शीर्षक: क्षितिजापलीडले
प्रकरण तिसरे
एका अद्भुत प्रयोगाबद्दल चर्चा करून समीरच्या विचार चक्राला चालना मिळाली. घरी आल्यावर समीर नेहमीच्या दिनचर्येमध्ये व्यस्त झाला.अभ्यास, लेक्चर्स,सबमिशनस! आठवडा कधी संपत आला कळला देखील नाही. तरीही मनात सतत प्रयोगाबद्दलचे विचार घोळत होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता समीर सरांच्या घरी दाखल झाला.
सरांनीही समीरचे हसून स्वागत केले. आज सरांचा चेहरा जरा प्रसन्न वाटत होता. त्यावरून समीरने ताडले की प्रयोगाची तयारी झालेली आहे. देवीप्रसादला आधीच सांगून सरांनी काही सँडविचेस आणि थर्मासभर फिल्टर कॉफी बरोबर घेतली. म्हणजे आता पुढचे दहा-बारा तास कोणताही व्यत्यय येणार नाही अशी खबरदारी घेत दोघेही प्रयोगशाळेकडे गेले.
“समीर तुला आता अंदाज आला आहे की, आपण काय प्रयोग करणार आहोत. तुझ्या दृष्टीने हा प्रयोग करण्यासाठी काय मोड्यूल्स लागू शकतात याबद्दल काही विचार केला आहेस का?” प्रोफेसर वसिष्ठांनी विचारले.
“हो सर! मी एक आराखडा तयार केला आहे. आणि तो ह्या पेपरवर उतरवला आहे. “ असे म्हणत समीरने बॅगेतला मोठा पेपर काढून टेबलवर पसरला. त्यात त्याने खूप लहान-सहान गोष्टीही नमूद केल्या होत्या.
“ट्रान्समिटर बरोबर एक रिसिव्हर आणि एक डिकोडर लागेल.फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेटर पण लागेल.आपले डोळे आणि कान खूप हाय किंवा खूप लो फ्रिक्वेन्सीसाठी तयार नसल्यामुळे डिकोडरची आवश्यकता असेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे.” इतक्या तयारीने आलेला समीर ऊत्साहात बोलू लागला. त्याच्या तयारीचं आणि ऊत्साहाचं सरांना खूप कौतुक वाटले.
“अगदी बरोबर! मला माहिती होते की तू तुझा आराखडा तयार करून आणशील आणि तो बऱ्याच प्रमाणात अचूक बनवला आहेस. पण एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे.” प्रोफेसर वसिष्ठ म्हणाले.
“कुठली गोष्ट सर?” इति समीर!
“आठव! मी तुला मनाच्या मितीचे तीन पैलू सांगितले होते आणि या आराखड्यामध्ये जडत्व या पैलूबद्दल काहीही उल्लेख नाही. अर्थात आपण आत्ता ह्या विषयावर काम नको करायला. त्या विषयावर माझा अभ्यास अजून पूर्ण झाला नाही.आत्ता त्याचा प्रयोग करणे धोक्याचे ठरु शकते. आधी आपण सूक्ष्म देहाचा प्रयोग करुयात.
“पण सर! गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध शक्ती निर्माण करण्यासाठी तर मोठाली मशिनरी लागेल. ते आपण कसे करणार?”
“त्यासाठी मी एक विचार केला आहे. आपण आपल्या देहामध्ये खूप तीव्र कंपनी निर्माण करून कंपने निर्माण करुन ‘अपथ्रस्ट लिफ्टिंग (गुरुत्वाकर्षण विरोधी शक्ती) च्या सहाय्याने देहासकट जाऊ शकतो. पुर्वीच्या काळी ऋषि-मुनिंनी गायत्री मंत्र किंवा अशाच खूप शक्तिशाली मंत्राचा ऊपयोग करुन ही कंपने निर्माण केली असावीत. पण आत्ता आपण फक्त मनाच्या मितिच्या दोनच पैलूंचा विचार करूयात. सखोल अभ्यास केल्याशिवाय हा प्रयोग धोक्याचा ठरु शकतो.
आत्ता आपण तुझ्या मोबाईलमध्ये ही मी आणलेली मेमरी चीप घालूयात. ह्या सगळ्या मॉड्यूल्सची एक ऍप्लिकेशन फाईल बनवूयात. आणि ती तुझ्या मोबाईलमध्ये रन करुयात.
तुझा मोबाईल हा रिसिव्हरचं काम करेल आणि ही गोल तबकडी ट्रान्सिमीटरचं, जी मी माझ्या हातात बांधीन. आपल्या लहरी जेंव्हा एका सामायिक पातळीवर येतील, तेंव्हा दोन्ही लहरी लॉक होतील आणि तुझ्या मनातले विचार मला डिकोडरच्या सहाय्याने कळतील. इथे असलेल्या ह्या मॉनिटरवर आपल्या लहरींचे आलेख उमटत रहातील. जोपर्यंत त्या एकमेकांशी बांधलेल्या अवस्थेत असतील, तोपर्यंत लहरींमध्ये सुसंगता असेल. आणि ह्या खालच्या बाजूला ज्या अनियमित लहरी उमटतील ते तुझ्या मनातले विचार असतील, जे मी डिकोडरने ओळखू शकेन. तर तू आत्ता सगळी साधने आपल्याला हव्या असलेल्या फ्रिक्वेन्सीला तयार कर.”
“ठीक आहे सर!” असे म्हणून समीर कामाला लागला. मुळातच हुशार आणि नाविन्याची आवड असलेल्या समीरने भराभर हवे असलेले कोडिंग करून सगळी छोटी मॉड्यूल्स् एका अप्लिकेशन मध्ये लिंक केली आणि स्वत:च्या मोबाइलवर घेतली.
हे सगळं करेपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. बाहेर थोडा रिमझिम पाऊस चालू झाला. छान थंड वातावरण होते.
“आता आपण थोडा वेळ थांबुन काहीतरी खाऊन घेऊयात.” असे प्रोफेसर म्हणाले.
मग त्यांनी आधीच आणून ठेवलेली सँडविचेस आणि गरम गरम कॉफी आस्वाद घेतला. थोडावेळ दोघांनी बाहेरचा पाऊस बघत आत्तापर्यंत केलेल्या प्रयोगाच्या तयारीची उजळणी केली.
थोड्या वेळाने आत येऊन एक ओमकार करून प्रयोगाला सुरुवात केली. नाही म्हटलं तरी समीरच्या मनात थोडी धाक धुक होतीच. दोघांनी आपली ऊपकरणे चालू केली आणि एक विशिष्ट बटण दाबले. इकडे सरांनी आपल्या हातावरचे उपकरण चालू करून सिग्नल पाठवायला सुरुवात केली. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला दोन्ही मनांची फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि समीरचे डोके हळूहळू जड व्हायला लागले. बाहेर पावसाचा जोरही जरा वाढला होता. आता विजांचा कडकडाट सुरु झाला आणि ढगसुद्धा गडगडायला लागले. मॉनिटरवर अनेक अनियमित लहरीचा आलेख उमटायला लागला. हेच समीरच्या मनात येणारे असंख्य विचार!! सरांकडे असलेल्या उपकरणाद्वारे सर ते वाचायचा प्रयत्न करत होते. अनेक विचारांची सरमिसळ स्पष्टपणे त्या स्क्रीनवर दिसत होती.
अचानक एक जोरदार वीज चमकली. त्या विजेच्या लहरीने दोन लहरींची सुसंगती बिघडली आणि तिथे वेड्या-वाकड्या लहरी ऊमटू लागल्या. एक क्षण समीरच्या हातात असलेल्या मोबाईलने विजेच्या लहरीला ही पकडायला सुरुवात केली. त्यामुळे समीरला जरा त्रास जाणवू लागला.
सरांच्या लक्षात आले आणि झटकन त्यांनी दोन्ही उपकरणं बंद केली. दोघांचेही डोके भलतेच जड झाले होते. समीरच्या ह्रदयाची धडधड वाढली होती. समीरने हळूहळू डोळे उघडले. शांतपणे थोडे पाणी प्यायले. आणि आता सर काय म्हणतायत ह्याची वाट बघू लागला.
“आपला प्रयोग थोड्याफार प्रमाणात का होईना यशस्वी झाला आहे. पण आता महत्त्वाचा प्रश्न! नको असलेल्या फ्रिक्वेन्सीला गाळणे. एकदा एक फ्रिक्वेन्सी मिळाली कि बाकीच्या फ्रक्वेन्सी फिल्टर लाऊन गाळल्या गेल्या पाहिजेत. कारण हा गोंधळ झाला तो नको असलेल्या फ्रिक्वेन्सीमुळे. त्याप्रमाणे मी डिझायनिंग आणि कोडिंग बदलतो. तू आता घरी जा. मीही जरा विश्रांती घेतो. पण त्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाचे! ते ऍप मोबाईलवरुन काढून टाक.” असं सरांनी सांगताच समीरनेही मोबाईल मधून ते ऍप काढून टाकले.
त्यानंतर समीर आपल्या दैनंदिन कामात बुडून गेला. आणि सरही त्यांच्या दिनचर्येत व्यस्त झाले.
एकीकडे या विषयावर दोघांचाही अभ्यास चालू होता. आता समीरची दुसऱ्या वर्षाची परीक्षा जवळ येत होती जवळ आली होती, त्यामुळे त्याने पूर्ण लक्ष आता अभ्यासावर केंद्रित केले. समीरची परीक्षा संपली आणि त्यांनी लोणावळ्याचा प्लॅन बनवला. आणि लोण्यावळ्याला समीरला त्या विलक्षण अनुभवाला तोंड द्यावं लागलं.
आता पुढे…
आजचा दिवस!
आज सरांना भेटून गेल्यावर समीरला जाणवले, या प्रयोगाशी संबंधितच आपल्याबरोबर काही तरी घडले असावे. पण आपण तर ते ऍप सरांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधून काढून टाकले होते. मग कसं हे घडेल अशी शंका समीरच्या मनात घोळू लागली. समीर आता पूर्णपणे बरा होऊन कॉलेजला जाऊ लागला होता. थोड्याच दिवसात त्याची तब्येत सुधारून तो परत पूर्वीसारखा झाला. आता त्याला उत्सुकता होती ती, त्याच्या मनातल्या शंकेच्या निरसनाची.
एक दिवस सरांना वेळ आहे, असे बघून तो सरांकडे गेला आणि त्याने आपली शंका सरांना बोलून दाखवली. “सर, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. किती वाजता येऊ शकतो भेटायला?
सर म्हणाले,”मलाही तुझ्याशी बोलायचे आहे. फक्त तू जरा बरा होईपर्यंत मी वाट बघत होतो. आज संध्याकाळी सहा वाजता प्रयोगशाळेमध्ये ये.”
“ठीक आहे.” असे म्हणत समीर संध्याकाळी सहाची वाट बघू लागला. दिवसभराचे कॉलेज संपल्यावर कॅन्टीनमध्ये थोडेफार खाऊन समीर सरांच्या घरी गेला. सरांनी त्याला आपल्या प्रयोगशाळेत नेले.
समीरने बोलायला सुरुवात केली,”सर! मला जो अनुभव आला त्याचा आपल्या प्रयोगाची काहीतरी संबंध आहे.” असे मला राहून राहून वाटते. पण मी तर माझ्या मोबाईल मधून ते अप्लिकेशन डिलीट केले होते. मग काय नक्की काय घडले असावे. तुमचा काय तर्क आहे?”
सर म्हणाले,”मी ही गेले काही दिवस याचाच विचार करत आहे. माझ्या अनुमानाप्रमाणे जरी तू मोबाईलमधून एप्लीकेशन डिलीट केले असले. तरी त्याची नोंद मोबाईलच्या मेमरीमध्ये कुठेतरी राहिली असावी आणि जसे आपण हे प्रयोग करत आहोत, तसं आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक प्रगत आणि अधिक ज्ञान असलेले असलेले जीव त्या परिसराच्या आसपास असावेत. पण ते दुसऱ्या मिती मध्ये असल्यामुळे आपल्याला दिसत नसावेत. तुझ्या मोबाईलमध्ये असलेल्या नोंदीमुळे आणि अनावधानाने तू जी बटणे दाबलीस त्यामुळे त्यांनी तुझ्या मोबाइलच्या लहरी पकडल्या असाव्यात.तू दुसर्या मितीमधे जाण्याच्या ऊंबरठ्यावर होतास.
तुझ्या शरीरात जी कंपनी निर्माण झाली ती त्यामुळेच! तुझ्या हातातून मोबाईल खाली पडून बंद झाला आणि त्यांच्याशी असलेला तुझा संपर्क तुटला. आणि तू आपल्याच मितीमधे राहिलास.
आता मी माझ्या मोबाईलमध्ये हे ऍप लोड करून लोणावळ्याला जाणार आहे.”
“सर! ते खूपच धोक्याचे आहे.” इति समीर.
“असू दे! पण आपण रिसेट प्रोग्रॅम लिहिला आहे आणि तू माझ्या प्रयोगशाळेत बसून माझ्या हालचालींवर आणि माझ्या
मोबाईल मधून निघणाऱ्या लहरींवर लक्ष ठेवायचे आहे. या मॉनिटरवर तुला दिसेल. जर का त्या लहरी खूपच अनियमित झाल्या किंवा त्या लहरी अंधुक झाल्या तर तू हे बटन दाबून रिसेट प्रोग्राम रन करायचा आहे. हे सगळं खूप रिस्की आहे, हे मला माहित आहे. पण जर का आपण यात यशस्वी झालो तर विज्ञान क्षेत्रात ही खूप मोठी झेप ठरेल आणि ही सुवर्ण संधी मी सोडू इच्छित नाही.”
“पण हे आपण कधी करायचे?”
“हे जितक्या लवकर होईल तेवढे बरे, असे मला वाटते.”
“ठीक आहे सर!”
“आपण या शनिवारी भेटूयात!”
बघता बघता शनिवार उजाडला. मुद्दामूनच शनिवारी रात्रीची वेळ निवडली होती, जेणेकरून कोणालाही कुठल्या गोष्टीची खबर लागू नये. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता समीर आणि सर प्रयोगशाळेत भेटले.
सरांनी त्यांच्या खिशातून एक किल्ली काढून समीरला दिली आणि सांगितले, “ही माझ्या कपाटाची किल्ली! ज्यात माझे आत्तापर्यंत केलेले सगळे संशोधन आणि आपला आजचा प्रयोग ह्याबद्दल सविस्तर माहिती लिहून मी सुरक्षित ठेवले आहे. त्यात माझी इतर सगळे डिटेल्स देखील आहेत. जर का मी परत येऊ शकलो नाही, तर माझा उत्तराधिकारी म्हणून तू माझे सगळे प्रकल्प पुढे नेशील ह्याची मला खात्री आहे.”
सरांच्या या सारवासारवीच्या बोलण्याने समीरच्या मनावर प्रचंड ताण आला. त्याने एकदा सरांना सांगितले, “सर! आपण परत विचार करूयात का? मला खूप भीती वाटत आहे.”
“हे बघ समीर! पहिल्यांदा प्रयोग करताना नेहमीच धोका असतो. प्रत्येक वेळेला जर का शास्त्रज्ञांनी हा विचार केला असता, तर आज आपण अवकाशात यान पाठवू शकलो असतो का? माणूस चंद्रावर उतरला असता का? तू निश्चिंत रहा. जर का प्रयोग यशस्वी झाला, तर विज्ञान क्षेत्रात एक मोठी झेप ठरेल आणि मी नाही परत येऊ शकलो तर माझे कार्य तू पुढे चालू ठेवशील अशी मला खात्री आहे.”
“ठीक आहे!” असे म्हणत पुन्हा एकदा दोघांनी प्रार्थना केली आणि प्रयोगाला सुरुवात केली.
सर समीरचा निरोप घेऊन लोणावळ्याकडे रवाना झाले. ज्या बंगल्यात समीर आणि त्याचे दोस्त उतरले होते तिथेच त्यांनी आपली गाडी लावली आणि आपला मोबाईल घेऊन समीरने सांगितलेल्या ठिकाणाच्या दिशेने चालत निघाले.जर का सरांच्या अनुमानप्रमाणे अतिप्रगत जीव तेथे असतील, तर दुसर्या मितीत जाण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी होणार होता.
सर हळूहळू चालत जंगलाच्या दिशेने निघाले. त्यांनी आपले ऍप चालू ठेवले होते. पावसाची बारीक रिपरिपही चालू होती. त्यांनी अंगावर रेनकोट चढवला आणि आपल्या रेनकोटच्या खिशात मोबाइल ठेवला. हळू हळू अंदाज घेत ते पुढे सरकत होते. तिकडे समीर मॉनिटरवर लक्ष ठेवून होता. सध्यातरी सरांच्या फ्रिक्वेन्सी आलेख नियमितपणे चालू असलेला दिसत होता. अचानक एके ठिकाणी सरांच्या फ्रिक्वेन्सी आलेख वर-खाली होताना दिसला. समीर सावध झाला. आणि एका फ्रिक्वेंन्सीवर स्थिरावला. सरांच्या फ्रिक्वेंसीने दुसरी फ्रिक्वेंसी पकडली होती. आता सरांच्या शरीरात अती तीव्र कंपने सुरु झाली. वातावरण बदलत चालले. सर्वत्र मिट्ट काळोख!कंपने अधिक तीव्र. डोके जडावत चालले होते. तेव्हढ्यात एक कानाचे पडदे फाटतील असा तीव्र आवाज आला! थोड्याच वेळात हवेत विरल्यासारखे सर तिथून गायब झाले. तिकडे समीरच्या मॉनिटरवर फ्रिक्वेंसी आलेख नियमीत सुरु झाला. सरांनी दुसऱ्या मितीमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आपल्या मोबाईलवर डीकोडरचे बटन दाबले. आता सरांना समोर सर्व स्पष्ट दिसू लागले. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला होता.
सरांच्या समोर एक वेगळीच दुनिया होती. सरांना समोरून एक अतिशय प्रखर तेजस्वी स्त्रोत येताना दिसला. त्या आक्रुतीमधून “अ…ऊ….म…, अ…ऊ….म…….. ओ..म… ओम…” असे अती ऊच्च स्वर गुंजत होते. हाच तो आवाज मगाशी कानावर आदळला होता. सरांनी डोळे ताणून बघायचा प्रयत्न केला. पण डिकोडरची क्षमता कमी पडली. एका तेजस्वी प्रकाशाचा स्त्रोताखेरीज काही दिसत नव्हते.
तो तेजस्वी स्त्रोत धीर गंभीर आवाजात बोलू लागला.’ या प्रोफेसर वसिष्ठ! ‘ आपले नाव आणि आपली भाषा ऐकून प्रोफेसर थोडे गोंधळले.
“असे गोंधळू नका प्रोफेसर. तुम्ही विसरलात, समीरच्या मोबाईल मधून तुमचे ॲप्लिकेशन काढले होते तरी आम्ही त्याच्या मनाच्या लहरी पकडल्या होत्या. आणि मनाचा मनाशी संवाद ह्याच विषयावर तुमचे संशोधन चालू आहे ना? तेंव्हा तुम्ही ताडलं होतं की आपल्यापेक्षा अती प्रगत कोणी तरी आहे इथे आसपास. मग तरीही शंका का आली तुमच्या मनात?”
सर जरा गडबडले होते.
“पण मला तुम्ही स्पष्ट दिसत नाही आहात? कोण आहात आपण? मी कोण?”
“तुला जे दिसत आहे, मी त्याच रुपात आहे. तुमच्या दुनियेतल्या मिती इथे लागू होत नाहीत.लांबी, रुंदी, ऊंची नसते इथे. असते ते फक्त तेजस्वी ऊर्जेच रुप. मी कोण? मी तुझाच एक अंश किंवा तू माझ्यातला एक अंश. आपण सगळे एकाच प्रखर कणातून निर्माण झाले आहोत. त्याला अणू म्हण.. विशुद्ध अणू म्हण… किंवा विष्णू म्हण… “
“मी सद्धया कुठल्या मितीमधे आहे? प्रुथ्वीपासून किती लांब?” सरांनी अधीरतेने विचारले.
त्याबरोबर तो ऊर्जा स्त्रोत जरा हलल्यासारखा झाला. कदाचित हसला असावा.
“तुझ्या वाचनात किंवा तुला प्रत्यक्ष देखील काही अनुभव आले असतील. देव पाठीशी होता, त्यानेच तारले. तो तारणारा हात मीच आहे. अनेकदा संत/महंतांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे दर्शन दिले असं ऐकले असशील, ते रुप माझेच आहे. तू आत्ता ह्या पॉझिटीव्ह मितीमध्ये आहेस.जिथे अध्यात्माच्या भाषेत सांगायचे तर पुण्यात्मे आहेत. त्यालाच कल्याणकारी शक्ती म्हणतात. तुला मगाशीच सांगितलं तसं ह्या मितीला निश्चित स्थान नाही कारण तुमच्या मिती इथे लागू होत नाहीत. ह्या शक्तीचे घटक तुमच्याच आसपास कुठे तरी असतात. म्हणूनच घरात तुमची वडील-धारी माणसे सांगत असतात की नेहमी चांगलं शुभ बोलावं.अशुभ बोलण्याने आमची तीव्रता कमी होऊ शकते. जितकी निगेटीव्हिटी ऍड होते, तितकी पॉझिटीव्हिटी कमी होते. तुमचं विज्ञान हेच सांगते ना?” अशीच एक वेगळी निगेटिव्ह ऊर्जा असणारी वेगळी मिती आहे. त्याला तुम्ही डार्क एनर्जी किंवा डार्क मॅटर म्हणता. अनेक वेगवेगळ्या मिती आहेत. त्याचा अभ्यास पूर्वी तप साधना, तंत्र/मंत्रच्या सहाय्याने केला गेला आहे. पुढे त्यात विशुद्दता न रहाता त्याचं हिडीस रुप समोर ठेवलं गेलं. स्वार्थापोटी त्याची रुपं बदलत गेली. आणि मग प्रलयाच्या रुपात जगाचा नाश झाला. पुन्हा नवीन सुरुवात झाली. आता नवीन जीव,नवीन ग्रहावर पुरेश्या पोषक वातावरणात सुरुवात झाली. जे द्यान पूर्वी मिळवलं गेलं ते गोष्टीरुपात लोकांसमोर मांडलं गेलं. कदाचित स्वार्थापोटी. प्रुथ्वीचे सुर्यापासूनचे अंतर, ब्रम्हांडाची निर्मिती, अनेक आकाशगंगा ह्या गोष्टींचा ऊल्लेख वेद-पुराणात आहे. हे सगळं कसं मिळवलं असेल? ह्या मनाच्या मितीला जागवूनच!तुझ्या शोधाची दिशा अगदी योग्य होती.”
प्रोफेसर भान हरपून सगळं ऐकत होते. अचानक “दिशा योग्य होती… होती? हा शब्द प्रयोग का केला गेला?” अशी शंका त्यांच्या मनात आली.
परत एकदा तो ऊर्जेचा स्त्रोत जरासा हलला.
“प्रोफेसर, एक चुक झाली तुमच्याकडून!”
“काय झालं?” सरांनी दचकून विचारले.
“तुम्हालाही माहित आहे. ह्या दुनियेत काळ अनादी-अनंत आहे.आणि तुमची फ्रिक्वेन्सीची व्याख्या ही काळाच्या व्यस्त प्रमाणात आहे. काळ अनंत असेल तर तुमच्या सगळ्या लहरी आता शून्य झाल्या आहेत.”
सरांना आता त्या मागचा धोका जाणवला. घाई-घाईत त्यांनी समीरच्या ट्रान्समिटरवर सिग्नल पाठवला. दोन मितींमधल्या लहरींची सुसंगती बिघडली होती. इकडे समीर सतत मॉनिटरवर लक्ष ठेवून होता. अचानक मॉनिटरवर अतिशय वेड्यावाकड्या लहरींचा आलेख उमटायला लागला. त्याने त्यातला धोका ओळखला. आलेख जस-जसा बिघडायला लागला, तसं-तसे वातावरण अचानक बदलले. जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचा प्रचंड कडकडाट सुरु झाला आणि एक अती तीव्र ऊर्जा स्त्रोत वेगाने सर्वत्र फिरला. त्या विजेच्या झटक्याने तिथली एकेक ऊपकरणे बंद पडायला लागली. सर्व ऊपकरणांचे स्फोट व्हायला लागले. हे सर्व इतक्या वेगाने घडले की क्षणभर समीरला काय चाल ले आहे ते कळेना. जेव्हा तो भानावर आला, तेव्हा एक एक उपकरण त्याला जळताना दिसत होते. आणि क्षणार्धात सर्वच प्रयोगशाळेला आग लागली. त्याही स्थितीत त्याने पटकन रिसेट प्रोग्रॅम चे बटन दाबले. रीसेट प्रोग्रॅम सुरू झाला आणि समीर आगीमुळे आणि धुरामुळे प्रयोगशाळेच्या दारातच बेशुद्ध पडला.
दहा दिवसानंतर…..
समीरने डोळे उघडले. तो एका हॉस्पिटलमध्ये होता. आजूबाजूला त्याचे मित्र, आई-बाबा उभे होते. समीरला कळेना, की काय झाले आहे?
“आता कसे वाटते आहे? “
“मी बरा आहे. सर…” असे एकदम त्याच्या तोंडून निघून गेले. पण त्याचे बोलणे अगदीच अस्पष्ट होते. चेहऱ्यावरील भाजल्याच्या खुणा होत्या. समीर घाईने उठू लागला.
“थोडा आराम कर! आता तुझ्या जखमा बऱ्या झाल्या आहेत. संध्याकाळी तुला घरी सोडणार आहेत.” समीरचे बाबा म्हणाले.
संध्याकाळी घरी आल्यावर समीर तडक प्रयोगशाळेकडे गेला. प्रयोगशाळेच्या जागी पूर्णपणे जळून खाक झालेली इमारत त्याला दिसली. सरांचे सर्व संशोधन, त्यांचा नवीन प्रयोगाची माहिती, सर्व काही बेचिराख झाले होते. तो घाईघाईत सरांच्या घरात गेला. तिथे दिवाणखान्यात सरांचा हार घातलेला फोटो बघून तो त्याला प्रचंड धक्का बसला. देवीप्रसादने सांगितले, ”सर कुठे गेले कोणालाच कळले नाही. त्यांची गाडी मात्र लोणावळ्याला सापडली.”
ते ऐकून समीरच्या मनावर खूप मोठा आघात झाला. तो विमनस्क अवस्थेत स्वत:शीच बडबड करु लागला. इतक्यात समीरच्या बाबांबरोबर एक पोलिस इन्स्पेक्टर सरांच्या घरी आला.
“तू सरांच्या प्रयोगशाळेत काय करत होतास? असे सरांच्या गायब होण्यामध्ये तुझा हात असावा असा आम्हाला दाट संशय आहे. तुला चौकशीला सामोरे जावे लागेल.” असे इन्स्पेक्टर म्हणताच, तो जोर-जोरात हसायला लागला.
“हो मीच मारलं सरांना!” असं बरळायला लागला. नाईलाजाने त्याची रवानगी वेड्याच्या इस्पितळात करावी लागली.
तिकडे सरांचा रिसेट प्रोग्रॅम अर्धवटच राहिला. ते दुसऱ्या मितीतून पहिल्या मितीत येत असतानाच सर्व संपर्क तुटला. ते दोन मितीच्या ऊंबरठ्यावर त्रिशंकूसारखे लटकत राहिले… अनादि… अनंतापर्यंत…!!!! आणि तिकडे त्या बंगल्याच्या आसपास वाईट शक्तिंचा वावर आहे ह्या अंधश्रद्देला अजूनच पुष्टी मिळाली.
समाप्त!
धन्यवाद!
— यशश्री पाटील.
||”श्री दत्तार्पणमस्तु”||
‘ईदं न मम’
#BeyondHorizon #ScienceFiction #BeyondHorizon
Leave a Reply