भक्ती करावी अंतरंगी
मांडूनी डाव लुटू नये
कर जोडूनी कर चुकवी
शब्दांत भक्ती मांडू नये!!
अर्थ–
मी किती देवाचं करतो, मला किती माहित्ये, मी केवढे श्लोक पाठ केले, माझं ज्ञान किती अगाध आहे हे दाखवण्या पेक्षा ते जर आचरणी आणले तर? चमत्कारच होईल.
मी इतकं करतो देवाचं, अगदी तासन तास माझे देवाच्या पुढे भक्ती करण्यात जातात, श्रावणात मी अमुक पूजा घातली, गणपतीत मी इतकं केलं, लक्ष्मी पूजनाचा मी मुहूर्त एक सेकंद सुद्धा टाळत नाही. पण या सगळ्यातून मिळाले काय? सामाजिक प्रतिष्ठा, प्रचंड likes, देवांच्या आरतीच्या चित्रफितीला काही लाख views बास आपली मान ताठ. पण अमुक मंत्र म्हणताना मला ह्याच्या कडून इतके पैसे येणं आहे. ह्याने माझं काम अडकवून ठेवले आहे त्याला बघतोच आता. ही व्यक्ती जरा जास्तच करत्ये त्याला आता ऐकवतोच हे असे विचार येत असतील तर म्हटल्या गेलेल्या श्लोकाला शाब्दिक अर्थ तर सोडाच पण भावनिक अर्थही प्राप्त होणार नाही. मग कसली भक्ती तुमची?
अमुक ना. मा. साहेबांच्या निधीतून नवचंडी यज्ञ, महासत्यनारायण, नागरिकांच्या भल्यासाठी नगरसेवका तर्फे देवीचा पाठ वगैरे वगैरे. पण हे सगळं करण्यासाठी आलेला पैसा हा येतो कुठून? मांडवली, खंडणी, लोकांचाच पैसा, आलेला निधी कामा साठी न वापरता आपल्याच संस्थेला देणगी म्हणून वापरायचा आणि त्यातूनच हे सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी यज्ञाचे घाट घालायचे. काय उपयोग त्याचा.
कुठल्याही देवा समोर कर जोडताना जर मन दुसरीकडे धावत असेल तर त्याला स्वतः देवही काही करू शकत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply