भगवतगीता या, सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्य केले आहे. गीतेच्या १८ अध्यायात वेदोपनिशदांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो (अध्याय२). कर्मयोग (अध्याय ३), भक्तियोग (अध्याय १२), प्रकृती-पुरुष विवेकयोग (अध्यय १३)वगैरे.
आतापर्यंत गीतेवर भाष्य केलेल्या असामान्य व्यक्ती म्हणजे आद्य शंकराचार्य (ज्ञानमार्ग), ज्ञानेश्वर माउली (भक्तिमार्ग) लोकमान्य टिळक (गीतारहस्य, कर्ममार्ग) या मानल्या पाहिजेत. त्यांनी केलेल्या भाष्यांमुळे, सामान्य माणसाला, गीतेचे खरेखुरे ज्ञान झाले.
गीतेच्या ७ व्या (ज्ञानविज्ञानयोग) आणि ११ व्या (विश्वरूपदर्शन योग ) या अध्यायांनी माझे लक्ष्य वेधून घेतले. तसे गीतेमध्ये पुरेपूर विज्ञान भरलेले आहे. पण ते विज्ञानीय दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.
ऋषीमुनी, महान तत्त्ववेत्ते आणि महान विचारवंत यांनी या विश्वाचे गूढ उकलण्याचा आणि सत्य जाणून घेण्याचा, अध्यात्माच्या मार्गाने, प्रयत्न केला आहे. या मार्गाने जात असतांना, त्यांनी अनेक संकल्पना रूढ केल्या. ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, मोक्ष, सजीवांच्या जन्ममृत्युचे फेरे, पुनर्जन्म वगैरे वगैरे. या सर्व संकल्पना, अनुभूतीतून साकारल्या आणि त्या अमूर्त स्वरूपात आहेत.
ऋषीमुनींना विज्ञानाची जाणीव होती याचे अनेक पुरावे आहेत. पण ते अध्यात्माच्या भाषेत सांगितल्यामुळे सामान्य माणसांना त्याची जाणीव झाली नाही असे मला वाटते.
आता विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. विश्वाचे गूढ उकलणे, सत्य जाणून घेणे, हाच विज्ञानाचाही उद्देश आहे. अमूर्त स्वरूपात, विश्वाचा कोणताही घटक अस्तित्वात असू शकत नाही, अख्खे विश्वच मूर्त स्वरूपात असते हा विज्ञानाचा पाया आहे. त्यामुळे विज्ञानाने काढलेले निष्कर्ष, योग्य परिस्थिती जुळून आल्यास, कोणाही व्यक्तीला, केंव्हाही, कोणत्याही स्थानावरून आणि कितीही वेळा पडताळून पाहता येतात. या विश्वात कोणतीही घटना किंवा कोणताही परिणाम, कारणाशिवाय घडत नाही (कार्यकारणभाव) आणि या कारणामागे कोणत्यातरी प्रकारच्या उर्जेचा सहभाग असतोच असतो. हे कारण किंवा हा उर्जेचा प्रकार समजला नाही तर ती घटना किंवा तो परिणाम, चमत्कार समजला जातो पण ते खरे नाही. विज्ञानाचा दुसरा भक्कम पाया म्हणजे, या विश्वाचे वास्तव नियम कोणतीही व्यक्ती मोडू शकत नाही किंवा त्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. गुरुत्वाकर्षण बल, वीजचुम्बकीय बल आणि दोन प्रकारची अणुगर्भीय बले, या चार भौतिक मुलभूत बलांमुळेच, विश्वाचे सर्व व्यवहार चालतात. विश्वात असलेल्या विज्ञानाच्या मानाने, शास्त्रज्ञांनी मिळविलेले ज्ञान नगण्य आहे, याचेही भान शास्त्रज्ञांना आहे.गीतेत सांगितलेल्या संकल्पनांना, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून काही स्पष्टीकरणे देता येतील असा माझा दृढ विश्वास आहे आणि तसे करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
‘विज्ञानाच्या दृष्टीकोनातून भगवतगीता’ या लेखमालेचा हाच उद्देश आहे.
— गजानन वामनाचार्य
गुरुवार १२ जानेवारी २०१२
Leave a Reply