झाले होते आणि सरांना दिलासा मिळाला होता. न कळत त्यांच्या तर्काला एक पुष्टी मिळाली होती.
‘हं चल प्रयोग शाळेत!’ असं म्हणत आणि ड्रॉवरमधला पेन ड्राईव्ह खिशात टाकून ते समीरसह प्रयोग शाळेत गेले.
गेल्याबरोबर त्यांनी प्रयोग शाळेचे दार खिडक्या बंद केले. पडदे बंद केले म्हणजे चुकूनही कोणी डोकावून पाहिलं तरी आत काय चाललय हे त्याला दिसणार नाही.
सरांच्या ह्या वागण्याचे समीरला नवल वाटत होते आणि त्याचे कुतूहल देखील वाढले होते. सर आता काय सांगतील ह्याची समीर उत्सुकतेने वाट पाहू लागला.
कॉफीचा एक घोट घेत सरांनी घसा खाकरून बोलायला सुरुवात केली, ‘समीर तुझ्या घरातही आमच्यासारखे धार्मिक वातावरण आहे. तुझी बरीचशी स्तोत्रे पाठ आहेत. त्यामुळे मी जे काही आता सांगणार आहे, ते तुला कळू शकेल. कुठे काही शंका आली तर ती नोट करून ठेव. माझं पूर्ण बोलणं झाल्यावर तू तुझ्या शंका विचारू शकतोस.’
समीर कान आणि मन एकाग्र करून सरांचे बोलणे ऐकू लागला. सर एक दोन क्षण घुटमळत कुठून सुरुवात करावी ह्या विचारात होते. मग डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
‘समीर, हे तर तू मनातोस की हे विश्व निर्माण करणारी एक नैसर्गिक शक्ती आहे, जिने हे विश्व निर्माणच केले नाही तर हे विश्व नियंत्रण देखील त्या शक्तीच्या हातात आहे. आपण जर वैज्ञानिक भाषेत हे सांगायचे ठरवले तर हे विश्व एका छोट्या अत्यंत तेजोमय कणापासून बनले आहे. तो सूक्ष्म कण ज्याला आपण वैज्ञानिक भाषेत atom म्हणतो.
गीतेमध्ये श्री कृष्णाने सांगितले आहे, मी अविनाशी पुरुषोत्तम आहे. माझ्यातून विश्व निर्माण झालं आहे, आणि ते माझ्यातच संपते. म्हणजेच तेजाचा, ऊर्जेचा स्रोत माझ्यात अखंड आहे.
हेच तर आइन्स्टाईन सांगतो, ‘Energy in the universe can not be created nor be destroyed, it can be change from one form to another.’
समीरला हे तर्कशुद्ध विवेचन पटत होते आणि त्याचे कुतूहल अजून वाढले. मधेच कॉफीचा एक घोट घेत सरांनी छोटा पॉज घेतला. मग ते पुढे बोलू लागले, आपण बिग बँग थियरीला आधार मानलं तर हे विश्व वाढतयं आणि ते अमर्याद आहे. एक तारा, त्यातून अनेक तारे, त्यातून आकाश गंगा, कृष्ण विवर ही विश्वची उत्पत्ती आहे. ताऱ्याचा स्फोट झाला की त्याच्या भोवती वलय निर्माण होते आणि त्या केंद्रभोवती अनेक ग्रह बांधले जातात. अशा अनेक आकाशगंगा मिळून हे विश्व बनले आहे. आणि ह्याही पुढे जाऊन शास्त्रज्ञ तपासात आहेत की अशी अजून विश्व आहेत का? ज्याला आपण ‘पॅरलल् युनिव्हर्स’ म्हणू शकतो.
आत्तापर्यंत सर जे सांगत होते, समीरला कळत होते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा, अध्यात्माचा आणि सरांच्या संशोधनाचा काय सबंध आहे हे अजून त्याच्या लक्षात येत नव्हते.
मनातली शंका सरांनी लगेच ओळखली. चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणून सर म्हणाले, ‘कॉफी घे. गार होतीय. आणि घरातल्या फोनवरून तुझ्या घरी फोन कर. आई वाट बघत असेल तुझी!’
समीरने घड्याळ बघितलं. रात्रीचे ८ वाजले होते. आई वाट पाहत असेल, हे लक्षात घेऊन, सर आणि समीर दोघेही सरांच्या बंगल्यात आले. समीरने घरी आईला फोन केला आणि आज मी सरांकडे थांबणार आहे त्यां च्या मदतीसाठी. माझी वाट बघू नकोस आणि काळजी करू नकोस असे आईला कळवले. आईलाही सरांबद्दल प्रचंड आदर होता आणि समीरवर विश्वास.त्यामुळे ती ही निर्धास्त झाली. मग सरांनी आणि समीरने थोडी थोडी खिचडी, लोणचं आणि भाजून ठेवलेला उडीद पापड खाऊन घेतले. कॉफीसाठी लागणारे सामान घेऊन ते परत प्रयोग शाळेत आले.
सरांनी आपल्या लाडक्या आरामखुर्चीवर अंग टाकले. ते जरा सैलावून बसले. आता सर १५ मिनिटे पॉवर नॅप घेणार, ही त्यांची नेहमीची सवय समीरला माहीत झाली होती. मग समीरही बाहेर बागेत जाऊन पाय मोकळे करून आला. तोपर्यंत सरांची झोप झाली होती आणि ते फ्रेश झाले होते.
सर पुढे बोलणार, इतक्यात समीरने त्यांना अडवले. ‘सर ! तुम्ही सुरू करण्यापूर्वी मी एक दोन प्रश्न विचारू का?’
सर हसले.त्यांना थोडीशी कल्पना आली होती की समीर काय विचारणार आहे ते. ते म्हणाले, ‘विचार…’
‘सर, मगाशी तुम्ही म्हणालात की विश्व वाढतयं आणि ते अमर्याद आहे आणि एनर्जी इज कॉन्स्टंट. जर का ऊर्जा तेवढीच असेल तर विश्व वाढेल कसं? विश्व वाढण्यासाठी ऊर्जा लागणारं ना? आणि जर का काहीही नाश पावत नाही ह्या विश्वात, तर आपल्याला अन्कमर्फटेबल का वाटत नाही?
आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आपले संभाषण घ्या. It’s a form of sound energy. आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते ह्याच परिसरात लहरींच्या रुपात असणार आहे. ते नाश नाही पावणार. मग त्या लहरी आणि आपण आत्ता बोलत असलेल्या लहरी एकमेकांना क्लॅश कशा होत नाहीत आणि वर्षानुवर्ष ज्या काही ध्वनी लहरी या पृथ्वीतलवार साठल्या आहेत त्यांचं काय होतं त्या कुठे जातात?’
‘ठीक आहे, तुझा दुसरा प्रश्नही विचार, मी माझ्या परीने दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.’
समीर पुढे बोलू लागला, ‘सर तुम्ही हे जे सर्व सांगत आहात त्याचा, अध्यात्माचा आणि तुमच्या संशोधनाचा काय संबंध असेल ही माझ्या मनात आलेली शंका तुम्ही कशी ओळखली?’
‘समीर, ह्या दोन्ही प्रश्नांवर आधारित माझ्या संशोधनाचा विषय आहे. आणि मी जो प्रयोग करत आहे त्यात जर यश मिळालं तर बऱ्याच गूढ अज्ञात गोष्टींची उकल होणार आहे.
आपण मुख्य विषयाकडे वळूयात, आपण रोजच्या जीवनात टेलीपथी, योगायोग हे शब्द सर्रास वापरतो. पण गीतेमध्ये सांगितलेल्या तत्वज्ञान प्रमाणे, अचानक काही घडत नसतं. हे सगळं ठरलेलं असतं. तुमच्या पूर्व कर्माचे भोग असतात ते. खगोल शास्त्रावरून एकदम अध्यात्म?’
समीर फारच अचंबित झाला आणि त्याला कळेना, नक्की काय म्हणायचं आहे सरांना?
त्याच्या चेहऱ्यावर उडालेला गोंधळ पाहून, सर पुढे म्हणाले, ‘मी जे काही सांगतोय, ते नीट ऐक. आत्ता कदाचित तू सांगड घालू शकणार नाहीस, पण पुढे तुला लिंक लागत जाईल आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरे पण मिळत जातील.
सुरवातीपासून सुरू करतो. माणसाला माहीत असलेला इतिहास हा काही हजारो वर्षांपूर्वीचा आहे. आदिमानवाच्या जीवन शैलीचे धागे दोरे १२००० वर्षांपूर्वीचे आहेत. पृथ्वीचा जन्म हा ४.५ अब्ज वर्षांपूर्वीचा आहे. त्या मानाने आदी मानव अगदीच अलीकडच्या काळातला म्हणावा लागेल.
पुढे हळू हळू मानवाची प्रगती होत गेली, त्याने विविध शोध लावले आणि संस्कृती आणि विज्ञान ह्यांची उत्तम सांगड घालत प्रगती केली. तेंव्हापासूनचा मानवाच्या प्रगतीचा इतिहास शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे जो की आपणा सर्वांना माहीत आहे.
आपला हिंदू धर्म हा सगळ्यात जुना धर्म म्हणून ओळखला जातो. त्याची पाळ मूळ ई.स.पूर्व. ४०००-५००० च्या काळात सापडतात. वेद हे हिंदू संस्कृतीचे अविभाज्य घटक.किंबहुना, हिंदू संस्कृतीचा उगम वेदांमध्ये आहे. ज्यांचा काळ कोणता, ते कधी आणि कसे निर्माण झाले हे अजूनही अज्ञात आहे. ब्रह्मदेवाने ज्ञानाच्या मोठ्या डोंगरातून चार मूठ ज्ञान काढून महर्षी वसिष्ठांना दिले, ते म्हणजे वेद अशी आख्यायिका आहे.
आपल्या वेद, पुराण आणि इतर पौराणिक कथा मधून आपल्याला असे जाणवते की, त्या काळात माणसाला विश्व निर्मितीपासून मणासाच्या मृत्यू नंतरचे विश्व ह्या सर्वांचे ज्ञान होते. ऋषी मुनी सूक्ष्म रुपात ये-जा करत होते. जे विश्व आपल्या डोळ्यांना दिसत नाही अशा विश्वात सूक्ष्म रुपात जाऊन तिथले अनुमान घेऊ शकत होते. तू रोज म्हणतोस त्या गायत्री मंत्रामधे देखील प्रुथ्वीपासून अनंत कोटी ब्रह्मांडाचा ऊल्लेख आहे. किंबहूना त्यालाच नमन आहे. गायत्री मंत्र हा ऋग्वेदात सांगितला आहे.
भूत काळ सांगणे, भविष्य सांगणे, वर्षानुवर्षे ताऱ्यांची स्थिती ओळखणे, हे सगळे ज्ञान कसे मिळवले असेल त्या काळी? आत्ताच्या काळात शोध लागलेल्या अनेक गोष्टी त्या काळी लिहून ठेवल्या गेल्या. हे कोडं उलगडण्याचा मी गेली काही वर्ष प्रयत्न करत आहे.
ह्यात दोन शक्यता लक्षात घेता येतील, पृथ्वीचं वय लक्षात घेता, ह्या आधी पृथ्वीवर किंवा तिच्या आसपास अती प्रगत जीव सृष्टी होऊन गेली असावी आणि त्यातलं थोडंसं ज्ञान वेदांच्या रुपात आपल्यापर्यंत पोहचले असावे. पण पृथ्वीचं त्या वेळचं तापमान बघता ही शक्यता गृहीत धरता येत नाही. इतक्या अती प्रचंड तापमानात जीव जगणे मुश्किल वाटते.
‘दुसरी कोणती शक्यता असू शकते सर?’ समीरला ही ह्या गोष्टी पटायला लागल्या होत्या आणि त्याचं कुतूहल वाढलं होतं.
‘दुसरी शक्यता!!! असे म्हणत सरांनी एक दीर्घ श्वास घेतला. उठून थोड पाणी पिऊन दोन फेऱ्या मारल्या. आणि परत आराम खुर्चीत सैलावले.
‘आता तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे ह्यात सापडतील. मिती ज्याला आपण dimension म्हणतो, तुला माहितीच आहे. कुठल्या ही वस्तूचे विशेष पैलू म्हणजे त्याची मिती. आपल्या रोजच्या जीवनात आपण 3 मिती वापरतो. लांबी, रुंदी, उंची… 3D म्हणतात त्याला.
शास्त्रज्ञांनी अजून काही मिती शोधून काढल्या आहेत. चौथी मिती म्हणजे काळ..बिग बँग थियरी ह्या TIME मितीला धरून derive केली आहे. जर का तेजस्वी कण हे झीरो अवर्स्ला धरले तर आज आपण किती तरी बिलीयन/ट्रिलीयन ईयर्स् ट्रॅव्हल केलं आहे. इतक्या लांब हे विश्व पसरलं आहे.किंबहुना त्याहून किती तरी पटीने जास्त.
टाइम ट्रॅव्हल ही सध्याच्या अती प्रगत यानानेही अशक्य गोष्ट आहे. प्रकाश वर्ष हे वेगाचे साधन धरले तरी विश्वाचा अफाट पसारा किती तरी अब्ज प्रकाश वर्ष जास्त आहे. वेदिक काळात ही प्रगत साधने नसतील तर त्यांनी विश्वाचे कोडे उलगडण्याचा कसा प्रयत्न केला असेल?
ह्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी नक्कीच काही तरी वेगळी मोज-माप लावली असावीत. गेले काही वर्ष मी ह्या सर्वांचा सखोलातेने अभ्यास करत होतो. अनेक जुने ग्रंथ, जुन्या काळी लावलेले खगोल शास्त्रीय शोध सर्व माहिती गोळा करून त्याची विशेष टिपणे काढली.
मी विचार केला, सूर्याचा प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसायला ८ मिनिटांचा अवधी जावा लागतो. पण मन मात्र निमिषात कुठेही पोहचू शकते.
ह्या मनाच्या पैलूंचा अभ्यास करून, जर का मन ही एक मिती मानली तर आपण ह्या मनाच्या आधारे विश्वाच्या अफाट पसाऱ्यात कुठूनही कुठेही मुक्त संचार करू शकतो. नारद मुनींनी हेच साधले होते का? मनाच्या मितीवर नियंत्रण मिळवू शकलो तर किती तरी गोष्टींचा सहज उलगडा होईल. मनाच्या मितीचे परिमाण काय असावे?
आता तू विचार कर, एखादी गोष्ट अस्तित्वात आहे पण मला ती दिसत नाहीये, तर आपण त्या नाकारु नाही शकत ना? फक्त त्या बघण्यासाठी ज्या विशिष्ठ साधनांची गरज आहे किंवा फ्रिक्वेंसीची गरज आहे, त्यासाठी आपले अवयव बनवलेले नाहीत. किंवा नैसर्गिक आपत्तीची चाहूल पशू पक्षांना आधी लागते, इथपासून ते, मृत्यू आसपास रेंगाळत असला की कुत्रे एका विशिष्ट पद्धतीने रडतात, अतृप्त आत्मा भोवताली घुटमळत असेल तर कावळा पिंडाला शिवत नाही का तर कावळा आत्म्याला सेंन्स करतो. आपल्या पूर्वजांची ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे. सामान्य माणूस हे सगळं सेंन्स नाही करू शकत. मग हा अभ्यास त्यांनी कसा केला?
आता मात्र समीर खरोखर पूर्ण भारावला होता. पुढे झुकत सर त्याला म्हणाले, ‘कळतंय ना मी काय म्हणतोय ते? थोडी विश्रांती घेऊ चल.मी मस्त कॉफी करतो आपल्याला’ अस म्हणत सर खुर्चीवरून उठले.
‘मी करतो कॉफी सर, तुम्ही बाहेर पाय मोकळे करून या.’ असं म्हणत समीरने प्रयोगशाळेतील इंडक्शन शेगडी चालू केली.त्यावर चकचकीत सपाट बुडाचे पातेले ठेऊन, कॉफी तयार करत ठेवली. हात यांत्रासरखे काम करत होते पण मन वेगळ्याच विचारात गढले होते.
कॉफीचा सुगंध दरवळला आणि सर आत आले. प्रयोगशाळेत असणाऱ्या गोल टेबलभोवती कॉफीचा एकेक घोट घेत ते शांतपणे बसले होते. बराच वेळ कोणी काहीच बोलत नव्हते. आत्तापर्यंत झालेल्या संभाषणाची सांगड घालत पुढे कसे जाता येईल ह्याच विचारात गढले होते.
थोड्या वेळात समीरची तंद्री भंग करत सरांनी खाकरुन पुढे बोलायला सुरुवात केली. आपल्याला माहीत असलेली audible frequency range – 20hz te 20k hz. तसच डोळ्यांच… आपण एक ठराविक स्पेक्ट्रम मधला प्रकाश बघू शकतो. आपलं जडत्व / वजन हा अजून एक पैलू. जडत्व हे गुरुत्वाकर्षण शक्तीवर अवलंबून असते. त्याचा परिणाम आपण नल्लीफाय (nullify) करु शकलो तर आपलं शरीर खूप हलके होऊन तरंगायला लागेल. ह्या तीन पैलूंवर मी काम केलं.
ऋषी मुनींनी तप करून ह्या पैलूंवर नियंत्रण मिळवले. मी ही त्याचा थोडा फार प्रयत्न केला आहे. आपण ह्याच्या पलीकडे ऐकू शकलो, बघू शकलो तर आपण सहज आपली मिती ओलांडून दुसऱ्या मितीत जाऊ शकतो.
आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ‘मला तुझ्या मनातली शंका कशी कळली? मी मगाशीच सांगितल्या प्रमाणे मी आपल्या दोघांच्या मनाच्या पैलूंचा अभ्यास करत होतो. एका क्षणी आपल्या मनातून निघणाऱ्या लहरी समान झाल्या आणि त्या माझ्या मनाने पकडल्या. हेच थोड्या फार फरकाने टेलीपथी, योगायोग ह्या बाबतीत घडतं असावे पण आपला तेवढा अभ्यास नसतो म्हणून कळत नाही.
आपण आधी बोललो तसे एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते तशीच ती एका मितीमधून दुसऱ्या मितीमध्येही जाऊ शकते. आणि त्या ऊर्जेची जाणीव आपल्याला कधी कधी होते आणि आपण त्याला काही तरी अदृश्य/असंभव नावे देतो.
ऊर्जा ही कधी विनाशी असते तर कधी कल्याणकारी असते. त्यालाच अघोरी आत्मा आणि पवित्र आत्मा असे म्हणत असावेत.
इथे आपण शक्तीला आत्मा म्हणू. त्याचं नियोजित कार्य पूर्ण झालं की त्याला मोक्ष मिळतो नाही तर तो पुनः जन्म घेत राहतो. म्हणजेच जी मुक्त झालेली शक्ती आहे ती त्याच्यातील घटकानुसार कार्य करत करते. जेंव्हा ती एक विशिष्ट पातळीवर पोहचते तेंव्हा ती तिच्या मूळ रुपात जाते. तेंव्हा तिच्यातून एक नवीन विश्व तयार होते. अशी अनेक विश्व तयार होतात. हेच तर आपल्या गीतेमध्ये आहे. ‘श्रीकृष्णाचे विराट रूप.. अनेक विश्व सामावलेल.’ मला असं वाटतंय की, आपण थांबुयात इथे. तुला कदाचित हे सगळं त्रासदायक होईल. असं सरांनी म्हणताच समीर भानावर आला. घाई घाईत म्हणाला, नाही, नाही सर! हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे.मला ह्यात तुम्हाला मदत करायला आवडेल.
‘ ऐक तर मग, मी मनाच्या ह्या पैलूंचा वापर करून दुसऱ्या मीतीत जाण्याचा प्रयोग करणार आहे.’
‘सर, पण ते खूप रिस्की होऊ शकतं. ‘इति समीर..
म्हणूनच मी तुला माझ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घ्यायचं ठरवलं आहे. जर का मी विशिष्ट वेळेत परत नाही येऊ शकलो तर तू मी तयार केलेला रिसेट प्रोग्राम रन करून मला परत आणायचं.’
‘पण सर आपण हे कसं साध्य करणार? त्यासाठी मी एक कॉम्प्युटर कोड तयार केला आहे. त्या कोडप्रमाणे मानवाच्या आवाक्याबाहेरची फ्रिक्वेंसी ह्या ट्रान्समिटरमधून ऊत्सर्जित होईल.
हा आहे तो ट्रान्समिटर आहे. त्यांनी एका तबकडीवजा साधना कडे बोट केले. हे मी माझ्या शरीराच्या कुठल्याही भागाला बांधले की ह्याच्या लहरी माझ्या मनाच्या लहरींना कॅच करुन ट्रान्समिट करतील. आणि त्या लहरींचे दोन भागात विभाजन होईल. एक स्पेक्ट्रम ऑडियो फ्रिक्वेंसीचा आणि एक स्पेक्ट्रम व्हिजूअल फ्रिक्वेंसीचा. ह्यांच्या सामाईक बिंदूवर जी मिती असेल त्या मितिशी माझे मन कनेक्ट होईल आणि मी त्या मितीमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा साक्षीदार ठरेन.कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मुळे काही क्षणात अब्जावधी कॉम्बिनेशन्स् होतील आणि त्यात कुठल्याही मितिमध्ये आपण जाऊ शकू.’ ह्यासाठी अजून काही साधने लागतील. मी सध्या त्यावर काम करत आहे. आता पहाटेचे ५ वाजले आहेत. तू आता घरी जा. पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटूयात. ह्याची कुठेही वाच्यता होणार नाही, ही खबरदारी घे. तुला ही ह्यात काही नवीन सुचत असेल तर ते आपण शुक्रवारी बघूयात.’
समीर प्राध्यापकांच्या घरातून बाहेर पडला, ते एका ध्येयाने झपाटूनच!!
क्रमश:
— यशश्री पाटील.
Leave a Reply