पांडूरंगा , मी तुझीच रे
“भक्ती”.
आता आमच्या माणसांच्या भाषेत सांगू तर मी वेश्या… नाही समजत?
Call girl . बघ किती छान वाटले ना इंग्रजीत. माझी आई पण वेश्याच होती. पण मरेपर्यंत तुझी वारी करायची. मी म्हणायचे आई का जातेस वारीला?? तर म्हणायची हो मोठी, समजेल सगळं.. तिची एकच इच्छा होती रे , तुझ्या चंद्रभागेच्या तिरी चिरनिद्रा घ्यायची. तितकच मागितलं तिनं तुझ्याकडे.
आणि ते तु पुरवलस सुद्धा.
प्रत्येक वेळी वारिला जाताना एकच सांगून जायची. पोरी एकदा तरी वारी कर हा. आणि मी पण सांगायचे , जर पांडूरंगाने तुझी इच्छा पूर्ण केली तर नक्कीच जाईन.
वारीतच पाच वर्षापूर्वी तिच्या चितेची राख चंद्रभागेत विलिन झाली.
पण तिने त्याआधी मला खुप शिकवलं,
बी. ए. झाले. पण आले परत आईकडेच तिच्याच व्यवसायात, खुप पैसा मिळला, छान चाल्लय , काही तक्रार नाही रे आयुष्याशी.
मग हळूहळू ” लावणीची लावड” अभंगात कधी बदलत गेली कळ्ळच नाही.. शेवटी आले तुला भेटायला , अगदी,
मागणे न काही सांगायासी आलो.।।
असच काहीसे…थोडे चंदन घेतलं, तुझे पाय दुखले असतील म्हणून लावायला, शिणला असशील म्हणून चार वासाची फुलं घेतली तुझ्यासाठी , देवीला गजरा बनवला स्वतःच्या हाताने..
आली तुझ्या दारात, खुप प्रसन्न वाटलं रे , तो प्रेमभक्तिचा सागर बघून .
पहिल्यादाच, खूप हसले मी, स्वतःशीच.
पण तुझ्या रांगेत राहिल्यावर परिक्षा घ्यायला सुरु केलिस माझी.
माझी एक “मैत्रिणी” होती रांगेत माझ्यापुढे काही अंतरावर. एक माणूस कुणीतरी येऊन तिच्याशी काही बोलला आणी ती निघुन .गेली. अर्ध्या तासानं ती नामदेवाच्या पायरीकडून परत जाताना दिसली.. बहुधा संध्याकाळीचं तिच फ्री बुकिंग झालं होतं .तिचं. आणि दर्शनही.
खूप हसले मी, स्वतःशीच.
देवा, इतकं कराव लागत का रे तुझ्या दर्शनाला?
आता तुझे रक्षक का कुणी रांगेची व्यवस्था बघायला फिरत होते, एकजण त्यातला माझ्या वक्षाला घासून गेला…
वेश्या रे मी देवा. मला समजतो पुरूषाचा स्पर्श , तुझ्यापेक्षा अधिक. पण मला राग नाही तर हसू आलं .
याच कल्पनेन कि या भक्ताची इच्छा माझा देव कशी पुरवेल????
खूप हसले मी, स्वतःशीच.
मग एक ड्रेस वाला आला, म्हणतो ५०० द्या दहा मिनीटात दर्शन करून आणतो. मी नको म्हटले. पण मागचे पूढचे चार लोक शोधून त्यांन कोटा केला आपला पुरा..
खूप हसले मी, स्वतःशीच.
सहा तास झाले रांगेत .. हळूहळू तुझ्यामुखदर्शन झालं खुप छान वाटलं. शांत वाटलं. माझ्यापुढे एक आज्जी होती संत्तरीची, आणि पोरगी सोळाची. कमीअधिक आले रे असेच काहीसे अनुभव .
पण शेवटचा अनूभव तुझ्या पायाकडचा खुप कठिण गेला पचवणं त्यांना.
मी खुप खुश होते रे तुझ्या पायाचं दर्शन होणार म्हणून, अगदी जवळ पोचलो तुझ्या मग अचानक काही घडले, मला ईतकच समजलं की कुणीतरी साहेब दर्शनासाठी आलाय. पुढच्या एका सेकंदात आम्हा पाचसात माणसांना पुढे ओढून टाकल गेलं. ती म्हातारी चिरडली खाली. ती पोर रडली रे , तिला ओढतांना .नक्की काय .झालं हे समजून मी पण कळवळले रे.
माझा गजरा पायाखाली तुडवला गेला आणि चंदन , त्याचा सडा झाला. पण एक थेंब त्याचा तुझ्या। भाळावर उडतांना बघितला मी..
खुप धन्य झाले, सार्थक झालं
आणि हे सगळं कोणासाठी माहितीय का तुला??
तो 500 जमा करत होता ना ड्रेस वाला , त्याला दर्शन मिळावं म्हणून…
होते तिथुनच हात जोडले.
देवा , थोडं मागते. इथुनच, माझ्या माय बहिणी येतात तुझ्या दर्शनासाठी. त्या सगळ्याच नसतात रे माझ्यासारख्या. त्यांना सांभाळशील?
सगळेच नाहीत रे असे स्त्रीलंपट , पण हजारात एखादा असतोच, तूझे लाखो भक्त, मग माझ्या मायबहिणींना त्रास होतोच.
मी पांडुरंग समजून सेवा करिन त्यांची ती पण निशुल्क…पण मला नामदेवाच्या पायरीचा दगड बनवशील ?. तुझ्या सेवेत राहिन. पण मंदिरात नाही येणार परत…
पण देवा त्यांना सांभाळशील ना?
बाहेर आले . नुकताच पाऊस सूरु झालेला.
डोळ्यातून. एक थेंब अश्रु त्यात मिसळला.
मला समजलाच नाही की तो सुखाचा होता का दुःखाचा???
दुरवर कुठेतरी अभंग ऐकू येत होता
अवघा रंग एकच झाला…
अन मी तेव्हाच चोखियाची महारी झाले . आणि नामदेवाच्या पायरीशी एकरुप झाले
— डॉ बापू भोगटे
Leave a Reply