भक्ती मग ती कोणावरही असो अगदी मनापासून केली की ‘अर्पण’ करण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. अशा अर्पण केलेल्या भक्तीचा महिमा अगाध असतो. या संदर्भात आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईने सांगितलेली गमतीदार गोष्ट पुढीलप्रमाणे आहे… एका गावात एक स्त्री राहात होती. गावात श्रीकृष्णाचे मंदिर होते. त्या मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीवर या स्त्रीची अपार भक्ती होती. तसे पाहिले तर ती स्त्री रोज मंदिरात जायची असेही नाही. कारण तिला घरातील इतकी कामे असायची की, मंदिरात जायला देखील वेळ मिळायचा नाही तरी पण कृष्णावर तिची फारच भक्ती होती आणि एकदा का तिच्या मनात आले की, ती कोणतीही गोष्ट ‘कृष्णार्पण’ म्हणून आपल्या लाडक्या देवाला अर्पण करीत असे. दुपारी जेवताना ती आपल्या ताटातील, चतकोर भाकरी घराबाहेर येऊन ‘कृष्णार्पण’ म्हणून दूर फेकत असे. इकडे त्या कृष्ण मंदिरातील पुजारी जेव्हा देवाला नेवैद्य दाखवीत असे त्यावेळी पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटात ती चतकोर भाकरीही असे. घरातील सर्वांची जेवणे झाल्यानंतर उष्टे आवरताना ती स्त्री त्यावरून शेणाचा गोळा फिरवायची व घराबाहेर येऊन ‘ कृष्णार्पण’ म्हणून उकिरड्यावर फेकून द्यायची. इकडे तो शेणगोळा नेमका कृष्णाच्या मूर्तीवर येऊन पडायचा. सुरुवातीला पुजाऱ्याला हा व तो नेवैद्याचा प्रकार ‘चमत्कार’ वाटायचा. मात्र जेव्हा त्याला त्या स्त्रीच्या भक्तीचा महिमा दिसला तेव्हा त्याचाही नाईलाज झाला. असे बरेच दिवस गेले. ती स्त्री एकदा आजारी पडली. आजार खूपच गंभीर झाला. मरण जवळ आले तेव्हा त्या स्त्रीने आपले मरणही ‘कृष्णार्पण’ केले. त्यासरशी इकडे मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीचे तुकडे झाले व मूर्ती भंगून खाली पडली. ती स्त्री पुण्यवान होती म्हणून तिला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी विमान आले मात्र ते विमानही तिने ‘कृष्णार्पण’ केले. त्यासरशी ते विमान त्या कृष्ण मंदिराला जाऊन धडकले व त्याचेही तुकडे झाले. हा सगळा चमत्कार पुजाऱ्याबरोबर गावकरीही पाहात होते. भक्तीचा महिमा किती अगाध असतो हे त्या स्त्रीने त्या सर्वांना दाखवून दिले होते.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply