तसं पाहिलं तर रभाजीच्या विहिरीला जेमतेमच पाणी होतं. यावर्षी बऱ्याच दिवस पावसानं दडी मारल्यामुळे गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली होती. जून महिना संपत आला तरी काळे ढग तोंड दाखवायला तयार नव्हते. त्यानं अन् रखमीनं सगळं यावर्षीच बी भरान कधीच तयार करून ठेवलं होतं फक्त त्यांना पावसाची वाट होती. रोज दुपारनंतर त्यांची नजर इकडं तिकडं ढगांकडं लागलेली असायची. आपल्या दोन एकर वावरात पाऊस पडल्यानंतर दीड एकरात बाजरी अन् बिघाभर मेथीची भाजी पावसावर करायचा त्यांचा बेत होता.
काल परवापासून जरा इकडं तिकडं गाड -गुड सुरू झाल्यानं रखमीच्या जरा जीवात जीव आला होता. सरला अन् दशरथची शाळा उघडून आठ दिवस झाले होते. सरला नववीला तर दशरथ सातवीला नायगावच्या शाळेत जात होते. दोघेही तसे चांगले हुशार त्यामुळे रभाजी रखमाला त्यांचा अजिबात घोर नव्हता. सकाळी आज ते शाळेला जातानाच रभाजीने त्यांना सांगितलं होतं,“सरले, पावसाची गाडगूड सुरू झालीय तव्हा, शाळातून येताना ईजा जर चमकल्या तर रस्त्याच्या एखाद्या घराचा आसरा घ्या झाडाखाली अजिबात थांबू नका, दशरथला बी सांभाळून घरी घेऊन ये.” पोरांनी शाळेत जाताना दप्तराच्या पिशव्या बगलात अडकवल्या अन् “हा हा ” करत सरळ नायगावला निघून गेले. आजी जनाई बी ते लांब जाईपर्यंत पोरांकडे काळजी करत पाहत होती. तिचा सरला अन् दशरथमधी लई जीव व्हता.
इकडं रखमी वावरत रभाजीच्या औता मागं काश्या गोळा करत होती, “रखमे, मागच्या साली हरळीनं पार वैताग आला व्हता, ह्या पट्टीत घुंगऱ्या केला होता त त्यात जिकडं तिकडं हरळचं माजली व्हती. तव्हा चांगली येचुन घे, नंतर तुझीच खुरपणी वाचलं.” अशी त्यांची दुपारच्या जेवणाला लिंबाच्या झाडाखाली चर्चा सुरू होती, पण आज जरा वातावरण जरा वेगळंच होतं. दुपारनंतर सिन्नरच्या बाजूनं जरा चांगलंच फुटल्यासारखं दिसायला लागलं आणि ते दोघे पण खुश झाले. वारा एकदम शांत झाला होता झाडाचं एक पान सुद्धा ह लागयला तयार नव्हतं. रभाजीचा बाप बाजीबा दररोज आजूबाजूच्या पडकात शेळ्या वळायचा, आज त्यानं बाभळीचा डहाळा केल्यामुळे त्या शांत झाल्या होत्या. बाजीबा सुद्धा फुटलेल्या पावसाकडं भुवईवर हात ठेवून पाहत होता त्यांना लांबूनच रभाजीला आवाज देत, “रभा, अरे उरक लवकर पाऊस सोळा आणे येणार आज. ” बाजीबाची हाक ऐकल्यानंतर रखमा जेवण उरकून लवकरच कामाला लागली अन् रभाजीनं बैल गळा घातले.
बराच वेळाचा लांब पडणारा पाऊस आता यांच्याकडे येऊ लागला होता. पाऊस जास्त मोठ्याने गर्जत होता तशी पावसाची फळी खूपच मोठी होती बराच वेळ लांबूनच त्याची सु सु सु ऐकू येत होती बाजीबाच्या शेळ्या आता इकडून तिकडे नुसत्या उड्या मारत होत्या त्यामुळे त्याने लगेच घरी आणून दावणीला बांधून टाकल्या. संध्याकाळच्या बैलांच्या चाऱ्या पाण्याची सोय म्हणून त्यानं दोन पेंढ्या कडबा कुऱ्हाडीनं तोडून ठेवला. पावसाची गर्जना खूपच मोठ्याने होऊ लागली. त्यामुळे रभाजीने बैल सोडून दिले अन् इकडं दावणीला आणून बांधले. बरेच दिवसाचा पाऊस वाट पाहून येत नव्हता परंतु तो आज त्याच्या मनानेच चांगला आला होता.
आता पावसाच्या बाजूने वारा सुटल्यामुळे त्याच्याबरोबर जोराची थेंब येऊ अन् क्षणातच जोरदार सरी कोसळायला लागल्या. पाऊस इतका जोरात होता की फर्लांग भर अंतराच्या पुढचं अजिबात काहीच दिसत नव्हतं “पोरांची शाळा आता सुटली आसंल! कसं व्हईल आता सरली अन् माह्या दासरथचं?” अशा चिंतेत ती बोलू लागली सकाळीच त्यांनी पोरांना पावसात आजूबाजूच्या घराचा आसरा घ्या असं सांगितलं होतं आता ते काय करतील त्यांची त्यांनाच माहीत सरला थोडी जाणती असल्यामुळे रभाजी तिला समजावत होता काही काळजी करू नको. तेवढ्यात जोरदार काड $का$ काड खूप लांबलचक प्रकाश पडून वीज कडाडली ते दुपारी ज्या वावरात काशा वेचत होते ते वावर त्या विजेच्या कडकडाटात एकदम उन्हा सारखं चमकून गेलं. इकडं सर्वांच्या कानठळ्या बसल्या. पाऊस बराच वेळ धो धो कोसळत होता आणि विजा पण खूपच चमकत होत्या. बराच वेळ असाच पाऊस सुरू होता. एवढ्यावर त्यांच्या पेरण्या व्हायला आता अडचण राहिली नव्हती फक्त आज त्यांना शाळेत गेलेल्या सरली अन दशरथ ची काळजी लागून होती. पाऊस थोडा कमी झाला बाजीबाकडे बघून रभाजी म्हणाला ,“दादा,मी घोंगता घेऊन पोरांना पाहू का पुढं जाऊन?” “आरे थांब जरा इजा चमकत्यात अजून, लई न्याट नको करू.मगाशी पाहिलं ना किती इज कडकाडली! तव्हा थांब जरा.”
घटका भरत पाऊस कमी झाला तेव्हा तो पोरांच्या शाळेच्या वाटेला लांबून पोरं दिसत्यात का ते पाहत होता , नायगावच्या बाजूने आता पूर्ण फटकलं होतं, बाजीबा पण आता बाहेर येऊन इकडं तिकडं पाहू लागला तेवढ्यात त्याचं लक्ष वावरातल्या मोठ्या लिंबाकडे गेलं ज्याच्या खाली दुपारी रभाजी व रखमा जेवायला बसली होती त्याची मधोमध एक फांदी पूर्ण फाटाळली होती. तेवढ्यात बाजीबा रभाजीला “आरे रभा, पाहिलं का?!! लिंबावं ईज पडली मघाशी! लई मोठ्ठा आवाज झाला व्हता तो ” रखमी बी घराकडून बाहेर पडत आली तर खरंच दुपारी जेवलेल्या लिंबाच्या झाडाखाली जी फांदी यांना सावली देत होती ती पूर्ण मोडून खाली पडली होती! विजेचा दणकाच तसा होता! तेवढ्यात इकडून सरला अन् दशरथ घराकडे येताना दिसले अन् रखमीच्या जीवात जीव आला …. जनाईला रातआंधळं होतं तरी ती सांज पडताना त्या लिंबाकडं पाहत होती एवढं दिसत नव्हतं तरी पण यांच्या बोलण्यावरून ती अंदाज लावून पोरांची काळजी करत होती तेवढ्यात सरला अन् दशरथ जनाई च्या अंगाला येऊन बीलगले अन् आज्जी नातवंडांचे मुक्के घेवू लागली…“ पावसा पाण्यात शाळातून येताना काळजी घे गं सरला, तूहीबी अन् दशरथची बी ते पाह्य आपल्या लिंबावर आज ईज पडली किती मोठी!! रखमे चार वाळेल मिरच्या काढ अन् का दिष्ट पोरांची चाल लवकर….” बराच वेळ सगळेजण आज्या नातांचा प्रेम जिव्हाळा पाहत होते…आज पोरं सुखरूप घरी पोहोचली होती पण उद्याचं भाकीत कुणाला माहीत? बाजीबा रभाजीला म्हणत होता “ उद्या सगळी औत संगीन करून ठीव रभा, परवा वाफसा झाल्यावर पेरूण घेवू बाजरी , पोटापाण्याचं बी ईसरून चालणार नही…..आपल्याला दुसरा कोंता आधार हाये…???….” त्यावर रभाजी मान डोलवत “ हा दादा माझ्या बी तेच डोक्यात केव्हाचं खेळू राहिलय….” बराच वेळ त्यांची अशी इकडची तिकडची चर्चा सुरू होती.तेवढ्यात चुल्हीकडून रखमाचा आवाज आला “ चला घ्या खाऊन सैपाक झालाय, तुम्ही जेवा म्हणजी मला भाक्रिंचा अंदाज येईन.”…
अन् ते उद्याच्या विचारात जेवायला बसले….. उद्याचं भाकीत काय आहे हे कोणालाच माहीत नव्हतं…!!
निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी,
फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
9423180393.
( मु. पो. खांबे तालुका संगमनेर जि. अहमदनगर)
Leave a Reply