भक्ती सांगे सक्ती नको
नको निश्चयाचा उतारा
वृत्ती निर्मळ, वाणी प्रेमळ
द्वेषास नसावा थारा
गरज म्हणूनी नसतो कोणी
कोणी नसतो दरिद्री
ज्याच्या त्याच्या दृष्टीदोष तो
नशिबी येतो!
अर्थ–
भक्ती सांगे सक्ती नको, नको निश्चयाचा उतारा, वृत्ती निर्मळ, वाणी प्रेमळ, द्वेषास नसावा थारा
(कोणी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट करू नये, त्यात मनाला कसं वाटतयं याचा विचार झाला पाहिजे. सक्तीने भक्ती करून त्यातून काहीच मिळत नाही. आणि त्याचाच निश्चय केला तर तो टिकवण्यासाठी इतर गोष्टींना आपण फाटा देत नाही ना हेही बघितले पाहिजे. निर्णय जपण्यासाठी किंवा भक्ती करताना तुमची वृत्ती चांगली आणि भाषा मृदू असली तर जगही जिंकता येतं पण तिथे जर दुसर्यास हिणवले जात असेल किंवा मी पणाचा आहेर दिला जात असेल तर तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं कितीही मृदू आणि चांगलं असलं तरी त्यात आपलेपणा रहात नाही आणि उपयोग काही होत नाही.)
गरज म्हणूनी नसतो कोणी, कोणी नसतो दरिद्री, ज्याच्या त्याच्या दृष्टीदोष तो, नशिबी येतो!
(मला कोणाची गरज नाही, मी एकटा अमुक करण्यास किंवा जगण्यास समर्थ आहे. तुम्ही कोणीच मला ओळखू शकलेले नाहीत. माझं मी करू शकतो, राहू शकतो या सर्वांला मी पणाची ठळक किनार असतेच आणि म्हणूनच आपण समोरच्याला कमी लेखतो. स्वभाव तसा आहे त्यात मी पणा नाही असं म्हणणं म्हणजे गरज तशी होती वृत्ती तशी नाही असं म्हणण्यासारखं आहे. कोणी एकटा जगण्यास किंवा रहाण्यास सक्षम नाही म्हणून कोणाचा आधार घेत नाही. प्रत्येकाला दोष हे दिलेले आहेत आणि गम्मत म्हणजे ते वेगवेगळे आहेत त्यामुळे तिथे एकमेकांना बोट दाखवण्याची सोय देवाने करून ठेवलेली आहे. तेव्हा त्यातून चांगलं कसं राहायचं हे प्रत्येकाने ठरवायचे.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply