भगवंता पुसे मनातली खंत
भक्त कोण खरा, नाठाळ सुमंत
अध्यात्म नक्की काय, वैराग्य जिवाचे
की मनातले बोल दळल्या गव्हाचे
काय मर्म तेथे कर जोडता मिळते
मग संसारी कष्ट नक्की काय देते
नियंत्रणे राखावी तोच उपाय खरा
भक्त भक्त म्हणोनि न घ्यावा आसरा!!
अर्थ–
काल एका मित्राशी अध्यात्म म्हणजे नक्की काय? भक्ती म्हणजे नक्की काय? साधू संत, गुहेतले बसले अबोल महंत हेच खरे भक्त का? मग संसारी असणारा व्यक्ती भक्त नाही का? अशा बऱ्याच गोष्टींवर विचार विनिमय झाला.
भक्तिरसात बुडालेला व्यक्ती हा लग्न केलेला आहे की ब्रह्मचर्य घेतलेला आहे हे भगवंत खरंच बघतो का? मला वाटत नाही बघ. तुझी भक्ती कशासाठी आहे, त्यातून तुला काय मिळवायचे आहे, की केवळ मनाच्या समाधानासाठी तू भगवंताचे नाम घेतोयस यावर सारे अवलंबून आहे. दिवसातले काही क्षण जरी तुम्ही देवापुढे हात जोडून उभे राहिलात तरी भक्ती होते आणि सगळं सोडून जरी तुम्ही अखंड नामस्मरणात गुंतलात तरी भक्ती होते. इथे श्रेष्ठ कोण ? हा प्रश्नच उदभवत नाही कारण दोन्ही ठिकाणी भक्ती चे रूप काय आहे हे तो करणारा आणि ज्याची करतोय तो हेच पूर्णपणे जाणून असतात.
श्री समर्थांनी ब्रह्मचर्य स्वीकारले आणि शेवटच्या श्वासापर्यंत पाळले कारण त्यांना भगवंताच्या भेटीसाठी, त्याने दिलेल्या कार्याने झपाटले होते. पण म्हणून आपणही श्री समर्थांसारखे व्हावे का? सगळे सोडून जावे का? एकट्याने रहावे का? काही सुचते रुचते म्हणून शब्दाला शब्द जोडावे का? त्याने काय होईल? त्याने कविता तयार होईल, समाजात चार लोकं वाहवा करतील पण त्याने हेतू साध्य होईल का? श्री समर्थ पुन्हा होणे नाही. आणि आपण होण्या जाऊही नये त्यापेक्षा समर्थांनी सांगितल्या प्रमाणे मनावर ताबा मिळवणे जास्त सोप्पे.
अध्यात्म म्हणजे केवळ ग्रंथ लिहिणे, स्तोत्र पाठ करणे, किंवा अभंग म्हणणे नाही तर या सगळ्यात तुमचे दुःख विसरणे, सुखाला आणि समाधानाला जास्त वाट करून देणे तसेच माणसात देव पहाणे हेही अध्यात्म च आहे.
केवळ ओव्या पाठ होऊन किंवा मोठाली स्तोत्रे पाठ होऊन भगवंत मिळत नाही. कारण एकपाठीस शिवी ऐकू येत नाही? असे कोण म्हणतो.
भक्ती करताना मनात हेतू बाळगून ती करणे भक्तपणाला मारक आहे तर माणसाशी माणुसकीने वागणे हेही अध्यात्मच.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply