मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैद्राबाद (दक्षिण) येथे झाला. भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू रामकृष्णबुवा वझे. भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले.
नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका मा भालचंद्र पेंढारकर यांनी गाजवल्या होत्या. भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही नाटके विशेष गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’मधील पेंढारकर यांनी साकारलेली ‘दिगू’ ही व्यक्तिरेखा अजरामर झाली.
याच नाटकातील ‘आई तुझी आठवण येते’ हे गाणेही खूप गाजले. मा.पेंढारकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आदी अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि दिलेल्या वेळेतच नाटय़प्रयोग सुरू करणारे निर्माते म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबई मराठी साहित्य संघात सादर झालेल्या ३०० नाटकांचे ध्वनिमुद्रण पेंढारकर यांनी करून ठेवले आहे.
भालचंद्र पेंढारकर यांनी संपूर्ण आयुष्य ललित कलादर्श या संस्थेसाठी वाहिले. या संस्थेची शतकोत्तर यशस्वी वाटचाल सुरू आहे ती केवळ पेंढारकर यांच्यामुळेच. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले. ५०च्या शतकात मरगळ आलेल्या मराठी संगीत नाटकांना पुनरुज्जीवित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘स्वामिनी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘जयजय गौरीशंकर’, ‘आनंदी गोपाळ’, ‘बावनखणी’ अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाट्यकृती त्यांनी रंगभूमीवर आणली. ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाने तर हजारो प्रयोगांचा विक्रम घडविला. नाटक नुसते आणले नाहीत तर ती गाजवून दाखवली. मा.भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते.
मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली. १ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. भालचंद्र पेंढारकर यांचे निधन ११ ऑगस्ट २०१५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली काही गीते.
आई तुझी आठवण येते
घनश्याम मुरली
जय जय कुंजविहारी
जय जय रमारमण श्रीरंग
तू जपून टाक पाऊल जरा
नयन तुझे जादुगार
मदनाची मंजिरी साजिरी
सप्तचसूर झंकारित बोले
Leave a Reply