नवीन लेखन...

भंगारातली बांगडी – Part 1

इन्स्पेक्टर शामराव साळुंकेनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे, ठाणे याचा नुकताच चार्ज घेतला होता. पोलीस ठाण्याची, गुन्ह्यांची वगैरे जुजबी माहिती त्यांना मिळाली होतीच परंतु तेवढ्याने साळुकेचं समाधान झालं नव्हतं. सर्वसामान्यपणे ठोकपीट मेथडचा अवलंब करून गुन्ह्याची उकल करण्याकडे त्यांचा कल नव्हता. गुन्ह्याचे सूक्ष्म विश्लेषण करुन, बारीक सारीक धागे जुळवून बुध्दी कौशल्याने त्याची उकल करण्यात त्यांना रस होता. फारच क्वचित, ठोकपीट मेथड ते वापरीत. बहुधा नाहीच. आढावा घेता घेता ते दिनकर मोरेच्या केसकडे वळले. त्या दिनकरची बायको गायब झाली अशी त्याने आठवड्यापूर्वी तक्रार नोंदविली होती. पण आजपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. त्यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना लगेच बोलावून घेतले.

“जाधव, ही दिनकर मोरेची काय केस आहे?”

“साहेब, हा दिनकर इथे जवळच वागळे इंडस्ट्रियल एरियात नोकरी करतो.आठ दिवसांपूर्वी त्याने त्याची बायको ऐश्वर्या गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पाटील साहेबांनी म्हणजे आपले आधीचे साहेब, या बाबत खूप तपास केला पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यांनी केलेल्या तपासाचा सगळा तपशील फाईल मध्ये आहे. त्या दोघांची सतत भांडणं व्हायची. नवीनच लग्न झालं होतं. पण बायको भांडकुदळ होती आणि ज्या दिवशी ती गायब झाली त्या दिवशीही त्यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्या रागाच्या भरात ती घर सोडून गेली असावी असं दिनकर सांगतो.

“जाधव, नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोत नवी नवलाई संपल्यावर अशा कुरबुरी होतात. त्यात नवीन काही नाही. परंतु बाई घरातून गायब होते सगळीकडे तपास करुनही तिचा पत्ता लागत नाही आणि आठ दिवस होऊनही केस मिसिंग म्हणूनच रहाते हे आपल्याला शोभत नाही. हा दिनकर एक सामान्य कामगार दिसतो म्हणून काही आरडाओरडा करीत नाही पण हीच जर एखादी मोठी व्यक्ती असती तर वर्तमानपत्र मिडीयाकडून रान उठवले असते. मला तर हे काही शोभादायक वाटत नाही. बरं, दिनकर किंवा त्याची बायको यांना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, दाखलेबाजी नाही. साधी सामान्य माणसं. मग त्यांचा तपास लागू नये? जाधव त्या दिनकरला बोलावून घ्या बरं.”

“जी सर!”जाधवांनी दिनकरला बोलावून आणलं.” शामरावांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली.

“दिनकरराव आपली बायको गायब झाली त्याला आठ दिवस झाले. पोलिसांना आजपर्यंत तिचा ठाव ठिकाणा लागला नाही म्हणून तुम्ही रागावले असाल?

“छे! छे! साहेब, अहो राग कसला? तुम्ही तर सर्व परीने तपास करतच आहात.”

“तरी पण तुम्हालाही ती सापडावी असं मनापासून वाटत नाही असं दिसतं. काय खरं ना?

“छे! छे! साहेब अहो काय बोलताय? माझी बायको होती ती. ती सापडू नये असं मला कसं वाटणार?”

“होती? म्हणजे आता नाही का?”

“तसं नाही साहेब, आता ती आहे का नाही ते मी कसं सांगू? अजून सापडली नाही म्हणून तसं म्हणालो. साहेब कसंही करा पण तिला शोधा.”

“का? परत पूर्वी सारखं भांडायला?”

“साहेब, नवरा बायकोची भांडणं ती, ती काय टिकतात का? १-२ दिवसात ठीक होतं सगळं, आणि इथे तरी मला तिच्याशिवाय दुसरं कोण आहे? सकाळ संध्याकाळ खायला घालायची. डबा द्यायची, आता मलाच सगळं करावं लागतं!

“दिनकरराव तुमच्या भांडणाची कारणं तरी काय असायची?

‘कसली कारणं साहेब? तिला छान छोकीची आवड होती. नव्या नव्या साड्या, दागिने वगैरे काही काही मागण्या असायच्या. आता मी हा असा साधा कामगार, कुठून आणू एवढे पैसे? तरी पण कंपनीतून कर्ज काढून टी.व्ही, फ्रीज आणला होता. आता नवं फर्निचर हवं म्हणून हटून बसली होती. साहेब, कारखान्यात मशिनच्या आवाजाचा त्रास आणि घरी हिचं भांडणं. आवाजही अगदी नारो शंकराच्या घंटेसारखा. फार त्रासलो होतो मी.”

“असं? मग ज्या दिवशी ती गायब झाली त्या दिवशी काही विशेष भांडण झालं होतं?”

“साहेब, त्या दिवशी आपली वर्ल्ड कप फायनलची मॅच होती. मला क्रिकेटचं फार वेड. ती मॅच पहायची म्हणून मी त्या दिवशी रजा टाकली होती. सकाळी बायकोला चहा दे म्हणालो तर म्हणाली. आज रजा घेतलीत ना तर आज संध्याकाळच्या पिक्चरला जाऊ, एरवी मी शांत रहायचा प्रयत्न करतो पण माझ्या मॅचच्या प्रोग्रॅमचे बारा वाजवायचा तिचा विचार ऐकून मी ही संतापलो आणि त्याच तिरीमिरीत बाहेर पडलो. ती मला म्हणाली होती की, कशी मॅच बघता तेच बघते. बघा तर खरी हा टी.व्ही. नाही फोडला तर ऐश्वर्या नाव सांगणार नाही! आणि म्हटल्याप्रमाणे ती केल्याशिवाय रहाणार नाही याची मला पूर्ण खात्री होती. त्यापेक्षा सरळ घराबाहेर पडू. शेजारी पाजारी कुठे मॅच बघायला मिळाली तर बघू म्हणून मी खूप वेळ बाहेर काढला.

“साधारण दुपारी तीन चार वाजता मी घरी परत आलो. बेल वाजवली पण कोणी दार उघडीना. माझ्याजवळ नेहमी एक दुसरी चावी असतेच. त्या चावीने घर उघडून मी आत आलो. यकोचा पत्ता नाही. गेली असेल शेजारीपाजारी मी लगेच टी.व्ही. लावला आणि मॅच पहात बसलो. जेवण खाणं काही न सुचता मी रात्री उशीरापर्यंत मॅच पाहिली. ऐश्वर्या अजून आली नाही याचं मला भानच नव्हते. मॅच संपली आणि मग माझ्या लक्षात आलं की ती अजूनही आली नव्हती. माझ्या सारखीच डोक्यात राख घालून कुठे तरी जाऊन बसली असेल, येईल सकाळपर्यंत. मी ही फार विचार केला नाही. पण सकाळीही ती आली नाही तेव्हा मी गडबडलो. आसपास शोध घेतला. काही पत्ता लागला नाही. कामावर गेलो संध्याकाळी आलो तरी तिचा पत्ता नाही म्हटल्यावर तिच्या माहेरी फोन केला पण ती तिकडेही गेली नव्हती. मग मात्र मी ताबडतोब इथं तक्रार नोंदवली.”

“ठीक आहे, दिनकरराव ही सगळी हकीगत या फाईलमध्ये नोंदवली आहे. पण ती मला तुमच्या तोंडून ऐकायची होती. चला आता तुमच्या घरची पुन्हा एकदा तपासणी करु. जाधव, तुम्हीही चला.”

दिनकरचे घर एका जुन्या दुमजली इमारतीत खाली तळमजल्यावर होते. वनरुम किचनचे प्रत्येकी चार ब्लॉक्स असे त्या इमारतीत १२ ब्लॉक होते आणि अशा चार इमारती एकाला एक जोडून एक लांबलचक इमारत होती ती. जुनाट, रंग उडालेली, अवस्था काही फार बरी नव्हती. दिनकरच्या मानाने जागाही त्याला शोभेशी होती. घरात सगळा पसारा पडला होता. छोटासा हॉल. कोपऱ्यात एक कपाट, लोखंडी कॉट, स्वयंपाक घर अगदी छोटंसं. भांडीकुंडी कळकट, मळकट असं त्या जागेचं स्वरुप अजागळपणाचा नमुना होतं. शामरावांनी जागेची सूक्ष्म पहाणी केली. काही विशेष स्वरुपाची माहिती, पुरावा, संकेत मिळाला नाही. परंतु लोखंडी कॉटच्या खाली भिंत आणि फरशी यामध्ये एक फट होती. त्या फटीत बॅटरीचा उजेड टाकला तेव्हा काहीतरी चमकल्यासारखे दिसले. जाधवांनी खिशातल्या बॉलपेनच्या टोकाने जरा उकरले तर चार पाच लहान लहान काचेचे तुकडे बाहेर पडले. काचेच्या बांगड्यांचे असावेत असे दिसत होते आणि त्या तुकड्यांवर एक खास डिझाईनही होते. शामरावांनी ते तुकडे दिनकरला दाखवले तेव्हा तो म्हणाला, “साहेब हे ऐश्वर्याच्या हातातल्या बांगडीचेच आहेत. आम्ही नुकताच दबंग म्हणून एक सिनेमा पाहिला होता. त्यातल्या हिरोइनच्या हातात अशाच बांगड्या होत्या. ऐश्वर्याने पण त्या हौसेनं घेतल्या होत्या. फुटून त्या फटीत पडल्या असतील.”

“ठीक आहे, जाधव हे तुकडे जपून ठेवा. मुद्देमाल म्हणून त्याला क्रमांकही द्या”

“जी सर,” जाधवांनी तसे केले. मनात मात्र हा साहेब वेडा का खुळा असा भाव आला. हे अलिकडले साहेब लोक कशातही काहीतरी शोधू पहातात त्यापेक्षा या दिनकरला आत घेऊन थोडा थोबाडला तर पोपटासारखा धडाधड बोलेल. पण या साहेब लोकांना कोण सांगणार? शेरलॉक होम्स समजतात स्वतःला.

“दिनकरराव, तुम्ही जसे वैतागून घराबाहेर पडलात तशी तुमची बायकोपण या रोजच्या कटकटींना वैतागून काशी यात्रेला तर गेली नसेल?”

“ऐश्वर्या? आणि काशीयात्रा? नाव नको, अहो साहेब ती स्वतःला ऐश्वर्यारायच समजायची. जेमतेम चार फूट उंची रंग गोरापान. नाकीडोळी बरी. देवाधर्माचे अजिबात वेड नाही पण सिनेमा, नट, नट्यांची भारी आवड. त्या दृष्टीनेही पोलीसांनी तपास केला पण काही निष्पन्न झाले नाही.”

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..