नवीन लेखन...

भक्तिसंप्रदाय समन्वय !!

वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल भक्तांचा संप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सर्वसमावेशक व्यासपीठ आहे.

या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जातीपंथाच्या स्त्रीपुरुषांना खुले आहे. त्यात उच्चनीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. ब्राह्मणांपासून हरिजनापर्यंत सर्वांना सारखेच स्थान त्यात आहे. वारकरी संप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला व जातिव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले. भक्ती पंथाच्या साहाय्याने अध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापांचिक दुःखांवर मात करता येईल असा विश्वास लोकांच्यात निर्माण केला.

वारकरी संप्रदायात विठ्ठल भक्तीचा महीमा विशेष असला तरी राम, कृष्ण, दत्त, विष्णू, शिव इत्यादी देवतांच्या भक्तांना त्यांनी आपल्यात सामावून घेतले.

स्वत: ज्ञानेश्वर महाराज गुरु परंपरेने नाथपंथीय होते; तसेच शांकरवेदान्त व काश्मिरी शैवमत यांचेही संस्कार त्यांच्यावर होते. त्यामुळे शैवांची निष्ठा व तपश्चर्या त्यांनी स्वीकारली. वैष्णव संप्रदायातील सात्विकता, दयाशीलता, विश्वबंधुत्व इत्यादी गुण उचलले.

वारकरी संप्रदायात व्रत वैकल्याचे स्तोम नाही, कर्मठपणा नाही. तर त्याग, भोग, स्वधर्माचरण व नैष्कर्म्य यांचा मेळ घालण्याचा उपदेश आहे. अद्वैत, भक्ती, ज्ञान, उपासना, श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर भर दिला आहे.

वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोकाभिमुख होती. रात्रंदिवस लोकांत राहून बहुजन समाजात नवचैतन्य ओतण्याचा सफल प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला. वारकरी पंथाने ज्ञानाचे महत्त्व मान्य करुन भक्तीला अग्रस्थान दिले व त्यासाठी नाम संकीर्तनासारखे साधन लोकांपुढे ठेवले. परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यात जाण्याची व व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची आवश्यकता नाही हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिले. व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नितीमत्तेला पोषक अशी कर्मे करावीत; असे सांगून वारकरी संप्रदायाने प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला आहे. वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल होते. आपापले व्यवसाय ते निर्वेधपणे करत व लोकांत मिसळत होते.

वारकरी संप्रदायाने स्त्री व शूद्रांतील जडत्व नाहीसे करुन त्यांच्या जीवनात कार्य प्रवर्तक निष्ठा उत्पन्न केली. त्यांच्या नीरस जीवनाला अध्यात्मज्ञानाची जोड मिळवून दिली. त्यामुळे आपल्यातील सुप्त शक्तींची व भावनांची जाणीव त्यांना झाली. प्राप्त परिस्थितीला कण़खरपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्या मनात निर्माण झाले. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या  सामाजिक प्रतिष्ठेवर अवलंबून नसून, वैयक्तिक चारित्र्यावर आहे ही गोष्ट वारकरी संप्रदायाने लोकांना पटवून दिली.

वारकरी पंथाने विद्वत्तेचे अवडंबर माजवले नाही. निस्सीम भक्ती हाच या संप्रदायाचा आधार आहे. पण अंधभक्तीला मात्र त्यांनी थारा दिला नाही. किर्तन, अभंग, गौळणी, ओव्या, भारुडे इत्यादी साधनांनी त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविले. आत्मशुद्धी व सदाचार यावर वारकरी पंथाने भर दिला.

महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी प्रथम मराठीत लेखन केले ते वारकरी संप्रदायातील संतांनी. नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे तीन ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाची ‘प्रस्थानत्रयी’ होय. एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर हे सारेच वारकरी संत बहुजन समाजाशी समरस झाले व लोकांना रुचेल, समजेल अशा भाषेत त्यांनी लेखन केले. म्हणून त्यांच्या वाड्मयाला लोकप्रियता लाभली. निरुपणे, किर्तने यातून लोकात आत्मीयता व आत्मविश्वास निर्माण झाला.

संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक ! वारकरी संप्रदायात प्रवेश करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. ज्याला वारकरी व्हायचे आहे. त्याने संप्रदायातील ज्येष्ठाकडे तुळशीमाळ घेऊन जायचे. तेथे गेल्यावर ती तुळशीमाळ ज्ञानदेवी, एकनाथी भागवत किंवा तुकाराम गाथा यापैकी कोणत्याही एका ग्रंथावर ठेवली जाते. आणि मग तीच माळ त्या वारकरी होण्याची इच्छा धरणार्‍याच्या गळ्यात घातली जाते. म्हणून त्यांना ‘माळकरी”असेही म्हणतात. वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का, तिसरे साधन म्हणजे गोपीचंदन, चौथे साधन म्हणजे पताका!

वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत श्रीविठ्ठल. हे श्री कृष्णाचे रुप आहे. ‘रामकृष्ण हरी” हा वारकर्‍यांचा महामंत्र, तर “पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्रीगुरु ज्ञानदेव तुकाराम” हे वारकरी संप्रदायाचे घोषवाक्य आहे.

खुला व प्रवाही असल्यामुळेच वारकरी संप्रदाय साडेसातशेहून अधिक वर्षं टिकून आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो विठ्ठलभक्त पंढरपूरला जातात. पंढरपूरच्या पांडुरंगाचे माहात्म्य कमीत कमी हजार ते बाराशे वर्षांपूर्वीपासून आहे. खुद्द आदी शंकराचार्यांनी भीमातीरीच्या पांडुरंगाचे वर्णन केलेले आहे. वारीची परंपरा कमीत कमी हजार वर्षांची असावी. महाराष्ट्रात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली, परकीयांची सरकारे आली आणि हिंदू धर्माला इस्लामचे आव्हान मिळाले, पण तरीही वारीची परंपरा अखंड चालू राहिली.

पंढरपूरच्या विठ्ठलाप्रती असणारी ही सख्य भक्ती नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा आणि निळोबा यांच्या लेखणीतून महाराष्ट्राच्या भक्तिसंप्रदायाला समृद्ध करीत आलेली आहे.

वारकरी संप्रदायास न्या.रानडे यांनी भागवत धर्म असे संबोधले आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी या परंपरेचा परामर्श विस्ताराने घेतला आहे.

वारकरी संप्रदाय हा सुसंघटित असा संप्रदाय नव्हता. तशा प्रकारचे संघटन समर्थ संप्रदायाचे होते. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील अठरा पगड जातींमध्ये लोकप्रिय असणारा संप्रदाय आहे.

पंढरपूरची वारी ही ज्याप्रमाणे व्यक्तीने किंवा कुटुंबातील व्यक्तींनी करायची असते, त्याच प्रमाणे ही समूहाने करावयाची असते. वारीतील लोक पायी पंढरपूरला जातात. निसर्गाच्या सर्व संकटांना प्रसन्न वदने सामोरे जात पायी दिंड्या काढणारे वारकरी हे एक न उलगडणारे नवल असून गेली कित्येक वर्षे जनांचा हा उत्स्फूर्त प्रवाह मार्गक्रमण करीत असतो. ह्यामध्ये स्त्री-पुरुषांचा समावेश असतो. या काळात शेकडो पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करीत असतात. या वाऱ्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत  काटेकोरपणे केलेले असते.  वारीवर जगभर बरेच संशोधन झालेले आहे.

वारकरी संप्रदायात अनेक गुरू व त्यांच्या परंपरा आहेत. यातील अनेक गुरू मठांचे प्रमुख, कीर्तनकार, प्रवचनकार आणि साधुवृत्तीचे होते. ह्या महाराजांचे अनेक मठ पंढरपुरात असून वारीच्या काळात हजारो वारकरी या मठात राहातात. वारीच्या काळात मठाधिपतींची प्रवचने आणि कीर्तने होतात. भक्ती आणि ज्ञान यांच्यामध्ये समन्वय साधत हे प्रवचनकार अद्वैत वेदांताचा पुरस्कार करतात. वारकरी कीर्तन बहारदार असते आणि गोपालकाल्याचा उत्सव रंगतदार असतो. मात्र“सर्वांभूती समत्व पाहा” असे सांगणारा हा संप्रदाय एकेकाळी विठ्ठल मंदिरात अस्पृश्याना प्रवेश देत नव्हता, त्यासाठी साने गुरुजींना उपोषण करावे लागले.

प्रा. दि. के. बेडेकर यांनी धर्माचे एकेश्वरी धर्म आणि यातूप्रधान धर्म असे दोन प्रकार सांगितले आहेत. वारकऱ्यांचे तत्त्वज्ञान एकेश्वरवादाला जवळचे अद्वैत वेदांताचे तत्त्वज्ञान आहे. पण सर्वसाधारण वारकऱ्यांच्या मनावर या यातूप्रधान धर्माचा वा सकाम भक्तीचा प्रभाव आहे.

इतिहासाचार्य राजवाडे मानतात की संतांनी वारीच्या आणि त्यांच्या साहित्याच्या द्वारे मराठी संस्कृतीचे रक्षण केले आहे. न्या. रानडे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्यक्रांतीला वारकरी संप्रदायाच्या चळवळीची पार्श्वभूमी होती असे मानतात.

वारकरी संप्रदाय राजकारणापासून दूर राहिल्यामुळे त्याचे प्रवाहीपण कायम राहिले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वारकरी संप्रदायातील काही महाराज जास्त आक्रमक भूमिका स्वीकारताना दिसत आहेत. वारकरी संप्रदायावर हिंदुत्वाचा प्रभावही वाढत चालला आहे. उदारता, सहिष्णुता, चित्तशुद्धी आणि सर्वांप्रति बंधुभाव या सात्त्विक गुणांऐवजी आक्रमक विचारांचा प्रभाव काही लोकांवर पडलेला दिसतो.

वारी आणि वारकरी यांच्यामध्ये जागतिकीकरणाच्या काळात मोठे बदल होत आहेत. नव्या पिढीही उत्साहाने वारीस जात आहेत. वारकरी संप्रदायातील काही गटांनी पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्रकल्पाविरुद्ध चळवळीही केल्या आहेत. त्यामुळे ग्रामविकास, पर्यावरण संरक्षण, जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, स्त्री-पुरुष समता याही क्षेत्रात वारकरी संप्रदाय नवे विचार आत्मसात करू लागला आहे.

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा/ विठ्ठल/ पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे,तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे.

हा संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार- वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे.

वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख अध्वर्यू सोनोपंत दांडेकर ह्यांनी “वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंथ असून वैदिक धर्माच्या तत्त्वांशी अतिशय जुळते घेणारा, असा पंथ असल्याचे” म्हटले आहे. “वारकरी पंथ म्हणजे सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा”,असेही त्यांनी म्हटले आहे.

पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे, अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच. द्वारका, काशी ही क्षेत्रेही वारकरी पवित्र मानतात. तसेच चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी, गोदावरी, कऱ्हा, तापी या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानले आहे. शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा, कृष्णा आदी नद्यांनाही ते पवित्र मानतातच.

संत नामदेवांच्या काळात आळंदीवारी सुरू झाली. सासवड, त्र्यंबकेश्वर, एदलाबाद, पैठण, देहू, पिंपळनेर,आळबेल्हे इ. ठिकाणीही वारकऱ्यांची यात्रा भरते. त्या त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठिकाणे पवित्र मानली गेली आहेत. तथापि विठ्ठलाच्या सर्व वाऱ्या शुद्ध पक्षातल्या असून भक्तांशी संबंधित असलेल्या स्थानी होणाऱ्या वाऱ्या वद्य पक्षातल्या आहेत.

हा संप्रदाय नेमका केव्हा उगम पावला, हे सांगता येत नाही. संत बहिणाबाईनी ‘संतकृपा जाली । इमारत फळा आली’ ह्या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे,

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया 
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार 
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत 
तुका जालासे कळस । भजन करा सावकाश 

‘ज्ञानदेवे रचिला पाया’ ह्या ओळीचा अर्थ पाहिला, तर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. ज्ञानदेव-नामदेवांनी बहुजनसमाजाच्या आध्यात्मिक आकांक्षांना जागे केले. त्या समाजातील माणसांना आत्माविष्काराची वाट मोकळी करून दिली. विठ्ठलभक्तिने भारलेले विविध जातींचे लोक विठ्ठलभक्तिने भारावलेल्या रचना करू लागले. गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा, सेना न्हावी इ. संतांची एक मालिकाच उभी राहिली. त्यांनी अभंगरचनेसाठी आपापल्या व्यवसायातली परिभाषा वापरली वा आपल्या व्यवसायांचे संदर्भ दिले.

वारकरी संतांनी चातुर्वर्ण्याच्या आणि जातिव्यवस्थेच्या चौकटीविरुद्ध बंड उभारले नाही. तथापी आध्यात्मिक समता निश्चितपणे प्रस्थापित केली . देवाला सर्व भक्त सारखे, हीच शिकवण दिली. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। ‘ ह्या तुकोबांच्या उक्तीमध्ये ही अभेदभावाची भूमिकाच स्पष्ट झालेली आहे. चोखोबांच्या समाधी पुढे संत एकनाथ नतमस्तक झाले, तसेच अन्य वारकरीही होतात.

ज्ञानदेव-नामदेवांनंतर मात्र जवळपास अडीचशे वर्षाच्या काळात  सतत चाललेल्या लढायांमुळे शांतता आणि स्वास्थ्य हरपले. ह्याचा परिणाम वारकरी संप्रदायावरही झाला. ज्ञानदेव-नामदेवांनी  सुरु केलेले कार्य पुढे नेईल, असे विभूती तत्व नंतरच्या काळात झाले नाही, त्याचप्रमाणे नाव घेण्यासारखा थोर ग्रंथही रचिला गेला नाही, तथापि विजयनगरचे साम्राज्य लयाला गेल्यानंतर आणि बहमनी राज्याचे विघटन होऊन पाच वेगवेगळ्या शाह्या निर्माण झाल्यानंतर परिस्थितीत बदल घडून आला. ह्या शाह्यांतील वैमनस्यामुळे मराठे जहागिरदार आणि मुत्सद्दी ह्यांचे सहकार्य मिळविण्याची गरज त्यांना वाटू लागली. त्यामुळे मराठ्यांच्या पराक्रमास वाव मिळाला. त्यांचा आत्मविश्वास वाढला. वातावरणात झालेल्या ह्या परिवर्तनामुळे धर्माच्या क्षेत्रातही उत्साहाचे वारे वाहू लागले. एकनाथांच्या कार्याला ह्या परिस्थितीची पार्श्वभूमी होती.

श्रीज्ञानदेवांची गुरूपरंपरा जशी नाथपंथाची, तशीच एकनाथांची दत्तसंप्रदायाची होती. त्यांचे गुरू जनार्दनस्वामी हे दत्तोपासक होते, परंतु विठ्ठलभक्त्तीची कौटुंबिक परंपराही त्यांच्या पाठीशी होती.

विठ्ठलभक्तीची पार्श्वभूमी पाठीशी  असल्यामुळे, एकनाथांच्या हातून वारकरी संप्रदायाच्या संदर्भातही भरीव कामगिरी घडून आली. गीतेचा अर्थ मराठीत सांगून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी ज्ञानेश्वरांनी केली. त्याचप्रमाणे नाथांनी भागवतपुराण मराठीत आणले. ह्या उपक्रमाला पैठणच्या तसेच काशीच्या सनातनी विद्वानांचा साहाजिक असलेला विरोध सहन करून नाथांनी एकनाथी भागवत काशीतच पुर्ण केले. एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीचा जीर्णोद्वार केला, तसेच ज्ञानेश्वर-नामदेवांच्या काळानंतर अनेक अशुद्धे शिरलेली  ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली.

लोकाभिमुखता हे वारकरी संप्रदायाचे एक फार मोठे वैशिष्टय होय. एकनाथांच्या जीवनातूनही ह्याचा प्रत्यय येतो. परमार्थ विचाराच्या व्यापक प्रसारासाठी देशी भाषेतून ग्रंथरचना करणे, हा ज्ञानेश्वरांप्रमाणेच एकनाथांच्याही लोकाभिमुखतेचाच आविष्कार होता. तथापि एकनाथ हे केवळ एकनाथी भागवत रचून थांबले नाहीत, तर परमार्थ विचार जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी त्यांनी भारूडासारख्या लोककाव्याचेही पुनरूज्जीवन केले. त्यातून लोकशिक्षण आणि मनोरंजन ह्यांची उत्तम सांगड घातली. विनोदाचाही वापर केला. कोल्हाटी, डोंबारी, भुत्या, वाघ्या, चोपदार, कुंटीण, वंजारीण इ. समाजाच्या विविध थरांतील लोकांच्या दैनंदिन कर्मांच्या वा व्यवसायांच्या परिभाषेतही त्यांनी आपली रचना केली. स्त्री-शूद्रांचा त्यांनी कैवार घेतला. सर्वांवर प्रेम करणे आणि दुःखितांची कणव करणे, हे त्यांनी आयुष्यभर केले.

वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे वर्णन करीत असताना संत बहिणाबाईंनी ‘तुका झालासे कळस’ असे सार्थ उद्‌गार काढले आहेत. कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची परिपूर्ती तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झालेली आढळते. “अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता ह्यांच्या मुशीत भागवत धर्माने ओतलेली सुवर्णमुर्ती म्हणजे तुकाराम”, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी म्हटले आहे. तुकारामांच्या जीवनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे ते हळूहळू, आध्यात्मिक प्रवासाचा एकेक टप्पा पार करीत’अणुरणीया थोकडा । तुका आकाशाएवढा।। ‘ अशी प्रचीती घेण्याइतके मोठे झाले. अभंगाच्या द्वारे आपल्या अनुभवांचे खडे बोल ऐकवीत त्यांनी सामान्यांना परमार्थबोध केला.

उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती ह्यांचाच वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव आहे.

वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्तिपंथ आहे; म्हणून त्याला आधारभूत असलेल्या तत्त्वज्ञानात पांडित्याचा प्रपंच नाही. भक्तिरसात न्हालेल्या संतांचा अनुभव, हेच त्या तत्त्वज्ञानाचे अंतिम प्रमाण होय. सकृद्‍दर्शनी असे वाटते, की भक्तीचे समर्थन करणारे तत्वज्ञान मध्वाचार्यांच्या मतासारखे द्वैतवादी असावयास हवे. देव हा भक्ताहून वेगळा असल्याशिवाय त्याची भक्ती करावयाची कशी? ही अडचण वारकरी संतांस वाटली नाही. भक्ती हा पाचवा पुरूषार्थ आहे आणि तो परमपुरूषार्थ आहे. तेव्हा ह्या परमपुरूषार्थाचे समर्थन करणे, हे वारकरी तत्त्वज्ञानाचे  प्रयोजन आहे.

चिद्विलासवाद म्हणजेच वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान होय. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामांची गाथा या ग्रंथांतून ते तत्त्वज्ञान अनुस्यूत आहे, असे म्हणता येईल. सारांशाने ते तत्त्वज्ञान असे: सर्वत्र केवळ एका आत्मतत्त्वाचे-म्हणजे चैतन्याचे स्फुरण आहे. ते स्वसंवेद्य आहे.म्हणजे त्याच्या अस्तित्वाला कोणताही बाह्य पुरावा लागत नाही. त्यास ‘असत् ’ असे म्हणताच येणार नाही. कारण जो म्हणणारा तेच आत्मतत्त्व होय. त्याच्या अभावाचे भान होणार नाही. कारण भान (चित्) हेच त्याचे स्वरूप होय. हे चैतन्य आनंदरूप आहे, असा संतांचा अनुभव आहे.

भक्तीचा हा अनुभव म्हणजे परमपुरूषार्थ होय. या भक्तिची गोडी एकांतात नसून संतांच्या संगतीत आहे.

वारकरी संप्रदायाला जी अमाप लोकप्रियता मिळाली, तिची काही स्पष्ट कारणे आहेत.  सर्वसामान्यांशी ह्या पंथाने अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले. उत्कट भक्ति, सदाचार, नीती ह्यांवर आधारलेला सरळमार्गी आचारधर्म  ह्या संप्रदायाने सांगितला. कर्मकांडांना थारा दिला नाही. वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती ही प्रवृत्तिपर आहे. समाजधारणेला पोषक होणारी कर्मे सोडण्याचा उपदेश ह्या संप्रदायाने आपल्या अनुयायांना कधीच केला नाही. कर्मबंधनाची यातायात टाळण्यासाठी प्रत्यक्ष कर्माचा त्याग केला पाहिजे, अशी ज्ञानेश्वरांचीही भूमिका नव्हती.

वारकरी संप्रदायाने संकुचित सांप्रदायिकतेला थारा न देता सर्वसंग्राहक वृत्ती जोपासली. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत जे विठ्ठल, तेच एका महासमन्वयाचे प्रतीक आहे आणि संतांनी शैव, वैष्णव, बौद्ध, जैन इ. विविध धर्मधारांचा विठ्ठलाच्या ठायी संगम साधला आहे. असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा नाथपंथीयांची होती, पण लोकांना सांगण्यासाठी त्यांनी नाथपंथाचे तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ निवडला नाही, तर गीतेची निवड केली.

वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्यांमध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती. ज्ञानेश्वरादी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकण्यात आले होते. तुकोबांचाही अनेक प्रकारे छळ झाला होता. पण त्यामुळे समाजापासून फटकून राहण्याची वृत्ती त्यांनी कधीही धारण केली नाही.

वारकरी संतांनी राजाश्रयाची आस कधीही धरली नाही. सामान्य माणूस हाच ह्या पंथाचा कायम आधार राहिला. लोकसंग्रह हे ह्या पंथाचे वैशिष्ट्य राहिले. प्रत्येक वारकरी आपापली कामे करूनच उदरनिर्वाह करीत असल्यामुळे भिक्षावृत्तीला ह्या पंथात थारा नाही.

वारकरी पंथाने देशी भाषेला जे महत्त्व दिले, ते महानुभाव पंथीयांनीही दिले होते. बौद्ध, जैन, लिंगायत ह्यांनीही देशी भाषेचा पुरस्कार केला होता. तथापि आपल्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वारकरी पंथीयांनी मराठी भाषेच्या जोडीला स्वतःचे असे एक तंत्र उपयोगात आणले, ते म्हणजे – श्रोत्यांबद्दलचा आदरभाव!

वारकरी संप्रदायाचे नियम असे आहेत: १. सत्य बोलावे. २. परस्त्रीला मातेसमान मानावे. ३. कांदा लसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. ४. मद्यपान वर्ज्य करावे. ५. रोज हरिपाठ करावा, तसेच ‘रामकृष्णहरी’ ह्या मंत्राचा जप करावा. ६. प्रपंचातील कर्मे श्रीविठ्ठलस्मरण करीत पार  पाडावी.

वारकरी संप्रदायात चैतन्य संप्रदाय ,स्वरूप संप्रदाय ,आनंद संप्रदाय आणि प्रकाश संप्रदाय अनुस्यूत आहेत.

समर्थ संप्रदाय

समर्थ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखितं धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध आहेत.

समर्थ संप्रदाय तुलनेत अर्वाचीन आहे तरीही तो चारशे वर्षे अस्तित्वात आहे. मूल्यांकनासाठी आणि तुलनेसाठी एवढा कालावधी निश्चितच पुरेसा आहे. संसारातील दुःखांना घाबरून त्यापासून पळ काढण्यापेक्षा प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यात समतोल साधणारी विचारधारा समर्थ संप्रदायात आढळते. हा संप्रदाय ऐहिक आणि पारलौकिक उन्नयनाचे परिशीलन करतो. स्वतः समर्थांनी हरिकथा -निरूपण, राजकारण ,सावधानता , उद्योगशीलता यांचा सतत  पाठपुरावा केला आहे.

प्रयत्न, प्रबोधन आणि प्रत्यय या तीन शब्दात समर्थांचे आणि त्यांच्या ग्रंथांचे  सार आहे.

वारकरी संप्रदाय निवृत्तीपूरक आहे परंतु समर्थ संप्रदाय त्याला यथानुरूप प्रवृत्तीचीही जोड देताना दिसतो. हेच समर्थ संप्रदायाचे वैशिष्ठय आहे.

समर्थ म्हणतात –

रामदासी ब्रह्मज्ञान सारासारविचारण।
धर्मसंस्थापने साठीं कर्मकांड

अथक सावधानता आणि प्रयत्नांची कास न सोडणे यावर समर्थ रामदास स्वामींचा विशेष भर होता. त्यातून स्वराज्य प्राप्ती होऊ शकते हे त्यांनी अधोरेखित केले. मर्यादा पुरुषोत्तम रामाची उपासना समर्थांनी सांगितली आणि त्याला बलशाली हनुमंताची जोड दिली. समर्थ संप्रदाय भगवद्गीतेत सांगितलेला कर्मयोगाचा मार्ग शुद्ध अंतःकरणाने निवडायचे प्रतिपादन करतो- यांत गृहस्थ आणि विरक्त दोघेही येतात. विरक्तांसाठी ब्रह्मचार्याचे पालन करून भिक्षेवर जीविका चालविण्याचे, जोडीला निष्काम बुद्धीने समाजाच्या धारणा विकसित करणे आणि आत्मज्ञान गाठीला जोडणे असे समर्थांचे आदेश आहेत.

दासबोध ,करुणाष्टके ,आत्माराम ,मनाचे श्लोक असे समर्थांनी केलेले विपुल लेखन या संप्रदायात शिरी धारण केले जाते. रामदास स्वामींनी सुरु केलेला रामनवमी उत्सव आजही तितक्याच उत्साहात साजरा केला जातो आणि या उत्सवाचा विधीही समर्थांनी आखून दिलेला आहे.

राममंत्राचे समर्थ लिखित ४९ श्लोक विख्यात आहेत त्यापैकी दोन श्लोक वानगीदाखल खाली उद्धृत केले आहेत –

तुला हि तनू,मानवी प्राप्त झाली।
बहू जन्म पुण्यें, फला लागिं आली।।
तिला तूं कसा, गोंविसी विषयीं रे।
हरे राम हां मन्त्र, सोपा जपा रे।।

कफें कंठ हा, रुद्ध होईल जेव्हां।
अकस्मात तो, प्राण जाईल तेव्हां।।
तुला कोण तेथे, सखे सोयरे रे।
हरे राम हां मंत्र, सोपा जपा रे।।

“मनाच्या श्लोकात ” मनाला संबोधून स्फूर्तिदायक उपदेश केलेला आहे. त्याची मोहिनी आबालवृद्धांवर आजही आहे.

स्वराज्य स्थापनेला आवश्यक ती सामाजिक मशागत आणि अध्यात्मिक अधिष्ठान समर्थ संप्रदायाने केले. गावोगावचे मठ, महंत, शिष्य, बलोपासना, रामजन्मोत्सव, मारुती मंदिरे आणि सांप्रदायिक उपासनापद्धती याद्वारे समर्थ रामदास स्वामींनी समाजमन तयार केले. सतराव्या शतकात रामदासी मठ देशभरातील अकरा राज्यांमध्ये ‘अध्ययन-अध्यापनातून लोकशिक्षण-ज्ञानोपासनेच्या केंद्रांचे जाळे’ बनले होते! या मठांना तीर्थक्षेत्राचे स्वरूप न देता ‘लोकशिक्षणाची’ प्रेरक श्रद्धास्थाने बनवीत, ‘रामदासी ज्ञानोपासक मठरचना’ समर्थोत्तर कालखंडात सजीव राहिली.

समर्थ संप्रदायाच्या पारमार्थिक संघटनामध्ये अन्य संप्रदाय व त्यांच्या उपासना पद्धतींचे अध्ययनही होत असे.

बहुतेक संतांना मानवी गुरू आहेत. समर्थांना मानवी गुरू नाही. स्वतः श्रीरामाने त्यांना राममंत्राचा अनुग्रह दिला अशी श्रद्धा आहे. ते स्वयंप्रज्ञ होते. आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी स्वत:च ठरविले, आणि ते साध्य करण्यासाठी मार्गही स्वत:च शोधला. समाजाविषयी अपार तळमळ, करूणा, हीच त्यांची प्रेरणा होती. धर्मसंस्थापना हेच त्यांचे कार्य होते.

“शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे।वसिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे। कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा त्यांच्याबद्द्लचा श्लोक सार्थच आहे.

एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ दोन शव्दांत सांगतां येते – प्रयत्न व सावधानता!

श्री समर्थ रामदास स्वामींनीं प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्रीसमर्थांना जाववली. श्रीसमर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती करेल असा श्री समर्थांचा विश्वास होता.

त्यांनी इ. स. १६४४ मध्ये शहापूर (जि. सातारा) येथे पहिला मारुती स्थापन करुन समर्थ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करुन संप्रदायाला संघटनेचे स्वरुप दिले. अशा रितीने समर्थ संप्रदायासाठी संस्थानाची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्री रामदास स्वामींनीच केली व हेच संस्थान श्री रामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.

इ. स. १६४४ ते १६५२ या काळात अन्य दहा मारुतींची स्थापना करुन एकूण अकरा मारुती स्थापन केले आणि समर्थ संप्रदायाच्या कार्याला चालना दिली. समर्थांची परंपरा योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या निर्वाणानंतर ३३ वर्षे चालविली. कल्याण स्वामी समर्थांचे “लेखनिक “म्हणून ओळखले जातात. दासबोधासह बहुतेक सर्व समर्थ साहित्य हे कल्याण स्वामींच्या हातचे उपलब्ध आहे.

” स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहीतसे ! ” असे त्यांच्या बद्दल लिहिले गेले आहे. कल्याण स्वामींनी दासबोध धारण केला होता आणि साहजिकच ते समर्थांचे उत्तराधिकारी ठरले. समर्थ सांप्रदायिक साहित्यात ” रामचंद्र जैसा मारुती ! तैसा दासा कल्याण !! ” असा उल्लेख आढळतो. शिष्य पूर्णपणे तयार झाला की त्याच्यात गुरुत्व येते आणि गुरु -शिष्य परंपरेनुसार समर्थांनी जगाच्या कल्याणार्थ कल्याण स्वामींना परांडा,डोमगांव या भागात पाठविले. परंपरेने त्यांना “योगीराज “ही उपाधी लागली. समर्थ संप्रदायाच्या प्रसारासाठी समर्थांच्या खालोखाल कल्याण स्वामींनी शिष्य परंपरा तयार केली. जगन्नाथ स्वामी ,रामाजी दादा ,हरीबाबा भूमकर,शिवराम स्वामी ही त्यातील काही प्रमुख नावे ! डोमगाव मठ या कार्याचा केंद्रबिंदू होता. त्यांनी २५० हून अधिक मठांची स्थापना मराठवाडा,आंध्र ,कर्नाटक सीमाभागात करून समर्थ संप्रदाय बहुपदरी केला. ‘ओव्या संतमाळा” या रचनेत संपूर्ण भारतातील संतांना एक एका अवयवाचे, वस्त्राचे रूपक देऊन रामाचे सगुण रूप बहरदारपणे व्यक्त केलेले आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी १३ व्या शतकात भक्तिमार्गाने जाणाऱ्यांना प्रत्यक्ष भगवंत भेटेल अशी ग्वाही दिली. या भक्तीचे अधिष्ठान वापरून शक्तीयुक्तीने रामराज्याची स्वप्ने पाहणारे समर्थ रामदास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सामर्थ्याचा जप करीत. शरीर ,बुद्धी आणि आत्मसामर्थ्याचा रामदास स्वामींनी पुरस्कार केला.

पंढरीचा विठ्ठल मानवी मनाचे श्रद्धास्थान आहे. माउलींनी त्याच्या सन्निध जाण्यासाठी वारी सुरु केली. ही वारी करणारे समर्थ विठुरायाचे भक्त होते. विठ्ठल ही सामर्थ्याची मातृसंकल्पना आहे. समर्थ वारकरी होते. आपल्या तीर्थाटनाच्या दरम्यान रामदास स्वामी पंढरपुरी विठ्ठल दर्शनासाठी आले. त्या पहिल्या दर्शने त्यांच्यातील अष्टसात्विक भाव जागृत झाले. समर्थांना विठुरायात रामराय दिसला. हे अद्वैत त्यांनी खालील शब्दात मांडले –

राम कृपाकर विठ्ठल साकार 
दोघे निराकार एकरूपे 
आमुचिये घरी वस्ती निरंतर 
हृदयी एकाकार राहियले 
रामदास म्हणे धरा भक्तिभाव 
कृपाळू राघव पांडुरंग 

समर्थांना जेव्हा अंतरीचा कल्लोळ साहवेना, तेव्हा ते म्हणतात –

येथे का रे उभा श्रीरामा I मनमोहन मेघश्यामा II
काय केली शरयूगंगा I येथे वाहे चंद्रभागा II
काय केली अयोध्यापुरी I येथे वसविली पंढरी II
धनुष्यबाण काय केले I कर कटावरी ठेले II
काय केली सीतामाई I येथे राई -रखुमाबाई II
रामी रामदासी भावे I तैसा झाला पंढरीनाथ II

समर्थांचा विठ्ठल- भक्तीचं, प्रेमाचं प्रतीक होता. हे दैवत प्रेमळ, सौम्य! मात्र त्या कालखंडात सामर्थ्यशाली , पराक्रमी देवदेवतांची निकड समर्थांनी जाणली. विठ्ठलाच्या हाती धनुष्यबाण दिलं की तो प्रभु श्रीराम होतो आणि ते उतरवून ठेवलं की पुनश्च सावळा विठुराया होतो. दोन्ही आराध्य दैवते सारखीच आहेत. देशाच्या उन्नयनासाठी समर्थांना शक्ती-भक्तीच्या दैवतांची एकत्रित आवश्यकता होती. भक्तिनिष्ठ मनाला बलशाली संप्रदायाची वाट त्यांनी दाखविली. हा समन्वय जाणीवपूर्वक घडवून आणलेला होता. भक्ती ही जर आध्यात्मिक विकासाची प्रथम पायरी असेल तर सामाजिक विकासासाठी शक्ती ही पुढची पायरी आहे.

समर्थांनी प्रतिकूल परिस्थितीत सज्जनांना समर्थ केलं आणि समर्थांना सज्जन केलं. समर्थांचा हा भक्ती शक्ती योग नक्कीच आचरणीय आहे. या दोन्ही संप्रदायातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तावेज नुकताच समोर आला असून रामदासी परंपरेतील अप्रकाशित “तुकाराम चरित्र” संशोधकांच्या हाती लागले आहे. या हस्तलिखितात संत तुकाराम महाराज यांचा उल्लेख “तुकारामसमर्थ “असा करण्यात आलेला आहे. यावरून रामदासी परंपरेत तुकाराम महाराजांना असलेले मानाचे स्थान अधोरेखित झालेले आहे. विशेष म्हणजे रामदासी परंपरेत याआधीही जगद्गुरु तुकाराम महाराज यांची चरित्रे लिहिण्यात आलेली आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांनीही या संशोधनाला दुजोरा दिला आहे.  त्यांनी म्हटले आहे- ” वारकरी संप्रदायाच्या फडांवर, मठांत तुकोबारायांची जितकी हस्तलिखिते उपलब्ध होतात, तितकी हस्तलिखिते रामदासी मठात आहेत. ”

रामदासी परंपरेचे तत्वज्ञान प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारे आहे. पण रामदासी मठांत वेदांत परंपरेतील तत्वज्ञानाचे प्रमाण म्हणून वारकरी वाङ्मयाचेही अध्ययन होत असे, ज्यांत प्रामुख्याने तुकोबारायांच्या अभंगांचाही समावेश असे.

समर्थांचे समकालीन होते जगद्गुरू तुकाराम महाराज ! दोघांच्या शिकवणुकीत कमालीचे साधर्म्य आढळते. रामदास स्वामींचे लेखन अधिक दाहक आणि तीक्ष्ण असले तरी प्रसंगी तुकाराम महाराजही अतिशय ‘रोकडे” आणि “प्रत्यक्ष” लेखन करीत. त्याबाबत समर्थांनी मनोज्ञ वर्णन केले आहे –

” साधू दिसती वेगळाले I परि ते स्वरूपी मिळाले II”

मला वाटतं वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये थोडीशी “फट “असली तरीही समर्थांचे वरील सार्वकालिक वचन सगळ्यांनी ध्यानी ठेवले तर “भक्ती संप्रदाय समन्वय” वेगळा समजावून सांगण्याची गरज भासणार नाही.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..